मराठीत एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे होतात, अंकांचा वाक्यात उपयोग हे सगळं शिकवल्यावर मराठी भाषेच्या शिकवणीचा पुढचा भाग म्हणून आम्ही सगळ्यांनी पद्मजाबरोबर शब्दार्थाच्या भेंडय़ा खेळायचे ठरवले.
पद्मजाला आता मराठी जरा वेगळ्या ढंगाने शिकवावे असे आम्हा सगळ्यांना वाटू लागले होते. मराठीतील वेगवेगळे शब्द भेंडय़ांच्या स्वरूपात पद्मजाच्या पुढय़ात यावे असे मी सुचविल्यावर सौमित्र, नूपुर, प्राजक्ता व स्वत: पद्मजादेखील खूपच खूश झाली. रात्रीच्या जेवणानंतर भेंडय़ा खेळणे म्हणजेच पद्मजाची शिकवणी घेणे यावरही सगळ्यांचे एकमत झाले.
खेळायला बसल्यावर मी दोन टीम्स बनविल्या. एका टीममध्ये माझी पत्नी प्राजक्ता, पद्मजा व माझी आई तर दुसऱ्या टीममध्ये सौमित्र, मी व माझ्या सासूबाई होते. वेगवेगळ्या शब्दांच्या चिठ्ठय़ा मी आधीच बनविल्या होत्या. त्यापैकी एक चिठ्ठी उचलल्यावर शब्द आला वजन. मी म्हटले वजन याचा अर्थ वेट असा होऊ शकतो. उदाहरणार्थ आजकाल मुलांना दप्तराचे वजन खूप होते. या शब्दाचा दुसरा अर्थ सांगताना समोरच्या टीममधून माझी आई म्हणाली, आपले वजन अशाच ठिकाणी खर्च करावे जिथे त्याचा सदुपयोग होईल. इथे वजन या शब्दाचा अर्थ होणार शब्द, शिफारस.
पद्मजाने दुसरी चिठ्ठी उचलली. शब्द आला खार. पद्मजा म्हणाली, खार म्हणजे स्क्विरल, एक सुंदर प्राणी. माझ्या सासूबाई म्हणाल्या, खारचा दुसरा अर्थ म्हणजे खार खाणे. म्हणजे एखाद्याचा दु:स्वास करणे.
आता तिसरी चिठ्ठी काढण्याचा मान होता सौमित्रचा. शब्द आला वार. सौमित्र म्हणाला, न कर्त्यांचा वार शनिवार. इथे वारचा अर्थ होतो दिवस. प्राजक्ताने लगेच उत्तर दिले, पाठून वार करणारे भ्याड असतात. वारचा अर्थ इथे होईल हल्ला.
पुढची चिठ्ठी उचलली ती माझ्या आईने म्हणजे सौमित्रच्या स्नेहा आजीने. शब्द आला तार. आजी म्हणाली पूर्वी पोस्टमन घरी तार घेऊन आला की हृदयात धडधड व्हायची. इथे तार या शब्दाचा अर्थ होणार निरोप पाठविण्याचे एक साधन. यावर माझे उत्तर होते, नोकरदार स्त्रियांसाठी घर व ऑफिस एकाच वेळी सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. तारेवरची कसरत म्हणजे अतिशय कठीण काम.
पुढच्या चिठ्ठीतून शब्द निघाला वाट. त्यावरून वाट बघणे म्हणजे प्रतीक्षा करणे व वाट लावणे म्हणजे एखाद्याचे नुकसान करणे या अर्थाची देवाणघेवाण दोन्ही टीम्समध्ये झाली.
सासूबाईंनी काढलेली पुढची चिठ्ठी वाचून पद्मजा म्हणाली, मान मोडून काम करणे असे म्हणतात तेव्हा मान या शब्दाचा अर्थ होतो नेक व मान मोडून काम करणे म्हणजे सतत खूप काम करत रहाणे. सौमित्र म्हणाला, मोठय़ांना मान देणे ही आपली संस्कृती आहे. इथे मान याचा अर्थ होणार रिस्पेक्ट.
एवढय़ात प्राजक्ताने टाइम प्लीज असे म्हणून सर्वाना थांबविले. ती सर्वासाठी आइस्क्रीमचे बाऊल भरून घेऊन आली. यावर माझी आई म्हणाली, सूनबाई, हे काम मात्र झकास केलेस. तेव्हा मी पद्मजाला म्हणालो, काम या शब्दाचे पण खूप अर्थ होतात जसे की, काम म्हणजे वर्क व काम म्हणजे सेक्स असे दोन्ही अर्थ होऊ शकतात. मराठीमध्ये सेक्स लाइफला कामजीवन असेही म्हणतात.
एवढेच कशाला अर्थ या शब्दाचे पण दोन अर्थ होतात. अर्थ म्हणजे मीिनग किंवा अर्थ म्हणजे पसा असेदेखील होऊ शकते म्हणून इकोनोमिक्सला मराठीमध्ये अर्थशास्त्र असेदेखील म्हणतात.
आम्ही आइस्क्रीम खात खातच पुन्हा खेळ चालू केला. कोणतीही टीम हार मानायला तयार नव्हती. बराच वेळ असे चालू राहिल्याने सासूबाई म्हणाल्या, अशाने हारजीतचा फैसला होणार तरी कसा? नूपुर म्हणाली पद्मजाताई हार या शब्दाचे पण दोन अर्थ होतात, एक म्हणजे गळ्यातील नेकलेस व दुसरा म्हणजे पराभव.
आता या खेळाचा निकाल लागला नाही तर अजून पाच शब्दांनंतर थांबायचे असे ठरवून आम्ही चिठ्ठय़ा काढावयास लागलो. पहिली चिठ्ठी निघाली पतंग. सौमित्र म्हणाला, पद्मजाताई, मी संक्रांतीला पतंग उडवितो. इथे पतंग म्हणजे काइट असा अर्थ घे. एवढय़ात प्राजक्ता म्हणाली की, पद्मजा, आमची नूपुर ना पतंगाला खूप घाबरते. इथे पतंगाचा अर्थ फुलपाखरू असा घे.
भेंडय़ा खेळतानाच मी लताची सीडी लावली. तिचे स्वर्गीय गाणे ऐकून नकळत माझ्या तोंडातून, ‘‘व्वा! काय सूर आहे. अगदी काळजाला भिडणारा.’’ असे शब्द निघाले. त्यावर नूपुर म्हणाली, सूर याचेही दोन अर्थ होतातच की एक गाण्यातील सूर व दुसरा पोहताना आमचा सौमित्र जो पाण्यात मारतो तो सूर.
पुढची चिठ्ठी काढायची पाळी प्राजक्ताची होती. शब्द आला काटा. प्राजक्ता म्हणाली, काटय़ाने काटा काढणे असे वाक्य होऊ शकेल. इथे काटय़ाचा अर्थ होईल झाडाला किंवा गुलाबाच्या फुलाला असलेला अणकुचीदार भाग व काटय़ाने काटा काढणे म्हणजे कधी तरी वाईट मार्गाचा अवलंब करूनच दुसऱ्या एखाद्या वाईट गोष्टीचा नाश करता येतो. त्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, सगळ्यांनी आता जरा घडाळ्याच्या काटय़ाकडे लक्ष द्या व हा खेळ आवरता घ्या. पद्मजाला नकळतच काटय़ाचा दुसरा अर्थ सापडल्याने आनंद झाला. मग शेवटच्या दोन चिठ्ठय़ा काढून आजचा अध्याय समाप्त करण्याचे ठरले.
एका चिठ्ठीमध्ये शब्द आला पान. यावरून मग पद्मजा म्हणाली, पान म्हणजे मुखशुद्धीसाठी खातात ते विडय़ाचे पान. सौमित्र म्हणाला, पुस्तकाचे पण पान असतेच की. स्नेहा आजी म्हणाली, माझ्यासारख्या सुगरणीच्या तोंडी चला मुलांनो, पाने वाढली आहेत, पाटावर बसा, असा संवाद तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेलच की. इथे पान म्हणजे जेवणाचे ताट होणार.
शेवटची चिठ्ठी आली, त्यात शब्द होता वाचणे. यावर मी म्हणालो, वाचणे याचा अर्थ एखाद्या जीवघेण्या प्रसंगातून बचावणे असा होऊ शकतो, तर पद्मजा म्हणाली, लेट मी कन्क्लूड. वाचणे याचा दुसरा अर्थ होईल पुस्तक वाचणे म्हणजे रीिडग.
आम्ही सर्व जण ओरडलो, व्वा! म्हणजे पद्मजा आता मराठीची प्रोफेसर होणार तर व एक दिवस आम्हालाच शिकवणार तर!