प्रत्येक मनुष्याला आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असतं. लहानपणापासून तो ज्या वातावरणात असतो ते वातावरण पारिवारिक असतं. प्रथम तिथेच तो मातृभाषा ऐकतो, नंतर बोलायला सुरुवात करतो. मोठा झाल्यावर वाचन आणि लेखन करतो. या भाषेबद्दल आपुलकी आणि अभिमान असणं साहजिकच आहे. आपल्याला महाराष्ट्रीय लोकांना आपल्या मराठी भाषेबद्दल प्रेम आहे.
मराठीची देवनागरी लिपी अत्यंत वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध आहे. हे आपणच म्हणतो असं नाही तर अनेक भाषांचे विद्वानही मान्य करतात. स्वररचना, व्यंजनांचे वर्गीकरण (कंठय़, तालव्य इ.) आणि लिपी म्हणजे अक्षर याचे ध्वनी म्हणजे उच्चार यात असलेले अन्योन्याश्रित संबंध यामुळे देवनागरी सुस्पष्ट आणि सक्षम झाली आहे. प्रत्येक अक्षराचा ठरावीक ध्वनी आणि प्रत्येक ध्वनीकरिता ठरावीक अक्षर आहे. असा स्पष्ट संबंध कित्येक समृद्ध वाङ्मयांच्या भाषेत नाही. इंग्रजीत तर अक्षर म्हणजे स्पेलिंग आणि ध्वनी म्हणजे उच्चार यांचा काहीच संबंध नाही. क या ध्वनीकरिता तीन-चार अक्षरं आहेत. कॅटमध्ये सी, काइटमध्ये के आणि केमिस्ट्रीमध्ये सीएच अशी अक्षरे आहेत. कालिदासकरिता Kalidas लिहितात. Calidas का नाही, याचं उत्तर नाही. gh या व्यंजनसमूहात तर फारच गोंधळ आहे. Ghost मध्ये gh चा उच्चार घ आहे, laugh मध्ये तेच gh फ होतात आणि daughter मध्ये gh चा काहीच उपयोग नाही. एखाद्या स्वराचा काय उच्चार होईल, याबद्दल कोणताही नियम नाही. But आणि Put हे सर्वसाधारण ओळखीचे उदाहरण आहे. उर्दूप्रेमींनाही असे कठीण प्रसंग येतात. ज़्ा करता उर्दूमध्ये जे, जोय, ज़्वाद अशी अक्षरे आहेत. ज़्ामीन, ज़्ाख्म या शब्दांमध्ये कोणते अक्षर कामात येते हे कळत नाही. परंतु हिन्दी, मराठी आणि संस्कृतमध्ये लिपी म्हणजे अक्षर आणि ध्वनी म्हणजे उच्चार स्पष्ट आणि तर्कशुद्ध आहेत.
तरी देवनागरी लिपी स्वयंपूर्ण आणि निदरेष नाही हे मान्य करायला पाहिजे. यापूर्वी लिपी सुधारण्याबद्दल प्रयत्न झाले, परंतु त्यांना मान्यता मिळाली नाही. ‘इ’करता अि, ‘उ’करता अु किंवा ‘ए’करता अे असे प्रयोग यशस्वी झाले नाहीत. हिन्दीनेही ते स्वीकारले नाहीत.
प्रत्येक भाषेत काही विशिष्ट ध्वनी असतात. परंतु त्यांना प्रकट करण्याकरता काही चिन्हे किंवा विशिष्ट अक्षरे असतातच असे नाही. देवनागरीत नवे चिन्ह बनवण्याची क्षमता आहे. इंग्रजीच्या काही ध्वनींकरता देवनागरीत विशिष्ट चिन्ह निर्माण करण्यात आले आणि ते रूढ झाले. cat, bat, rat करता कॅट, बॅट, रॅट असे लिहू लागलो. तसंच college, doctor, office करता आ आणि ओ मधील ध्वनी करता मराठी भाषिकांनी कॉलेज, डॉक्टर, ऑफिस असे लिहिण्यास सुरुवात केली आणि ती मान्य झाले. परंतु इंग्रजीच्या प्रत्येक ध्वनीकरता नवे चिन्ह बनवण्याची गरज नाही. Division शब्दाचा प्रयोग आपण करतो, परंतु sion चा उच्चार कठीण आहे. तो ध्वनी प्रत्येक शिक्षित व्यक्तीला जमणार ही नाही.
मराठी भाषेतही काही विशिष्ट ध्वनी आहेत. ते संस्कृत आणि हिंदीत नाही. ज आणि ज़्ा करता आपण एकच अक्षर ज वापरतो. परंतु आपण वेगळे चिन्ह तयार करू शकतो आणि करायला हवे. जोशी हे आडनाव फार प्रचलित आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये अनेक जोशी आहेत. हिंदीत साहित्यिक इलाचंद्र जोशी, गुजराती लेखक उमाशंकर जोशी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचा उच्चार ज आहे. परंतु महाराष्ट्रात जोशी नाही, ज़्ाोशी (प. भीमसेन ज़्ाोशी) आहेत. या ध्वनीकरता आपण वेगळे चिन्ह केले नाही. तसेच च चे दोन प्रकार आणि चिमणी, चिटणीस आणि चम्म्मचम, चमेर; परंतु आपण लिहितो फक्त च. याच वर्गात झ चेही दोन प्रकार किंवा ध्वनी आहेत. माझा भाऊ, माझी बहीण, माझा नवरा, माझी बायको. हिन्दी भाषकांनी ज मध्ये एक बिंदू (त्याला नुक्ता म्हणतात.) लावून ज़्ामीन, ज़्ाोर, ज़्ामाना असे शब्द लिहिण्यास सुरुवात केली. परंतु उर्दू शब्दांचे बरोबर उच्चार करणं सर्वसाधारण माणसाला जमत नाही. मराठीत मराठीचे शब्द स्पष्टपणे लिहिता येतील. इतर भाषांच्या विशिष्ट ध्वनीकरता प्रयत्न न करता आपल्याच भाषेतील शब्दांना स्पष्टपणे लिहिण्याकरता शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, नियतकालिक, लेखक आणि मुद्रक यांनी प्रयत्न करायला हवा. च, ज आणि झ मध्ये बिंदू लावून चार-चम्मचे, जीभ-जमळे, तुझी आणि तुझम यांचे अंतर दाखवावे.
प्रत्येक भाषेच्या ध्वनींची सीमा आहे. इतर भाषांचे सर्व उच्चार कोणतीही लिपी दाखवू शकत नाही. उर्दूची लिपी तर फार दोषपूर्ण आहे, परंतु उर्दूप्रेमींना आपल्या वाङ्मय आणि बोलण्याच्या ढबीचा अभिमान आहे. मराठीत असलेले ळ हे अक्षर उर्दू, बंगाली, एवढेच काय हिंदीतही नाही. टिळक, सुळे, मुळे, खळे असे शब्द बोलणे फार अवघड आहे. म्हणून इंग्रजांनी टिळकांना तिलक केलं. संस्कृतच्या देवनागरी लिपीमध्ये काही अक्षरे हिन्दी-मराठीतून लुप्त झाली. इतर भाषांचे जे ध्वनी देवनागरीत नाहीत त्यांच्याकरता विशिष्ट अक्षर किंवा चिन्ह बनविण्याचे प्रयत्न हिन्दीत झाले. हिन्दीचा उर्दूशी निकटचा संबंध असल्यामुळे काही लेखकांनी क, ख, ग, फ, ज यांची दोन रूपे एक बिंदू लावून केले. परंतु त्यांनी ळ ध्वनी स्वीकारला नाही. देवनागरी लिपीत इतर भाषांचे शब्द, अक्षर, ध्वनी घेण्याची क्षमता असली तरी मराठीने उर्दू, इंग्रजीचे शब्द वापरताना आपली भाषा अवघड करू नये. क़मर जलालाबादी, मिज़्रा ग़ालिब, सुपरविज़्ान यांसारख्या शब्दांना मराठी उच्चारच द्यावा. टिळक बोलता येत नाही म्हणून हिंदी-इंग्रजीने तिलक बोलणं आणि लिहिणं मान्य केलं. त्याचप्रमाणे उर्दूचे असंख्य शब्द मराठीत आहेत. त्यांना मूळ उर्दू उच्चारकरता नवे चिन्ह किंवा अक्षर तयार करीत नाही. देवनागरी सामथ्र्यवान आहे म्हणून तिचे दोहन किंवा exploitation करणे योग्य नाही. मराठीत गजल लोकप्रिय आहेत. परंतु उर्दूमध्ये तो शब्द ग नाही, ग आणि घ मधील ध्वनी आहे. असा ध्वनी प्रत्येकाला जमणार नाही. उर्दू ग चे अनेक शब्द (गरीब, गरज, मुगल), फ चे शब्द (फायदा, फरक), ख चे शब्द (खराब, खूश, खुदा) यांना मराठी लिपीमध्येच लिहिणे आणि त्याचप्रमाणे बोलणे योग्य आहे. हिंदीतही ते पूर्णपणे स्वीकारले गेले नाहीत.
महाराष्ट्रीय लोक किंवा महाराष्ट्रात राहणारे इतर लोक यांना लहानपणापासून मराठी संभाषण ऐकण्याची सवय आहे. ते चम्, ज़्ा आणि झम् चे शुद्ध उच्चार करतात. परंतु इतर भाषकांना जर मराठी भाषा शिकायची किंवा मराठी वाङ्मय वाचनाची इच्छा असेल तर त्यांना च, ज आणि झ ची दोन्ही रूपे कळत नाही. ‘चार चोर घरात शिरले,’ ‘जीवन जगण्याची इच्छा नाही’ किंवा ‘तुझ्या शाळेत माझा भाऊ शिकतो’ हे कसं बोलायचं, हे स्पष्टपणे कळणार नाही. च, ज आणि झ ची दोन्ही स्वरूपे दाखविण्याकरता लेखक, मुद्रक, शिक्षणतज्ज्ञ, वर्तमानपत्र यांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रात राहणाऱ्या इतर भाषकांनाही मराठी सुगम होईल. हे काम फार अवघड नाही. प्राथमिक शाळेत मराठी शिकवताना जर आपल्या लिपीत या सुधारणा केल्या तर देवनागरी अधिक स्पष्ट, सुगम आणि तर्कशुद्ध होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा