मराठीमधल्या फळ या शब्दाला दोन अर्थ आहेत. त्याचा इंग्रजीमधला अर्थ आहे, फ्रूट. मराठीमध्ये कळ म्हणजे एखाद्याची काढलेली कुरापत आणि दुसरा अर्थ बटण.. एका शब्दावरून कसे वेगवेगळे अर्थ तयार होतात नाही..
रात्रीचे जेवण आटोपले व आम्ही ठरल्याप्रमाणे भेंडय़ा खेळण्याचे ठरविले. पहिली चिठ्ठी निघाली ती काळ या शब्दासाठी. पद्मजा म्हणाली, काळ म्हणजे टेन्स. वर्तमान, भूतकाळ व भविष्यकाळ. नूपुरचे उत्तर तयारच होते. काळचा दुसरा अर्थ मृत्यू त्यासाठी तिने म्हण सुचवली, ‘‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती.’’
दुसरी चिठ्ठी मीच काढली, ज्यात नाव होते फळ. सौमित्र म्हणाला, फळ म्हणजे फ्रूट. मला फळांमध्ये आंबा खूप आवडतो. त्यावर माझी आई म्हणाली, ‘‘फळ म्हणजे आपण काम केलेल्या यशाची पावती असा अर्थही होतो. त्यासाठी तिने गीतेमधील ओळ सुचवली, काम करीत राहा, फळाची अपेक्षा करू नका.’’
खेळातील तिसरा शब्द होता टीप. माझी पत्नी म्हणाली, आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा वेटरला आपण जी बक्षिशी देतो त्याला टीप म्हणतात. तर माझ्या सासूबाई म्हणाल्या, टीप म्हणजे माहिती असाही होतो. पोलिसांचे खबरे, खुन्याला पकडण्यासाठी, पोलिसांना बरेचदा पशांच्या बदल्यात महत्त्वाची टीप देतात, असा संदर्भ त्यांनी दिला.
पुढचा शब्द निघाला कर. त्यावर एका टीमचे उत्तर होते कर म्हणजे हात तर दुसऱ्या टीमचे उत्तर होते कर म्हणजे टॅक्स. ‘कर नाही त्याला डर कशाला,’ अशी म्हण या शब्दामुळे पद्मजाला कळली.
पाचवा शब्द निघाला सार. सार म्हणजे आमटी. पद्मजा काल तू सार-भात खाल्ला होतास. आठवतंय ना?’ अशी टिप्पणी आईने केली. त्यावर नूपुरचे उत्तर होते सार म्हणजे समरी किंवा थोडक्यात महत्त्वाचे असेही होऊ शकते. प्रत्येक कथेच्या शेवटी त्याचे सार दिलेले असते असेही तिने सांगितले.
पद्मजानेच परत एकदा चिट्ठी काढून कळ हा शब्द सर्वासमोर ठेवला. आधी ती म्हणाली, काका हा शब्द आधी येऊन गेला ना? मी म्हटले, ‘‘इथे एका कान्याचा फरक आहे काळ आणि कळ.’’
सौमित्र म्हणाला, कळ काढणे म्हणजे एखाद्याची कुरापत किंवा खोडी काढणे. त्यावर नूपुर म्हणाली, सौमित्र, माझ्यासारख्याच खोडय़ा काढत असल्याने त्याला हा अर्थ चांगलाच माहीत असणार. पुढे नूपुर म्हणाली, कळचा दुसरा अर्थ होणार बटण.
पुढचा शब्द प्राजक्ताने काढला व तो होता नाव. माझ्या सासूबाई म्हणाल्या, मी म्हण सांगते, ‘नाव मोठे लक्षण खोटे.’ इथे नावचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो नेम किंवा identity. माझी आई म्हणाली, नाव शब्दाचा दुसरा अर्थ होतो होडी, लहान बोट.
आता पाळी होती कट या शब्दाची. कट करणे म्हणजे एखाद्याविरुद्ध काही तरी वाईट योजना बनविणे असा अर्थ पद्मजाला मी समजावून सांगितला. त्यावर प्राजक्ता म्हणाली, एकदा पद्मजासाठी पुरणपोळी आणि कटाचा बेत केला पाहिजे. कट म्हणजे एक प्रकारची तिखट आमटी हा अर्थ पद्मजाने डायरीमध्ये नोंदवला.
अचानक नूपुर किंचाळली व म्हणाली, बाबा माझ्या ड्रेसवर मोठा कोळी चढला आहे. तो झटकून दे. पटकन. मी म्हटले हो. कोळी झटकत असतानाच माझी पत्नी म्हणाली, इथे अजून एक शब्द सापडला. कोळी म्हणजे स्पायडर असा अर्थ होतो किंवा कोळी म्हणजे मासे पकडणारा फिशरमन असाही होतो.
पुढची चिठ्ठी काढण्यापूर्वी प्राजक्ताने सगळ्यांना फ्रूट सलाड देण्यासाठी ब्रेक घेतला. तेव्हा ती म्हणाली, मी सगळ्यांसाठी फ्रूट सलाडचे बाऊल भरते, मात्र सौमित्र तू चमचे घे सर्वासाठी. चमचे आणायला सौमित्र उठला खरा पण म्हणाला, पद्मजा ताई चमचा या शब्दाचेही दोन अर्थ होतात. एक म्हणजे स्पून व दुसरा अर्थ जरा मजेशीर आहे. बॉसचा चमचा असणे म्हणजे त्याचा खास माणूस, जो आजूबाजूला काहीही घडलं की लगेच बॉसला त्याची खबर पोहचवतो.
फ्रूट सलाड खाताना मी प्राजक्ताला म्हणालो, उद्या मला डबा नको, कारण ऑफिसमध्ये पार्टी आहे एकाच्या प्रमोशनची. मी पद्मजाला म्हणालो, आज चिठ्ठी न काढताच नवीन शब्द मिळत आहेत. बघ ना आता मी म्हणालो डबा; याचा अर्थ होतो टिफिन किंवा काहीही खाण्याचे पदार्थ ठेवण्याची वस्तू पण जर मी म्हटले की आमच्या ऑफिसचा ग्रुप नेहमी लोकल ट्रेनचा तिसरा डबा पकडतो तर दुसरा अर्थ होईल compartment.
ट्रेनचा विषय निघाल्यावर माझी आई म्हणाली, आजकाल मुंबईत लोकलचा प्रवास म्हणजे डोक्याला नसता ताप झाला आहे. त्यावर सौमित्र म्हणाला, ताई अजून एक शब्द.. ताप. ताप म्हणजे त्रास. आजीने ताप हा शब्द त्रास या दृष्टीने उच्चारला पण तापचा दुसरा अर्थ होतो फिव्हर जसा की फ्लू किंवा मलेरिया. पद्मजा म्हणाली आज चिठ्ठी न काढताच मला खूप दोन अर्थ असणारे शब्द ऐकायला मिळत आहेत.
मी ताप हा विषय पुढे नेत म्हटले की सहसा क्लायमेट चेंजमुळे तापाची साथ आढळून येते. माझ्या सासूबाई म्हणाल्या, जावईबापू मला माहीत आहे तुम्ही हा विषय का काढलात ते; कारण साथ या शब्दावरून पण दोन अर्थ होतातच की. साथ म्हणजे इंग्रजीमधील एपिडेमिक्स आणि साथचा अर्थ सोबत किंवा मदत असाही होतो.
मी म्हटले की आता शेवटच्या तीन चिठ्ठय़ा काढू आणि आजची शिकवणी बंद करू. पहिला शब्द मिळाला वात. सौमित्र म्हणाला, वात म्हणजे वारा. त्यावर नूपुर म्हणाली, वात म्हणजे देवाच्या पुढे निरांजनात तेवणारी कापसाची वळी.
दुसऱ्या चिठ्ठीत शब्द होता पाव. पद्मजा म्हणाली, पाव म्हणजे ब्रेड. प्राजक्ता म्हणाली, पाव म्हणजे एखाद्या गोष्टीचा चौथा समान भाग. माझी आई म्हणाली, मी देवा मला पाव म्हणते तेव्हा त्याचा अर्थ होतो प्रसन्न होणे.
मी शेवटची तिसरी चिठ्ठी काढली. त्यात शब्द निघाला बस. नूपुर म्हणाली, बस म्हणजे शाळेची बस, एक वाहन. मी नूपुरला म्हणालो, बस हा इंग्रजीमधला अर्थ सांगण्यापेक्षा बस म्हणजे टू सीट असं सांग. त्यावर प्राजक्ता म्हणाली, आता भेंडय़ा खेळणे बस झाले आणि सर्वानी अंथरुणे घ्या. इथे बस म्हणजे पुरे हा अर्थ सांगून आम्ही भेंडय़ा संपविल्या.