सास-बहू आणि कुटुंबकलहाच्या भीषण नाटय़ातून सुटका करून घेण्यासाठी प्रेक्षक विनोदी कार्यक्रमांकडे वळतो खरा, पण काही काळानंतर या कार्यक्रमांमध्येही तोच-तोचपणा यायला लागतो. मग प्रेक्षकानं जायचं कुठे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विनोदी कार्यक्रमांमध्ये येणारा तोचतोचपणा अपरिहार्य आहे. कारण एखादा लेखक किंवा नट किती वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करणार हा शेवटी प्रश्नच आहे. भडकपणा टाळला पाहिजे. आमच्या वेळच्या विनोदांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींची भर दिली जायची. त्यात अॅक्शनचीही भर मी दिली होती. पण, कालांतराने त्याचा अतिरेक व्हायला लागला. हीच अॅक्शन कॉमेडी विशिष्ट मर्यादेत केली तर योग्य आहे. विनोदनिर्मितीच्या पुनरावृत्तीला इलाज नाही. तरी त्यातही काय वेगळं देता येईल याचा प्रयत्न निश्चितच केला पाहिजे. आजची विनोदनिर्मिती हळूहळू वेगळ्या वळणावर जातेय. खरा विनोद सापडतच नाही. विनोद ही गोष्टच वेगळी आहे. तेच ते शब्द वापरून सतत शाब्दिक कोटय़ा होत असतात. पण, त्यात वैविध्य असून त्याला मर्यादाही असावी. शाब्दिक कोटय़ांच्या अतिरेकामुळे विनोदाचा दर्जा घसरतोय असं म्हणावं लागेल. अर्थात आजचे विनोदी कलाकार उत्तमच काम करताहेत, यात अजिबात वाद नाही. पण, कधीकधी मर्यादेच्या बाहेर जातात, हे त्यांनी टाळायला हवं.
– अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते
कोणत्याही नव्या कार्यक्रमाबाबत कुतूहल हे असतंच. त्याचं कौतुकही होतं. कार्यक्रम खरंच चांगल्या आशय-विषयाचा असेल तर तो लोकप्रियही होतो. पण, विशिष्ट टप्प्यानंतर त्यातला एकसुरीपणा जाणवू लागतो. तेच तेच बघतोय, अशी भावना मनात रुजू लागते. वास्तविक असं मालिकांच्या बाबतीत वाटणं अगदी स्वाभाविक असतं. कारण एक घर, त्यातली नायिका, तिच्यापुढे आलेली संकटं, तिचा लढा, तिचं धैर्याने सामोरं जाणं, मग पुन्हा नवं संकट, नवा लढा वगैरे हे चक्र सतत सुरूच असतं. त्यामुळे मालिकेबाबत एकसुरीपणा येण्याची शक्यता जास्त असते. पण, एकसुरीपणा आता विनोदी कार्यक्रमांमध्येही अनेकदा दिसून येतोय. याचं नेमकं कारण काय? साचेबद्ध सादरीकरण, कलाकारांचा अभिनय, लेखकांची विचारक्षमता, की प्रेक्षकांचा बदलेला दृष्टिकोन हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ हे सध्या सुरू असलेले दोन विनोदी कार्यक्रम. दोन्ही लोकप्रिय कार्यक्रम. तरी त्यातल्या विनोद किंवा सेगमेंटवर ‘हे होऊन गेलंय’ किंवा ‘तेच तेच दाखवताहेत’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
याचा सगळ्यात आधी अनुभव येत असेल तो त्या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना. सतत काही वेगळं करू पाहण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असतेच. त्यामुळे कलाकाराला सतत तेच ते करायला लागलं तर सहाजिकच कंटाळा येऊ शकतो. याबाबत भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम सांगतात की, ‘विनोदी कार्यक्रमांमध्ये तोचतोचपणा येतच नाही असं मी म्हणणार नाही. पण, यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण विनोदी लेखन करणाऱ्यांची संख्या हे असू शकतं. ती कमी आहे. एका लेखकाच्या डोक्यातून येणाऱ्या संकल्पनांनाही काही मर्यादा असू शकते. तो दहा गोष्टी लिहील पण, अकारावी गोष्ट लिहिताना त्याची विचार करण्याची क्षमता साथ देईलच असं नाही. त्यामुळे लेखकांची संख्या वाढायला हवी. आम्ही कलाकार फक्त सादरीकरण करतो. तोचतोचपणा टाळण्यासाठी आम्ही एखादं वाक्य चार वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकतो. पण, पाचव्यांदा पुनरावृत्ती होणारच. आताच्या विनोदी कार्यक्रमांचं, विनोदांचं भवितव्य ठरवणारे लेखक आहेत. लेखकाला प्रेक्षकांची आवडनिवड कळायला हवी.’ तर भारत गणेशपुरे म्हणतात की, ‘टीव्ही हे मनोरंजनाचं साधन आहे. त्याकडे तशाच दृष्टिकोनातून बघावं. काही गोष्टी सातत्याने तशाच दाखवल्या जातात हे मान्य आहे. पण, तो त्या-त्या कार्यक्रमाचा पॅटर्न असतो. त्या पॅटर्नमधले शब्दांचे अनेक प्रयोग होत असतात. एखादी गोष्ट चालली की, त्याचे समर्थकही असतात आणि विरोधकही असतात. सध्या प्रेक्षकांवर विविध गोष्टींचा ताण आहे. तो कमी करण्यासाठी ते विनोदी कार्यक्रमांचा आधार घेतात.’
– भालचंद्र ऊर्फ भाऊ कदम
विनोदी कार्यक्रम लोकप्रिय आहेत. पण, त्याच वेळी त्यावर टीका करणाऱ्यांची संख्याही आहे. मुळात अलीकडे सिनेमा-नाटकांचं प्रमोशन हा महत्त्वाचा मुद्दा झालाय. त्यामुळे अशा कथाबाह्य़ कार्यक्रमांचा प्रमोशनच्या वेळी फार उपयोग होतो हे चॅनलही जाणून असतात. त्यामुळे नवनवीन सिनेमा-नाटकांमधले कलाकार-तंत्रज्ञ अशा कार्यक्रमांमध्ये आल्याने कार्यक्रम आणि आगामी सिनेमा अशा दोघांनाही फायदा होतो. हे साटंलोटं चांगल्या दिशेने पसरताना दिसतंय. पण, कार्यक्रमाचा विशिष्ट साचा त्यात वैविध्य आणत असला तरी ठरावीक काळानंतर त्यात एकसुरीपणा येतोच. शाब्दिक कोटय़ा, सुमार विनोद, अंगविक्षेप यांच्या पुनरावृत्तीमुळे कार्यक्रमाचा कंटाळा येणं स्वाभाविक आहे. ही विनोदनिर्मिती शेवटी कलाकारांना कुठवर घेऊन जाणार हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. विनोदी कलाकार अशी कलाकारांची प्रतिमा तयार होते. सिनेइंडस्ट्रीत कलाकाराची एक प्रतिमा यशस्वी झाली की, त्या कलाकाराला तशाच प्रकारच्या भूमिकांची विचारणा होते. कलाकारही चांगल्या ऑफर्स म्हणून त्या स्वीकारतो. पण, एका टप्प्यानंतर त्यालाही त्या प्रतिमेतून बाहेर पडणं गरजेचं वाटू लागतं. श्रेया बुगडे सांगते, ‘एकीकडे ‘फू बाई फू’ आणि दुसरीकडे ‘तू तिथे मी’ ही मालिका मी करत होते. एकात वेगवेगळी पात्रं उभी करत विनोदी अभिनय करायचा होता. तर मालिकेत दादा होळकर या खलनायकाची बायको म्हणजे अतिशय साधी, गरीब, बुजरी अशी स्त्री साकारायची होती. त्यामुळे माझी विशिष्ट अशी प्रतिमा न होण्याला एकाअर्थी मदतच झाली. काही वेळा तोचतोचपणा येतो हे खरंय. पण, तो कुठवर न्यायचा हेही खरंय. हा तोचतोचपणा फक्त कथाबाह्य़ कार्यक्रमांमध्येच असतो असं नाही तर मालिकांमध्येही असतो. टीव्ही हे माध्यम असं आहे जिथे जितकं नवीन द्याल तितकं प्रेक्षकांना ते आवडतं. सातत्याने अनेक र्वष चालणाऱ्या कार्यक्रमाला ब्रेक मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच ‘फू बाई फू’ची आठ र्पव झाल्यानंतर त्याच्या क्रिएटीव्ह टीमने ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सुरू केला. ‘फू बाई फू’पासून ब्रेक हवा म्हणूनच नव्या शोचं पाऊल त्यांनी उचललं.’
टीव्हीवरच्या कार्यक्रमांशिवाय इतर अनेक इव्हेंट्समध्ये विनोदी कलाकारांना अलीकडे मोठी मागणी आहे. विनोदी स्किट हा पुरस्कार सोहळ्यांचा एक अविभाज्य घटक झालाय. कोणताही सोहळा अशा स्किट्सशिवाय पूर्ण झालेला दिसणार नाही. त्यामुळे ते सादर करणाऱ्या कलाकारांची मागणीही वाढली आहे. कलाकारही अशा अनेक कार्यक्रमांचा स्वीकार करतात. इंडस्ट्रीच्या भाषेत अशा कार्यक्रमांची ‘सुपारी’ घेतात. याबाबत नम्रता आवटे-सुंभेराव म्हणते, ‘प्रत्येक कलाकार आर्थिकदृष्टय़ा विचार करणारच. मालिकेत आजही पुरेसं मानधन मिळत नाही. मग साहजिकच कलाकार दुसऱ्या ठिकाणी पैसे कमवायचा वाव असेल तर तिथे जाणार. तिथे कलाकारांना हवं तितकं मानधन मिळतं. मग कलाकारांनी असे कार्यक्रम केले तर त्यात गैर काहीच नाही. काही इव्हेंट्ससाठी आम्ही पैसे घेतही नाही. त्यामुळे कुठून पैसे घ्यायचे आणि कुठून नाही याचं भान कलाकाराला असतं.’ तर टीव्हीमुळे ओळख, लोकप्रियता मिळते या मुद्दय़ावर भारत म्हणतात की, ‘टीव्ही ही एकाअर्थी कलाकाराची आर्थिक गरज आहे. शिवाय लोकप्रियता हाही एक मुद्दा आहेच. टीव्हीमधून लोकप्रियता लवकर मिळते. ते क्षणिक असतं हे मान्य केलं तरी आता चिरकाल असं टिकणारंही फार काहीच नाही. एखादं प्रोजेक्ट कलाकाराने स्वीकारलं तर तो त्याला बांधील असतो.’
अभिजात लिखाणाला, सादरीकरणाला जेवढा विचार करावा लागतो तेवढाच विनोदी प्रहसन करताना करावा लागतो. त्यासाठीही तेवढेच कष्ट घ्यावे लागतात. प्रेक्षकांना हसवणं हे कठीण आहे. प्रत्येक गोष्टीला त्याचं स्वत:चं बलस्थान आहे आणि काही त्रुटीही आहेत. ज्या प्रेक्षकांना रोज मनोरंजनाची गरज असते ते अशा कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद देतात. त्यात एकसुरीपणा येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील असतोच. एखाद्या कार्यक्रमाचा विशिष्ट फॉरमॅट असतो. त्याला काही मर्यादाही असतात. त्या मर्यादेत राहून वेगळं काही शोधायचं असतं. कोणताही शो एकसुरी झाला की आपोआपच त्याचं रेटिंग कमी होऊन तो शो बंद होतो.
– सचिन गोस्वामी, निर्माता-दिग्दर्शक,
कॉमेडीची बुलेट ट्रेन, कलर्स मराठी
एखाद्या स्किटची सुरुवात धमाकेदार गाण्याने करणं, स्त्री-व्यक्तिरेखा साकारणं, कार्यक्रमातल्या स्पर्धकांवरच विनोद करणं, स्वत:वर विनोद करणं, एखाद्याच्या जाडेपणा-रंगावर विनोद करणं हे सुपरहिट स्किट्सचे काही हिट फंडे. ‘स्किट हिट करायचाय मग यापैकी कोणतीही एक गोष्ट करा’ असा अलिखित फतवाच जणू अशा कार्यक्रमांमध्ये असतो. यातला नंबर एकचा फंडा म्हणजे पुरुष कलाकाराने स्त्री-व्यक्तिरेखा साकारणे. खरंतर ही गोष्ट तशी जुन्या काळापासून आलेली. पण, ‘अशी ही बनवाबनवी’ या अजरामर सिनेमापासून ती आणखी प्रकाशझोतात आली. त्या सिनेमात पुरुष कलाकाराने साकरलेल्या स्त्रिया केवळ बघूनच प्रेक्षकांमध्ये हशा उमटतो. त्यामुळे हा सगळ्यात हिट फॉम्र्युला असल्याचा समज आजही इंडस्ट्रीत आहे. पण, त्याचा अतिरेक झाला की ते वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचतं. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये सागर कारंडे वेगवेगळ्या स्त्री-व्यक्तिरेखा साकारतो. त्याला प्रेक्षकांची पसंतीही मिळते. पण, त्याचबरोबर त्याच्यावर टीकाही होते. याबाबत तो स्पष्ट व्यक्त होतो, ‘मी स्त्री-व्यक्तिरेखा साकारतो यावर चांगल्या प्रतिक्रियाही येतात आणि टीकाही होते. पण, कलाकार ज्या प्लॅटफॉर्मवर विशिष्ट व्यक्तिरेखा साकारतोय तो प्लॅटफॉर्म लक्षात घेणं जरुरी आहे. जर एखाद्या गंभीर नाटक किंवा सिनेमात पुरुष कलाकाराने स्त्री-व्यक्तिरेखा साकारली तर त्याकडे गांभीर्याने बघितलं जातं. पण, जर एखाद्या विनोदी कार्यक्रमात ती साकारली तर त्याकडे फक्त मनोरंजन म्हणूनच बघितलं जातं. त्यामुळे विविध प्लॅटफॉर्मनुसारच दृष्टिकोन बदलत जातो. मी एकच स्त्री-व्यक्तिरेखा न साकारता विविध स्वभाववैशिष्टय़ांच्या स्त्रिया साकारतो.’
‘मराठी सिनेमांना चांगले दिवस आलेत की नाहीत’ यावर ज्याप्रमाणे चर्चासत्र सुरू असतात त्याचप्रमाणे ‘टीव्हीवर सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये विनोदाचा दर्जा घसरतोय का?’ यावरही ठिकठिकाणी चर्चा सुरू असतात. मध्यंतरी कमरेखालचे विनोद, शिवीसदृश भाषा यांनी पुढची पातळी गाठली होती. हिंदीतली ही परंपरा मराठीकडेही वळली होती. पण कालांतराने चॅनल्सनी लगाम लावत अशा गोष्टी थांबवल्या. पण आजही कमरेखालच्या विनोदांच्या बाजूने जाणारे विनोद घडताना दिसतात. तसेच शिवराळ भाषेचा थेट वापर केला जात नसला तरी प्रेक्षक ते कळण्याइतके हुशार नक्कीच आहेत. तसेच आजच्या विनोदी कार्यक्रमांचा प्रेक्षकवर्ग सर्व वर्गातला आणि सर्व वयोगटांतला आहे. त्यामुळे विनोद करताना तारतम्य ठेवणं गरजेचं असतंच. ‘अनेकदा विनोदाच्या दर्जावर बोललं जातं. पण हा दर्जा नेमकं ठरवतं कोण? तो ठरवण्याची अशी कोणती समिती आहे का? कोणी एक अशा प्रकारे दर्जा ठरवू शकत नाही. एखादी व्यक्ती विशिष्ट विनोदावर किंवा कार्यक्रमावर बोलत असेल तर ते त्याचं वैयक्तिक मत असतं’, असं सागर कारंडे स्पष्ट सांगतो. प्रेक्षक जसा वेगवेगळ्या वयोगटातला असतो तसाच तो वेगवेगळ्या विचारसरणीचाही असतो. कार्यक्रम आवडणारे जसे असतात तसेच न आवडणारेही असतात. हाच मुद्दा सचिन गोस्वामी मांडतात, ‘दर्जा घसरत चाललाय ही सापेक्ष गोष्ट आहे. प्रेक्षकांमध्ये दोन वर्ग आहेत. साधं, सोपं, सरळं कळणारा एक वर्ग आहे आणि मेंदूला सतत आव्हान देत राहा असं म्हणणारा एक वर्ग आहे. साधं, सरळ कळणारा वर्ग अमुक एक विनोद त्याच्या पद्धतीने आवडतो. पण तोच विनोद मेंदूला आव्हान दे सांगणाऱ्या वर्गाची भूक नाही भागवू शकत. अशा वर्गाची एकसुरीपणाबद्दल ओरड असते. विनोदाचा वेग बदललाय हे मात्र मी नक्की सांगेन.’
नाण्याच्या दोन बाजू असतात. दोन्ही बाजूंना तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. विनोदी कार्यक्रमांचं तसंच काहीसं आहे. विनोदी मालिकांव्यतिरिक्त विनोदी बाजाचे कथाबाह्य़ कार्यक्रम मराठीमध्ये आहेत ही जमेची बाजू आहे. त्यातले कलाकारही प्रामाणिकपणे काम करताहेत. कार्यक्रमाची टीम त्यांच्या परीने वैविध्य देण्याचाही प्रयत्न करीत असते. पण अनेकदा विनोदांची पुनरावृत्ती, सुमार विनोद, रटाळपणा अशा गोष्टींचा कळत-नकळत समावेश भासतो. कलाकारांनाही कुठे थांबावं हे कळायला हवं. असे विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतात हे खरंय. पण ते निखळ मनोरंजन असणं आवश्यक आहे. तेचतेच न दाखवता कार्यक्रमाला पूर्णविराम देणं केव्हाही चांगलं.
नम्रता आवटे-सुंभेराव
– श्रेया बुगडे
– भारत गणेशपुरे
– सागर कारंडे
-चैताली जोशी