लाथ मारीन तिथे पाणी काढेन असा आत्मविश्वास असला तरी परिस्थितीचं पाणी नीट जोखलं नाही तर मात्र प्रतिस्पध्र्याकडून पाणी पाजले जाण्याची शक्यता असते.
जेवणाशी संबंधित शिकवणीचा तिसरा दिवस होता. त्यामुळे मी शिकवणी जेवणाच्या टेबलवर घ्यायचे नक्की केले. आज सर्व स्वयंपाक तयार असल्याने प्राजक्ताचे पाट-पाणी घेणे चालू होते. नूपुर सर्वासाठी पाण्याचे ग्लास भरत होती. ते पाहून मी पद्मजाला म्हटले की, ‘‘वॉटरला मराठीमध्ये पाणी म्हणतात हे तुला एव्हाना कळले असेलच, पण पाणी हा शब्द कसा वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो ते आज बघू या.’’
‘पाणी जोखणे’ हा वाक्प्रचार मी सर्वप्रथम शिकवायला घेतला. पद्मजाला म्हणालो, ‘‘याचा अर्थ होतो एखाद्या माणसाची खरी कुवत ओळखणे.’’ त्यावर नूपुर म्हणाली, ‘‘ताई दुसरा वाक्प्रचार मी सांगते. ‘पाण्यात पाहणे’ म्हणजे एखाद्याचा खूप द्वेष करणे.’’
पाण्याचा घोट घेत घेत स्नेहा आजी म्हणाली की, ‘‘ ‘पाणी पाजणे’ म्हणजे एखाद्याचा पराभव करणे.’’ त्यावर दुसऱ्या आजीने म्हणजे रश्मी आजीने भर टाकली की, ‘‘ ‘काळजाचे पाणी पाणी होणे’ म्हणजे एखाद्या वाईट शंकेमुळे मनात खूप घाबरणे.’’
पद्मजा भराभर सर्व अर्थ डायरीमध्ये लिहून घेत होती. एकाच शब्दाचे अनेक अर्थ पाहून पद्मजा म्हणाली की, ‘‘काका आता मला शंकाच वाटायला लागली आहे की मी कधी तरी मराठी भाषा पूर्णपणे शिकू शकेन का?’’ त्यावर माझी सौ. म्हणाली की, ‘‘पद्मजा पाण्यात पडले की आपसूकच पोहता येते.’’ त्यावर सौमित्र हसून म्हणाला, ‘‘पद्मजा ताई अजून एक अर्थ व तो म्हणजे एखादी अनोळखी गोष्ट शिकावयास घेतली की कालांतराने त्या गोष्टीचा सारखा सराव करून त्यात प्रावीण्य मिळविता येते.’’
प्राजक्ताने ताटामध्ये अळूवडी वाढण्यास घेतली होती ते पाहून स्नेहा आजी परत म्हणाली, ‘‘पद्मजा मराठीमध्ये एक म्हण आहे.. ‘अळवावरचे पाणी.’ याचा अर्थ होतो एखादी क्षणभंगुर गोष्ट.’’
एकीकडे प्राजक्ताचे जेवण वाढणे चालू होते आणि दुसरीकडे नूपुर व सौमित्रची मस्ती चालू होती. ते पाहून सौ. रागानेच म्हणाली, ‘‘या मुलांना किती वेळा समजावा की जेवणाच्या टेबलपाशी दंगामस्ती नको; एखादी गरम वस्तू अंगावर पडून भाजायचे, पण यांचे म्हणजे ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ अशी अवस्था.’’ पद्मजा म्हणाली, ‘‘काकू याचा अर्थ काय?’’
मी म्हटले, ‘‘एखादी गोष्ट हजारदा समजावूनदेखील जेव्हा समोरचा माणूस तीच तीच चूक पुन्हा करतो तेव्हा ही म्हण वापरतात.’’
मी सवयीप्रमाणे जेवता जेवता टीव्ही पाहणे चालू केले. त्यात एक बातमी होती की, सर्वच राजकीय पक्ष या वेळची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ‘पाण्यासारखा पैसा खर्च’ करत आहेत. नूपुर म्हणाली, ‘‘ताई, आज तुझे नशीब नेहमीप्रमाणेच जोरदार आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करणे म्हणजे खूप उधळपट्टी करणे.’’
आता अळूवडीबरोबर ताटामध्ये इतर पदार्थही होते. पद्मजा डायरी बाजूला ठेवून आता एक एक पदार्थ चाखून बघत होती. तिला कैरीचे आंबट-गोड लोणचे चाखताना बघून नूपुर म्हणाली, ‘‘ताई अजून एक अर्थ सापडला. ‘तळे राखी तो पाणी चाखी.’ याचा अर्थ होतो जो एखाद्या गोष्टीचे रक्षण करतो तो त्या गोष्टीचा उपभोगपण घेतोच.’’
पानामधील नारळाची चटणी पाहून मी पद्मजाला म्हटले, ‘‘कोशिंबीर, लोणचे, चटणी हे पदार्थ पानामध्ये असलेच पाहिजे व ते सर्वानी रोज प्रमाणात खाल्लेच पाहिजे. यावरूनच मला अजून एक म्हण सापडली आहे.. ‘देवाची करणी अन् नारळात पाणी.’ पण याचा अर्थ शोधून काढणे हा तुझा गृहपाठ.’’
‘दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे’ असा एक अर्थ अचानकच माझ्या मनामध्ये आला. मी पद्मजाला म्हटले की, ‘‘एखादा माणूस जेव्हा स्वत: स्वतंत्रपणे विचार न करता दुसऱ्या माणसाच्या मतानुसार चालतो त्याला ही म्हण वापरतात.’’
त्यावर खटय़ाळ पद्मजा म्हणाली, ‘‘म्हणजे आपले माजी पंतप्रधान का रे काका?’’
मला हसू आवरले नाही तिच्या या हजरजबाबी वाक्यामुळे.
एवढय़ात टीव्हीवरील एका बातमीने आमचे लक्ष वेधून घेतले होते व ती बातमी म्हणजे कावेरीचे पाणी परत एकदा पेटले ही होती. पद्मजा पटकन म्हणाली, ‘‘काका लेट मी गेस. पाणी पेटणे म्हणजे पाणीवाटपावरून भांडण होणे बरोबर ना?’’ मी म्हटले, ‘‘तू तमिळ मुलगी ना! बरोबर कावेरी प्रश्नावर कान टवकारलेस.’’
‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन’ असा आत्मविश्वास दाखवणारी म्हण आम्हाला तिसऱ्या बातमीमध्ये सापडली. आयत्या वेळी हक्काचा लोकसभा मतदारसंघ बदलला गेल्यामुळे नाराज झालेला एक भाजपाचा पुढारी मुलाखत देत होता- ‘मी राष्ट्रीय पुढारी असल्याने कुठूनही तिकीट द्या मी निवडून येणारच’ या अर्थाने त्याने ही म्हण वापरली होती. मी पद्मजाला म्हटले, ‘‘या म्हणीचा अर्थ होणार कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होण्याची खात्री असणे.’’
‘रक्त हे पाण्यापेक्षा घट्ट असते’ (ब्लड ईज थिकर दॅन वॉटर) अशी अजून एक म्हण नूपुरला आठवली. ती म्हणाली, ‘‘पद्मजा ताई, काही कारणांमुळे दुरावलेली रक्ताची नाती जेव्हा वाईट प्रसंगी पुन्हा एकदा एकमेकांना आधार द्यायला परत एकत्र येतात तेव्हा ही म्हण वापरतात.’’
जेवण संपत आले होते, पण पाण्यावरील विविध अर्थ काही संपत नव्हते. पद्मजा म्हणाली, काका, मराठी भाषा खरोखरच समुद्राच्या पाण्यासारखी अथांग आहे.
एवढय़ात शेवटच्या घासाला पद्मजाच्या दाताखाली भाजीमधील मिरची आली व तिच्या तोंडाची आग आग होऊ लागली. मी लगेचच पाण्याचा ग्लास तिच्यापुढे केला व सौ.ला तिच्या हातावर साखर ठेवण्यास सांगितले. तिच्या तोंडाची आग आग कमी झाल्यावर मी म्हटले, ‘‘आजची शिकवणी संपली; पण पुढच्या शिकवणीसाठी शब्द सापडला व तो म्हणजे आग.’’
लक्ष्मी घरात पाणी भरते हा वाक्प्रचार आपण विसरूनच गेलो याची आठवण स्नेहा आजीने करून दिल्यामुळे पद्मजाला मी तिची डायरी परत उघडण्यास सांगितले. ‘लक्ष्मी घरात पाणी भरते’ म्हणजे घरात श्रीमंती, वैभव ओसंडून वाहणे असे मी तिला सांगितले. त्यावर पद्मजा म्हणाली की, म्हणजे अंबानीच्या घरात का? मी म्हटले यस. या चेष्टेवरच आम्ही आजची शिकवणी बंद केली.