पोट हा आपला महत्त्वाचा अवयव. त्याच्यावरून मराठीत केवढे तरी वाक्प्रचार, म्हणी आहेत, पण अतिपरिचयामुळे आपलं या वेगळेपणाकडे लक्षच जात नाही.
पद्मजा आणि आम्ही सगळे आता आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना मराठीमध्ये काय म्हणतात या मुद्दय़ावर आलो होतो. कान, डोळे या अवयवांनंतर मी आज पद्मजाची पोट या विषयावर शिकवणी घ्यायचे ठरवले. पद्मजाला नाश्त्याच्या टेबलवरच मी म्हणालो की, आपण ज्याचे लाड करण्यासाठी नाश्ता करतो ना त्या stomach बद्दल आज मी तुला खूप काही सांगणार आहे. मी म्हटले मराठीमध्ये stomach ला म्हणतात पोट.
पण या पोटाने मराठी भाषेला खूपच समृद्ध केले आहे. पोट हा शब्द वापरून आपण खूप काही वेगळे सांगू शकतो. सुरुवात करू या पोट फुटेस्तोवर खाणे. याचा अर्थ आहे खूप खाणे किंवा To overeat. मी पद्मजाला म्हटले, नाश्ता खूप केलास तर सुस्ती येईल व अभ्यास होणार नाही, त्यामुळे खा पण जपून.
त्यावर सौ.ची टिप्पणी होती की पोटभर हसलीस तर मात्र चालेल. मी पद्मजाला म्हटले की, पोट दुखेपर्यंत हसणे असेही म्हटले जाते. या सर्वाचा अर्थ म्हणजे खूप हसणे, इतके की हसूच आवरता न येणे.
पद्मजाला मी म्हटले की, पोट हा शब्द वापरून मनुष्यस्वभावाचे अनेक पैलू दर्शविता येतात. उदाहरण द्यायचे झाल्यास पोटात एक अन् ओठावर दुसरे. याचा अर्थ मनात एक असणे व प्रत्यक्षात लोकांना दुसरेच सांगणे.
दुसऱ्याच्या पोटावर पाय देणे याचा अर्थ एखाद्याचा रोजगार हिरावून घेणे किंवा त्याचे नुकसान करणे. मी पद्मजाला म्हटले की, गोगलगाय अन् पोटात पाय याचा अर्थ तू सवडीने शोधून काढ.
नूपुर म्हणाली, ताई, आपल्याला खूप खायला मिळते, पण गरिबांना मिळत नाही. त्यांचा उपाशीपणा दाखविण्यासाठी पाठीला पोट लागणे असा वाक्प्रचार वापरला जातो.
सौमित्र म्हणाला, पोटात दुखणे म्हणजे एखाद्याचे चांगले झालेले सहन न होणे व त्याबद्दल ईष्र्या वाटणे. सौमित्र म्हणाला, ताई, तुझ्यामुळे आमचेही मराठीचे ज्ञान वाढत आहे. मी पद्मजाला म्हटले, आता टेबलवरून उठू या व आंघोळीचे बघू या. नाही तर तुझी प्राजक्ताकाकू रागावेल. पण त्या आधी तुझा गृहपाठ लिहून घे. ..आधी पोटोबा मग विठोबा, पोटापाण्याला लावणे व हातावर पोट असणे या तीन शब्दांचा अर्थ शोधून ठेव.
प्राजक्ता सौमित्रला म्हणाली, तू नाश्ता पोटभर केलास ना? कारण आज जेवणाला वेळ आहे. नाही तर मग खेळून झाल्यावर दमशील व मग येशील आई पोटात कावळे ओरडत आहेत, लवकर जेवायला दे असे सांगत. लगेच आमचे चिरंजीव पद्मजाला म्हणाले, बघ अजून एक अर्थ मिळाला.. खूप भूक लागणे.
मी नेहमीप्रमाणे सर्व काही आटोपून ऑफिसला पळालो. गाडीत पेपर चाळत असताना एक बातमी दिसली. त्यात म्हटले होते की, स्वातंत्र्यानंतर आजही आपल्याला इंडिया व भारत असे दोन प्रकार पाहायला मिळत आहेत. इंडियावाल्यांकडे सर्व सुखे हात जोडून दारात उभी आहेत तर भारतात राहणाऱ्यांना आजही पोटासाठी दारोदार हिंडावे लागत आहे. मी लगेच डायरीमध्ये नोट केले की, पद्मजाला हा आणखी एक वाक्प्रचार घरी गेल्यावर सांगायचा. तो म्हणजे रोजगारासाठी जागोजागी फिरावे लागणे.
ऑफिसमध्ये गेल्यावर आज एका गोपनीय विषयावर चर्चा करून निर्णय घ्यायचा होता. मी माझ्या विश्वासातील स्टाफला बोलाविले. सुरुवात करताना मी त्यांना म्हटले की, काही जणांना मी मुद्दामहून या ठिकाणी बोलाविलेले नाही, कारण त्यांच्या पोटात काहीही राहात नाही. हे बोललो खरे मी, पण मला लगेच जाणवले की, पद्मजासाठी मला अजून एक अर्थ मिळाला आहे व तो म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे कोणतेही गुपित टिकून न राहणे.
पण मी ज्यांना ज्यांना मीटिंगला बोलाविले होते त्यापैकी सतीश हजर नव्हता. मी वीणाला विचारले की, सतीश का नाही आला? तेव्हा ती म्हणाली की, त्याचा फोन आला होता की, त्याचे पोट अचानक बिघडले असल्याने तो आज सिक लीव्हवर आहे. मला हे ऐकून हसू आले, कारण अजून एक अर्थ सापडला होता ना! पोट बिघडणे म्हणजे stomach upset.
ऑफिसचे काम आटोपून मी वेळेवर घरी परतलो. सौ.ने लगेच चहा पुढे आणून ठेवला तर पद्मजाने चिवडय़ाची डिश पुढे ठेवली. पद्मजा म्हणाली, काका, आधी पोटोबा करा मग विठोबा. काय बरोबर म्हणत आहे ना! मी म्हटले अगदी बरोबर. आधी खाऊन घेतले ना की मग सर्व कामे करावीत, छान पार पडतात मग ती. मी तिला म्हटले, पण बाकीच्या गृहपाठाचे काय?
पद्मजा म्हणाली, केला आहे ना! पोटापाण्याला लावणे म्हणजे कोणाला तरी नोकरीला किंवा रोजगाराला लावणे, ज्यायोगे त्याची कमाई चालू होणे व हातावर पोट असणे म्हणजे रोजच्या जेवणासाठी रोज काम करावेच लागेल अशी परिस्थिती असणे.
पोटाची खळगी भरणे असाही एक अर्थ आहे, असे मी चिवडय़ाचा शेवटचा घास घेता घेता पद्मजाला सांगितले व त्याचा अर्थ म्हणजे कशीबशी भूक भागवणे.
सौ. पद्मजाला म्हणाली, पोटात आनंद न मावणे हाही एक वाक्प्रचार आहेच की. मला माहीत आहे की, तुला नोकरी मिळाल्यावर तुझ्या वडिलांचे पण असेच झाले असेल. त्यांना खूप आनंद झाला असेल जो शब्दात व्यक्त करता आला नसेल त्यांना.
एवढय़ात एक मांजर किचनच्या खिडकीपाशी अधाशीपणे कोणी काही खायला देत आहे या आशेने आमच्या सर्वाकडे बघत होते. तेव्हा सौ. म्हणाली नूपुर तिला जरा दूध-पोळी दे गं.. पोटुशी आहे ती!
नूपुर एवढय़ात पद्मजाला म्हणाली, ताई दूध-पोळी देताना आपल्याला अजून एक अर्थ मिळाला. पोटुशी असणे म्हणजे प्रेग्नंट असणे.
मी पद्मजाला म्हटले की, अजून हवे तितके अर्थ निघू शकतात पोट या शब्दावरून. त्यामुळे पोटात गोळा येणे या अर्थानंतर आपण सर्व जण थांबू या असे सांगून या शिकवणीचा समारोप करण्याचे मी ठरवले. सौमित्र म्हणाला, पोटात गोळा येणे म्हणजे खूप भीती वाटणे. पद्मजा, तुला आता मराठी शब्द ऐकल्यावर पोटात गोळा येत नसेल अशी आशा करून आपण इथे थांबत आहोत, असे सांगून आजची टय़ूशन मी खऱ्या अर्थाने पूर्ण केली.