लहान बाळ जेव्हा बोलू लागते, तेव्हा घरातील माणसांच्या आनंदाला पारावार उरत नाही, कारण त्याला बोलता येऊ लागल्यामुळे, संवादाचे माध्यम सापडलेले असते. त्याच्या मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्यास ते समर्थ झालेले असते. मनुष्य हा इतका समाजशील आहे की त्याला सतत संवाद साधण्याची, अभिव्यक्त होण्याची ओढ असते. आपल्या भावना, श्रवणशक्ती, अनुभव घेण्याची क्षमता व व्यक्त होण्याची कला यामुळे आपले व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण निश्चित होते आणि म्हणूनच आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो.
मानवाने केलेल्या अनेक संशोधनांमुळे इतकी प्रगती झालीय की आपल्या पूर्वापार जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. घरोघरी फोन आल्यामुळे सविस्तर पत्रलेखन बंद झाले. आपसूक देवाणघेवाणीचा मजकूर आटला. अतिव्यग्रता, धावपळ आणि वेळ नसणे या सबबीमुळे घराघरातून एकमेकांशी होणारे भावनांचे प्रकटीकरण आणि संभाषण यांना संक्षिप्त स्वरूप आले. त्यानंतर इंटरनेट व ऑनलाइन पद्धती अस्तित्वात आल्यावर सगळे प्रत्यक्ष संभाषणापेक्षा, चॅटिंग करताना दिसू लागले. या वेळी टायपिंग हे व्यक्त होण्याचे माध्यम बनले. त्यानंतर मोबाइल फोन आला. त्याबरोबर मेसेज पाठवण्याची आयती सोय झाली.
पण या सर्वामुळे एक गोष्ट मागे पडत चाललीय, ती म्हणजे एकमेकांसाठी पुरेसा वेळ देऊन, एकमेकांना समजून घेऊन, आपल्यातील स्पर्श, भावना व्यक्त करून एकमेकांशी साधलेला सुसंवाद.
प्राध्यापक व मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या लेखिका डॉ. नीना सावंत यांनी आपल्या ‘संवाद’ या पुस्तकातून, त्यांच्या अनुभवांच्या शिदोरीतून तयार झालेला संवाद आपल्याशी साधला आहे. आयुष्यातील अनेक टप्प्यांवर वेगवेगळे नातेसंबंध हाताळताना, घराबाहेरील जगात वावरताना प्रत्येकाशी संवादाचे स्वरूप कसे असावे, याचे अतिशय सोप्या पण मार्मिक शब्दात वर्णन केले आहे.
आज घराघरात आपण जी बालक आणि पालक यांच्यात वाढत जाणारी ताणतणावांची दरी अनुभवतो आहोत, ती ‘मुलांबरोबर सुसंवाद’ या लेखातील सुसंवादाची तत्त्व अनुसरल्यास नक्कीच कमी होईल. घराघरातून उसवलेल्या नात्यांची वीण नक्कीच नव्याने साधली जाईल. पौगंडावस्थेतील मुलांशी कसा संवाद साधावा, त्यांना बोलते करून लैंगिक शिक्षणाचे मार्गदर्शन कसे करावे?, दत्तक मूल घेतले असल्यास त्याबद्दल त्याला कधी व कसे सांगावे? त्याच्यात प्रेम आणि आपुलकीची जाणीव कशी निर्माण करावी? योग्य संवादातून आणि वागणुकीतून सासू-सुनेने आपल्यातील निकोप नाते कसे टिकवावे? पती-पत्नीने एकमेकांच्या भावनांचे प्रकटीकरण कसे करावे? वैवाहिक जोडीदारांनी एकमेकांशी लैंगिक संबंधाविषयी चर्चा करून त्याबाबतीतले प्रश्न कसे सोडवावे? कार्यालयात उच्चपदावर असणाऱ्यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी कसे वागावे, बोलावे? लोक जर आपल्याविषयी वाईट बोलले, तर ती गोष्ट मनाला लावून न घेता त्या टीकेचा उपयोग स्वत:च्या प्रगतीसाठी कसा करून घ्यायचा? स्वमताला आदर देऊन समोरच्याला वेळोवेळी नाही कधी व कसे म्हणावे? कोणाची क्षमा मागायची असल्यास सॉरी कधी, कसे व का म्हणावे? प्रत्येकाने स्वत:शी सुसंवाद साधणे किती महत्त्वाचे आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोनातून कसा साधावा? या सर्व विषयांवर आपल्याशी चर्चा आणि मार्गदर्शन केले आहे. सरतेशेवटी ‘दुरावलेला संवाद’ या लेखात आधुनिकीकरणामुळे हरवत चाललेल्या संवादाबद्दल खंत व्यक्त केली आहे.
डॉ. नीना सावंत यांनी या पुस्तकात उल्लेखिलेली सुसंवादाची तंत्रे आपण वेळोवेळी आत्मसात केल्यास व अमलात आणल्यास प्रत्येकाचे आयुष्य सकारात्मक स्नेहबंधाच्या अतूट लडीमध्ये गुंफले जाईल यात काहीच शंका नाही.
‘संवाद’- डॉ. नीना सावंत
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : ८६
मूल्य : १०० रुपये.


सुतावरून स्वर्ग

‘शोध’ या ‘डिटेक्टिव्ह’ पुस्तकाचे लेखक डॉ. बी.जी. शेखर (क.ढ.र.) हे पोलीस उप-आयुक्त, क्राइम ब्रँच, गुन्हे अन्वेषण विभाग, बृहन्मुंबई येथे कार्यरत आहेत. कोणत्याही स्वरूपाचा गंभीर गुन्हा घडल्यावर मग तो खून असो, लूटमार असो, दरोडा असो किंवा एखादा बेवारशी मृतदेह सापडला असो. केवळ सुताएवढय़ा पुराव्यावरून त्या पुराव्याचा पाठपुरावा करत स्वर्ग गाठणे म्हणजेच गुन्ह्याची उकल करून गुन्हेगाराला योग्य शिक्षा फर्मावण्यापर्यंतच्या प्रवासाची हातोटी डॉ. बी. जी. शेखर यांना आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
घटनास्थळ हे आरोपींच्या प्रतिमांचा आरसा असते. त्याचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीची घटनास्थळी हरवलेली प्रतिमा शोधणे, हे गुन्हे अन्वेषण करणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचे काम असते. तपासाची सत्यता अन्वेषण अधिकाऱ्याच्या अंगी असलेल्या गुण, जिद्द आणि आत्मविश्वासामुळे सिद्ध होते. काही ठिकाणी गुन्हेगाराला मारहाण करण्यापेक्षा पोलीस अधिकाऱ्याला आपली बुद्धी कसोटीला लावून त्याच्याकडून गुन्हा वदवून घ्यावा लागतो. अशा वेळी यश मिळवण्यासाठी स्वत:च्या बुद्धी व कर्तृत्वावर अधिकाऱ्याचा विश्वास असणे फार महत्त्वाचे असते. सूक्ष्म पुरावेदेखील अत्यंत कठोर व क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यासाठी व गुन्हेगाराला शासन करण्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतात याचा ‘शोध’ गुन्हेगारांचा शोध घेताना डॉ. बी. जी. शेखर यांना लागला. सूक्ष्म नैसर्गिक पुराव्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा वापर जिद्दीने व वैशिष्टय़पूर्णरीत्या सातत्याने केल्यास कोणताही गंभीर गुन्हा उघडकीस येऊ शकतो हा आत्मविश्वास प्रत्येक तपासणी अंमलदारामध्ये व त्यास साथ देणाऱ्या प्रत्येक माणसातील पोलिसामध्ये तसेच माणसांमध्ये निर्माण व्हावा या अंत:करणातील इच्छेतूनच डॉ. बी. जी. शेखर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
यातील प्रत्येक प्रकरणात सापडलेल्या छोटय़ाशा दुव्यावरून केलेली गुन्ह्य़ाची उकल अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. एकदा एक प्रकरण वाचायला सुरुवात केली की संपवल्याशिवाय पुस्तक बाजूला ठेवलेच जात नाही. प्रत्येक कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे
कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा पूर्वानुभव नसतानाही अतिशय रंजकतेने अनुभवांची मांडणी केली आहे. ओघवती भाषाशैली मनाचा वेध घेते. या सर्वामुळे घटना आणि प्रसंग त्यातील पात्रांसकट डोळ्यासमोर जिवंत होऊन खरोखर एखादी ‘डिटेक्टिव्ह’ मालिका पाहात असल्याचा भास होतो.
हे पुस्तक रसिकजनांच्या पसंतीस उतरलेच, त्याचबरोबर नवोदित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल एवढे नक्की.
‘शोध’- डॉ. बी. जी. शेखर (क.ढ.र.)
ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे- १२४
मूल्य – १५०


चिंतनशील ललित वाङ्मय

कथा, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र या विविध वाङ्मय प्रकाराचे ज्यांनी चौफर व सशक्त लेखन केले आहे, त्याचबरोबर घटना प्रसंग, निवेदन, संवाद, ओघवत्या भाषाशैलीतील जीवनानुभव ज्यांच्या लेखात डोकावतात, असे मराठीतील श्रेष्ठ नावाजलेले कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांचे ‘अज्ञाताचा शोध’ हे एक स्फुटलेखन आहे. यामधील लेखांत ते आपल्या जीवनातील घटनांचा आणि जीवननिष्ठांचा आपल्या चिंतनशील ललित लेखनातून अन्वयार्थ लावतात. प्रत्येक कथेमध्ये जीवनातील नाटय़ रेखाटताना, निवेदनात तटस्थ तरीही, जीवनवेधी अशा चैतन्ययुक्त, जिवंत निवेदनातून जीवनाचे नाटय़मय दर्शन घडवतात.
बालकवी, गोविंदाग्रज, मर्ढेकर यांच्यानंतर खानोलकरांचे साहित्यात काय स्थान होते? याचा लेखाजोखा ‘साहित्यातील खानोलकर घराणं’ या लेखाद्वारे घेतला आहे. त्याचबरोबर मराठी साहित्यात ज्या कादंबऱ्यांनी विशेष मोहोर उठवली, अशा कादंबऱ्यांवर केलेले वैचारिक विश्लेषण व त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील यशाचा आलेख अतिशय वाचनीय आहे.
‘परदेश एक किंचित दर्शन’मध्ये इंग्रज माणसाची स्वभाववैशिष्टय़े, त्याची मर्मस्थाने व त्याच्या अनेक विसंगतीतून एका मनोहारी संगतीचे दर्शन कसे घडते याचे वर्णन केले आहे.
‘पॅसिफिकच्या पुळणीवरून’या लेखात एम्बसी हॉटेल सॅनफ्रान्सिस्को येथून श्री. वामन यांना
६-२-५६ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वित्र्झलडची सरोवरं आणि दाभोळची खाडी या दोघांतील त्यांच्या सौंदर्यदृष्टीने व रसिकमनाने घेतलेला आढावा वाचून, आपल्याला जणू काही कोकणची सफर घडवतो असे वाटते. त्यांच्या भावी आयुष्यातील प्रभावी लेखनाला स्फूर्तिदायक ठरलेल्या दापोली, आंजर्ले, मुरुड, गारंबी, दाभोळचे बंदर या सर्व परिसरांतील वेडावणाऱ्या, लोभसवाण्या अतुलनीय निसर्गसौंदर्याने भारावून गेलेले पेंडसे, घरच्या आठवणींनी बेजार झाल्यावर याच स्मृतींची शाल पांघरतात.
‘कादंबरी एक चिंतन’मध्ये सामान्य लेखकाचा एखादी घटना पाहिल्यावर उत्कृष्ट लेखक होईपर्यंतच्या विचारप्रक्रियेचे वर्णन केले आहे. तसेच कथा व कादंबरीतील फरक सांगून कादंबरी लिखाण वाचनीय करण्यासाठी वापरण्याच्या क्लृप्त्या दिल्या आहेत.
‘एक मुलाखत’ या सदरात त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्यांवर इतरांचे अभिप्राय व त्यावरील चर्चा रंगली आहे. त्यात प्रामुख्याने ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीचे वर्णन केले आहे.
‘यशोदा घरी येते’ या लेखांतर्गत ‘गारंबीचा बापू’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीतील त्यांना भावलेल्या यशोदा नावाच्या प्रकरणाचे विस्तृत वर्णन आहे.
‘एक होती आजी’ मध्ये त्यांच्या आईची मामी असलेल्या त्यांच्या आजीचे प्रसंगानुरूप स्वभाववर्णन केले आहे.
‘एक साहित्यिक पत्रव्यवहार’मध्ये ‘गारंबीची राधा’या कादंबरीवर आनंद साधले यांची विरोधी प्रतिक्रिया आणि त्यांना पेंडसेंनी दिलेल्या विस्तृत विवेचनपर प्रत्युत्तराचा दोघांमधील पत्रव्यवहार दिला आहे.
‘सामाजिक बांधीलकी आणि लेखक’यामध्ये उत्तम लेखकाची जडणघडण कशी होते, त्याच्या हातून समाजाभिमुख कादंबरीचे लिखाण होण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले आहे.
आणि शेवटी ‘अध्यक्षीय भाषण’या लेखात उत्तम कादंबरीचा गाभा काय असावा यावर चिंतनमय भाष्य व कादंबरी लिहिताना त्यावर उत्तम कारागिरी करून ती अधिक वाचनीय कशी करता येईल याबाबत चर्चा केली आहे.
नवोदित लेखकांना उत्तम लिखाण करण्यासाठी काय लिहावे व काय लिहू नये याचे योग्य मार्गदर्शन ‘अज्ञाताचा शोध’ या पुस्तकाद्वारे नक्की होईल. त्याचा नवोदित लेखकांनी जरूर लाभ घ्यावा.
‘अज्ञाताचा शोध’
लेखक : श्री. ना. पेंडसे
साकेत प्रकाशन
पृष्ठे : १९० मूल्य : २०० रुपये