भाषांभाषांतील ही देवाण-घेवाण, पूरक की मारक? शुद्ध-अशुद्धतेच्या कसोटय़ा कुणी अन् कशा ठरवायच्या? मुळात ‘संवाद’ साधणारी भाषा अशुद्ध का व्हावी?

नूकताच जागतीक आरोगय दीन पार पडला..!
कसं वाटतं वाचून? पाऽऽर ‘पडल्यावाणी दीनवाणं, अगतिक’ खरं ना? हे अशुद्ध लेखन. आता ‘बोल्लेलं’ वाचा.
‘आज सकाळी गोची झाली. साली डबल-फास्ट कॅन्सल झाली. आठ बत्तीसची स्लो पकडायची म्हणजे, प्लॅटफॉर्म बदलायचा, रेल्वे ट्रॅक क्रॉस न करता ब्रिजवरनं जायचं म्हणजे प्रॉब्लेम, यु नो. ब्रिजवर नुसते भिकारी अन् फेरीवाले. सगळाच राडा. ब्रिजवरनं जायचं म्हणजे स्लोदेखील चुकणार. नंतर तेरा मिनिटं लोकल नाही.. सगळाच लोच्या. ऑफिसात लेट-मार्क. बॉस हजामत करणार! सालं, लाइफ म्हणजे लोकलचं टाइम टेबल झालं आहे अगदी..!
ही मुंबईकरांची बोली भाषा वा भेळ भाषा! एकाअर्थी सहजवाणी अथवा मुक्तवाणी. कॉकटेल भाषेला लोकल-टच.. स्थानीय स्पर्श. राडा, लोच्या, गोची, लफडा, साला वगैरे. शब्दश: शुद्ध मराठी भाषेचा आग्रह धरला तर.. पाहाच गंमत-
‘आज सकाळी गडबड झाली- दुप्पट जलद कॅन्स. सॉरी, माफ करा.. रद्द झाली. आठ बत्तीसची सावकाश पकडायची म्हणजे, तट बदलायचा. लोहमार्ग न ओलांडता पुलावरून जायचं, म्हणजे समस्या, कल्पना आहेच तुला. पुलावर नुसते भिकारी अन् फेरीवाले. सगळाच चिखल. पुलावरनं जायचं म्हणजे सावकाशदेखील चुकणार. नंतर तेरा मि.. सॉरी, माफ करा.. घटिका/ पळे (?) स्थानीय नाही.. सगळाच घोटाळा. कार्यालयात उशीर-खूण. साहेब केश-कर्तन करणार! ‘-’ आयुष्य म्हणजे आगगाडीचे स्थानीय वेळापत्रक झालं आहे अगदी..!’
कशी वाटते ही वाणी?
दीन वाणी? बोगद्यातून गेल्यासारखं वाटतं ना? जगाशी संपर्क नको. एरवी बोगद्यातून बाहेर आल्यावर कसं मोकळंढाकळं वाटतं.. सूर्यप्रकाश वा चांदण्या.. काहीही. हे महत्त्वाचं, खरं ना? भाषा शुद्ध असावी यात दुमत नाही. पण ती ‘सहजशुद्ध’ असणंदेखील तितकंच महत्त्वाचं. खरंच, इतर भाषेतील काही शब्द वापरल्याने भाषा ‘अशुद्ध’ का व्हावी? ज्ञानेश्वरकालीन व त्या आधीची ‘मराठी’ हा मूळ स्रोत मानला, तर गेल्या हजारभर वर्षांत, मोगल-ब्रिटिश या परकीय राजवटीत फारसी-इंग्रजी शब्द येऊन मिळाले, तर रामाची गंगा वा गोदावरी मैली का व्हावी? इतर देश-प्रांतातील वेशभूषा करण्याचे वा खाद्यपदार्थ खाण्याने आपण ‘अशुद्ध’ होतो का? तसं असेल तर मग घडय़ाळाचे काटे कुठवर मागे फिरवणार? आणि इतर कुठल्याही भाषेचे वा बोलीचे संस्कार न झालेली ‘मराठी’ कुठच्या काळांत अस्तित्वात होती? जिचा आज वापर होण्याची अपेक्षा करायची? ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलून इतिहास बदलता येतो, की पुन्हा लिहिता येतो नव्याने? की स्वाभिमान चेतविला जातो? अभिमान आणि अट्टहास यामधील लक्ष्मणरेषा कुणी ठरवायची अन् कशी ठरवायची?
वास्तवात किती तरी इंग्रजी शब्द, मराठी शब्दाला जोडून-जुळे शब्द असल्यासारखे आपण ध्यानीमनी नसताना सर्रास वापरत असतो.. पाटी-पेन्सिल, शाळा-कॉलेज, टेबल-खुर्ची, कप-बशी, स्टोव्ह-शेगडी, चोर-पोलीस, कोर्ट-कचेरी, डॉक्टर-वकील, नाटक-सिनेमा असे किती तरी. मुळात खुर्ची-कचेरी हे शब्द तरी कुठून आले? अथवा वरील बोगद्यातला ‘साहेब’ कुठला? ‘बस स्टॉप’साठी बस-थांबा वा ‘रिक्षा स्टॅण्ड’साठी रिक्षा-तळ हा तर अट्टहासाचा अतिरेक. जणू बस वा रिक्षा (की रिक्शा?) संस्कृतातून आल्या आहेत. खरं तर त्यांच्या केवळ युनियन्स, सॉरी संघटनाच तेवढय़ा मराठी असतात. ‘बंद’मध्ये अग्रेसर. बंद-बंदोबस्त-लाठीचार्ज’ वगैरे शब्द तर इंग्रजी वर्तमानपत्रांनी केंव्हाच आपलेसे केलेत. त्यातून ‘लाठी चार्ज’ तर आंतरराष्ट्रीय विवाह. तरीदेखील आपण टेलिफोन वा कॉम्प्युटर या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित शब्दांना प्रतिशब्दांचा अट्टहास करतो, तेंव्हा ‘दूरध्वनी-संगणक’चा अट्टहास दिसतो. (इथं पु.लं.चा ‘सखाराम गटणे’ आठवतो.) असे शब्द बोलताना ‘सहज’पणे आल्यास प्रश्नच नसतो. जसे हल्लीच्या मोबाइल-जमान्यातील, रिंग टोन-कॉलर टय़ून, एसेमेस-ईमेल, सेव्ह-डिलिट-अ‍ॅड करणे, करप्ट होणे-हँग होणे, वगैरे. या शब्दांनादेखील प्रतिशब्द शोध चालू असतो. हाताचं सहावं बोट असणाऱ्या मोबाइलसाठी मग ‘भ्रमणध्वनि-चलभाष’ वगैरे पुस्तकी खडे मग दाताखाली येतात. ‘पारेषण-उदंचन’च्या शुद्धीकरण काळात असंच होणार. प्रतिशब्द ‘सहज’ असणं मान्य नसावं. अर्धशतकापूर्वी ‘भ्रमंती’कार प्रमोद नवलकरांनी घेतलेलं टोपणनांव ‘भटक्या’ हा ‘मोबाइल’साठी जवळचा शब्द वाटतो. पण त्याला, या ‘रोडसाइड’ शब्दाला प्रतिष्ठा नाही. खरं तर येऊन मिळणाऱ्या प्रवाहातून हिणकस वेगळं करायचं, कसदार जवळ करायचं. प्रवाही व्हायचं, तरच मूळ प्रवाह जोमाने वाहेल, अन्यथा भाषेचं डबकं व्हायचं, वा न संपणारा बोगदा! एरवी काळाच्या उदरात गडप होणाऱ्या वस्तूंबरोबर ते शब्ददेखील इतिहासजमा होतातच की. पाटा-वरवंटा, खल-बत्ता, ताटाळं-शिंकाळं, घडवंची-फडताळं, कोनाडा-व्हरांडा, ओटी-माजघर, नरसाळं-काकडा.. पुढच्या पिढीपर्यंत नष्ट होतील. हे जिवंत नैसर्गिक तितकाच नव्याचा स्वीकार नैसर्गिक-सहज असावा. दैनंदिन वैज्ञानिक शब्दांचा सहज स्वीकार व्हावा.
हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं सत्य सांगताना, हिंदी ही ‘संपर्क भाषा’ असल्याचं विचारवंत मान्य करतात. तर कुणी, डॉ. आंबेडकरांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी, असं सुचविल्याचे दाखले देतात. थोडक्यात, स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षांनीदेखील आपण आपली राष्ट्रभाषा ठरवू शकलो नाही, इतक्या विविध भाषा असूनही. किंबहुना याच कारणामुळे, भाषाभिमानामुळे, हे उघड आहे. दुसऱ्या भाषेला मान देण्याची मानसिकताच नाही. वास्तवात, हिंदी ही ‘प्रवाही’ भाषा आहे असं म्हटलं जातं. हिंदीत ‘टेक्निकल’चं सहज ‘तकनिकी’ होतं. पोलीस-हॉस्पिटलचं सहज ‘पुलिस-अस्पताल’ होतं. जनवरी-फरवरीपासून सहज ‘नवंबर-दिसंबर’ करत वर्ष सरतात. वा मुंबईचा हिंदी भाषिक ‘अपनी तो साला वाट लग गई,’ असं सहज बोलून जातो. ‘वाट लगना’ हे पुढे-मागे हिंदी राज्यातसुद्धा प्रस्थापित झालं तर आश्चर्य वाटायला नको. बॉलीवूडखालोखाल हिंदी चित्रपट दक्षिणेत होतात, पण त्यांचा हिंदी-दुस्वास ऐतिहासिकच. त्यांना इंग्रजी जवळची वाटते त्यात गैर नाही, पण हिंदी परकीय वाटते, हे दुर्दैव. संस्कृतसाठी देवनागरी चालते, पण देवनागरीतील हिंदी नको. दक्षिणी राज्यांतून त्यांच्या भाषेत दुकानांच्या पाटय़ा, म्हणून महाराष्ट्रात ‘मराठी पाटय़ां’च्या सक्तीचं राजकारण. सक्तीनं साध्य होतं फक्त शक्तिप्रदर्शन. इंग्रजांचा तिरस्कार म्हणून इंग्रजीचा तिरस्कार, त्यामुळे मराठी शाळांतून इंग्रजी हद्दपार करण्याचा स्वातंत्र्यानंतरचा काळ. त्या पिढय़ांचं नुकसान झालं ते झालंच. आज मराठी शाळाच बंद पडत आहेत, त्याचं सोयरसुतक नाही. मात्र गाडय़ांच्या नंबर प्लेट्सवरून ‘महाराष्ट्र १२ एक्स झेड्..’ असा बेकायदेशीर ‘अभिमान’ मिरवला जातोय. काय बोलणार? काय‘द्या’चं बोला!
अध्र्याअधिक जगात इंग्रजीमधून संवाद साधला जातो. पण ‘यूनो’च्या वा तत्सम आंतरराष्ट्रीय सभेत, तिथं जागतिक समस्यांवर चर्चा-प्रश्नोतरं-संवाद अपेक्षित असतो, तिथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रेंचमधून, जपानचे नेते जपानी भाषेतून, तर भारतीय नेते हिंदीतून बोलतात. इंग्रजी येत असून. आपले भाषाभिमान-देशाभिमान कुठे कसे प्रकट करायचे तर जिथे जगाच्या-मानवतेच्या समस्या एकत्र येऊन सोडवायच्या तिथे! थेट संवाद न होता मग दुभाषेच संवाद साधतात(!) ज्यांना केवळ विविध भाषा अवगत असतात, पण विषयांचा गंध नसतो..
आपल्या देशांत आपण वेगळं काय करतो? भाषावार प्रांत रचना करताना प्रादेशीक भाषा समृद्ध व्हाव्यात हा स्तुत्य हेतु होता. पण स्वभाषेच्या अभिमानापोटी दुसऱ्या भाषेच्या-पर्यायाने प्रांताच्या-धर्माच्या तिरस्काराला खतपाणी घालणारं नेतृत्व इथं निर्माण झालं, पोसलं गेलं, त्यामुळे वेगळं काय साधणार? त्यामुळे भाषा संवाद साधण्यासाठी असताना विसंवाद पोसला गेला.
भाषा हे माध्यम न राहता, अंतिम साध्यच झालं. भाषेमुळे माणसं जवळ येण्याऐवजी दऱ्या वाढत चालल्या. पूल बांधायचे तिथे भिंती बांधल्या गेल्या. मूक व्यक्ति‘संवाद’ साधतात हातवारे-हावभाव-बोटांच्या आकृत्यांनी.. त्यांची भाषा-बोली कुठली? पंजाबी ओ. पी. नय्यर, उर्दरूतून शिक्षण झाल्यामुळे ‘रामनाम’ उर्दरूतून लिहायचा, हे भाषा-प्रांत-धर्म यामधील भिंती नष्ट करणारं उदाहरण! भाषा-धर्म-जात भ्रष्ट होण्याच्या भीतीमुळे वा अभिमानापोटी कुठलीही देवाण-घेवाण नाकारीत, कृत्रिम दिव्यांचा उजेड करून बोगदेच उजळत बसायचं का?
पु. ल. देशपांडे एका मुलाखतीत म्हणतात, ‘लिखित मराठी मला कधी आवडलंच नाही. कुठल्याही तऱ्हेची कृत्रिमता आली की ती मला नकोशी वाटते.. विवेकानंदांनीही एकदा म्हटलं आहे, लेखी निराळी का करता? मनामध्ये बोललेलं हाताच्या वाटे शाईतून उतरत असताना, तुम्हाला त्याची निराळी भाषा करायची काय गरज आहे?.. छान भाषेत लिहिणारे, बोलणारे लेखक.. चटकन आठवलं म्हणून सांगतो, व्यंकटेश माडगूळकर!..’
याच व्यंकटेश माडगूळकरांचा, त्यांनीच लिहिलेला एक घडलेला किस्सा थोडाफार आठवतोय. एका प्रकरणांत त्यांनी इंग्रजी प्रतिज्ञापत्रावर मराठीतून सही केली, तेंव्हा संबंधित अधिकाऱ्याला ते मान्य होईना. त्याने माडगूळकरांना विचारलं, ‘सही करण्यापूर्वी इंग्रजी मजकूर कुणी समजावून सांगितला होता का?’ माडगूळकर स्तंभितच झाले. त्यांनी आपल्याला इंग्रजी येत असल्याचं इंग्रजीतून सांगितल्यावरदेखील, त्या अधिकाऱ्याला ते पटेना, मग सही मराठीतून का? याच माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ इंग्रजीतून ‘दी व्हिलेज हॅड नो वॉल्स’ म्हणून प्रसिद्ध झाली. त्यामुळे ती जर्मन-जपानी भाषेतदेखील गेली, तिच्या आवृत्त्या निघाल्या! असो. भाषांभाषांतील ही देवाण-घेवाण, पूरक की मारक? शुद्ध-अशुद्धतेच्या कसोटय़ा कुणी अन कशा ठरवायच्या? मुळात ‘संवाद’ साधणारी भाषा अशुद्ध का व्हावी? शब्दश: कृत्रिम भाषांतरापेक्षा, शब्दांची देवाण-घेवाण झाल्यास भाषा अशुद्ध होईल की समृद्ध?

veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Dr Hartman said Pali is ancient language with valuable knowledge and literature published in Germany
जर्मनीतही पाली साहित्य प्रकाशित; पाली भाषेच्या संवर्धन आणि प्रचारासाठी प्रयत्न गरजेचे
Loksatta Lokrang Shades of greedy people on stage play
रंगभूमीवरील लोभस माणसांच्या छटा
Ministry of Skill Development launched skill courses in local languages now available in Marathi as well
कौशल्य विकासाचे धडे आता मातृभाषेतून; एनसीडीसीकडून मराठीमध्ये सुविधा
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
uday samant reaction marathi and non Marathi dispute over satyanarayan puja
मराठी भाषेबाबत जर कोणी अटकाव करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे : उदय सामंत
Story img Loader