मराठीत एकच क्रियापद जसं वेगवेगळ्या अर्थानी वापरता येतं तसंच अनेक शब्दही वेगवेगळ्या अर्थानी वापरता येतात. त्याबद्दलचा आजचा धडा गळा आणि घसा या दोन अवयववाचक शब्दांच्या वैविध्यपूर्ण अर्थाबद्दल सांगणारा
पद्मजाला मराठीचे समग्र ज्ञान मिळणे आवश्यक होते. फक्त क्रियापद कसे वापरतात हे सांगणे पुरेसे होणार नव्हते. म्हणूनच तिला शरीराच्या विविध भागांना मराठीमध्ये काय म्हणतात हे शिकवण्याचे ठरवले. पद्मजालादेखील ते पटले. मी म्हटले, ‘‘सुरुवात करू या त्या भागापासून ज्याच्याशिवाय तुझी शिकवणी शक्यच नव्हती. थ्रोट ज्याला मराठीमध्ये गळा, कंठ व घसा म्हणतात. या भागावरून मराठीमध्ये खूप मजेशीर वाक्प्रचार प्रचलित आहेत.’’ नूपुर म्हणाली की, ‘‘ताई खरे तर आपल्या डोळ्याला जो भाग दिसतो त्याला गळा व मान असेदेखील म्हणतात व या भागाच्या आत असणाऱ्या स्वरयंत्राला कंठ किंवा घसा असे म्हणण्याचा प्रघात आहे.’’
मी वर्तमानपत्र वाचायला घेतले. त्यात बातमी होती, ‘दिल्ली निवडणुकीत एकमेकांचे गळे पकडणारे काँग्रेस व आप हे पक्ष सत्ता स्थापनेसाठी गळ्यात गळे घालायला तयार झाले.’ मी पद्मजाला म्हटले की, एकमेकांचे गळे पकडणे म्हणजे हमारीतुमरीवर येऊन भांडणे, गळ्यात गळे घालणे म्हणजे एकत्र काम करण्यास तयार होणे किंवा मित्र होणे.
दुसरी बातमी होती की, ‘न्याय्य हक्कांची गळचेपी होत असल्याने सरकारी कर्मचारी संपावर जाण्याचा विचार करत आहेत.’ मी पद्मजाला म्हटले की, गळचेपी करणे म्हणजे जाणूनबुजून दुर्लक्ष करून एखाद्याचे नुकसान करणे. कधी कधी बळाचा वापर ही गळचेपी करण्यासाठी करतात अशी पुस्ती सौने जोडली.
तिसऱ्या बातमीमध्ये ‘आसाराम-पुत्राविरोधात सबळ पुरावे मिळाल्याने त्याच्या गळ्याभोवती फास आवळत चालला आहे’ अशी ओळ होती. गळ्याभोवती फास आवळला जाणे म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये पुरते अडकणे असा घ्यायचा असे पद्मजाला सांगून मी चहाचा पहिला घोट घेतला.
एवढय़ात शेजारच्या काकू धावत आल्या. म्हणाल्या, ‘‘सौमित्र आहे का हो तुमचा? आमचा कुत्रा, जिमी, आमच्या खुशीच्या गळ्यातला ताईत आहे. तो घरातून पळून गेला आहे. त्याला शोधायला मदत हवी होती. जिमी मिळाला नाही ना तर खुशीच्या गळ्याखाली घास उतरणार नाही.’’
सौमित्र घरात नव्हता त्यामुळे नूपुर मदतीसाठी तयार झाली. चपला पायात घालता घालता नूपुर पद्मजाला म्हणाली, ‘‘ताई, जिमीमुळे तुला मात्र दोन अर्थ मिळाले. गळ्यातला ताईत असणे म्हणजे अतिशय प्रिय असणे तर घशाखाली घास न उतरणे म्हणजे अतिशय काळजीमुळे खाणेपिणे काही न सुचणे.’’
मी म्हटले, ‘‘पद्मजा आंघोळीला जाण्यापूर्वी दोन अर्थ सांगतो. घसा फोडेस्तो ओरडणे म्हणजे खूप मोठय़ा मोठय़ाने ओरडणे व घसा बसणे म्हणजे तोंडातून नीट आवाज न फुटणे किंवा नीट बोलता न येणे.’’
ऑफिसला जात असताना मी पद्मजाला गळ्यात मारणे, गळाभेट घेणे, जेवण गळ्याशी येणे किंवा प्रकरण गळ्याशी येणे यांचे अर्थ शोधून ठेवणे असा होमवर्क दिला.
ऑफिसमध्ये काम करायला सुरुवात करणार एवढय़ात माझ्या कॉलेजच्या मित्राचा फोन आला. ऑफिसनंतर सर्व जुने मित्र बारमध्ये घसा ओला करायला भेटणार आहेत. मीदेखील तिथे यावे अशी त्याची अपेक्षा होती. मी म्हटले, ‘‘अरे, विक्रांत मी तिथे येऊन फार फार तर एखादे कोल्ड्रिंक घेणार, कारण तुला माहीत आहे माझे घसा ओला करणे यावरच थांबते.’’ त्यावर विक्रांतचे उत्तर होते, ‘‘तू ये तर तिथे, आम्ही तुझ्या वतीने पितो, तू आमच्या वतीने खा. आणि तू नाही आलास ना तर मागवलेले सर्व पदार्थ घरी येऊन तुझ्या घशात कोंबू.’’ मी बघू असे मोघम उत्तर देऊन फोन संपविला व कामाला लागलो. पण घसा ओला करणे व घशात कोंबणे हे दोन अर्थ पद्मजाला शिकवायचे असे मनात नोट डाऊन करून ठेवले.
आज ऑफिसमधील सर्वात जुन्या शिपायाचा निरोप समारंभ होता. शशिकांत शिपाई नेहमीच कोणत्याही कामाला तत्पर असायचे. कित्येक लोकांना ऑफिसच्याच कामात नाही तर घरगुती कामातही त्यांची मदत झाली होती. त्यामुळेच त्यांच्या निरोप समारंभात अनेकांचा गळा दाटून आला होता. एरवी कामचुकार शिपायांच्या नावाने सर्व स्टाफ गळा काढत असतो. पण शशिकांत मात्र त्याला अपवाद ठरले होते.
आता घसा ओला करणे म्हणजे काही तरी पेयपान करणे, घशात कोंबणे म्हणजे मनाविरुद्ध खायला घालणे, गळा दाटून येणे म्हणजे वाईट वाटणे व एखाद्याच्या नावाने गळा काढणे म्हणजे एखाद्याची तक्रार करणे, असे चार अर्थ घेऊनच मी संध्याकाळी घराची वाट पकडली. फक्त विक्रांतला कबूल केल्याप्रमाणे जरा वेळ बारमध्ये हजेरी लावली.
घरी यायला जरा उशीर झाल्याने पद्मजा मी आत शिरताच चहा न घेऊन येता फक्त पाणीच घेऊन आली. चहाची वेळ टळून गेल्याने मीही पटकन फ्रेश होऊन टीव्हीसमोर बातम्या ऐकण्यासाठी बसलो. प्राजक्ता म्हणाली, ‘‘काय हो आज पद्मजाचा गृहपाठ ऐकायचा नाही वाटते?’’
मी म्हटले, ‘‘असे कसे होईल? मला व पद्मजाला दोघांना घशाखाली घास उतरेल का त्याशिवाय?’’ पद्मजाने अर्थ सांगण्यापूर्वीच मी तिला ऑफिसमधून मिळालेले चार अर्थ लिहून घ्यायला सांगितले. ते लिहून झाल्यावर पद्मजा सांगू लागली, ‘‘गळ्यात मारणे म्हणजे एखाद्याला फसवून, त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट विकत घ्यायला लावणे, गळाभेट घेणे म्हणजे प्रेमाने एखाद्याला भेटून जवळीक दर्शविणे, जेवण गळ्याशी येणे म्हणजे खूप खाल्ल्याने अजीर्ण होणे किंवा प्रकरण गळ्याशी येणे म्हणजे आपणच ज्या गोष्टीची सुरुवात केली तीच आपल्याला गोत्यात आणण्यास कारणीभूत होणे.
टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये एक ब्रेकिंग न्यूज दाखवत होते. सिनेमात काम मिळत नसल्याने एका तेलुगु अभिनेत्याने नराश्याच्या भरात गळफास लावून घेतला होता. पद्मजाला तमिळ व तेलुगु दोन्ही येत असल्याने, ती दोन्ही भाषांतील चित्रपट पाहते; तिला या अभिनेत्याविषयी जेव्हा कळले तेव्हा ती जरा उदास झाली. मी न सांगताच तिला गळफास लावून घेणे म्हणजे आत्महत्या करणे हा अर्थ कळला होता.
तिचा उदास मूड पाहून मीदेखील आजची शिकवणी आवरती घेतली पण शेवट असा उदास होऊ नये म्हणून मी पद्मजाला म्हटले की, तुझी आवडती गायिका कोण? तेव्हा ती म्हणाली, आताच्या जमान्यातील श्रेया घोषाल व कालच्या जमान्यातील लता व आशा. मी म्हटले या तिन्ही गायिका गोड गळ्याच्या आहेत. गोड गळ्याच्या म्हणजे मलमली, भावस्पर्शी व मधुर आवाजाच्या हे सांगून मी शिकवणीचा शेवट गोड केला.