म्हणी, वाक्प्रचार हे कोणत्यीही भाषेचे वैभव असते. या लेखात म्हणींचा आधार घेत पद्मजाला पशु- पक्ष्यांची माहिती करून दिली आहे..
पद्मजाला पशु-पक्ष्यांच्या माध्यमातून थोडे मराठी शिकविण्याचे मी ठरविले. बाल्कनीमधून माडाच्या झावळीवर बसलेल्या कावळ्याकडे बोट दाखवून मी म्हटले की ज्याला इंग्लिशमध्ये तू क्रो म्हणतेस त्याला मराठीमध्ये कावळा म्हणतात. या पक्ष्यावरून मराठीमध्ये बरेच वाक्प्रचार आहेत. पहिला म्हणजे ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.’ याचा अर्थ होतो लहान, कद्रू विचाराच्या माणसाच्या जळफळाटामुळे चांगल्या, सुस्वभावी माणसाचे नुकसान होत नाही. दुसरा वाक्प्रचार आहे ‘कावळा बसायला व फांदी तुटायला एकच गाठ पडणे.’ इथे अर्थ होणार दोन वेगवेगळ्या गोष्टी कधीकधी निव्वळ योगायोगामुळे एकाच वेळी होतात; त्याला काही शास्त्रीय कारण नसते.
पद्मजाला म्हटले की कावळ्यानंतर आपण वळूया मोर या पक्ष्याकडे. ‘चोरावर मोर’ व ‘मोर नाचला म्हणून लांडोरही नाचली’ हे दोन वाक्प्रचार मी पद्मजाला सांगितले. नाश्त्याच्या टेबलवर बसलेली माझी सौ म्हणाली, ‘‘पद्मजा, तुझ्या काकांचा चहा होईपर्यंत मी ह्यचे अर्थ सांगते. पहिला अर्थ आपल्यापेक्षा वरचढ होऊ पाहणाऱ्या माणसाला, खरेतर आपणच कसे त्याच्यापेक्षा वरचढ आहोत हे दाखवून देणे. व दुसरा अर्थ होतो आपली लायकी नसतानाही केवळ दुसरा करतो म्हणून आपण त्याचे सवंग अनुकरण करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करणे.’’
माझा चहा घेऊन झाला होता त्यामुळे मी आता तिसरा शब्द, घार शिकवायला घेतला. घारीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे मी सांगण्याआधीच नुपूरनेच पद्मजाला सांगितले व सोबत तिला दोन म्हणीही सांगितल्या. पहिली म्हण होती ‘घार हिंडते आकाशी परी चित्त तिचे पिलांपाशी’ व दुसरी होती ‘घारीची नजर असणे.’ मी पद्मजाला म्हटले, ‘‘राजकीय पुढारी लोकसभेवर निवडून गेले तरी आपल्या मुलाबाळांची सोय लावण्यासाठी त्यांचे लक्ष दिल्लीमधून आपापल्या राज्यांमध्येच जास्त असते. हे वर्तन दर्शविण्यासाठी पहिला वाक्प्रचार बहुतेक वेळा वापरला जातो. तर घारीची नजर असणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर खूप बारीक नजर ठेवून असणे, जराशीही चूक किंवा किंचितही झालेली घडामोड त्वरित टिपायची पात्रता असलेल्या माणसासाठी हे विशेषण वापरतात.’’
नाश्त्याच्या टेबलवर उशिरा पोहोचलेला सौमित्र म्हणाला, ‘‘बाबा आपणही शेजारच्या काकांसारखा कुत्रा पाळूया का?’’ मी म्हटले, ‘‘तू स्वत: कुत्र्याची काळजी घेण्याएवढा मोठा झालास ना कि बघू. तूर्त विषय निघालाच आहे तर तुझ्या पद्मजाताईला कुत्र्यावरून दोन-तीन वाक्प्रचार सांग.’’ सौमित्र म्हणाला, ‘‘पहिला वाक्प्रचार म्हणजे ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.’ याचा अर्थ होईल एखाद्याला कितीही सुधारायचा प्रयत्न करा त्याची वाईट सवय कधी सुटतच नाही.’’ त्यावर नुपूर म्हणाली, ‘‘ताई, म्हणजे सौमित्रचे शेपूट वाकडे ते वाकडेच. कारण बाबा कितीही ओरडले किंवा त्यांनी कितीही समजावून सांगितले किंवा त्यांनी लाड केले तरी सौमित्र स्वत:हून कधीच अभ्यासाला बसत नाही.’’
सौमित्रने लगेच विषयांतर करत दुसरी म्हण सांगितली, ‘‘भिक नको पण कुत्रं आवर.’ ताई, आपण मदत मागायला एखाद्याकडे गेलो असताना, मदत करायची सोडून ती व्यक्ती आपल्याला अजून त्रास होईल असे जेव्हा वागते तेव्हा ही म्हण वापरतात.’’
नुपूर म्हणाली, ‘‘अजून एक म्हण, ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय.’ याचा अर्थ होतो एखादी व्यक्ती, संस्था इमाने इतबारे चांगले काम करते, पण त्याचे फायदे चुकीच्या नियोजनामुळे, चुकीच्या नियंत्रणामुळे, चुकीच्या लोकांना मिळणे किंवा कोणालाच न मिळणे.’’
पद्मजानेच काऊ , बुल व बफेलोला काय म्हणतात असा प्रतिप्रश्न सौमित्र व नुपुरला केला. त्यावर सौमित्र म्हणाला, ‘‘यांना मराठीमध्ये अनुक्रमे गाय, बैल व म्हैस असे म्हणतात. वाक्प्रचार मात्र नुपूर ताई तुला सांगेल, कारण माझी आता क्लासला जायची वेळ झाली आहे.’’ नुपूर म्हणाली, ‘‘गाय या शब्दावरून आठवणारे वाक्प्रचार म्हणजे ‘वासरांमध्ये लंगडी गाय शहाणी’, ‘आखूड शिंगी बहुगुणी गाय’ व ‘दुभत्या गायीच्या लाथा गोड’.
वासरांमध्ये लंगडी गाय शहाणी म्हणजे एखादी व्यक्ती खरे तर हुशार नसते, पण सदैव आपल्यापेक्षा कमी गुणवत्तेच्या लोकांच्या सान्निध्यात राहिल्याने तिला हुशार समजण्यात येते. आखूड शिंगी बहुगुणी गाय म्हणजे अधिकाधिक फायदे, पण कमीत कमी उणीवा व किंमत असणारी वस्तू.’’ पद्मजा म्हणाली, ‘‘म्हशीवरून सांग ना!’’
नुपूर म्हणाली, ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ असा एक खूप प्रसिद्ध वाक्प्रचार आहे. याचा अर्थ होईल ज्या व्यक्तीकडून चांगल्या कामगिरीची हमखास खात्री असते तीच व्यक्ती आयत्यावेळी अपयशी ठरते व आपला अपेक्षाभंग करते. दुसरी म्हण ‘अग अग म्हशी, मला कुठे नेशी’ अशी आहे. याचा अर्थ होतो आपली जायची इच्छा नसताना दुसऱ्यासाठी जाणे भाग पडणे.
बैल या शब्दावरून पद्मजाने ‘बैल गेला नि झोपा केला’ ही म्हण सांगितली. त्यावर माझी सौ म्हणाली, ‘‘याचा अर्थ होतो, एखाद्या गोष्टीची योग्य वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टीवर सुरुवात करून कितीही काम केले तरी होणारे नुकसान टळू शकत नाही.’’ अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ शोधणे हा तुझा होमवर्क असेही माझ्या स्टाईलमध्ये सौ पद्मजाला सांगायला विसरली नाही.
पद्मजा म्हणाली, ‘‘आता आपण शेवटचा प्राणी किंवा पक्षी शिकूया व राहिलेले उद्या शिकूया. तिनेच स्र्ं११३ हा पक्षी सुचविला. सौ म्हणाली, ‘‘म्हणजे पोपट. यावरून येणारे वाक्प्रचार म्हणजे ‘पोपटपंची करणे’ व ‘पोपट होणे’. यांचा अनुक्रमे अर्थ होणार दुसऱ्याने पढविलेले न समजता तसेच्या तसे दुसऱ्यास सांगणे किंवा शिकविणे व फजिती होणे.’’
उद्यासाठी आणखी काही पक्षी, प्राण्यांची नावे सुचवत पद्मजाने डायरी बंद केली.