अंकांचा उपयोग फक्त आकडेमोड करण्यासाठी नसतो तर त्यांच्यामुळे आपल्याला ध्वनित असलेले वेगवेगळे अर्थ सांगता येतात. शेरास सव्वाशेर, पाचवीला पुजणे, बत्तीशी दाखवणे अशी कितीतरी उदाहरणं त्याबाबत सांगता येतात

नाश्त्याच्या टेबलावर मी पद्मजाला म्हटले की काल आपण चारवरून सरळ बारावर उडी घेतली होती तेव्हा आज सुरुवात करूया पाचपासून.
‘पाचामुखी परमेश्वर’, ‘पाचावर धारण बसणे’ असे काही वाक्प्रचार मराठीमध्ये आहेत, असे मी पद्मजाला सांगितले. पाचामुखी परमेश्वर याचा अर्थ होतो.. जुने जाणते, आजूबाजूचे लोक जे बोलतात ते सहसा काळाच्या कसोटीवर खरे उतरलेले असते; त्यामुळे त्यांच्या बोलांमध्ये परमेश्वराची मर्जी दडलेली असते. तर पाचावर धारण बसणे म्हणजे खूप भीती वाटल्याने तोंडातून शब्द न फुटणे. हे सर्व अर्थ, पद्मजा डायरीमध्ये भक्तिभावाने लिहून घेत होती.
‘पाचवीला पुजणे’ असा एक वाक्प्रचार सासूबाईंनी चहाचा कप माझ्यासमोर ठेवत सुचविला. मी पद्मजाला म्हटले, ‘‘इथे अर्थ होईल की एखादी गोष्ट काही केल्या आपला पिच्छाच न सोडणे.’’
थालीपिठावर ताव मारत असताना मी पुढचा अंक म्हणजे सहा शिकवायला घेतला. ‘कपिला षष्ठी योग’ असा एक वाक्प्रचार मला पद्मजासाठी आठवला. पण सहावरून मला शुद्ध मराठीतील काही सुचेना. म्हणून मी पद्मजाला म्हटले, ‘‘हा अंक सध्या बाजूला ठेवूया. पुढचा अंक सात, त्यासाठी मराठीमध्ये खूप वाक्प्रचार आहेत, जसे की ‘सातासमुद्रापार जाणे’, ‘सात मजली हसणे’, ‘साताजन्माची सोबत करणे’. या सर्वाचे अर्थ शोधणे हा तुझा आजचा वर्गपाठ’’, असे सांगून मी पद्मजाला काही अध्रे-मुध्रे अंक शिकविण्याचे ठरविले; जसे की अर्धा, सव्वा, दीड, साडेसात वगरे.
पद्मजाला म्हटले की हाफला मराठीमध्ये अर्धा म्हणतात. त्यावरून सहज सुचणारा वाक्प्रचार म्हणजे ‘अध्र्या हळकुंडाने पिवळे होणे’. याचा अर्थ होतो जराशा यशाने हुरळून जाणे व डोक्यात हवा जाणे .
सव्वा म्हणजे वन अॅण्ड क्वार्टर असे समजावत मी पद्मजाला दोन म्हणी सांगितल्या- ‘शेरास सव्वाशेर’ व ‘अवाच्या सव्वा’. सौ. म्हणाली, ‘‘पद्मजा, शेरास सव्वा शेर मिळणे म्हणजे एका बिलंदर माणसास त्याच्यापेक्षाही बिलंदर माणूस भेटणे. तर अवाच्या सव्वा म्हणजे वाटेल तशी किंमत, (भरमसाट किंमत) सांगणे; जसे की मोसमातील आंब्याच्या पहिल्या पेटीसाठी बाजारात अवाच्या सव्वा किंमत सांगितली जाते.’’
सव्वानंतर दीड येतो असे सांगत मी माझी शिकवणी पुढे सरकवली. त्यासाठीदेखील मी दोन वाक्प्रचार सुचवले; एक दीड दमडीचीही किंमत नसणे व दुसरा दीड शहाणा. एवढय़ात नूपुर आली. ती म्हणाली, ‘‘ताई, सौमित्र ना दीडशहाणा आहे, म्हणजे तुला कळले असेलच.’’ त्यावर पद्मजा म्हणाली, ‘‘मला अर्थ माहीत नाही, पण तुझ्या हावभावावरून एवढे नक्की की दीडशहाणा हा काही चांगला शब्द दिसत नाही.’’ मी म्हटले, ‘‘म्हणजे हुशार नसतानाही स्वत:ला इतरांपेक्षा बुद्धिमान समजणारा.’’
‘दीड दमडीचीही किंमत नसणे’ म्हणजे एखाद्याच्या लेखी दुसऱ्या व्यक्तीला काहीच महत्त्व नसणे हा अर्थ सांगून मी आंघोळीला पळालो.
आज ऑफिसला जायचे नव्हते, पण त्याऐवजी घरी बसून टेलिफोनवरून मुलाखती घ्यायच्या होत्या. कित्येक दिवस मी आमच्या सेल्स विभागासाठी चांगले उमेदवार शोधत होतो. पण चांगले उमेदवार मिळतच नव्हते. त्यामुळे मला अगदी ‘नाकी नऊ आले’ होते. त्या अवस्थेतही मला हसू आले, कारण पद्मजासाठी एक अर्थ मिळाला होता!
माझी शेवटची मुलाखत पूर्ण केली आणि जेवणाच्या टेबलवर परतलो. जेवताना पद्मजाने अर्थ सांगण्यास सुरुवात केली.. सातासमुद्रापार जाणे म्हणजे परदेशगमन करणे, सात मजली हसणे म्हणजे खूप मोठय़ाने हसणे व साताजन्माची सोबत करणे म्हणजे सुख असो की दु:ख सदैव एखाद्याची साथसंगत करणे.
मी हसत म्हटले, ‘‘आता तुला जेवण गळ्याखाली उतरेल ना! कारण मला अर्थ सांगून झाले तुझे.’’ पद्मजा म्हणाली, ‘‘असे काही नाही काका, पण मला तुला लवकरात लवकर सांगितल्याशिवाय राहवत नाही हेही खरे आहे.’’ मी पद्मजाला म्हटले, ‘‘काही हरकत नाही. आपण मनसोक्त जेवूया, मग नवीन अंक शिकूया.’’
जेवण संपवून मी पद्मजाला अठरा अंक शिकवायला घेतला. ‘अठरा विश्व दारिद्रय़’ म्हणजे अतिशय गरिबी असे सांगून मी सुरुवात केली.
अठरा या अंकाची दुप्पट म्हणजे छत्तीस असे सांगून मी सरळ ‘छत्तीसचा आकडा असणे’ या म्हणीवर पद्मजाचे ध्यान आकर्षति केले. दोन माणसांचे क्षणभरही एक दुसऱ्याशी पटत नाही तेव्हा ही म्हण वापरतात असे मी पद्मजाला समजाविले, तेव्हा शाळेतून परतलेला सौमित्र म्हणाला, ‘‘ताई छत्तीसच्या आधी बत्तीस हा आकडा येतो. बत्तीस म्हणजे थर्टी टू. या आकडय़ाचा संबंध आपल्या दातांच्या संख्येशी येत असल्याने मराठीमध्ये यावरून खूप वाक्प्रचार आहेत. ‘बत्तिशी दाखवणे’ म्हणजे अचकट विचकट हसत दात दाखविणे. ‘बत्तीशी पाडणे’ म्हणजे खूप मारणे ज्यायोगे शारीरिक इजा होणे व ‘बत्तिशी खरी होणे’ म्हणजे एखाद्याने केलेले भाकीत खरे ठरणे, असे एका पाठोपाठ तीन अर्थ सांगून सौमित्रने आपणही काही कमी नाही हे दाखवून दिले.
सौमित्रच्या या टोलेबाजीनंतर मी बेचाळीस या आकडय़ावर जायचे ठरविले. मी पद्मजाला म्हटले की या अंकावरून पटकन आठवणारे वाक्प्रचार म्हणजे ‘बेचाळीस पिढय़ा बसून खातील एवढे कमविणे’ किंवा ‘बेचाळीस पिढय़ांचा उद्धार करणे’. पहिल्या वाक्प्रचाराचा उच्चार बरेचदा राजकारणी लोकांनी कमावून ठेवलेल्या अपार संपत्तीबाबत होतो. तर दुसऱ्या वाक्प्रचारावर सासू-सुनेचा प्रभाव जाणवतो. सुनेकडून जराशी चूक झाली रे झाली, की खाष्ट सासू तिच्या माहेरच्या ‘बेचाळीस पिढय़ांचा उद्धार करते’. इथे अर्थ होतो खूप रागविणे व ज्या व्यक्तीची चूक झाली आहे, तिच्या बरोबरच तिच्या घरच्यांबद्दल पण वाईटसाईट बोलणे.
पद्मजाला हे सर्व ऐकून हसू आले. प्राजक्ता म्हणाली, ‘‘हसू नको. सासूचा जाच काय ते लग्न झाल्यावर कळेल तुला.’’ यावर मी म्हणालो, ‘‘पद्मजाला कशाला जाच होईल? माझ्या मित्राची मुलगी म्हणजे ‘बावनकशी सोने’ आहे.’’ बावनकशी सोने म्हणजे एकदम उत्तम प्रतीचे, गुणवान, अस्सल असा अर्थ सांगून मी शिकवणी आवरती घेतली. उद्याचा दिवस आकडय़ांवरचा शेवटचा क्लास असेल, हेही सांगून टाकले.

increase in Rabi crop sowing country farming farmers
देशातील रब्बी पेरण्यांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या, पेरा किती हेक्टरने वाढला, गव्हाचे क्षेत्र किती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
shash and malavya rajyog will make after holi these zodiac sign could be lucky
शश आणि मालव्य राजयोगामुळे या ३ राशींचा सुरू होईल सुर्वणकाळ; शनी-शुक्र देवाच्या कृपेने होळीच्या आधी पूर्ण होतील सर्व कामे
Chronology Mathematics of time Republic Day independence day
काळाचे गणित: दिवस क्रमांक २४६०७०७
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
lokmanas
लोकमानस: हा तर श्रद्धेचा राजकारणासाठी वापर
venus and sun yuti 2025
शुक्रादित्य राजयोग देणार पैसाच पैसा; १२ महिन्यानंतर निर्माण झालेल्या राजयोगाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”
Story img Loader