मराठी माणसाच्या जिभेला हाड नसते, तो जिभेचे चोचले पुरवतो, तो उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे प्रकारही अधनंमधनं करत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज नाश्त्याच्या टेबलवर मी जरा लवकरच पोहोचलो. खमंग पुरणपोळीच्या वासाने मी आपसूकच तिथे ओढलो गेलो होतो. प्राजक्ता साजूक तूप पोळीवर वाढत होती. मला पाहताच म्हणाली, ‘‘तुमच्या आवडीची पुरणपोळी केली आहे, पण जरा बेतानेच खा, मधुमेह आहे तुम्हाला. नाहीतर जिभेवर ताबा राहणार नाही तुमच्या.’’ एवढय़ात पद्मजा व नूपुरची स्वारी पण तिथे धडकली.
नूपुर म्हणाली, ‘‘पद्मजाताई, आज तुला नवीन पदार्थ, पुरणपोळी व त्याबरोबर नवीन शब्द शिकायला मिळणार व तो शब्द म्हणजे टंग किंवा जीभ. आताच आई म्हणाली की जिभेवर ताबा राहणार नाही, म्हणजे अर्थ होतो खाण्यावर कंट्रोल न राहणे.’’
पद्मजाला मी म्हणालो, ‘‘प्राजक्ताच्या हाताची पुरणपोळी खाऊन तर बघ! नाही त्याची चव पुढचे दोन महिने जिभेवर रेंगाळली तर माझे नाव बदलून टाकेन.’’ चव जिभेवर रेंगाळणे म्हणजे पदार्थाची आठवण खाल्लय़ानंतरही कित्येक दिवस येत राहणे, असा अर्थ सांगून मी दुसरी पोळी ताटात ओढून घेतली.
सौमित्रला गोड फारसे आवडत नाही. त्यामुळे पुरणपोळीचे त्याला अप्रूप नव्हते, पण जेव्हा त्याला कळले की आज दुपारच्या जेवणात वांग्याची भजी मिळणार आहे तेव्हा त्याच्या तोंडाला आताच पाणी सुटले. तो सौ.ला म्हणाला, की मी आतापासूनच जिभेला धार लावून बसतो.
प्राजक्ता पद्मजाला अजून एक पोळी वाढत म्हणाली, की तोंडोला पाणी सुटणे म्हणजे पदार्थाच्या नुसत्या आठवणीने भूक चाळवणे. तर जिभेला धार लावून बसणे म्हणजे कधी एखादा पदार्थ खायला मिळतो याची वाट पाहणे.
एवढय़ात माझ्या सासूबाईदेखील चहासाठी टेबलवर आल्या. आमचे बोलणे त्यांनी ऐकले होते. त्या म्हणाल्या, ‘‘पद्मजा, जेव्हा तुझेपण लग्न होईल ना तेव्हा तुलापण तुझ्या कुटुंबाच्या सदस्यांचे जिभेचे चोचले पुरवावे लागतील.’’ जिभेचे चोचले पुरविणे म्हणजे एखाद्याच्या आवडीचे खाणे बनविणे असा होतो, हे सांगून मी आंघोळीला जायचे ठरविले.
आंघोळीला जाण्यापूर्वी मी पद्मजाला काही अर्थ शोधून ठेवायला सांगितले. जिभेला हाड नसणे, जीभ सैल सोडणे, उचलली जीभ लावली टाळ्याला व जिभेला लगाम घालणे हे ते वाक्प्रचार होते. आज सुट्टी असल्याने आंघोळीनंतर ऑफिसला जायचे नव्हते, पण निवांतपणे देवपूजा मात्र करायची होती. पूजाअर्चा झाल्यावर पद्मजाला दात व ओठ हे शब्द शिकविण्याचे मी मनाशी ठरविले.
माझी पूजाअर्चा होत आली होती, इथे पद्मजाचे पण अर्थ शोधणे संपत आले होते.
मी कोचवर आरामात बसत असतानाच पद्मजा तिची डायरी नाचवत माझ्याजवळ आली. मला म्हणाली, ‘‘हा घे तुझा होमवर्क. जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल तसे बोलणे, जीभ सैल सोडणे म्हणजे नको तेवढे बोलणे, उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे विचार न करता, परिणामांची तमा न करता मनात येईल ते बोलून मोकळे होणे व जिभेला लगाम घालणे म्हणजे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे.’’
मी पद्मजाला म्हटले, ‘‘बरोबर आहेत सर्व अर्थ, पण आता सुरुवात करू या दात व ओठ या शब्दांशी संबंधित वाक्प्रचार. दात म्हणजे टीथ व ओठ म्हणजे लिप्स असे सांगून मी पहिला वाक्प्रचार सांगितला; आपलेच दात अन आपलेच ओठ. बरेच वेळा आपल्याच माणसाकडून त्रास होत असल्याने त्याविषयी दुसऱ्याकडे बोलताही येत नाही हे सुचविण्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात, असे मी पद्मजाला सांगितले.
ओठ शिवून घेणे म्हणजे काहीही बोलण्याचे टाळणे असा दुसरा वाक्प्रचार सौ.ने किचनमधून सुचविला. त्यावर सौमित्र म्हणाला की ओठ शिवून घेतले तर ताईची शिकवणी कशी पूर्ण होणार?
एवढय़ात बेडरूममधून सासूबाई म्हणाल्या, ‘‘जावई बापू, जरा डोळ्यांच्या डॉक्टरचा फोन नंबर सांगाल का? एरवी ओठावर असतो पण आता आठवतच नाही.’’ मी नंबर सांगताना पद्मजाला म्हटले की ओठावर असणे म्हणजे तोंडपाठ असणे.

सासूबाई पुढे म्हणाल्या, ‘‘मघाशी ओठावर होता, पण आठवत नव्हता, आता जिभेवरून एक अजून वाक्प्रचार आठवला; तो म्हणजे जिभल्या चाटत खाणे म्हणजे अतिशय आवडीने खाणे.’’
मी शिकवणीची गाडी ओठांवर परत आणण्यासाठी दात-ओठ खाणे हा वाक्प्रचार पद्मजाला सांगितला. दात-ओठ खाणे म्हणजे एखाद्यावर चरफडणे असे सांगून आता फक्त दातांवरच म्हणी शिकू या असेही माझ्या शिष्येला सुचविले.
खायचे दात व दाखवायचे दात वेगळे हा प्रसिद्ध वाक्प्रचार मी पद्मजाला उदाहरणासहित सांगायचे ठरविले. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या गप्पा मारणारे राजकारणी जेव्हा स्वत: भ्रष्टाचार करतात तेव्हा ही म्हण चपखल लागू पडते, असे सांगितल्यावर पद्मजाला ते पटकन कळले.
एवढय़ात मी वर्तमानपत्र चाळू लागलो. काही नवीन अर्थ सापडतात का ते बघण्यासाठी. माझ्या सुदैवाने लगेच मला एक वाक्प्रचार मिळाला. भारतीय सेनेने काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडले अशी एक बातमी होती. मी पद्मजाला म्हटले की इथे अर्थ होतो अगतिकपणे पराभव मान्य करून शरण येणे.
दुसरी बातमी होती की प्रमाणाबाहेर वाढणाऱ्या महागाईमुळे गरिबांना दात कोरून पोट भरण्याची वेळ आली आहे. सौमित्र म्हणाला ताई इथे अर्थ होणार अत्यंत काटकसर करून जीवन व्यतीत करणे.
पद्मजाला मी म्हटले, ‘‘मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की तिचा तळ गाठणे कोणालाच शक्य होणार नाही. त्यामुळेच दातावरून मी शेवटचा वाक्प्रचार सांगून हे दंतपुराण थांबविणार आहे.’’
दाताच्या कण्या करणे हा शेवटचा वाक्प्रचार मी निवडला व पद्मजाला म्हटले की याचा अर्थदेखील थोडाफार दात कोरून पोट भरण्यासारखाच होणार आहे.
दाताच्या कण्या करणे म्हणजे काय हे समजाविण्यासाठी मी पद्मजाला म्हटले की प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून दाताच्या कण्या करतात.
पद्मजाच्या डायरीचे पानपण भरत आल्याने तीही आता पुरे या मूडमध्येच होती. उद्याचा शब्द काय असेल याचा विचार करतच तिने डायरी मिटली व माझी आजच्यापुरती तरी शिकवणीपासून सुटका झाली.