मुंबईत बंद पडलेल्या एका मिलच्या जागी उभ्या राहिलेल्या एका भव्य वातानुकूलित तयार कपडय़ाच्या दुकानात मी पाऊल ठेवणार तेवढय़ात त्या दुकानाच्या बाहेर दरवाजाजवळ बसलेल्या एका तरुण रखवालदाराने माझ्याकडे बघून ओळखीचे हसू केले आणि उठून नकळत मला सवयीनुसार सॅल्यूट केला. मी जवळ जाऊन त्याची विचारपूस केली. तो माझ्या एका परिचिताचा तरुण नातू होता. तो बारावी पास होऊन नुकताच तिथे सिक्युरिटी स्टाफमध्ये नोकरीला लागला होता. माझे ते परिचित आणि त्यांचा मुलगा म्हणजे या रखवालदाराचे वडीलही या ठिकाणी पूर्वी जी मिल होती त्यामध्ये काम करत होते. पूर्वी दसऱ्याच्या दिवशी बाहेरील व्यक्तींनाही मिल बघण्याची खास परवानगी असे. मी लहान असताना त्या परिचिताबरोबर या ठिकाणी पूर्वी असलेली मिल पाहण्यासाठी गेलेलो मला स्पष्ट आठवते. त्या मिलमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांची बायका-मुले नटूनथटून मिल पाहाण्यासाठी येत आणि जाताना मिठाईचा पुडा त्यांच्या हातात असे. त्या अश्राप आनंदी जीवाचे हसरे चेहरे आजही मला स्पष्ट आठवतात. पुढे सगळ्या कामगार क्षेत्राचे अतोनात नुकसान घडवून आणणारा गिरण्यांचा संप झाला. माझे ते परिचित कुटुंब मिल बंद पडल्यावर आपली वरळीतील राहती जागा विकून गावी निघून गेले होते. याचे वडील आणि आजोबा स्वर्गवासी होऊनही आता चार-पाच वर्षे झाली होती. मी त्या थंडगार दुकानात शिरलो आणि ते भपकेबाज वातावरण मला गुदमरवू लागले. तेथले सर्वच कपडे मला तेलकट, घामट आणि काही ठिकाणी चक्क फाटलेले ठिगळ लावलेले भासू लागले, कदाचित तीही आता फॅशन असेल म्हणून मी स्वत:ची समजूत घालू लागलो. कुतूहलाने इकडेतिकडे पाहू लागलो तर काय, तिथे जागोजागी काही पुतळे तयार कपडे घालून उभे केले होते. त्या पुतळ्यांच्या जागी मला भकास डोळ्यांचे, कळाहीन चेहऱ्यांचे, दाढीचे खुंट वाढलेले, कानाच्या मागे विडीचे विझलेले थोटूक खोचलेले, हातात अॅल्युमिनियमचा तीन पुडांचा जेवणाचा डबा घेतलेले, पायात अंगठा तुटलेली चप्पल घातलेले गिरणी कामगार येणाऱ्याजाणाऱ्यांकडे लाचार पण क्रोधाने पाहात उभे आहेत असे वाटू लागले. ते भयंकर संतापलेले कामगार मला नखशिखान्त न्याहाळून कसला तरी शोध घेतायत आणि कुठल्याही क्षणी ते माझ्यावर चाल करून येतील असे वाटू लागले. मी तेथे काही खरेदी करण्यासाठी आलो आहे याचे भानही मला राहिले नाही. मला त्या थंडगार वातावरणातही दरदरून घाम फुटला. तिरमिरीत त्या भव्य दुकानाचे भव्य दार ढकलून बाहेर आलो आणि मागे न पाहाता सुसाट निघालो. बाहेर उभा असलेला तो तरुण रखवालदार मला अहो काका, काका करून हाका मारत होता. मला मागे वळून पाहाण्याचीसुद्धा हिंमत होईना. त्या अतिभव्य, सजवलेल्या थंडगार थडग्यापासून मला लवकरात लवकर दूर पळायचे होते.
ते भव्य थडगे आणि मी…
मुंबईत बंद पडलेल्या एका मिलच्या जागी उभ्या राहिलेल्या एका भव्य वातानुकूलित तयार कपडय़ाच्या दुकानात मी पाऊल ठेवणार तेवढय़ात त्या दुकानाच्या बाहेर दरवाजाजवळ बसलेल्या एका तरुण...
आणखी वाचा
First published on: 13-06-2014 at 01:19 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi blog