आपण मराठी माणसं एखाद्याची कानउघडणी करतो. एखाद्याचे कान उपटतो. एखाद्याच्या कानीकपाळी ओरडून सांगतो. या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो. एवढंच नाही तर एखाद्याचे कानही भरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पद्मजा व माझी गाठ नेहमीप्रमाणे नाश्त्याच्या टेबलवर पडली. ब्रेड बटर खाता खाता मी पद्मजाला म्हटले की आजचा शब्द आहे एअफ. म्हणजे कान. कान हा शब्द शिकणे खूप सोपे आहे, तसेच वापरणेदेखील. हा शब्द वापरून मराठी भाषेमध्ये खूप काही सुचविता येते; जसे की, एखाद्याची कानउघाडणी करणे. याचा अर्थ होतो एखाद्याला ओरडणे. त्याचप्रमाणे कान उपटणे म्हणजे एखाद्याची चूक अधिकारवाणीने दाखवून देणे.
एवढय़ात आमच्या सौचे ओरडणे ऐकू आले. ती सौमित्रला ओरडत होती की, एरवी तू फार तिखट कानाचा आहेस, पण आता मी कानीकपाळी ओरडून सांगत आहे की, आठ वाजले, तुझ्या क्लासची वेळ झाली तरी अजून अंथरुणात लोळत पडला आहेस.
मी पद्मजाला म्हटले, ‘‘अजून दोन अर्थ मिळाले आपल्याला सौमित्रमुळे. तिखट कानाचा म्हणजे अगदी हळू बोललेलेही ज्याला ऐकू येते अशी व्यक्ती व कानीकपाळी ओरडून सांगणे म्हणजे परत परत सांगणे.’’
सौमित्र शेवटी उठला. पण आज सौ वेगळ्याच मूडमध्ये होती. तिची गाडी आता घसरली होती नूपुरवर. ती नूपुरला म्हणाली की, तुम्ही भाऊ -बहीण दोघेही सारखेच. तुलाही सांगत आहे की, जाडी होत आहेस, जरा दोरीच्या उडय़ांचा व्यायाम कर तर तूही या कानाने ऐकतेस व त्या कानाने सोडून देतेस.
मी पद्मजाला म्हटले, ‘‘आज तुझे नशीब जोरावर आहे. अजून एक अर्थ सापडला. इथे अर्थ आहे सांगितलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे.’’
मी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र चाळायला घेतले. त्यात बातमी होती की, एका प्रसिद्ध नटीने या कानाचे त्या कानाला कळू न देता एका उद्योजकाशी काल विवाह केला. मी पद्मजाला म्हटले की, अजून एक अर्थ लिहून घे, या कानाचे त्या कानाला कळू न देता म्हणजे अतिशय गुप्त प्रकारे एखादी गोष्ट तडीस नेणे.
इतक्यात नूपुर सौमित्रला म्हणाली, ‘‘काल फ्रिजमध्ये माझ्या वाटणीचे ठेवलेले चॉकलेट पाहिलेस का?’’ खरे तर मला माहीत होते की, हे सौमित्रचेच काम असणार, पण तो सवयीप्रमाणे मला माहीत नाही असेच म्हणाला.
मी पद्मजाला म्हटले, ‘‘सौमित्रच्या या कृतीला म्हणतात कानावर हात ठेवणे. म्हणजे आपल्याला काहीही माहीत नसल्याची बतावणी करणे.’’
सौची गाडी आता माझ्यावर घसरली होती. मला म्हणाली, ‘‘पद्मजाला शिकवता शिकवता आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. कारण नूपुर व सौमित्र माझे काही ऐकत नाहीत, पण तुमचे मात्र घाबरून का होईना ऐकतात तेव्हा सोनारानेच कान टोचलेले बरे!’ मी सौचा राग शांत करण्यासाठी म्हटले की, आताच दोघांना अभ्यासाला बसवितो. हे सांगत असतानाच मी पद्मजाला म्हटले की, सोनाराने कान टोचणे म्हणजे योग्य त्या व्यक्तीनेच एखाद्याला चूक दाखवून देणे.
नेहमीप्रमाणे माझी ऑफिसला जायची वेळ झाली म्हणून मी माझे सर्व रुटीन आटोपले व ब्रीफकेस घेऊन घराबाहेर पडतच होतो, एवढय़ात पद्मजा म्हणाली, ‘‘काका, माझा गृहपाठ?’’
मी म्हटले, ‘‘आज नूपुर किंवा प्राजक्ताकडून घे.’’
दुपारी ऑफिसमध्ये लंच टाइममध्ये मला पद्मजाचा फोन आला. ती म्हणाली, ‘‘काकूने मला गृहपाठ दिला होता कानोकानी होणे, कान भरणे व कानफाटय़ा नाव पडणे.’’
मला पहिले दोन अर्थ शोधता आले. कानोकानी होणे म्हणजे एखादी बातमी सर्वाना कळणे, जगजाहीर होणे. कान भरणे म्हणजे एखाद्याविषयी वाईट विचार दुसऱ्याच्या मनात भरविणे. पण तिसरा काही शोधता आला नाही.
मी म्हटले की, कानफाटय़ा नाव पडणे म्हणजे एखाद्याविषयीचे मत कायमसाठी कलुषित होणे. मग भलेही तो माणूस बरोबर असो वा नसो.
संध्याकाळी घरी परतल्यावर सौने चहा देत असतानाच मला प्रश्न केला, ‘‘अहो, ऐकलंत का? तुमच्या कानावर काही पडले आहे का की आपल्या शेजारील बिल्डिंगचे पुनर्विकासाचे काम चालू होत आहे ते? जरा चौकशी करा ना. जमल्यास आपण तिथे एक छोटीशी जागा बुक करू.’’
मीही म्हटले की, माझ्याही कानावर असे काही आले आहे. एवढय़ात पद्मजाचे डोळे चमकले. तिला नवीन अर्थाचा सुगावा लागला होता ना. मी सौला हसतच म्हटले की, कान शब्द म्हटल्यावर पद्मजाने बघ कसे कान टवकारले. मी पद्मजाला म्हटले की, कानावर पडणे म्हणजे कुठून तरी एखादी बातमी समजणे व कान टवकारणे म्हणजे काही तरी ऐकू येतंय का हे बघण्याचा प्रयत्न करणे.
सौ म्हणाली की, कानात प्राण आणून ऐकणे असाही एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ होतो खूप एकाग्रतेने एखाद्याचे म्हणणे समजण्याचा प्रयत्न करणे.
एवढय़ात सौमित्रची किचनमध्ये एन्ट्री झाली. त्याने प्राजक्ताला फर्मान सोडले की, आज रात्री थालिपीठ व लोण्याचा बेत कर. वरती हेही सांगायला विसरला नाही की, थालिपीठे जरा तिखटच कर. तेव्हा मी पटकन पद्मजाला म्हटले की, तिखट या शब्दावरून आठवले की, कानामागून येऊन तिखट होणे असाही वाक्प्रचार आहे. याचा अर्थ आहे मागाहून येऊन किंवा कनिष्ठ असूनही एखाद्याच्या पुढे जाणे.
एवढय़ात नूपुरचेही आगमन झाले. ती सौला म्हणाली, ‘‘आई, तू नेहमी तुझ्या मुलाचेच चोचले पुरवितेस. मी कधीपासून तुझ्या कानापाशी भुणभुण लावली आहे की, पुरणपोळ्या कर तर तुझे मात्र नेमके त्या वेळी ‘कानपूर’मध्ये हडताल असल्यासारखे वर्तन असते.
प्राजक्ता म्हणाली, ‘‘अग नूपुर, पुरणपोळ्यांसाठी खूप मोठा घाट घालावा लागतो. त्यामुळे सवडीने त्याही करेन.’’ विषयांतर करण्यासाठी मी पद्मजाला म्हटले की, नूपुरला विचार ना अर्थाबद्दल. नूपुर जरा नाराजीनेच म्हणाली की, ताई कानामागे भुणभुण लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सारखी मागणी करणे व कानपूरमध्ये हडताल म्हणजे बहिरे असणे, ऐकू न येणे.’’
मी पद्मजाला म्हटले, ‘‘आता लताच्या वाढदिवसानिमित्त टीव्हीवर जुनी हिंदी गाणी लागणार आहेत व मी कानसेन असल्याने ती चुकवणार नाही. तेव्हा आता तुझी शिकवणी समाप्त करू या.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘ठीक आहे. काका फक्त कानसेन म्हणजे काय ते सांग.’’
मी म्हटले, ‘‘कानसेन म्हणजे उत्तम श्रोता असणे.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘हळूहळू आता माझे मराठी तामिळपेक्षाही जास्त चांगले होणार आहे.’’
प्राजक्ता व मी दोघांनी एकसुरात म्हटले की, तथास्तु व मी एका बाजूस टीव्हीचे बटन चालू केले लतादीदींचे स्वर्गीय सूर ऐकण्यासाठी..