एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असण्यात भाषेची गंमत तर असतेच पण त्यातून हेही समजते की अर्थाच्या वेगवेगळ्या छटा मांडणारी आपली भाषा किती समृद्ध आहे.
आज पहिली चिठ्ठी उचलण्याचा मान माझ्या आईचा होता. शब्द आला चाळ. आई म्हणाली, ‘‘चाळ हा एक
घराचा प्रकार असतो जसे की उंच टोलेजंग इमारत, बंगला, झोपडी वगरे वगरे.’’ त्यावर माझी पत्नी म्हणाली, पायात बांधतात ते पण चाळच नाही का?
खेळ चालू असताना मध्येच सौमित्र म्हणाला, ‘‘आई गं! आंबे कधी येणार? मला ना आमरस खायचे डोहाळे लागले आहेत. डबाबंद फ्लेवरवाला रस मला आवडत नाही तुला माहीत आहेच.’’
त्यावर मी म्हणालो, ‘‘सौमित्र, अजून हापूस यायला खूप वेळ आहे. धीर धरा रे, धीरा पोटी फळे. रसाळ गोमटी.’’ आणि पद्मजाला म्हणालो, ‘‘इथे रस शब्द म्हणजे ज्यूस. पण रस या शब्दाचा दुसरापण अर्थ होतो व तो आहे एखाद्या गोष्टीमधील इंटरेस्ट.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘आपण दुसरी चिठ्ठी काढू या का?’’ सौमित्रने चिठ्ठी काढली त्यात शब्द आला ‘रवी’.
नूपुर म्हणाली, ‘‘रवी म्हणजे सूर्य.’’ तर माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘‘आपण ज्याने ताक घुसळतो ती पण रवीच की!’’ रवी कशी दिसते ते सौ.ने पद्मजाला प्रत्यक्षात आणून दाखविली.
पुढच्या चिठ्ठीमध्ये शब्द आला तो ‘जलद’. माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘‘जलदचा अर्थ होईल ढग. गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले’ ही कविताच त्यांनी मग आम्हाला म्हणून दाखविली. त्यावर सौमित्र म्हणाला, ‘‘जलदचा दुसरा अर्थ होतो फास्ट, जसे की स्टेशनवर आपण सूचना ऐकतो की कर्जतला जाणारी जलद लोकल आज चार नंबरच्या फलाटावर दहा मिनिटे उशिरा येत आहे.’’
पुढची चिठ्ठी आमच्या मातोश्रींनी काढली. शब्द होता ‘वर’. त्यावर नूपुर पटकन म्हणाली, ‘‘वर म्हणजे अबाउ किंवा ऊध्र्व दिशा.’’ मी म्हणालो, ‘‘वर म्हणजे नवरा, जो आपल्याला थोडे दिवसांनी पद्मजासाठी शोधावा लागणार आहे.’’
एवढय़ात पद्मजा म्हणाली, ‘‘मलापण माहीत आहे वरचा तिसरा अर्थ व तो म्हणजे देवाचा आशीर्वाद.’’ त्यावर माझ्या सासूबाईंनी कोटी केली की ‘‘पद्मजा, तुझ्या बालाजीकडे वर माग की मला चांगला वर मिळून दे.’’ यावर आम्ही सर्वजण मिश्कीलपणे हसलो तर पद्मजा मस्तपकी लाजली.
एवढय़ात शेजारच्यांची तीन वर्षांची नात दुडूदुडू चालत आली. ते पाहून मी पद्मजाला म्हटले कीलहान मुलांची चाल पाहून मजा येते ना! मी पुढे हेही सांगितले, ‘‘चाल या शब्दाचे पण अनेक अर्थ होतात, जसे की चाल म्हणजे चालण्याची पद्धत; उदाहरण द्यायचे झाले तर देव आनंद यांची तिरकी चाल तरुणींना घायाळ करायची. चालचा दुसरा अर्थ होईल रीत; आपल्याकडे अजूनही लग्नात हुंडा द्यायची वाईट चाल पाहण्यास मिळते.’’ त्यावर नूपुर म्हणाली, ‘‘खूपदा खेळामध्ये एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास आपल्या प्रतिस्पध्र्याला पुढे चाल देतो. याचा अर्थ होतो ६ं’‘५ी१ देणे.’’
आमच्या खेळामध्ये पुढचा शब्द आला तो म्हणजे ‘तीळ’. सौमित्र म्हणाला, ‘‘ताई संक्रांतीला आमच्याकडे तिळाचे लाडू बनवितात . तीळ म्हणजे इंग्रजीमधील सेसामम.’’ यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘‘तीळ म्हणजे अंगावरचा काळा डाग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मोल म्हणतो. या मोलचा उपयोग ओळख पटवण्यासाठी बरेचदा केला जातो. तू िहदी चित्रपटात पाहिले असशीलच.’’
आज मला जेवण जरा जास्तच झाले होते तेव्हा मी सौला म्हटले, ‘‘जरा मला िलबूसोडा देशील का? जरा ढेकर आले की बरे वाटेल मला.’’
यावर नूपुर म्हणाली, ‘‘पद्मजाताई सोडा या शब्दाचेपण अनेक अर्थ होतात. जसे की खायचा म्हणजे बेकिंग सोडा, धुण्याचा म्हणजे वॉिशग सोडा. हे सर्व प्रकार आहेत केमिकल्सचे, पण सोडा याचा दुसरा अर्थ होतो लेट मी गो किंवा माझी सुटका करा.’’ यावर मी म्हटले, ‘‘सुकवलेल्या माशालापण सोडा म्हणतात. अट्टल पार्टीबाज मित्रांना नेहमीच असे वाटते की व्हिस्की-सोडा आणि वांगे-सोडा ह्य जोडीत श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविणे कठीण आहे.’’
सोडा पुराणावरून सौमित्रला गोटीसोडा व बर्फाच्या गोळ्याची आठवण झाली. तो म्हणाला, ‘‘बाबा, परत एकदा जुहू बीचला जाऊ व बर्फाचा गोळा खाऊ या, या रविवारी.’’ मी हो म्हटले, पण एवढय़ात माझी सौ म्हणाली, ‘‘गोळा या शब्दाचेपण वेगवेगळे अर्थ होतात ते आधी पद्मजाला सांगू या.’’
सौ म्हणाली, ‘‘गोळा म्हणजे कोणतीही वर्तुळाकार गोष्ट. पण गोळा करणे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ टू कलेक्ट असा होतो.’’
दोनच दिवसांनी नूपुरचा वाढदिवस येणार होता, त्यामुळे सौ. म्हणाली, ‘‘आता थोडय़ा वेळात भेंडय़ांचा कार्यक्रम आवरता घेऊ या, कारण मला उद्याच्या सामानाची लिस्ट बनवायची आहे.’’ तिने मला गाजरे आणायला सांगितली, कारण नूपुरला गाजराचा हलवा खूप आवडतो ना! त्यावर मी पद्मजाला म्हटले, ‘‘हलवा म्हणजे एक गोड पदार्थ. हलवा हा गाजराचा, दुधी किंवा मूग डाळीचा पण होतो.’’ त्यावर नूपुर म्हणाली की मला गाजराचा हलवा आवडतो, पण बाबांना तळलेला हलवा आवडतो. त्यावर मी स्पष्टीकरण दिले की हलवा एका माशाचे नावपण असते. त्यावर माझी आई म्हणाली की नवीन लग्न झालेल्या मुलीला पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने करून घालतात. मग आईनेच तिळाचे लाडू व हलवा हे सर्व पद्मजाला सविस्तरपणे सांगितले
आम्ही शेवटच्या दोन चिठ्ठय़ा काढायचे ठरवले. पहिला शब्द आला ‘शिळा’. त्यावर पद्मजा म्हणाली, ‘‘मला माहीत आहे शिळा म्हणजे स्टेल. तुम्ही मला आता दुसरा अर्थ सांगा.’’ त्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘‘शिळा म्हणजे दगडाची शिळा. तुला माहीत आहे ना की रामाने पदस्पर्श करून शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार केला होता ते.’’ मग त्यांनी हा श्लोकच म्हणून दाखविला..
अहल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली..
आता शेवटची चिठ्ठी काढली गेली. त्यावर शब्द होता ‘भूत’. पद्मजा म्हणाली की भूत म्हणजे घोस्ट हे मला माहीत आहे. त्यावर नूपुर म्हणाली की ताई, मराठीमध्ये तीन काळ असतात, भूत, वर्तमान व भविष्य. भूत म्हणजे गतकाळ असेदेखील होते.
त्यावर मी पद्मजाला म्हणालो, ‘‘तुला मराठी कळत नव्हते हा भूतकाळ झाला. आता तू मास्टर होत चालली आहेस मराठीमध्ये.’’ या गुडनोटवरच आम्ही ‘मराठी तितुकी फिरवावी’चा अध्याय समाप्त केला
.