करणे हे क्रियापद आपण अनेक अर्थानी वापरत असतो. पण अतिपरिचयामुळे त्यातल्या अर्थाच्या विविध छटा आपल्या लक्षात येतातच असं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळी सकाळीच सौमित्र व नूपुरची काही कारणावरून जुंपली होती. प्रकरण हाताबाहेर जात आहे हे पाहून नूपुर सौमित्रची तक्रार करण्यासाठी माझ्यापाशी धावली. त्यावर पाठोपाठ सौमित्रही आला व म्हणाला, ‘‘ताई, माझी कागाळी करू नकोस. त्यापेक्षा तुझे काय चुकले ते सांग आधी.’’
नेहमीप्रमाणे मी दोघांना जवळ घेत समजावले व मध्यस्थी केली. पद्मजानेदेखील मग सौमित्रला व नूपुरला, ‘भांडला नाहीत तर संध्याकाळी आइस्क्रीम घेऊन देईन’ असे प्रॉमिस केले. सगळे शांत झाल्यावर पद्मजा म्हणाली, ‘‘काका, कागाळी करणे म्हणजे काय रे?’’
मी म्हटले, ‘‘पद्मजा, काहीही होवो, तू तुझी शिकवणी विसरणार नाहीस. चल आज शिकू ‘करणे’ हा शब्द. कागाळी करणे म्हणजे एखाद्याची कम्प्लेंट घेऊन येणे.’’
अजून काही अर्थ मिळतात का ते पाहण्यासाठी मी चहा घेत घेत टीव्ही चालू केला. पहिली बातमी होती टोलबंदीवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वेशीवरच्या टोलनाक्यावर राडा केला व टोलवसुली काही काळासाठी बंद पाडली. पद्मजाला म्हटले, ‘‘राडा करणे म्हणजे िहसक पद्धतीने धुडगूस घालणे व काही काळासाठी अराजक निर्माण करणे.’’
पद्मजाने हा अर्थ डायरीमध्ये लिहून घेईपर्यंत दुसरी बातमी सुरूही झाली होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांचे विद्यमान खासदार आपल्याकडे खेचून घेऊन परस्परांवर कुरघोडी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. असा काहीसा त्यातील मथळा होता. मी म्हटले, ‘‘पद्मजा कुरघोडी करणे म्हणजे ट्राय टु बी वन अप किंवा दुसऱ्यापेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करणे.’’
तिसरी बातमी जी सारखी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवत होते ती म्हणजे काश्मीरमधील लोकसभेच्या संभाव्य निवडणुका उधळण्यासाठी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी घातपात करण्याच्या तयारीत आहेत. घातपात करणे म्हणजे मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी होईल असे िहसक कृत्य करणे. पद्मजा जरा गोंधळल्यासारखी वाटली म्हणून मीच मग म्हटले, ‘‘राडा हा दोन गटांमध्ये होतो; तर घातपात हा दहशतवाद्यांकडून जनतेला घाबरविण्यासाठी व जीवितहानी करण्यासाठी केला जातो.’’
पुढची बातमी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासंदर्भात होती. आता जारण मारण करणे, करणी करणे कायद्याने गुन्हा ठरणार अशी ती बातमी होती. पद्मजाला म्हटले, ‘‘डायरी काढ व लिहून घे- करणी करणे म्हणजे  to do black magic.’’
शेवटची बातमी ऐकून मी आंघोळीला पळायचे ठरविले. आमच्या सुदैवाने त्या बातमीमध्ये करणेचा अजून एक अर्थ मिळाला. न्यूज होती मुंबई मेट्रोबद्दल. मेट्रोचे रिलायन्स मेट्रो असे परस्पर बारसे केल्याने एमएमआरडीए रिलायन्सवर नाराज आहे हे ऐकून मी पद्मजाला म्हटले, ‘‘बारसे करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे नवीन नाव ठेवणे किंवा नामकरण करणे.’’
मी पद्मजाला गृहपाठ म्हणून काही वाक्प्रचार दिले.. मांडवली करणे, कांगावा करणे व पानिपत करणे.
आंघोळ आटपून मी ऑफिसला जायला निघालो. एवढय़ात शेजाऱ्यांचे कुत्र्याचे पिल्लू माझ्या जवळ येऊन माझ्या पायाशी लुडबुड करू लागले. मी त्याला उचलून हातात घेतले व त्याच्या अंगावरून लाडाने हात फिरविला. त्या पिल्लाला खाली ठेवत मी पद्मजाला म्हटले, ‘‘लुडबुड करणे म्हणजे आपल्याला नको असताना एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या कामामध्ये हस्तक्षेप करते किंवा आपल्या आजूबाजूला नाहक घुटमळते तेव्हा हा वाक्प्रचार वापरतात.’’
आज ऑफिसमध्ये एक-दोघांची कानउघाडणी करायची होती. खूप दिवस झाले, त्यांना कामामध्ये सुधारणा करण्याचे बजावूनदेखील काहीच सुधार दिसत नव्हता. मी त्यांना केबिनमध्ये बोलावून घेतले. त्यांना मी शांतपणे समजावले की मला त्यांचा उपमर्द करण्यात काहीच स्वारस्य नाही, पण मीही कोणाला तरी उत्तरदायी असल्याने त्यांच्या चुका दाखवून देणेदेखील आवश्यक होते.
माझे सहकारी मान खाली घालून निघून गेले व मी मात्र कागद काढून पद्मजासाठी अर्थ लिहू लागलो. कानउघाडणी करणे म्हणजे कठोरपणे टीका करणे व उपमर्द करणे म्हणजे वाईट प्रकारे अपमान करणे.
ऑफिसमधून परतल्यावर सवयीप्रमाणे चहा, नाश्ता व पद्मजाचा गृहपाठ स्वागतासाठी सज्ज होता. मांडवली करणे म्हणजे तडजोडीचा मार्ग स्वीकारून वादग्रस्त प्रकरण मिटविणे, कांगावा करणे म्हणजे नाहक आरडाओरडा करून स्वत:ची चूक लपविण्याचा प्रयत्न करणे व पानिपत करणे म्हणजे एखाद्याचा खूप वाईट प्रकारे पराभव करणे असे अचूक अर्थ माझ्या शिष्येने शोधून ठेवले होते.
पद्मजाला मी म्हटले, आता मी शहानिशा करणार आहे की हे अर्थ तू स्वत:हून शोधले आहेस की कोणाच्या मदतीने. पद्मजा म्हणाली, ‘‘मीच शोधून काढले अर्थ, पण गुगलच्या मदतीने. पण काका शहानिशा करणे म्हणजे काय?’’
मी म्हटले, ‘‘पूर्ण व सखोल चौकशी करणे.’’
पद्मजाची ज्ञानाची भूक शमविण्यासाठी मी तिला करणे या शब्दाचे अजून तीन अर्थ सांगून आजच्या पुरती शिकवणी पूर्ण करण्याचे ठरविले. पहिला वाक्प्रचार निवडला- सर करणे. सर करणे म्हणजे काबीज करणे. बरेचदा गिर्यारोहक एखादे उंच शिखर सर करतात किंवा सनिक शत्रूचे लष्करी ठाणे सर करतात.
दुसरा वाक्प्रचार होता उठाठेव करणे म्हणजे नको त्या गोष्टी करणे. त्यावर प्राजक्ता म्हणाली, ‘‘पद्मजा, तुझ्या काकाला सवय आहे लोकांसाठी नसत्या उठाठेव करण्याची. सुरुवातीला मला वाटले होते की तुझी मराठीची शिकवणी ही पण एक उठाठेवच आहे, पण आय शुड से आय वॉज राँग.’’
तिसरा व शेवटचा वाक्प्रचार होता- हाराकिरी करणे. भारतीय फलंदाज पुष्कळ वेळा हाराकिरी करून जिंकत आलेला सामना शेवटच्या क्षणी हरतात असे सांगून हाराकिरी करणे म्हणजे स्वत:हून पराभव ओढवून घेणे असा अर्थ मी तिच्या डायरीमध्ये लिहिला.
शिकवणी पूर्ण करण्याआधी अजून काही अर्थ मी पद्मजाला शोधायला सांगितले जसे की तोंड वाकडे करणे व रंगाचा बेरंग करणे. पण शिकवणीचा शेवट तर गोड करायचा असा अलिखित नियम असल्याने मी म्हटले आता आपण सर्वानी तोंड गोड करूया.. मी आणलेला खरवस खाऊन. तोंड गोड करणे याचा अर्थ पद्मजाला आपसूकच समजला हे काय वेगळे सांगायला हवे का?