अंक, आकडे यांचं स्थान खरं म्हणजे गणितात. रोजच्या व्यवहारांच्या घडामोडींमध्ये. पण मराठी भाषेने वाक्प्रचार, म्हणींमध्ये आकडय़ांना स्थान देऊन त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

आज पद्मजाला मराठी अंक शिकवायचे असे मनापाशी ठरवूनच मी नाश्त्याच्या टेबलवर आलो. तिला म्हटले, ‘‘आता आपण अंक शिकूया. सुरुवात करूया वन, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये एक म्हणतो त्यापासून. पण हे अंक शिकवताना तुला मी काही म्हणी आणि वाक्प्रचारही शिकवणार आहे.
सुरुवात करूया ‘एक हाती विजय मिळविणे’ या वाक्प्रचारापासून; एक हाती विजय मिळविणे म्हणजे कोणाही टीम मेम्बरची मदत न घेता कोणतीही मदत होत नसताना विजय मिळविणे. ‘एकखांबी तंबू’ या वाक्प्रचाराचा अर्थदेखील थोडाफार असाच आहे. ज्या एका माणसाच्या खांद्यावर, इतर सर्व जण सोबत असतानाही पूर्णपणे जबाबदारी येऊन पडते अशा माणसाला एकखांबी तंबू म्हणतात.
तर ‘एक से भले दो’ याचा अर्थ होतो, कोणत्याही समस्येला तोंड देताना एकाऐवजी दोन माणसे एकत्र सामोरी गेली तर ती समस्या लवकर सुटायची जास्त शक्यता असते.’’
इतक्यात सौमित्र म्हणाला, ‘‘बाबा, तुम्ही एकपासून कशी काय सुरुवात केलीत? आधी येणार शून्य. पद्मजा ताई, झीरो ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. तेव्हा शून्यापासून पण वाक्प्रचार शिकून घे.’’
मी माझी चूक स्वीकारत पद्मजाला म्हटले, ‘‘शून्यावरून चटकन आठवणारा वाक्प्रचार म्हणजे, ‘शून्यातून विश्व निर्माण करणे’ म्हणजेच काहीही जवळ नसताना मोठे साम्राज्य स्वबळावर उभे करणे. ‘शून्यात नजर लावून बसणे’ असाही वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ होतो, जगापासून अलिप्त राहून, हताशपणे एका ठिकाणी विचारमग्न बसणे.’’
चहाचा शेवटचा घोट संपविताना मी म्हटले, ‘‘आता पुढचा अंक येईल तो दोन. यावरून एक वाक्प्रचार आहे तो म्हणजे ‘दोनाचे चार हात होणे’ याचा अर्थ होतो लग्न होणे. तर ‘स्वर्ग दोन बोटे उरणे’ याचा अर्थ होणार अतिशय आनंद होणे.’’ एवढय़ात नूपुर आमच्या संभाषणामध्ये भाग घेत म्हणाली की, ‘‘मला आठवताहेत अजून काही दोनवरून सुरू होणारे वाक्प्रचार. ते म्हणजे ‘दोन हात करणे’ म्हणजे संकटाशी धीराने सामना करणे, ‘दोन डगरीवर पाय ठेवणे’ म्हणजे एकाच वेळी दोन पर्याय निवडण्याचा निष्फळ प्रयत्न करणे.’’
सवयीप्रमाणे मी चहा घेत घेत दुसरीकडे टीव्हीवर बातम्याही ऐकत होतो. त्यात बातमी होती की आम पार्टीमुळे दिल्लीमध्ये काँग्रेसचे निवडणुकीमध्ये ‘तीनतेरा वाजले’ व दारुण पराभव झाला. मी पद्मजाला म्हटले, ‘‘तीनतेरा वाजणे याचा अर्थ होतो पूर्ण वाताहत होणे.’’
आम आदमी पार्टीचे हे यश ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ याप्रमाणे नसावे अशी कामना अण्णा हजारेंनी केली अशीही एक बातमी होती. मी पद्मजाला म्हटले की तेरडय़ाचा रंग तीन दिवस याचा अर्थ म्हणजे काही गोष्टी या काही काळासाठीच किंवा त्यांची नवलाई काही दिवसांचीच.
आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी काँग्रेस या तिघांना मिळालेल्या सीट्सचे वर्णन ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ असे करण्यात आले होते, कारण कोणालाच बहुमत न मिळाल्याने अधांतरी विधानसभा अस्तित्वात आली होती. तीन तिघाडा काम बिघाडा म्हणजे जिथे दोघांची गरज आहे तिथे तिसरा माणूस आल्यास संपूर्ण कामाचा विचका होणे असे मी पद्मजाला समजावले.
चार हा शब्द शिकविताना मला आली पटकन लक्षात ती जगप्रसिद्ध म्हण, ‘चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे’. याचा अर्थ जीवनामध्ये कधी एकाची सरशी होते तर कधी दुसऱ्याची हे मी पद्मजाला सांगितले.
‘चारी मुंडय़ा चीत करणे’ म्हणजे सपशेल पराभव करणे असा अजून एक वाक्प्रचार सौ ने आम्हाला सुचविला. ऑफिसची वेळ झाल्याने मी शिकवणी आवरती घेतली व पद्मजाला म्हणालो, ‘‘मी संध्याकाळी ऑफिसमधून येईपर्यंत ‘बारा गावाचे पाणी प्यायलेला’, ‘बाराच्या भावात जाणे’, ‘बारा वाजविणे’, ‘बारा महिने तेरा काळ’ यांचे अर्थ शोधून ठेव.’’
नेहमीप्रमाणे माझी ऑफिससाठी पाठ वळल्यावर पद्मजा गृहपाठासाठी, सौच्या मदतीची अपेक्षा करू लागली. प्राजक्ताला पण याची सवय झाली होती, त्यामुळे तीही ‘एका पायावर तयार’ झाली. बारा गावाचे पाणी प्यायलेला म्हणजे खूप वेगवेगळे अनुभव गाठीशी असणारा इरसाल माणूस, बारा वाजविणे म्हणजे एखाद्याचा निक्काल लावणे किंवा त्याला नामोहरम करणे, बारा महिने तेरा काळ म्हणजे सदासर्वदा, असे सर्व अर्थ पद्मजाने शोधून काढले. पण बाराच्या भावात जाणे हा अर्थ सौ.ने मुद्दामहून राखून ठेवला होता. एक तरी अर्थ स्वतंत्रपणे पद्मजाने शोधून काढावा अशी तिची इच्छा होती.
ऑफिसमधून मी जरा उशिरानेच परतलो. मला पाहिल्यावर सवयीप्रमाणे चहा, नाश्ता व पाणी घेऊन पद्मजाची स्वारी माझ्यापुढे येऊन उभी राहिली. मी हसतच म्हटले की उशीर झाला तरी तुझी शिकवणी घेणार आहे मी; नाही तर ‘चौदावे रत्न’ दाखवशील मला. पद्मजा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. मी म्हटले, इथे अर्थ होईल रागावल्यामुळे मारणे. पद्मजा म्हणाली, काय रे काका चेष्टा करतोस. आता मराठीची गोडी लागल्यामुळे अभ्यासात खंड पडल्यावर जरा विरस होतो माझा.
फ्रेश झाल्यावर शिकवणीचा दुसरा अध्याय सुरू करण्यासाठी मी वर्तमानपत्राचा आधार घ्यायचे ठरविले. या वर्षी पावसाळा नेहमीप्रमाणे झाला नसल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईचा धोका आहे व त्यात एक प्रमुख जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी आधीच वाया गेले आहे. हे सर्व सांगण्यासाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’ या मथळ्याखाली मजकूर छापून आला होता. मी पद्मजाला म्हटले की, बारानंतर येतो तेरा हा आकडा व दुष्काळात तेरावा महिना याचा अर्थ म्हणजे आधीच संकटात असताना त्यात अजून एका संकटाची भर पडणे. पद्मजाला मी म्हटले की चौदावरून एक म्हण तुला आधीच सांगितली आहे. पंधरावरून मला वाक्प्रचार आठवत नसल्याने मी सरळ सोळावर जातो. मला आठवतील अशा दोन म्हणी म्हणजे ‘सोळा मुळे सुळसुळीत’ व सोळा आणे खरे. पहिल्याचा अर्थ होतो, कितीही कानउघाडणी करा, एखादा माणूस त्याचे वर्तन जेव्हा बदलत नाही त्या वेळी सोळा मुळे सुळसुळीत असे म्हणतात, तर सोळा आणे खरे म्हणजे संपूर्ण सत्य. पूर्वी सोळा आण्यांचा एक रुपया असायचा, त्यामुळे ही म्हण आली हे सांगून मी पद्मजाची शिकवणी आवरती घेतली, पण हे सांगायलाच नको की मराठी अंक आधारित माझी शिकवणी अजून एक-दोन दिवस तरी पुढे चालूच राहणार आहे.

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
Hemant Dhome : राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
Tarkatirtha Laxman Shastri Joshi Marxs Hindi Ancestor
तर्कतीर्थ विचार: मार्क्सचे हिंदी पूर्वज
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा
Story img Loader