पॅलेस्टाइनमधील पुराणमतवादी, परंपरावादी संस्कृतीचा बळी ठरलेली एक कोवळी मुलगी-सुआद, परपुरुषाबरोबर बोलते, त्याच्या प्रेमात पडते म्हणून घरच्यांच्या अनन्वित छळाला सामोरी जाते. पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या घरात तिच्या उमलत्या भावनांना अक्षरश: पायदळी तुडवले जाते. तिचा मित्र लग्नाचे वचन देऊन तिला फसवतो. तिच्यामुळे घराण्याची अब्रू चव्हाटय़ावर येईल, या भीतीने घरातील कर्त्यां पुरुषाकडून तिला जिवंत पेटवून दिले जाते. पोटात चार महिन्यांचा गर्भ असताना, अग्नीच्या ज्वालांच्या लपेटय़ात अडकलेली सुआद, तिची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. ऑनर कििलगच्या या घटनेमुळे उन्मळून पडलेली सुआद केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचते. जॅकलिन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्तीमुळे नवे आयुष्य सुरू करते. पण ऑनर किलिंगच्या अशा पेटवून दिल्या गेलेल्या घटनांमधून वाचलेली, जिवंत असलेली एकमेव साक्षीदार म्हणून सुआद तिची कहाणी लिहण्यासाठी प्रवृत्त होते हा पुस्तकाचा गाभा आहे. मात्र जिवंत पेटवून दिल्याने तिच्या शरीरावर असलेल्या जखमा, तिची विद्रुपता, ती कुणालाच नकोशी झाली आहे ही भावना या सगळ्या अनुभवांचे गंभीर, शारीरिक व मानसिक परिणाम तिच्यावर होतात. इतके की तिच्या भूतकाळातील जखमा, त्यांचे व्रण यांच्यात अडकलेली तिची मानसिकता पदोपदी, क्षणोक्षणी तिचा पिच्छा पुरवते, तिचा आत्मविश्वास पार धुळीस मिळवते. भाजलेल्या त्वचेमुळे ती कुरुप दिसायला लागते, पण ही कुरुपता तिच्या मनावर पुटं धारण करू लागते. पण त्यातूनही तग धरणारी, सामान्य स्त्रीप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी आसुसलेली सुआद, एक प्रेयसी, एक पत्नी, एक आई ते एक समाजसेवी व्यक्ती अशा विविध भूमिकांमधून वाचकांना भेटते आणि तिच्या आयुष्याचा प्रवास उलगडताना, तिच्यावरच्या अत्याचाराचे- छळाचे वाचक जणू साक्षीदार असल्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानांतून येतो.
सुआद तिची शोकांतिका मांडते आहे, अशा प्रथमपुरुषी स्वरातून पुस्तकाची सुरुवात होते आणि अगदी सहज, सोप्या भाषेत तिच्या पॅलेस्टिनी घराचे, गावाचे, तिथल्या समाजाचे चित्र आपल्यापुढे उभे राहते. भूतकाळातील तपशील, घटनांची सुसंगती लावण्यात गोंधळात पडलेली सुआद, तिची ही केविलवाणी मन:स्थिती पाहिल्यावर या आठवणी तिच्यासाठी इतक्या वर्षांनंतरही किती नकोशा, जीवघेण्या आहेत याची खात्री पटते.
नूरा, कैनात, सुआद आणि.. तिच्या चौथ्या बहिणीने नाव काही केल्या तिला लक्षात येत नाही. काही प्रसंग सोडले तर तिला तिच्याविषयी काहीच आठवत नाही. तिच्या घरातला अंधार, मुलींनी पायघोळ, गळाबंद करडय़ा वा मळकट रंगाचे झगे घालावे हा वेष, मुलींसाठी शिक्षण निषिद्ध. परक्या पुरुषाशी सोडाच अनोळखी स्त्रीशीसुद्धा संभाषण करायचे नाही हा शिरस्ता, दिवसभर कष्ट करून, राबूनही मुलींपेक्षा घरातील शेळ्या-मेंढय़ांची पत जास्त चांगली अशा मताचे वडील व हिसंक वृत्तीचा तिचा भाऊ या वर्णनामुळे तत्कालीन पुरुषसत्ताक व्यवस्थेचे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होते. सुआदच्या आईला एकूण १४ मुले झाली. मात्र त्यातली ५ जगली, मात्र उरलेल्यांना जन्माला आल्या आल्या आईनेच अंथरुणात लपेटून संपवून टाकले होते. मुली जन्माला आल्या तर त्यांचे काय करायचे, हा धडा इथूनच तिच्या मोठय़ा बहिणीला मिळाल्याचे सुआद म्हणते. बाहेरख्याली मुलीला ‘चारमुटा’ म्हणत व त्यांच्या या कृत्याची शिक्षा म्हणून त्यांना जिवे मारले जाई, याचीच तर सुआद साक्षीदार होती.
जॅकलिन ही कार्यकर्ती, कर्तव्यभावनेपेक्षा माणुसकीच्या दृष्टीने सुआदला व तिच्या बाळाला वाचवते. तिला युरोपात घेऊन जाते. नव्याने आयुष्य जगण्यासाठी सुआदला किती मानसिक व शारीरिक दिव्यातून जावं लागलं. तिच्या मुलाशी तिचे विभक्त होणे, नव्याने प्रेमात पडून संसार थाटणे, दोन कन्या रत्नांच्या प्राप्तीनंतर, आपली कहाणी जगासमोर मांडायला तयार झालेली सुआद, इतक्या वळणांवर असहाय, केविलवाणी झालेली दिसते की आता ही संपलीच असे वाटत असताना नवऱ्याच्या, मुलींच्या व आप्तेष्टांच्या प्रेमामुळे/ पािठब्यामुळे ती पुन्हा उभी राहते. मुलगा मारूआनचा तिच्या आयुष्यात झालेला पुनप्र्रवेश तिला पूर्णत्वाकडे घेऊन जातो.
मात्र या सगळ्यात सुआदचा एक गुण अधोरेखित करावा असा वाटतो, घोर अन्यायाला सामोरी गेल्यावरही तिच्यातील माणुसकी संपत नाही. तिच्या आठ आणि दहा वर्षांच्या मुलींना ती तिच्या भूतकाळाबद्दल अत्यंत संवेदनशीलपणे माहिती देते, त्यांना कळेल, समजेल अशा स्वरूपात तिच्या जखमांची ओळख करून देते. पण मुलींनी, तिच्यावरच्या अन्यायाचा सूड उगवावा असा तिचा सूर नाही. मुलींनी सगळ्याच अरबी पुरुषांचा तिरस्कार करावा असे तिला वाटत नाही. हा तिचा समजूतदारपणा कौतुकास्पद आहे.
सुआदच्या धैर्याची, दुर्दम्य इच्छाशक्तीची, जगण्याच्या चिवट महत्त्वाकांक्षेची व पॅलेस्टिनी भूमीतील स्त्रियांच्या जगण्याच्या आलेखाची कल्पना येण्यासाठी ..तरीही जिवंत मी हे पुस्तक वाचावयास हवे. एकूण ३९ भाषांमध्ये अनुवादित झालेली ही कहाणी अत्यंत प्रेरक आहे.
..तरीही जिवंत मी
मूळ लेखिका- सुआद,
अनुवाद : गौरी देशपांडे, मेहता पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठे- २०२, मूल्य- २५० रु.
पुन्हा गुरुदत्त
सुहास जोशी
गुरुदत्त यांच्या निधनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. आजवर गुरुदत्तवर भरपूर लिखाण झालं आहे, तरीदेखील त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिवर्षांनिमित्ताने आजही त्याच उत्साहानं लिहिलं जातंय. संदर्भ बदलले, काळ बदलला, समाज बदलला, महत्त्वाचं म्हणजे चित्रपटदेखील बदलला आहे. तरीदेखील गुरुदत्तवर लिखाण व्हावं, चर्चा झडाव्यात असं नेमकं काय गारूड आहे? ‘रात गर ढल गई, फिर ये खुशियाँ कहाँ?’ असे म्हणताना गुरुदत्तांना क्षणभंगुरत्वाची तीव्र जाणीव दिसून येते. मात्र त्यांच्या कलाकृती कधीच क्षणभंगुर ठरल्या नाहीत. याचं कारण त्यांची अभिजातता. त्यामुळेच पन्नास वर्षांनंतरदेखील गुरुदत्तांच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीवर लिहिणं क्रमप्राप्त ठरतं. ‘वास्तव रूपवाणी’चा गुरुदत्त विशेषांक हा त्याच क्रमप्राप्त मालिकेतील एक म्हणावा लागेल. संग्राह्य़ दस्तऐवजाचे स्वरूप असणाऱ्या या पुस्तकातून गुरुदत्तच्या अभिजाततेचे सारे पैलू उलगडण्याचा प्रयत्न झाला आहे.
गुरुदत्त यांच्या कलाकृतींवर चिकित्सक प्रकाश टाकणारे लिखाण, गुरुदत्तवरील आजवरच्या लेखांचं संकलन आणि अभ्यासकांना उपयोगी असे संदर्भ लिखाण असा एकंदरीत गुरुदत्तांचा जागर या पुस्तकात मांडला आहे. गुरुदत्तांची मानसिकता, मनस्वी जगणं, संवदेनशीलता, अस्वस्थता, एकटेपणा, मृत्यूची ओढ, सर्जनशील मन या सर्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न अभ्यासक आणि पत्रकारांनी या पुस्तकात केला आहे.
गुरुदत्तांना समजून घ्यायचं असेल तर व्ही. के. मूर्ती, अबरार अल्वी आणि साहिर यांदेखील समजून घ्यावं लागतं. किंबहुना या कलावंतांना गुरुदत्त नेमका उमजला होता. त्यांची नाळ जुळली होती. गुरुदत्तला जे हवं होतं तेच मलाही हवं असायचं, व्ही. के. मूर्तीचं हे वाक्य कमी-अधिक प्रमाणात तिघांनाही लागू पडतं. ‘प्यासा’मधील कविमनाचं सारं दु:ख साहिरनं कधी ना कधी अनुभवलं होतं. या संदर्भात या पुस्तकातील लेख महत्त्वाचे आहेत.
‘जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ हैं’ या लेखात रेखा देशपांडे यांनी गुरुदत्तांच्या गीतकारांवर, मनोभूमिकेवर प्रकाश टाकला आहे. अर्थातच लेखातील फार मोठा भाग साहिरने व्यापला आहे. गुरुदत्त आणि साहिरची जडणघडण, मनोभूमिका, त्या काळातील देशातील सामाजिक बदल या सर्वाचा गुरुदत्तांच्या चित्रपटगीतांवर पडलेला प्रभाव अतिशय पद्धतशीरपणे उलगडून दाखविला आहे. गीतं हा त्यांच्या चित्रपटांचा आत्मा आहे. केवळ गीतं हवीत म्हणून ती कधीच आली नाहीत. उर्दू शायरीच्या अंगाने जाणाऱ्या गीतांचं प्रयोजन त्यातील अर्थगर्भ गूढता ही कशी आली असेल, रचनाकाराला नेमकं काय म्हणायचं असेल हे जाणून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरतो. व्ही. के. मूर्तीच्या मुलाखतीवर आधारित सिनेपत्रकार अशोक राणे यांचा लेख थेट गुरुदत्तांच्या सेटवरच घेऊन जातो. गुरुदत्तांना जे दाखवायचं होत ते व्ही. के. मूर्तीनी अचूकपणे पडद्यावर मांडलं. गुरुदत्तांच्या चित्रपटातील त्या अद्भुत आणि अभूतपूर्व अशा प्रतिमा पडद्यावर नेमक्या कशा आल्या असतील या प्रचंड उत्सुकतेपोटी लेखकाने मूर्तीना बोलतं केलं आहे आणि ‘त्या अलौकिक प्रतिमांचा वसंतोत्सव’ या लेखात नेमकं मांडलं आहे. त्या वसंतोत्सवाची भव्यता आणि सर्जनशीलता सारं काही या लेखातून उलगडतं. तुलनेने गुरुदत्तांचा पटकथाकार अबरार अल्वी यांच्या मूळ लेखाचा अनुवादित लेख खूपच त्रोटक वाटतो.
गुरुदत्तांचे भव्यदिव्य प्रोजेक्शन असणाऱ्या ‘साहिब बीबी और गुलाम’ या कलाकृतीवरील दोन्ही लेख वेगळा विचार मांडतात. कथानकातील नात्यांची गुंफण, तत्कालीन पश्चिम बंगालमधील परिस्थिती, सरंजामशाहीचा पडता काळ आणि त्या पाश्र्वभूमीवर घडणारं हे महानाटय़, बिमल मित्र यांची ही कलाकृती सिनेमा माध्यमात आणतानाचा प्रवास आणि आणि भूतनाथ-छोटी बहू यांच्या नातेसंबंधाच्या अनुत्तरित प्रश्नांची उकल जाणून घेण्यासाठी सिनेपत्रकार सुधीर नांदगावकर यांचे हे दोन्ही लेख महत्त्वाचे आहेत. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ आणि ‘साहिब बीबी और गुलाम’ या चित्रपटांच्या अनुषंगाने अंधारातली बाजू मांडणाऱ्या अरुण खोपकर यांनी या पुस्तकात ‘बाजी’, ‘बाज’, ‘जाल’ आणि ‘आरपार’ या चित्रपटांत आढळलेली प्रकाशातली बाजू अरुण खोपकर यांनी दाखवून गुरुदत्तांच्या कलाकृती पाहण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिला आहे.
श्याम बेनगेल, वहीदा रहमान, देवीदत्त या गुरुदत्तांच्या निकटच्या व्यक्तींनी आणि कलाकारांनी गुरुदत्त यांच्या भावविश्वावर प्रकाश टाकला आहे. तत्कालीन फ्रेंच सांस्कृतिक केंद्राचे संचालक आंरी मिचेलो यांच्यावर गुरुदत्तांच्या कलाकृतींनी गारूड केलं होतं. एका फ्रेंच नियतकालिकात त्यांनी हे गारूड प्रदीर्घ लेखातून मांडलं, त्याच्या अनुवादाचा गोषवारा हा तर गुरुदत्तांच्या कारकीर्दीचा र्सवकष आढावा घेणारा आहे. त्याचबरोबर विश्वास पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, कृपाशंकर शर्मा, विजय आपटे, कविता सरकार यांनी गुरुदत्तांच्या कलाकृतींची वेगवेगळ्या अंगाने चिकित्सा केली आहे. वि. गो. नमाडे, डॉ. सुमती क्षेत्रमाडे, जयंत धर्माधिकारी यांचे गुरुदत्तांसोबतचे अनुभव वाचनीय आहेत.
एकंदरीतच गुरुदत्तांचा सर्वागीण आढावा असं या पुस्तकाचं स्वरूप म्हणावं लागेल. पण अनेक ठिकाणी पुनरावृत्तीदेखील झाली आहे. गुरुदत्तांच्या अभिजाततेविषयी चर्चा करताना तेवढं टाळलं असतं तर बर झालं असतं.
गुरुदत्त
वास्तव रूपवाणी विशेषांक – सप्टें.-ऑक्टो.-नोव्हें.-डिसें. १४
प्रकाशक : ग्रंथाली
संपादन : सुधीर नांदगावकर
कार्य. संपादक : रेखा देशपांडे
पृष्ठे : २१६; मूल्य : २२५/- रु.