आपण मराठी माणसं एखाद्याला डोक्यावर घेतो, एखादा आपल्या डोक्यात जातो, एखाद्यासमोर आपल्याला डोकं आपटावं लागतं. डोक्यावर असलेल्या केसांनी आपण एखाद्याचा गळाही कापतो आणि एखाद्याच्या केसालाही धक्का लावत नाही.
सकाळी सकाळी माझ्या सहकाऱ्याने फोन करून आजारी असल्याने ऑफिसला येऊ शकणार नाही असे सांगितले. त्याचे असे न येणे वारंवार होऊ लागल्याने मला मात्र अधिक कामाचा ताण येत होता. वैतागतच मी नाश्त्याच्या टेबलवर आलो. स्वत:शीच पुटपुटलो की, आजकाल ऑफिसला जाणे म्हणजे डोक्याला नसता ताप झाला आहे. पद्मजा चहा व उपमा देत मला म्हणाली, ‘‘काका, टेक चिल पिल. आणि हो, तू माझ्या टय़ूशनची चिंता करू नको.’’ मी म्हटले, ‘‘तुझी टय़ूशन हा माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. चल आता, डोके हाच शब्द तुला शिकवतो. इंग्लिशमध्ये हेड म्हणजे मराठीत डोके.. आता डोक्याला नसता ताप होणे म्हणजे बहुतेक वेळा दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला त्रास भोगावा लागणे.
सौमित्र आला. उपमा बघून वैतागला. म्हणाला, ‘‘आई, उपमा आता माझ्या डोक्यात जायला लागला आहे, पास्ता, नुडल्स, फ्रेंच टोस्ट असं काही तरी वेगळं बनवत जा ना.’’
सौ. हसत म्हणाली, ‘‘मोठा झालास की इंग्लिश बायको घेऊन ये व तिच्या हातून ते सगळं खा, तोपर्यंत उपमाच गिळावा लागेल.’’ मी पद्मजाला म्हटले की, डोक्यात जाणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा खूप तिटकारा येणे, डोळ्यासमोरही नकोसे वाटणे.
मी वर्तमानपत्र वाचायला घेतले. त्यात होते की, नंबर वनच्या पदावर असताना डोक्यात हवा जाऊ न देणे हे सचिनला जमले असल्याने आजही तो वयाच्या चाळिसाव्या वर्षी यश व त्याचबरोबर लोकांचा आदरही अनुभवत आहे. मी पद्मजाला म्हटले की, डोक्यात हवा जाणे म्हणजे जराशा यशाने हुरळून जाणे व स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास वाढणे, त्यामुळे वागणे उद्दाम होणे.
एवढय़ात नूपुर आली व म्हणाली, ‘‘बाबा, या वर्षीपासून संस्कृत हा विषय आला आहे आम्हाला. आणि तो माझ्या डोक्यावरून जातो आहे. तू संध्याकाळी घरी आलास की मला संस्कृत सुभाषितांचे भाषांतर करायला मदत कर.’’ मी मानेने हो म्हटले व पद्मजाला म्हणालो की, डोक्यावरून जाणे म्हणजे काहीही न कळणे.
सौ. नूपुरला म्हणाली की, बाबा सकाळी ऑफिसच्या कामांमध्ये विचारमग्न असतात. त्यामुळे संस्कृत शिकवणीचे त्यांच्या डोक्यातून निघून जायची शक्यता आहे. तेव्हा घरी आल्यावर तू त्यांना आठवण कर’’. सौ. म्हणाली, ‘‘पद्मजा, डोक्यातून निघून जायच्या आधी तुला मात्र अर्थ सांगते. अर्थ आहे विसरून जाणे.’’
मी ऑफिसला जाण्यापूर्वी मी पद्मजाला विचारले, ‘‘डोक्यावर काय आहे तुझ्या किंवा माझ्या?’’ ती म्हणाली, ‘‘हेअर.’’ मी म्हटले, ‘‘हेअरला मराठीमध्ये केस म्हणतात. मी केसावरच तुला होमवर्क देणार आहे. लिहून घे, केसाला ही धक्का लागू न देणे, केसाने गळा कापणे व उन्हात केस पांढरे करणे किंवा पिकविणे.’’
ऑफिसमध्ये मी नेहमीच्या कामांना हात घातला. माझ्या मार्केटिंग टीमने नेहमीप्रमाणे रेट्समध्ये घोळ घालून ठेवला होता. मी टीमला बोलावून घेतले. त्यांना म्हटले की, कोणत्या शब्दांमध्ये समजावले की तुमच्या डोक्यात शिरेल? तुम्हाला काही सांगणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे.
टीम आता खजील झाली होती. त्यांनी असे परत होणार नाही, झाले ते शेवटचे, असे सांगून माफी मागितली. मला नकळत जाणवले की पद्मजासाठी मला दोन अर्थ मिळाले.. डोक्यात शिरणे म्हणजे सांगितलेले कळणे व दगडावर डोके आपटणे म्हणजे निर्थक प्रयत्न करणे.
मी काही लोकांची शाळा घेत आहे हे माझ्या काही वरिष्ठांना कळले. त्यांनी मला केबिनमध्ये बोलावून सांगितले, ‘‘तुम्ही मार्केटिंग टीमला ओरडलात ते बरेच केले. त्या टीममध्ये असे काही लोक आहेत की ज्यांना तुमच्या आधीच्या वरिष्ठांनी उगाच कारण नसताना डोक्यावर चढवून ठेवले आहे.’’ मी मानेनेच हो म्हणत तेथून निघालो. पद्मजासाठी आता तिसरा अर्थ मिळाला होता. डोक्यावर चढवून ठेवणे म्हणजे कारण नसताना, अकारण एखाद्याला महत्त्व देणे.
माझ्या जागेवर मी परतलो. बघतो तर काय, माझ्या हाताखालचा एक कर्मचारी माझी वाट बघत बसला होता. त्याला कौटुंबिक कारणांमुळे त्याच्या गावी बदली हवी होती. पण त्या ठिकाणी त्याच्या लायक काम नसल्याने ते एवढय़ात शक्य नव्हते. पण तो ऐकायला तयार नव्हता. मी म्हटले, ‘‘तुझ्यालायक तिथे काम नसेल तर कंपनी कशाला तुझी बदली करील? माझे रोज रोज डोके खाऊन ते साध्य होईल का? तूदेखील त्या ठिकाणी दुसरे काही काम आहे का आणि ते तुला करता येईल का हे शोधून ठेव.’’ त्याला ते पटले. डोके खाणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सारखी भुणभुण लावणे असा चौथा अर्थ मी पद्मजासाठी डायरीमध्ये नोट केला. संध्याकाळी घरी पोहोचलो तेव्हा सवयीप्रमाणे सौ. व पद्मजा माझ्यासाठी चहा व नाश्ता घेऊन आल्या. दोघींना माहीत होते की, पद्मजासाठी काही तरी नवीन अर्थ मी शोधले असणारच. बायको म्हणाली, ‘‘तुम्ही एक वेळ भाजी व फळे आणायला विसराल, पण हिच्यासाठी अर्थ आणायला विसरणार नाहीत.’’ पद्मजा म्हणाली, ‘‘काका, माझा होमवर्क झाला आहे. केसालाही धक्का न लागू देणे म्हणजे जरासेही नुकसान होणार नाही याची हमी घेणे, केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे व उन्हात केस पांढरे करणे म्हणजे खूप अनुभव घेणे.’’ मी म्हटले, ‘‘बरोबर, बरेचदा समोरच्याला आपल्या अनुभवाची जाणीव करून देण्यासाठी असे म्हटले जाते की, तुला काय वाटले, हे केस मी उन्हात पिकवले आहेत किंवा उन्हात पांढरे केले आहेत, या प्रश्नामागे उत्तरही असते की माझे पांढरे केसच मी तुझ्यापेक्षा जास्त अनुभवी असल्याचे द्योतक आहे.’’
मी पद्मजाला म्हटले की, आज तुझी शिकवणी संपवू या तुझा लाडका हीरो, रजनीकांतचा विषय काढून. त्याचा नवीन चित्रपट पुढच्या आठवडय़ामध्ये रिलीज होत आहे. रजनीकांत म्हटले की लोक चित्रपटगृह शिट्टय़ा मारून, टाळ्या वाजवून डोक्यावर घेतात. मीही या वेळी तुझ्याबरोबर तो अनुभव घेईन. पद्मजा जाम खूश झाली. कारण तिला नवीन चित्रपट पण पाहायला मिळणार होता व आतासाठी तिला अजून एक अर्थही मिळाला होता ना! डोक्यावर घेणे म्हणजे खूप कौतुक करणे.
पद्मजा म्हणाली, ‘‘काका, अजून काही बॉडीचे पार्ट राहिले आहेत का? नसतील तर मला मराठीमध्ये वेगवेगळ्या नंबर्सना काय म्हणतात ते शिकवायला सुरुवात करू या.’’