सिनेमाच्या शेवटी सगळ्यांना धूळ चारत हिरो जिंकतो असं बघायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. त्यामुळे सिनेमाच्या जगात हिरो हा नेहमीच मसिहा असतो. असाच आशय असणारा ‘अवताराची गोष्ट’ हा नवीन सिनेमा येतो आहे.
मराठी चित्रपटांनी कोटीकोटीची उड्डाणे करत असतानाच मराठी चित्रपट निर्मितीमध्ये मोठय़ा प्रमाणावर नवीन निर्माते-दिग्दर्शक सहभागी होत आहेत. नव्या दमाचे निर्माते-दिग्दर्शक आणि त्यायोगे नवनवीन कलावंत येत असल्यामुळे बऱ्याच आगामी चित्रपट तुलनेने नव्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत.
मुळातले कथा-पटकथालेखक असलेले नितीन दीक्षित यांनी ‘अवताराची गोष्ट’ हा मराठी चित्रपट तयार केला असून नव्या, अस्फुट विषयाला तो स्पर्श करणारा आहे, असे म्हणायला हरकत नाही.
साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पारितोषिकांवर मोहोर उमटविलेल्या ‘धग’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे कथा-पटकथालेखक म्हणून गाजलेले नितीन दीक्षित ‘अवताराची गोष्ट’ या आगामी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत.
हिंदी चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या उदयाच्या आधीपासूनही ‘मसिहा’ म्हणून नायकाचा उदय पडद्यावर झाला. हा गोरगरिबांचा तारणहार आणि धनदांडग्यांचा कर्दनकाळ, काळाबाजारवाल्यांचा नायनाट करणारा नायक अशी प्रतिमा हिंदी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात रुजविली. काळानुरूप नायकाच्या प्रतिमेत बदल होऊन तो ‘अॅण्टिहिरो’ बनला असला तरी मूळ ‘मसिहा’सदृश प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात घट्टपणे ठाण मांडून बसली आहे, हे सर्वानाच चांगलेच ठाऊक आहे. जे सर्वसामान्य माणूस करू इच्छितो पण करू शकत नाहीत असे अशक्य, अतिरंजित सारे पडद्यावरचा अमिताभ बच्चन किंवा तत्सम नायकाच्या भूमिकेतील कलावंत करून दाखवितो, हे समाधान प्रेक्षकाला मिळाले आहे. आगामी ‘अवताराची गोष्ट’ या संकल्पनेच्या गाभ्यावर काहीसा अवलंबून आहे. अवतार धारण करणारी माणसे इतरांपेक्षा वेगळी आणि असामान्य म्हणविली जातात. त्याच धाटणीचा या चित्रपटाचा नायक आहे, अशी पुस्ती नितीन दीक्षित यांनी चित्रपटाबद्दल माहिती देताना जोडली.
चित्रपटाचा नायक कौस्तुभ हा बारा-तेरा वर्षांचा मुलगा असून ही भूमिका मिहिरेश जोशी या नव्या बालकलाकाराने केली आहे. चित्रपटाची सगळी गोष्ट किंवा ‘वनलाइन’ प्रकट न करता लेखक-दिग्दर्शक नितीन दीक्षित म्हणाले की, मसिहा, तारणहार, अचाट, अफाट काम करून लोकांचे भले करणारा नायक अशा स्वरूपाचे कथानक नाही. परंतु, शीर्षकातून तसे सूचित करून प्रेक्षकांना या ‘मसिहा’ प्रकाराशी संबंध जोडता येऊ शकेल अशा काहीशा स्वरूपाचा नायक आहे, असे म्हणायला हरकत नाही. आजच्या काळातील लहान, अल्लड मुलामुलींवर घरच्यांपेक्षा आजूबाजूची तरुणाई यांना पाहून, त्यांचे वागणे-बोलणे पाहून काही नकळतपणे संस्कार होत असतात. ते चांगले झाले तर या वयातील मुलामुलींच्या जडणघडणीवर त्याचा खोलवर चांगला परिणाम घडू शकतो. आज अवतार म्हटलं की सगळे त्या अवतार झालेल्या माणसासमोर हात जोडून उभे राहतील, अशी परिस्थिती झाली आहे. आपण माणूस आहोत आणि देव संकल्पनेमुळे माणूस असल्याचा आपल्यात न्यूनगंड निर्माण झाला आहे, अशी नेमकी परिस्थिती आपल्या अवतीभवती निदान मला तरी दिसून येते, असे सांगून दीक्षित म्हणाले की, हा विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रसार वाढला असला तरी जुन्या रूढी पक्क्या करण्यासाठी आपण याचा आधार घेऊ पाहतो आहोत, असेही सूक्ष्मपणे समाजाकडे पाहिले तर दिसून येते. आधुनिक भोंदूगिरी बोकाळत चाललेली दिसते. या आधुनिक भोंदूगिरीवर भाष्य करण्याचा सूक्ष्म प्रयत्न आपण ‘अवताराची गोष्ट’ या चित्रपटाद्वारे केला आहे.
चित्रपटाच्या फेसबुकद्वारे कौस्तुभ आणि मंग्या यांची कॉमेण्ट करणारी कार्टून्स अपलोड करून त्याद्वारे चित्रपटाचे अनोखे प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलांवर होत असलेले भिंतीबाहेरचे संस्कार यावर आज त्यांची जडणघडण बऱ्याच अंशी अवलंबून आहे. या चित्रपटाद्वारे फॅण्टसीचा आधार घेऊन काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असे दीक्षित म्हणाले. गोष्ट लहान मुलांना मध्यवर्ती भूमिका देऊन सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी चित्रपट हा मोठय़ा माणसांसाठीचा निश्चितच आहे. प्रमुख भूमिकेत इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेली व्यक्तिरेखा आजच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आदिनाथ कोठारेने साकारली असून यश कुलकर्णी या बालकलाकारसह सुलभा देशपांडे, लीना भागवत, सुनील अभ्यंकर यांच्याही भूमिका आहेत. सचिन साळुंके निर्माते असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.