खार, मासा, घोडा, उंट, हत्ती, सरडा, मुंगी या सगळ्यांच्याच वैशिष्टय़ांचा उपयोग करून घेत मराठी भाषाव्यवहार समृद्ध होत गेला आहे.
पशुपक्षी यांवर आधारित शिकवणीचा आज तिसरा दिवस होता. नाश्त्याच्या टेबलवर आम्ही सर्वजण एकत्र आलो असताना सहज माझे लक्ष बाल्कनीतून बाहेरच्या झाडाकडे गेले; त्यावर एक खार नाचत होती. मी पद्मजाला म्हटले की झाडावर बघ स्क्विरल म्हणजे खार आहे. खारीवरून मला पटकन म्हण आठवली.. ‘खारीचा वाटा असणे.’ मी म्हटले, ‘‘पद्मजा, तुझ्या मराठीच्या ज्ञानामध्ये भर घालण्यात नूपुर व सौमित्रचा पण खारीचा वाटा आहे. खारीचा वाटा म्हणजे छोटे पण महत्त्वपूर्ण योगदान.’’
इतक्यात सौ म्हणाली, ‘‘आज शुक्रवार आहे त्यामुळे माशांचा बेत करायचा विचार आहे. त्यामुळे कोणते मासे कोळणीकडून घेऊन ठेवू ते आधी सांगा.’’
मी म्हटले, ‘‘पापलेट किंवा सुरमई घे.’’ इतक्यात सौमित्र म्हणाला, ‘‘ताई, तुला फिश म्हणजे मासा यावर आता मी म्हणी सांगतो. पहिली म्हण ‘पाण्यात राहून माशाशी वैर’. याचा अर्थ होणार एखाद्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये राहून त्या व्यवस्थेशी भांडणे सोपे नसते. दुसरी म्हण होते ‘मासा गळाला लागणे.’ याचा अर्थ एखादी इच्छित गोष्ट खूप प्रयत्नांनंतर मिळणे असा घेता येऊ शकतो.’’
मी म्हटले, ‘‘पद्मजा जेव्हा तू एखाद्या मुलाला आवडशील तेव्हा तो तुला गळाला लावायचा पुरेपूर प्रयत्न करेल.’’ हे ऐकून पद्मजा लाजली.
एवढय़ात नूपुर म्हणाली, ‘‘बाबा डर्बी म्हणजे काय?’’ मी म्हटले, ‘‘डर्बी म्हणजे घोडय़ांची शर्यत.’’ पद्मजाला कळावे म्हणून मी म्हटले, ‘‘घोडे म्हणजे हॉर्स व महालक्ष्मी रेस कोर्स इथे या शर्यती होतात.’’
‘‘घोडय़ावरून पण काही तरी वाक्प्रचार असतीलच ना?’’ हा पद्मजाचा प्रश्न स्वाभाविकच होता.
मी म्हटले, ‘‘आहे ना. जसे की ‘सब घोडे बारा टके’, ‘खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला’, ‘घोडा मैदान दूर नसणे’, ‘गंगेत घोडं न्हाणे’ व ‘वरातीमागून घोडं’. गंगेत घोडं न्हाणे म्हणजे एकदाचे आपण ठरविलेले काम तडीस जाणे, घोडा मैदान जवळ असणे म्हणजे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी नजीक असणे, वरातीमागून घोडे म्हणजे गरज असताना एखादी गोष्ट न मिळता, ती गोष्ट गरज संपल्यावर उपलब्ध होणे.’’ बाकीचे दोन अर्थ पद्मजाने शोधून काढावेत असे म्हणून मी पुढच्या प्राण्याकडे वळलो.
सौमित्र म्हणाला, ‘‘बुद्धिबळाच्या खेळात घोडय़ाबरोबर उंट व हत्ती असतो. तेव्हा पद्मजाताईला हे प्राणी शिकवा.’’ मी पद्मजाला म्हटले, ‘‘उंट म्हणजे कॅमल व हत्ती म्हणजे एलिफंट. यावरून मी तुला नवीन अर्थ सांगणार व मग ऑफिसला पळणार.’’
‘उंटावरून शेळ्या हाकणे’ म्हणजे स्वत: काम न करता किंवा जबाबदारी न घेता दुसऱ्याला कामाला लावणे. ‘उंटावरचा शहाणा’ म्हणजे मूर्ख सल्ला देणारा माणूस असे मी पद्मजाला सांगितले तेव्हा ती म्हणाली, ‘‘मराठीतील या फिरवाफिरवीमुळे माझे डोके गरगर फिरते.’’
हत्तीवरून वाक्प्रचार सांगण्यापूर्वी मी पद्मजाला उंटावरून अजून एक वाक्प्रचार सांगितला- ‘उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरणे’ म्हणजे एखाद्या गोष्टीचा कडेलोट झाल्याने उद्रेक होणे.
आमचे बोलणे ऐकल्यामुळे आईने हत्तीवरून एक मस्त म्हण सांगितली. जी खरे तर मी पण फारशी ऐकली नव्हती. ती म्हण होती दु:ख हत्तीच्या पावलांनी येते, पण मुंगीच्या पावलांनी जाते. याचा अर्थ पण आईनेच पद्मजाला सांगितला. तो अर्थ होता दु:ख जेव्हा येते तेव्हा ते मोठय़ा प्रमाणावर येते, पण जाताना मात्र हेच दु:ख हळूहळू जाते.
‘हत्ती गेला आणि शेपूट राहिलं’ ही दुसरी म्हण माझ्या सौ ने सुचविली. पद्मजाला आता सगळीकडूनच इनपुट मिळत होते. सौ म्हणाली या म्हणीचा अर्थ होणार एखाद्या कामातील कठीण, आव्हानात्मक भाग पूर्ण होणे पण छोटा भाग मात्र नाहक अडून राहाणे.
हत्ती पुराण पुढे नेताना मी म्हटले, ‘‘अजून एक प्रसिद्ध म्हण आहे ‘हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी.’ याचा अर्थ होतो मोठे होऊन यातना, कष्ट भोगण्यापेक्षा लहान राहून मजा, सुख उपभोगावे.’’
हे सांगून मी ठरल्याप्रमाणे आंघोळीला पळालो, पण मुंगी या शब्दाचाच आधार घेऊन बायकोने पद्मजाची शिकवणी पुढे चालू ठेवली.
‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ असे सांगून प्राजक्ताने aant म्हणजे मुंगी असे पद्मजाला समजाविले.
संतांनी लहान होऊन राहण्यातच कसे सुख आहे हे पटवून देण्यासाठी मुंगीचा कसा सुरेख वापर केला हे ऐकून पद्मजालाही कौतुक वाटले.
मुंगीसारखाच घराभोवती आढळणारा अजून एक प्राणी म्हणजे सरडा. सरडा म्हणजे chameleon.
असे सांगून प्राजक्ताने पद्मजाला दोन-तीन वाक्प्रचार सांगितले. पहिला म्हणजे ‘सरडय़ासारखे रंग बदलणे’, दुसरा ‘सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत’ व तिसरा ‘कुंपणावरचा सरडा.’ हे ऐकून नूपुर म्हणाली हे सर्व अर्थ मी ताईला सांगते आणि आई तू माझ्या शाळेच्या डब्याचे बघ.
नूपुरने ज्ञान देणे चालू केले.. सरडय़ासारखे रंग बदलणे म्हणजे एका विषयावर घेतलेली भूमिका सतत बदलत राहणे किंवा काळ वेळ बघून आपला स्वभाव, वागणे इत्यादी बदलत राहणे. सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत म्हणजे सुमार बुद्धिमत्तेच्या माणसाची कल्पनाशक्ती किंवा कामाचा आवाका हा एका विशिष्ट पातळीपर्यंतच मर्यादित राहतो. त्यापुढे जायचे धैर्य तो कधीच एकवटू शकत नाही. सर्वात शेवटी म्हणजे कुंपणावरचा सरडा. याचा अर्थ होणार कोणताही निर्णय घेऊ न शकणारा, नक्की कोणत्या बाजूला जायचे हे ठरवू शकत नसणारी व्यक्ती.
‘बाहेर सरडा तर आत पाल’ असे म्हणत सौमित्रनेही आता पद्मजाच्या शिकवणीमध्ये सहभाग घेतला. पाल म्हणजे लिझार्ड असे सांगत त्याने पद्मजाला ‘मनात शंकेची पाल चुकचुकणे’ असा वाक्प्रचार सांगितला. पाल चुकचुकणे म्हणजे मनात वाईट शंका येणे असे मग पद्मजाने डायरीमध्ये नोट केले.
आजची शिकवणी पूर्ण करण्याआधी सौमित्र म्हणाला, ‘‘ताई दोन दिवसांपूर्वी तू काऊ म्हणजे गाय व बुल म्हणजे बैल या प्राण्यांबद्दल शिकलीस. त्यावरून अजून काही म्हणी मला आठवल्या जसे की एखाद्याने ‘गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये’ व ‘घाण्याला जुंपलेला बैल’; मात्र आता यांचे अर्थ शोधायचे काम मात्र तुझेच असे सांगून स्वारीने धूम ठोकली व पद्मजा मात्र विचारांमध्ये गढून गेली.