मराठीत केवळ क्रियापदांनाच वेगवेगळे अर्थ आहेत असं नाही तर अवयवांच्या बाबतीतही असंच आहे. आपण डोळे हा अवयव घेतला तरी त्याचा किती वेगवेगळ्या संदर्भात उपयोग केला जातो.
आज सकाळी जाग आली तेव्हा मला काही तरी डोळ्यात गेल्यासारखे वाटत होते. डोळे चोळत चोळतच मी उठलो व डोळ्यांवर पाणी मारायला बेसिनकडे वळलो. एक छोटेसे पाखरू पापण्यांमध्ये अडकले होते. ते काढल्यावर जरा आराम वाटला. हे सर्व पद्मजा व सौ न्याहाळत होत्या.
पद्मजा म्हणाली, ‘‘काका, आर यू ओके?’’ मी म्हटले हो. चहाचा कप तोंडाला लावतानाच मी पद्मजाला म्हणालो, ‘‘चल आजचा विषय सापडला. आज मी तुला EYES या शब्दाबद्दल मराठीतील वाक्प्रचार सांगतो. तुला कळले असेलच की EYES ना मराठीमध्ये डोळे म्हणतात.’’
नाश्त्याच्या टेबलवर नेहमीप्रमाणे मी, पद्मजा, सौमित्र, नूपुर व सौ बसलो. आजचा बेत होता कांदेपोह्य़ांचा. सौमित्रला खायची घाई झाली होती म्हणून त्याने स्वत:च्या प्लेटमध्ये पोहे न घेता डायरेक्ट पोह्य़ांच्या बाऊलमध्ये हात घातला. सौ ने म्हणून लगेच डोळे वटारले व म्हणाली, ‘‘तुझे लाडके बाबा तुझ्या बेशिस्तीकडे कानाडोळा करतील, पण माझ्याकडे हे चालायचे नाही.’’ मी पद्मजाला म्हटले, ‘‘तुझी काकू मात्र खरंच हुशार आहे तिने डोळ्यांवरून आपल्याला दोन क्लू दिले. पहिला म्हणजे कानाडोळा करणे याचा अर्थ दुर्लक्ष करणे व डोळे वटारून तिने रागावणे हा अर्थ पण सुचविला.’’ पद्मजा म्हणाली, ‘‘म्हणूनच तर मी मराठी खूप लवकर शिकत आहे ना तुमच्या संगतीमध्ये!’’
मी म्हटले, ‘‘कानाडोळा करणे याला समानार्थी शब्द आहे डोळ्यावर कातडे ओढणे.’’
आम्हा सर्वाचे पोहे दोनदा खाऊन झाले होते तरीदेखील थोडेसे पोहे बाऊलमध्ये उरले होते. सौमित्रचा त्यावरच डोळा होता. सौ ने ते बरोबर ओळखले होते ती म्हणाली, ‘‘सौमित्र मगा पासून तुझा डोळा आहे त्या पोह्य़ांवर.. एकदाचे गिळा ते व मला मोकळे करा.’’ नूपुर म्हणाली, ‘‘ताई अजून एक अर्थ मिळाला व तो म्हणजे एखाद्या गोष्टीची अपेक्षा असणे म्हणजे डोळा असणे.’’
मी प्राजक्ताला म्हटले, ‘‘आंघोळीचे पाणी गरम होईपर्यंत मी आजचा पेपर डोळ्याखालून घालतो.’’
पद्मजा मला जरा पेपर देशील का असे विचारतानाच मी तिला डोळ्याखालून घालणे म्हणजे वाचणे हा अर्थ सांगितला.
पेपरमध्ये पहिली बातमी होती की एका आयकर खात्यातील अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्याकडे इतकी बेहिशेबी मालमत्ता आढळली की तपास अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले.
दुसरी बातमी होती की आमदार पुत्राच्या लग्नातील उधळपट्टीमुळे उपस्थित पाहुण्यांचे डोळे दिपून गेले.
मी पद्मजाला म्हटले की डोळे पांढरे होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे व डोळे दिपणे म्हणजे श्रीमंतीच्या प्रदर्शनामुळे हरपून जाणे.
तिसरी बातमी होती की सचिन तेंडुलकरची शेवटची खेळी डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक चाहते चढय़ा किमतीमध्ये तिकीट खरेदी करून वानखेडेवर जमणार.
चौथ्या बातमीमध्ये लिहिले होते की प्रसिद्ध गायक मन्ना डे यांनी मध्यरात्री खासगी रुग्णालयात शेवटचे डोळे मिटले. मी पद्मजाला म्हटले की डोळ्यात साठवणे म्हणजे एखादी गोष्ट कायमची स्मृतीमध्ये बंदिस्त करणे व शेवटचे डोळे मिटणे म्हणजे अंतिम श्वास घेणे किंवा निधन पावणे.
सौ पद्मजाला म्हणाली, ‘‘पद्मजा, सचिनची निवृत्ती व मन्ना डे यांचे जाणे यामुळे अनेक लोकांचे डोळे पाणावले.’’ डोळे पाणावणे म्हणजे अतिशय वाईट वाटणे हा अर्थ ती पद्मजाला सांगायला विसरली नाही.
मी ऑफिसला जाताना पद्मजाला सांगितले की पटकन गृहपाठ लिहून घे. डोळ्याला डोळा न लागणे, डोळ्यात सलणे, डोळ्यावर झापड बांधणे.
मी पद्मजाला म्हटले की आता बाकीची शिकवणी संध्याकाळी. पण आज सौमित्रचा मूड जरा मजा करण्याचा होता. तो म्हणाला, ‘‘पद्मजाताई, तू दिसायला इतकी सुंदर आहे कधी तुला कोणी कॉलेजमध्ये डोळा मारला की नाही?’’ पद्मजाला त्याचे म्हणणे कळले नाही. त्यामुळे नूपुरने तिला अर्थ सांगितला की डोळा मारणे म्हणजे एए- ळएअरकठॅ. हे ऐकल्यावर मात्र पद्मजा लटक्या रागानेच सौमित्रला मारायला सरसावली.
ऑफिसला पोहोचल्यावर माझे नेहमीचे काम चालू होते. इतक्यात एका रजेच्या अर्जावर माझे लक्ष गेले. डोळे आल्यामुळे दोन दिवस ऑफिस डय़ुटी करू शकणार नाही, असे त्यात कारण देण्यात आले होते. मी लगेच त्यावर सही केली व मनात खूणगाठ बांधली की पद्मजाला सांगायचे की डोळे येणे म्हणजे EYE- TEASING
संध्याकाळी घरी नेहमीप्रमाणे माझ्या स्वागताला चहा, नाश्ता व पद्मजाचा गृहपाठ तयार होता. पद्मजाला म्हटले, ‘‘मी पण एक अर्थ आणला आहे तुझ्यासाठी. पण त्या आधी तुझा गृहपाठ ऐकू दे.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘काका, डोळ्याला डोळा न लागणे म्हणजे शांत झोप न लागणे, डोळ्यात सलणे म्हणजे डोळ्यासमोर एखादा माणूस नकोसा वाटणे व डोळ्यावर झापड बांधणे म्हणजे नेहमी एकाच पद्धतीने विचार करणे.’’
आमचे हे संभाषण चालू असतानाच माझा शाळेतील एक जुना मित्र अचानक माझ्या घरी आला. खरे तर आम्ही एकाच रस्त्यावर वर्षांनुवर्ष राहत आहोत व आमची ऑफिसेस पण एकाच रस्त्यावर आहेत पण कधी तो मुंबईबाहेर तर कधी मी भारताबाहेर त्यामुळे गाठभेट होतच नव्हती. मी विक्रांतला म्हटले, ‘‘अरे ये. अगदी योग्य वेळी आलास, चहा तयारच आहे.’’
विक्रांत म्हणाला, ‘‘अरे आपले असे झाले आहे ना दोन डोळे शेजारी भेट नाही या संसारी.’’
सौ म्हणाली, ‘‘भावजी, अगदी बरोबर..’’
विक्रांत कधी त्याच्या घरी परत जातो व कधी मी काकाला अर्थ विचारते अशी घाई पद्मजाला झाली होती. मीही ते ओळखले होते. त्यामुळे विक्रांत गेल्या क्षणीच मी पद्मजाला म्हटले, ‘‘विक्रांतला म्हणायचे होते की कधी कधी खूप जवळ असूनही एकमेकांशी गाठभेट होणे अशक्य असते.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘अजून खूप वाक्प्रचार असतील ना डोळ्यावरून.’’
प्राजक्ता म्हणाली, ‘‘हो न, जसे की दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसणे, पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ न दिसणे. याचा अर्थ होतो दुसऱ्याचा क्षुल्लक दोषपण दिसणे, पण स्वत:ची घोडचूक मात्र न दिसणे किंवा डोळा चुकविणे म्हणजे एखाद्याच्या नकळत हळूच निघून जाणे.’’
सौ म्हणाली, ‘‘पद्मजा, मराठी भाषा इतकी समृद्ध आहे ना की नवीन नवीन अर्थ सापडतच राहतील त्यामुळे आता आपण ही शिकवणी येथेच आवरती घेऊया.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘बरोबर आहे काकू, आता उद्या नवीन शब्द पण नेहमीचाच खेळ.
am loving it.’’