पायाभरणी करणे, पायधूळ झाडणे, पाय फुटणे, पायउतार होणे, एका पायावर तयार असणे, पायाला भिंगरी असणे, पाय जमिनीवर नसणे, पाया पडणे.. पाय या अवयवाला मराठी भाषेने अशी खूप कामे बहाल केली आहेत.
रस्त्यात चालत असताना एक बाईकस्वार रस्त्याच्या उलटय़ा दिशेने वेगात माझ्या दिशेने येत होता. तो धडकेल या भीतीने मी दोन पावले मागे सरलो, पण मागच्या छोटय़ा खड्डय़ात माझा पाय अडकून तो मुरगळला. मी लंगडतच कसा बसा घरी पोहोचलो. माझा तो अवतार पाहून सौ लगेच आयोडेक्स आणायला पळाली तर पद्मजा माझ्यासाठी गरम पाण्याचा शेक करायला धावली. थोडे उपचार केल्यावर मला बरे वाटू लागले. मी पद्मजाला म्हणालो, ‘‘चल तुझी शिकवणी चालू करू या.’’ पद्मजा म्हणाली, ‘‘काका, नको तुम्ही आराम करा.’’ मी म्हटले, ‘‘तुझ्या शिकवणीमुळे माझे लक्ष दुसरीकडे विचलित होईल व मला पायाचे दुखणे जाणवणार नाही.’’ पाय ज्याला इंग्रजीमध्ये लेग म्हणतात त्यावरून आज आपण वाक्प्रचार शिकू या. पाय; ज्याला पद असेही म्हणतात हेही मी पद्मजाला सांगायला विसरलो नाही.
मी पेपरमधल्या बातम्या वाचू लागलो व लगेचच मला एक अर्थ सापडला. बातमी होती की, निवडणुका जवळ आल्याने मंत्र्यांची विविध उद्घाटनांसाठी धावपळ चालू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून धरणाचा पायाभरणी समारंभ लगबगीत उरकण्यात आला. मी पद्मजाला म्हटले की, पायाभरणी करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची ठोस, मजबूत सुरुवात करणे.
दुसरी बातमी होती, अजून एका घोटाळ्यामुळे सत्ताधारी पक्षाची अवस्था बुडत्याचा पाय अजून खोलात, अशी झाली आहे. मी म्हटले, ‘‘आता इथे अर्थ होईल सध्याच्या वाईट परिस्थितीमधून अजून बिकट परिस्थितीमध्ये सापडणे.’’
तिसरी बातमी होती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने एका मंत्र्याला नाइलाजाने पायउतार व्हावे लागले. मी पद्मजाला म्हटले की, इथे अर्थ होतो पोझिशनवरून बाजूला व्हावे लागणे.
चौथी बातमी होती की, भ्रष्टाचाराशी निगडित फाइलींना अचानक पाय कसे फुटले, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली व त्याबद्दल तंबीही देऊन अहवाल सदर करण्यास सांगितले. पद्मजाला म्हटले की, पाय फुटणे म्हणजे अचानक गायब होणे.
पद्मजा पायाचे इतके विविध अर्थ ऐकून अचंबित होत होती. मी म्हटले आता शेवटची बातमी वाचून पेपर वाचन थांबवू या. शेवटच्या बातमीमध्ये, विरोधी पक्षाने सरकारवर पाणीपुरवठय़ाच्या सद्य:परिस्थितीबद्दल हल्ला करताना म्हटले की, स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांनंतरदेखील एक हंडा पाण्यासाठी ग्रामीण महिलांना दोन-दोन मैल पायपीट करावी लागते. मी पद्मजाला म्हटले की, पायपीट करणे म्हणजे खूप चालावे लागणे
इतक्यात सौ माझा नाश्ता बेडपाशीच घेऊन आली. मी म्हटले, ‘‘माझा नाश्ता टेबलवरच ठेव; मी उठू शकतो आता. मी उठलो की तेवढे अंथरूण मात्र घडी करून ठेव.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘काका, ते काम मी करते ना!’’ प्राजक्ता म्हणाली, ‘‘पद्मजा तुला अंथरुणावरून सांगते, अंथरूण पाहून पाय पसरणे असाही एक वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ उत्पन्न पाहून खर्च करणे.’’
नाश्त्याच्या टेबलवर बसताना मला मोबाइलवर फोन आला. माझा जुना मित्र जयंत पलीकडे फोनवर होता. तो म्हणाला, ‘‘अरे, तू आणि वहिनी आज संध्याकाळी घरी आहात ना? कारण तुझ्या घरी संध्याकाळी पायधूळ झाडण्याचा विचार आहे.’’ मी म्हटले, ‘‘हो, ये ना अवश्य.’’ फोन ठेवताना मी पद्मजाला म्हटले की, अजून एक अर्थ मिळाला पायधूळ झाडणे म्हणजे कोणाकडे तरी भेटायला जाणे.
सौने नाश्त्याची प्लेट भरताना सौमित्रला विचारले, ‘‘काय रे, दडपे पोहे चालतील ना तुला?’’ त्यावर चिरंजीवांचे उत्तर होते की, दडपे पोह्य़ांसाठी मी नेहमीच एका पायावर तयार असतो. पोह्य़ांचा घास तोंडात टाकताना सौमित्र पद्मजाला म्हणाला, ‘‘ताई एका पायावर तयार असणे म्हणजे मोठय़ा खुशीने एखाद्या गोष्टीसाठी राजी असणे.’’
नाश्ता संपवून उठताना मी पद्मजाला म्हटले की, माझी आंघोळ, पूजा-अर्चा होईपर्यंत खालील होमवर्क करून ठेव. पायावर धोंडा पाडून घेणे, अडला हरी गाढवाचे पाय धरी व बाळाचे पाय पाळण्यात दिसणे.
एवढय़ात सौमित्र नाश्ता संपवून घराबाहेर खेळण्यासाठी पळत होता. तेव्हा सौ म्हणाली, ‘‘सौमित्र, रविवार म्हटले की तुझ्या पायाला भिंगरी लागलेली असते. जरा लवकर घरी ये खेळून आणी अभ्यासाला लाग.’’
पायाला भिंगरी असणे म्हणजे सतत एक ठिकाणावरून दुसरी कडे फिरत राहणे. हा अर्थ साहजिकच पद्मजाला मला सांगावा लागला.
यथावकाश माझी नित्य कामे आटोपून मी निवांत बसलो होतो. पद्मजाने आज खास दक्षिणात्य स्वयंपाक आमच्यासाठी बनविला होता. त्यामुळे मोठय़ा उत्साहाने तिने मला जेवणासाठी हाक मारली. मीही पद्मजाला म्हटले की, लग्नाआधी मुलींना त्यांच्या पायावर उभे राहता येणे जितके महत्त्वाचे असते त्यापेक्षा अधिक त्यांना सुग्रास जेवण करता येणे आवश्यक असते.
पद्म्जा म्हणाली, ‘‘मला माहीत आहे काका, माझ्या मराठीच्या ज्ञानाबद्दल तुम्हाला अजून विश्वास नाही, पण माझे कुकिंग स्किल तुम्ही नक्की अॅप्रेशिएट कराल.’’ पद्मजाने खरेच सर्व फार सुंदर बनविले होते. जेवणानंतर सुपारी हातावर ठेवताना पद्मजा म्हणाली, ‘‘काका, आता अर्थ सांगते पायावर धोंडा पडून घेणे म्हणजे स्वत:च स्वत:चे नुकसान करून घेणे, अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे गरजेच्या वेळी मूर्ख माणसाचीही याचना करावी लागणे; त्याची मदत घ्यावी लागणे व बाळाचे पाय पाळण्यात दिसणे म्हणजे फार लवकरच एखाद्या माणसातील कौशल्य जगजाहीर होणे.’’
मीही पद्मजाला म्हटले की मी जेव्हा मघाशी पायावर उभे राहणे हा वाक्प्रचार वापरला तेव्हा त्याचा अर्थ होता स्वावलंबी होणे. नूपुरही आमच्या संभाषणात सामील होत म्हणाली की, ताई अजून काही अर्थ मी सांगते जसे की, पाय जमिनीवर नसणे म्हणजे अतिशय आनंदित असणे किंवा फाजील आत्मविश्वासामुळे वास्तवाची जाणीव नसणे, हातपाय चालविणे म्हणजे पोटापाण्याचा धंदा चालू करणे.
पद्मजा म्हणाली, ‘‘आता मी तुमच्या पाया पडते, ही शिकवणी इथेच थांबवू या व उद्या नवीन शब्द शिकू या.’’ मी व नूपुर मात्र गालातल्या गालात हसलो. पद्मजाला म्हटले, ‘‘पाया पडते म्हणजे विनवणी करते हा अर्थ स्वत:हून शोधून तुझी शिकण्याची आवड तू सिद्ध केलीस.’’