इतर अवयवांप्रमाणेच गुडघा, मांडी, पोटरी, तळवा, टाच या अवयवांवरून निघालेले वाक् प्रचार पाहिले की मराठीचे भाषिक वैविध्य जाणवते.
चहाचा घोट घेता घेता मी पद्मजाला म्हटले, ‘‘काल मी तुला पाय या शब्दाबद्दल शिकविले. आज बघूया पायाच्या विविध भागांना मराठीमध्ये काय म्हणतात ते. सुरुवात करूया मांडीपासून. मांडी म्हणजे ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये thigh म्हणतात तो भाग. त्यानंतरचा भाग म्हणजे गुडघा. ज्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ‘knee.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘मांडीवरून काही अजून अर्थ नाही का?’’ मी म्हणालो, ‘‘सध्या आपण गुडघा या शब्दापासून सुरुवात करूया.’’ मी वर्तमानपत्र उघडून सवयीप्रमाणे पद्मजासाठी अर्थ शोधू लागलो. एका बातमीमध्ये म्हटले होते की लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षाचे नेते पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मी म्हणालो, ‘‘पद्मजा, इथे अर्थ होईल, खूप आतुर होणे किंवा इम्पेशंट होणे.’’
दुसरी बातमी होती, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी अश्विनच्या फिरकी माऱ्यापुढे गुडघे टेकले. मी म्हटले, ‘‘इथे अर्थ बदलून होणार हार मानणे.’’
तिसरी बातमी होती, सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसणारे दोन राजकीय पक्ष निवडणुका आल्या की मात्र दोन बोक्यांप्रमाणे भांडत, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांची अब्रू चव्हाटय़ावर काढत आहेत. मी पद्मजाला म्हटले, ‘‘बघ तुला मांडीचा अर्थ पाहिजे होता ना! मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे एकत्र असणे.’’
पद्मजाला मी म्हटले, ‘‘आता मी तुला सांगतो पाऊल या भागाबद्दल, याला इंग्रजीमध्ये फूट असे म्हणतात. मराठीमध्ये पाऊल या शब्दावरून खूप वेगवेगळे वाक्प्रचार आहेत. जसे की पावलावर पाऊल टाकणे म्हणजे एखाद्याच्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण करणे.’’
मी पद्मजाला म्हटले, ‘‘आता वर्तमानपत्रातील शेवटची बातमी वाचून मी आंघोळीला पळतो.’’ बातमी होती, महागाई कमी करण्यासाठी रिझव्र्ह बँकेने व्याजदर वाढविण्याचे पाऊल नाइलाजाने उचललेले आहे. मी पद्मजाला म्हटले, ‘‘पाऊल उचलणे म्हणजे ठोस कृती करणे.’’
पद्मजाला गृहपाठ म्हणून मी पाऊल घुटमळणे, पाऊल उमटविणे व पाऊल वाकडे पडणे हे वाक्प्रचार दिले. सवयीप्रमाणे मी मग ऑफिसला गेलो व तेथील कामांमध्ये गुंतून गेलो. कामाच्या व्यापात दोन कधी वाजले ते कळले पण नाही. एवढय़ात माझा मित्र विक्रांत माझ्या केबिनमध्ये आला व म्हणाला, ‘‘आज कॅन्टीनमध्ये तुला पाहिले नाही लंच टाइममध्ये. म्हणून माझी पावले तुझ्या केबिनकडे आपसूक वळली. खूप कामाचे प्रेशर आहे का?’’
मी म्हटले, ‘‘हो, आहे जरासे.’’
विक्रांत गेल्यावर मी माझ्या केबिनमध्येच जेवण उरकले. पण पावले वळणे म्हणजे एखाद्या ठिकाणी जाण्याची इच्छा होणे हा अर्थ, मात्र मी पद्मजासाठी नोट करून ठेवला.
संध्याकाळी ऑफिसमधून परतत असताना सगळ्यांसाठी वडे-सामोसे बांधून घेतले. घरात शिरतानाच वडय़ांच्या वासाने, नूपुर, सौमित्र, पद्मजा सारे जण न सांगताच नाश्त्याच्या टेबलपाशी जमले. पद्मजाने आज खास कोल्ड कॉफी बनविली होती, जी तिने सर्वाना दिली. पोटोबा झाल्यावर पद्मजा म्हणाली, ‘‘काका, आता होमवर्क सांगते, पाऊल घुटमळणे म्हणजे एखाद्या ठिकाणाहून जावेसे न वाटणे व तिथेच उभे राहावे असे वाटणे. पाऊल उमटविणे म्हणजे स्वत:चे अस्तित्व एखाद्या ठिकाणी दाखवून देणे व पाऊल वाकडे पडणे म्हणजे चुकीच्या मार्गावर जाणे.
मी पद्मजाला म्हटले, ‘‘एकदम परफेक्ट! आता मी तुला हिल म्हणजे टाच या भागाबद्दल सांगतो. टाच या शब्दावरून मला सर्वप्रथम वाक्प्रचार आठवतो तो टाच आणणे म्हणजे एखाद्याच्या मालमत्तेवर जप्ती आणणे. दुसरा अर्थ आठवतो तो म्हणजे टाच मारणे म्हणजे घोडय़ाला जोराने पळण्यासाठी इशारा देणे.’’
एवढय़ात प्राजक्ता, माझी सौ म्हणाली की मराठीच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये एखादा प्रदेश टाचेखाली आणणे असे आम्ही खूप वेळा वाचले आहे. त्याचा अर्थ होतो, एखादा प्रदेश युद्ध करून जिंकून घेणे.
मी हसत हसत म्हटले की तुम्हा सर्व बायकांना आपापल्या नवऱ्यांना टाचेखाली ठेवायला खूप आवडते ना? तेव्हा प्राजक्ता म्हणाली, ‘‘तुम्ही नको तो विषय नको त्या ठिकाणी काढता.’’
मी म्हटले, ‘‘पण त्यामुळेच पद्मजाला कळेल ना की टाचेखाली ठेवणे म्हणजे एखाद्याला आपल्या हुकुमात ठेवणे.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘काका टाच पुराण बंद करूया व दुसऱ्या भागाकडे वळूया.’’
मी म्हटले, ‘‘आता एकच भाग राहिला आहे व तो म्हणजे तळपाय.’’ तळपाय काय हे दाखविण्यासाठी मी माझा पाय उचलून तिला तळपाय कशाला म्हणतात ते दाखविले. तळपायाची आग मस्तकाला जाणे हा एक खूप वापरला जाणारा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा खूप राग येणे असा होतो.’’
माझे बोलणे अर्धवट तोडत पद्मजा म्हणाली की, ‘‘काका तू जेव्हा ऑफिसमध्ये होतास ना तेव्हा नूपुर व सौमित्रचे भांडण चालले होते. तेव्हा नूपुर सौमित्रला म्हणाली की, तुझी अक्कल गुडघ्यात आहे त्यामुळे तू असे बोलत आहेस. याचा नेमका अर्थ काय होईल?’’
मी म्हटले, ‘‘गुडघ्यामध्ये अक्कल असणे म्हणजे कमी बुद्धिमत्तेचा असणे.’’
नूपुर म्हणाली, ‘‘पद्मजा ताई मलाही काही वाक्प्रचार आठवत आहेत तुझ्यासाठी. उदा. चोरपावलांनी येणे म्हणजे किंचितही आवाज न करता प्रवेश करणे. आल्या पावली मागे फिरणे असाही एक वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ होतो क्षणभरही न थांबता निघून जाणे.’’
नूपुरला मध्येच थांबवत मी म्हणालो, ‘‘गुडघ्याच्या खालील व पावलावरील भागास आपण पोटरी म्हणतो. पण यावरून मला तरी काही वाक्प्रचार सुचत नाही आहे. तुला काही सुचत आहे का ते बघ.’’ नूपुरलाही पोटरीवरून काही सुचत नाही हे बघून मी पद्मजाला म्हटले, ‘‘फोर अ चेंज, ज्याला तू इंग्लिशमध्ये ूं’ऋ म्हणतेस त्याला मराठीमध्ये पोटरी असे म्हणतात. पण या क्षणाला मला पोटरीवरून दुसरा कोणताही अर्थ सापडत नाही आहे.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘चला, एक तरी शब्द मिळाला की ज्याला फक्त एकाच प्रकारे वापरता येऊ शकते. एव्हरी रूल कम्स विथ एक्सेप्शन. बरं काका, उद्या कोणता शब्द घ्यायचा?’’
मी म्हटले, ‘‘माउथ व त्याचे पार्टस.’’