शिष्यवृत्तीच्याआधारे उच्च शिक्षणासाठी संजय खेड्यातून शहरात येतो. मात्र हुशार होतकरू संजयला त्या झकपक कॉलेजमध्ये पदोपदी मानहानी सहन करावी लागते. कॉलेजमधल्या मुलांची चाकरी करत, रॅगिंग आणि मानहानीचे प्रसंग झेलूनदेखील त्याला आसरा गमावावा लागतो. त्याच वेळी एक तृतीयपंथी (खोटा) झोपडीत आसरा देतो. पण तोदेखील गुन्हेगारी वर्तणुकीचा असल्यामुळे संजयवर ओढवलेल्या प्रसंगात त्याच झोपडपट्टीतले तृतीयपंथी संजयची पाठराखण करतात. त्यापैकीच एक तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) संजयच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून त्याला मदत करु लागते. आणि त्या दोघांच्या गुंतागुंतीच्या नात्याची येथेच सुरुवात होते. नात्यांची गुंतागुंत, भावनिक आंदोलन आणि अखेरीस एका वेगळ्याच वळणावर जाणारं असं हे कथानक. चित्रपटकत्र्यांच्या म्हणण्यानुसार सत्य घटनेवर आधारित असलेलं.
पहिल्याच दिग्दर्शनात असा विषय घेणं याबाबत दिग्दर्शकाचं कौतुकच करावं लागेल. मांडणीसाठी काहीसा आव्हानात्मक विषय असणाºया या चित्रपटावरचं भाष्य हे अर्थातच दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर करावं लागेल. चित्रपट म्हणून तांत्रिक आणि कलात्मक बाबी एकीकडे आणि दुसरीकडे समाजाच्या या हेटाळल्या गेलेल्या घटकावरच भाष्य. सत्य परिस्थिती संयतपणे मांडणं, त्यातील नाट्य जपणं, भडकपणा टाळून साकारलेला अभिनय या पातळीवर चित्रपट बरा आहे. विद्यार्थीदशेतला संजय आणि ट्रान्सजेंडर या भूमिकांना ओंकार गोवर्धन आणि नारायणी शास्त्री यांनी चांगला न्याय दिला आहे.
खरं तर एखाद्या माहितीपटाचं कथाबीज असणारा विषय चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. पण स्ट्रेट समाज (पुरुष आणि महिला) आणि समलैंगिकांच्या आयुष्यावरचं भाष्य करताना मात्र चित्रपट कमी पडतो. समलैंगिकांच्या आयुष्यातले नेमके पैलू पकडण्यात आणि ते प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. नारायणी शास्त्रीने ताकदीने भूमिका साकारली असली तरी तिच्या आयुष्यावर इतका त्रोटक प्रकाश टाकला आहे की नाट्यमय कथानकातून सूत्र कळतं पण आशय पोहचत नाही.
समलिंगी समाजाबाबत एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायोसेक्स्यूअल आणि ट्रान्सजेंडर) ही संकल्पना आज काही प्रमाणात तरी बहुतांशाना माहीत झाली आहे. या विभागणीत चित्रपटातील नेमक्या भूमिका मुद्देसूद मांडणं गरजेचं होतं. तृतीयपंथीयांची हेटाळणी मांडताना त्यामागील शास्त्रीय विश्लेषण कळण्यास खूपच मर्यादा पडत असल्यामुळे विषयाचा नेमका प्रभाव पडत नाही. चाकोरीबाहेरचा विषय हाताळताना चित्रपटकत्र्यांनी करायला हवा असा शास्त्रीय अभ्यास केला असला तरी तो सोप्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत न पोहोचण्यामुळे चित्रपट तुमच्या मनात सदोदीत शंका उत्पन्न करत राहतो. त्यामुळेच नाट्यमय कथानकातून समाजातील ही उपेक्षितांबाबतची दरी दिसत असली तरी भिडत नाही हे मात्र निश्चित.
श्री समर्थ इंटरनॅशनल फिल्म्स निर्मित – ॠण
निर्माता – मुकुंद म्हात्रे आणि एकनाथ भोपी
लेखक – दिग्दर्शक – विशाल गायकवाड
संगीत – सिद्धार्थ संगीत
पटकथा – विनोद नायर
कलावंत – ओंकार गोवर्धन, नारायणी शास्त्री, मनोज जोशी, विनय आपटे, अनंत जोग, विजय पाटकर, उषा नाईक, जयराज नायर, राजेश्वरी सचदेव, विवेक लागू, शितल करंजेकर, शायनम लदाखी, म्येथू वर्गीस.