घालणे हे क्रियापद आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरत असतो, पण त्याच्या विविधतेची आपल्याला कल्पना असतेच असं नाही. भाषा नव्याने शिकणाऱ्याला मात्र ते पटकन जाणवतं.
पद्मजाला मराठी शिकविण्यासाठी आज मी शब्द निवडला तो ‘घालणे’. मराठी वर्तमानपत्रात एक बातमी होती- पोलीस असल्याचा बहाणा करून एका भामटय़ाने वृद्धेला एक लाखाला गंडा घातला. पद्मजाला मी म्हटले, ‘‘गंडा घालणे म्हणजे फसविणे. त्याला समानार्थी शब्द म्हणजे टोपी घालणे.’’
दुसरी बातमी होती. राज्यसभेमध्ये गोंधळ घालून समाजवादी पार्टीने महिला आरक्षण बिल पास होण्यात मोडता घातला. पद्मजाला म्हटले गोंधळ घालणे म्हणजे to create chaos व मोडता घालणे म्हणजे to create obstacle.
एवढय़ात माझ्या सौ.ने फर्मान काढले, ‘‘तुमचे मराठीपुराण जरा थांबवा. आधी मला पद्मजा व मुलांना खाऊ पिऊ घालून देत, म्हणजे मी स्वयंपाक करायला मोकळी.’’
नूपुर म्हणाली, ‘‘ताई, वन मोर मिनिंग.. खाऊ -पिऊ घालणे म्हणजे टु फीड समवन.’’
मी टीव्ही चालू केला. अनुदानित सिलिंडरची संख्या सहावरून बारा करावी ही मागणी पंतप्रधानांच्या कानावर घालण्याचे आश्वासन पेट्रोलियम मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांंना दिले अशी बातमी होती.
नूपुर म्हणाली, ‘‘कानावर घालणे म्हणजे टु इन्फॉर्म.’’
यानंतरची बातमी होती शिर्डीला जाणाऱ्या भाविकांवर नियतीने क्रूर घाला घातला. सौमित्र म्हणाला, ‘‘पद्मजा ताई, नियतीने घाला घालणे म्हणजे ‘to meet with fatal accident’ हा अर्थ सांगून होत नाही तोपर्यंत तिसरी बातमी आली, की नक्षलवाद्यांनी गावात शिरून सरपंचाला, तो पोलिसांचा खबऱ्या होता म्हणून गोळ्या घातल्या. पद्मजा म्हणाली, ‘‘गोळ्या घालणे म्हणजे टु शूट विथ बुलेटस; राईट?’’
मी म्हटले, ‘‘अगदी बरोबर.’’
ऑफिसला जाताना मी पद्मजाला गृहपाठ दिला. दु:खावर फुंकर घालणे, घाट घालणे, अपराध पोटात घालणे व सपशेल लोटांगण घालणे.
घरी परतलो तेव्हा, सौ चहा व नाश्ता तर पद्मजा पाण्याचा ग्लास व तिचे मराठीचे अर्थ घेऊन आली. म्हणाली, ‘‘दु:खावर फुंकर घालणे म्हणजे एखाद्याच्या दु:खात सहभागी होऊन त्याला सहानुभूती दाखवून त्याचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करणे, घाट घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा बेत रचणे, अपराध पोटात घालणे म्हणजे एखाद्याला चूक केली असतानादेखील माफ करणे व सपशेल लोटांगण घालणे म्हणजे विनाअट पराभव मान्य करून क्षमायाचना करणे.’’
एवढय़ात माझ्या आईने सांगितले की अपराध पोटात घालणे यावर समानार्थी वाक्प्रचार आहे चुकांवर पांघरून घालणे म्हणजे एखाद्या चुकीच्या गोष्टीकडे डोळेझाक किंवा दुर्लक्ष करणे.
सासूबाईंनी तेवढय़ात टीव्ही लावला. मालिकेतील एक पात्र म्हणत होते की, ‘मी घातलेली अट पूर्ण केलीस तरच मी तुझ्यासोबत संसार करेन.’ पद्मजाला मी म्हटले, ‘‘अट घालणे म्हणजे टु पुट कंडिशन.’’ त्याच मालिकेमध्ये पुढे एक संवाद होता, ‘मी माझी मुलगी तुमच्या ओटीमध्ये घालत आहे, तेव्हा मुलगी समजून तिचा सांभाळ करा.’ मी पद्मजाला म्हटले, ‘‘इथे ओटीमध्ये घालणे म्हणजे सुपूर्द करणे.’’
त्यानंतर मी पद्मजाला म्हटले, ‘‘दोन दिवसांपासून मी कुंडीतील झाडांना पाणीच न घातल्याने ती सुकली आहेत, तेव्हा बाल्कनीत जरा पाणी घालून आलो.’’
पाणी घालणे म्हणजे to water हे मी तिला आवर्जून सांगितले.
मालिकेत पुढचे संवाद होते, ‘सुनेने माझ्या मुलावर अशी भुरळ घातली आहे की तो तिचाच होऊन राहिला आहे.’ मी पद्मजाला बाल्कनीमधूनच सांगितले की भुरळ घालणे म्हणजे to hypnotize.
घोळ घालणे, शपथ घालणे असेही काही वाक्प्रचार त्या मालिकेमध्ये आले. त्यामुळे घोळ घालणे म्हणजे टु मेस अप किंवा शपथ घालणे म्हणजे टु टेक प्रॉमीस असे अर्थही मला पद्मजाला समजावून सांगावयाला लागले. एवढय़ात त्या मालिकेत खलनायकाची एन्ट्री झाली.
माझी आई दातओठ खात म्हणाली, ‘‘या मेल्याचे दात कोणीतरी घशात घातले पाहिजेत.’’
आजीचा तो अवतार पाहून सौमित्र म्हणाला, ‘‘ताई, दात घशात घालणे म्हणजे एखाद्याला त्याच्या वाईट कामांसाठी दंडित करणे.’’
नूपुरची मराठीची क्लास टेस्ट असल्याने आम्ही टीव्ही बंद केला, पण तिच्या अभ्यासात आकाशाला गवसणी घालणे व काळजाला हात घालणे असे वाक्प्रचार होते.
नूपुर म्हणाली, ‘‘पद्मजा ताई, माझ्याबरोबर तुझापण अभ्यास होणार. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अशक्य असे काम तडीस नेण्याचे ठरविणे व काळजाला हात घालणे म्हणजे भावनिकदृष्टय़ा एखाद्याला आवाहन करणे.
मी पद्मजाला म्हटले, जरा शब्दांची अदलाबदल कर, उदाहरणार्थ, काळजावर घाव घालणे असे लिहिले म्हणजे अर्थ होतो to hurt someone emotionally.
उद्या परीक्षा असल्याने नूपुरला मी लवकर निजायला जा असे बजावले तेव्हा ती म्हणाली, ‘‘बाबा, आज अंथरूण घालायचे काम सौमित्रचे आहे..’’
अंथरूण घालणे म्हणजे टु प्रीपेअर बेड फॉर स्लीप हे पद्मजाला सांगून तिला म्हणालो, ‘‘सौमित्रचे अंथरूण घालून होईपर्यंत मी तुला अजून काही अर्थ सांगतो जसे की चुलीत घालणे, आळ घालणे म्हणजे आरोप करणे, खड्डय़ात घालणे म्हणजे एखाद्याला तोटय़ात किंवा नुकसानीत ढकलणे, साद घालणे म्हणजे प्रेमाने बोलाविणे, कोडे घालणे म्हणजे एखादा पटकन न सुटणारा प्रश्न विचारणे, गळ्यात गळे घालणे, मेळ घालणे म्हणजे दोन गोष्टींची उत्तम सांगड किंवा केमिस्ट्री अचिव्ह करणे व वादावादी घालणे म्हणजे एखाद्या मुद्दय़ावर भांडणे.’’
पद्मजाने विचारले, ‘‘काका गळ्यात गळे घालणे व चुलीत घालणे याचे तू अर्थ मला सांगितलेच नाही?’’
मी म्हटले, ‘‘जेव्हा मी तुला बॉडीपार्टस् व किचन आयटम्सबद्दल शिकवेन तेव्हा आपण हे अर्थ बघू.’’
पद्मजाचा चेहराच आता सांगत होता की, घालणे या शब्दापासून तिला सुटका हवी आहे. कारण आता तिच्या मेंदूमध्ये अजून नवीन काही सामावून घ्यायची ताकदच उरली नव्हती.