फक्त गाण्यांचे कार्यक्रम बघायची सवय असलेले आपण डोक्यात प्रश्नांचा भुंगा घेऊन बाहेर पडतो की नेमकं काय पाहिलं आपण? नेमकी गोष्ट काय होती? कुणाची होती?
गाण्याच्या विविध कार्यक्रमांना पुण्यामध्ये तोटा नाही, पण असे कार्यक्रम बघत असताना त्यातील वेगळेपण शोधत जाणारे प्रेक्षकही कमी नाहीत. असाच एक आगळावेगळा कार्यक्रम २१ जून रोजी पाहायला मिळाला, पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात!
हा खरे तर नुसता गाण्याचा कार्यक्रम नाहीच! संगीत, अभिनय, सिनेमा अशा तिन्हीच्या सहभागाने नटलेला हा त्रिवेणी संगम आहे.
‘‘ही एका काळाची गोष्ट, तशीच त्या काळात जगलेल्या कुटुंबाची ही कहाणी. जगताना वाटय़ाला आलं त्याचा विनातक्रार स्वीकार करून शुभंकराची अपेक्षा करणारी ही माणसं; आता हाकेपलीकडच्या अंतरावर निघून गेलीत. त्यांची भेट घ्यायची तर पडद्यावर उमटलेल्या त्यांच्या प्रतििबबांकडेच बघायला हवं.’’
निश एंटरटेन्मेंटद्वारा सादर होणाऱ्या ‘गोष्ट एका काळाची.. काळ्या-पांढऱ्या पडद्याची’ या आपल्या वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमाचे वर्णन अशा प्रकारे कानावर येते.
वेगवेगळ्या स्तरांवर हा कार्यक्रम आपल्यासमोर उलगडत जातो, तो आपल्याला त्यामध्ये अगदी पहिल्यापासून गुंतवून ठेवतच. एकीकडे साठी-पासष्टीच्या एका प्राध्यापकाची ही गोष्ट आहे, त्याच वेळी दुसरीकडे त्यांना आपल्या भूतकाळाकडे पाहायला प्रवृत्त करणाऱ्या, आयुष्यात काही चांगलं करू पाहणाऱ्या- धडाडीच्या- कार्यकर्ताप्रवृत्ती असणाऱ्या तरुण मुलांची ही गोष्ट आहे..
आणि ते जे काही करू पाहतात, ते त्यांच्या पुढच्या पिढय़ांसाठी.. म्हणून त्याच वेळी अशा एखाददुसऱ्या पुढच्या पिढीचीही ती गोष्ट आहे.
ही तरुण मुलं संग्राह्य़ स्वरूपात काही करू पाहत आहेत, त्यासाठी इथे धांडोळा घेतला आहे चित्रपटसृष्टीचा आणि चित्रपटगीतांचा- जी प्रामुख्याने कृष्णधवल काळामधली आहेत.
ब्लॅक अॅण्ड व्हाइट कार्यक्रम हा निश एन्टरटेन्मेंटनेच याआधी आपल्यासमोर सादर केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या काळ्या-पांढऱ्या रंगांतील चित्रपटांच्या काळातील हा मात्र गाण्याचा कार्यक्रम होता. तरीही त्यामध्येदेखील चित्रपट-कलावंतांची थोडी ओळख निवेदनातून करून दिली होती आणि गायक मंडळी त्या त्या चित्रपटातील पडद्यावरील कलाकारानुसार वेशभूषेत थोडा बदल करीत होते. कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला. कलाकारांचे दोन ग्रुप तयार ठेवून ते तो सादर करतात. हा कार्यक्रम अर्थातच त्यापुढचं एक पाऊल म्हणता येईल, म्हणावा लागेल.
अर्थातच या प्रवासात आपल्याला कृष्णधवल मराठी चित्रपटकाळातील विविध कलाकार भेटतात. कधी ते पडद्यावर गाणं सादर करणारे कलाकार असतात, कधी कवी, संगीतकार, दिग्दर्शक, ग. दि. माडगूळकरांसारखे कथा-पटकथा-संवाद आणि गीतेही लिहिणारे सिद्धहस्त कलाकार असतात, तर कधी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि जोडीला संगीतकार आणि अभिनेतेही असणारे बहुरूपी पु. ल. देशपांडे असतात. बहुतांश वेळा आपल्या गीतांचा ठेका ग्यानबा-तुकाराम ठेवणारे राम कदम असतात किंवा अशी गीते ज्यांच्या तुफान चालणाऱ्या चित्रपटांमधून अफाट लोकप्रिय व्हायची ते दादा कोंडकेही असतात.
कामानिमित्ताने तरुण पिढीने तयार केलेले हे प्रेझेंटेशन पाहत असताना एका प्राध्यापकाच्या व्यक्तिगत जीवनातील आठवणी ताज्या होतात. तर गाण्यांचा, पडद्यावरीलचित्रांचा आनंद घेत असताना आपणही त्या प्राध्यापकाच्या कहाणीत गुंतत जातो. त्याच वेळी आपल्या जगण्याशी त्या गाण्यांचा संबंध जुळत असेल तर त्याच्या आठवणीही आपण थांबवू शकत नाही. एकूण हा गोड गुंता वाढतच जातो.
व्यासपीठावर कलाकार प्रत्यक्ष गाणे गातात, त्यांना कधी तबला-पेटीची साथ असते, तर बहुतांश वेळा संगीताचा रेकॉर्डेड ट्रॅकही असतो. निसर्गातला श्वास घेत मातीशी नातं सांगत जगणारं कुटुंब आपल्या पुढे येतं ते-
अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
या रामदासांच्या शब्दांबरोबर..! तर सर्वात पहिलं चित्रपटगीत येतं ते- ‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे..’
दणदणीत आवाजातल्या या गाण्याने कार्यक्रमाच्या उत्कृष्टतेची झलक दाखवली आणि यशाची ग्वाहीसुद्धा दिली. नंतर चित्रपटसृष्टीच्या भारतातील आगमनाची गोष्ट निवेदनातून आणि पडद्यावरून आपल्यापुढे आली.
चित्रपटाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे मागच्या पडद्यावर जसजसे हलकेहलके उलगडत जातात, तशीच धुळीतून बाहेर काढलेल्या घरातल्या जुन्या फोनोमुळे प्राध्यापक आणखीनच आपल्या गतकाळातील आठवणीत बुडत जातो.
..इथे या कलाकारांनी, दिग्दर्शकाने आणखी एक किमया साधली आहे. या प्राध्यापकाशी- राहुल सोलापूरकर- संवाद साधायला त्यांना आणखी एका पात्राची गरज वाटली आणि म्हणूनच त्याची स्मृती त्याच्यासोबत येऊन बोलू लागली.. म्हणजे ती होतीच त्याच्याबरोबर; पण आता मात्र ती प्रत्यक्षात आपल्याला दिसू लागली. एक व्यक्ती म्हणूनच पुढे साकार झाली.
या प्रवासात आपल्याला कृष्णधवल मराठी चित्रपटसृष्टीच्या काळातील विविध कलाकार भेटतात. कधी गायकांच्या संवादातून, कधी मागच्या पटावरील चित्रातून, तर कधी चक्क चित्रपटाच्या त्या गाण्यातील काही अंशांमधून!
चित्रपट-बोलपटांच्या इतिहासातील एक महत्त्वाचं आणि अगदी सुरुवातीचं नाव भालजी पेंढारकर.. कोल्हापूरमधला त्यांचा स्टुडिओ आणि उत्तमोत्तम कलाकार आणि चित्रपटांच्या निर्मितीमुळे ओळखल्या जाणाऱ्या कलापूरमधील हा कलावंत! त्यांच्या चित्रपटांची नावं त्याच वेळी मागच्या पडद्यावरून सरकत जातात. कधी त्या काळातील त्या चित्रपटांच्या जाहिरातीही बघायला मिळतात. काळ पुढे सरकत जातो.
आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले.. हा तुकारामांचा नसलेला, पण त्यांचा म्हणून गाजलेला अभंग जितेंद्र अभ्यंकरने सुंदर रंगवला.. मागे पडद्यावर ‘संत तुकाराम’मधील तुकाराम विष्णुपंत पागनीस अधूनमधून दर्शन देत होते आणि तशाच पद्धतीने पुढे जितेंद्र बसलेले होते. शिवाय केशवराव भोळे, ‘केसरी’मधला तुकाराम चित्रपटावरचा लेख, यांचंही पडद्यावर दर्शन घडलं.
प्रभातचा काळ, त्या आधीचे, त्या वेळचे आणि नंतरचे कलाकार, त्यांची थोडक्यात ओळख सर्वाना करून देत काही माहिती सांगण्यासाठी आणखी एका निवेदकाची योजना केली आहे. अमित वझे ही कामगिरी उत्तम पार पाडतो.
‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’.. राजा गोसावींवर चित्रित झालेल्या गाण्यांमधून एकाची निवड करणं किती अवघड.
‘कानडा राजा पंढरीचा’ हे गीत पुन्हा एकदा चैतन्य कुलकर्णी आणि जितेंद्र अभ्यंकर यांनी एकत्र गाऊन धमाल आणली, तर ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’वर चैतन्यने आपला ठसा उमटवला. चित्रपटातली अशी उत्तमोत्तम लोकप्रिय गाणी सादर होतातच; पण त्यापलीकडेही रंगमंचावर खूप काही घडत असतं.
‘लाखाची गोष्ट’, ‘पुढचे पाऊल’, ‘सुवासिनी’, त्यातील अजरामर गाणं.. ‘जिवलगा कधी रे येशील तू..’; शांता हुबळीकरांचं ‘कशाला उद्याची बात’ हे गाणं स्वत: गात, रमा कुलकर्णीनं तसंच टेचात सादर केलं.
‘शेजारी’मधल्या िहदू-मुस्लीम उठावाच्या वेळच्या धरणाच्या िभतीची पडझड दाखवताना डॉॅल्बी सिस्टीमला लाजवेल अशा ध्वनिसंयोजनाची झलक आणि त्यामागचं तंत्रही इथे निवेदकाने सांगितलं.
‘शूर आम्ही सरदार आम्हांला काय कुणाची भीती..’ दोघे गायक मावळ्याच्या वेशात गाणं म्हणत असताना एक निधडय़ा छातीचा तरुण झेंडा नाचवत आपल्या पुढून निघून जातो. गदिमा, सुधीर फडके, राजा परांजपे या त्रयीनंतर वंदेमातरमपासून पु. ल. देशपांडे युग अवतरले.. ‘वेदमंत्राहूनि वंद्य आम्हा वंदे मातरम..’ हेही अशा कार्यक्रमांमधलं न टाळता येणारं गाणं..
‘देवबाप्पा’ चित्रपटातील आशा भोसले यांचे अजरामर गीत ‘नाच रे मोरा..’ रमा कुलकर्णी हिने नाचाचे निरागस हावभाव करत गायलं.. झालरीचा पांढरा फ्रॉकही याला मागच्या काळाची किनार लावून गेला.. परंतु या गाण्यासाठी या ठिकाणी एखादी छोटी बाहुली का येऊ नये या प्रकल्पात असा प्रश्न मनापासून पडला. अगदी गावोगावी प्रयोग करू तिथे त्या त्या ठिकाणची एखादी मुलगी घेणंसुद्धा सहज शक्य होईल.. पडद्यावरची मेधा गुप्तेची छोटी आकृती पामची मोठी पानं कमरेला बांधून डोलताना बघितल्यावर हे प्रकर्षांने जाणवलं. शिवाय कार्यक्रमात पुढे ऋतुजा दाते ही एका लावणी नृत्यासाठीच फक्त या कार्यक्रमात आलेली आहे; हे बघितल्यावर तर ते जास्तच जाणवलं.
आचार्य अत्रे यांचेही चित्रपट खूप गाजले. चित्रपटाच्या इतिहासात त्यांचं स्वतंत्र स्थान आहे. प्रभातनंतर यांनीही सामाजिक प्रश्न हाताळले.. त्यांच्या टीकास्त्राला या माध्यमाने करमणुकीचा स्पर्श दिला.
स्वरदा गोखले आणि चैतन्य कुलकर्णी यांनी विविध प्रकारची गाणी अत्यंत तयारीने गायली. कधी कधी आपल्या वेगळ्या जागाही त्यांनी त्यामध्ये घेतल्या, अनेक वेळा वन्स मोअर देण्याचा मोह झाला, परंतु कार्यक्रमाचा ओघ अशा प्रकारे कुठेही रोखणं अशक्यच होतं.
‘ब्रह्मचारी’मधली ‘यमुना जळी खेळु खेळ कन्हैया का लाजता..’ची झलक अगदी पुसटशी दिसूनही तिचं अस्तित्व दाखवून गेली. गांधीजींचे रेखाचित्र आणि बंदुकीचे दोन बार एवढे गांधीहत्या घटना घडल्याचे सांगायला पुरेसे ठरले..
त्या त्या काळातले मोहरे- महत्त्वाची कलाकार मंडळी- पडद्यावर हजेरी लावून जाताना दिसत होती. ‘आनंदघन’ यांच्या संगीताने सजलेली गाणी एक-दोन कडव्यांत हजेरी लावून गेली.
‘ऐरणीच्या देवा तुला अगिनफुले वाहू दे’, यातला अगिनफुले हा जगदीश खेबूडकरांचा मूळ शब्द इथे स्वरदाच्या आवाजात किती गोड लागला.. तसाच डोक्यावर पदर घेऊन आपल्या पुढे बसलेली स्वरदा आणि मागे पडद्यावर जयश्री गडकर.. किती वेळा तर भाता हलवणारे दोघींचे हातही बरोबरीने हलत होते.
‘अखेरचा हा तुला दंडवत..’ लता मंगेशकरांचं आणखी एक अजरामर गीत..
हे सगळं चालू असताना प्राध्यापकाच्या आयुष्यातील घटनाक्रमही पुढे सरकत होता.. राहुल सोलापूरकर यांच्या जोडीला एक व्यक्ती संवाद साधण्यासाठी हवी म्हणून डॉ. समीर कुलकर्णी यांनी थेट त्यांच्या स्मृतीचीच योजना केलेली दिसली. त्यांच्या आठवणीतला सगळा काळ पुढे सरकत असताना तीच त्यांची साथीदार असते. स्वानंदी टिकेकर हा एक नवा, एरवीपेक्षा वेगळा चेहरा बघताना खूप आनंद वाटला.. व्यक्ती वेगळी असली तरी चेहरा नवा नव्हता.. थेट आरती अंकलीकर-टिकेकर.. स्वानंदी ही त्यांचीच मुलगी, इथे वडिलांचा अभिनयाचा वारसा घेऊन आली होती. अभिनवतेचा आणखी एक स्पर्श प्रयोगाला लाभला. गाण्यांच्या जोडीला अभिनयही बघायला मिळणं आणि गोष्टीतील काही प्रसंग डोळ्यासमोर घडत जाणं, कधी ते घडताहेत असा भास निर्माण होणं.. ही या कार्यक्रमाची जमेची बाजू आहे.
एकतारी हातात घेऊन चैतन्यने ‘पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ हे गाणं गायलं. हा पसा शब्द कुठून आला.. यावरही टिप्पणी झाली.
गायकांनी गाणं उत्तम म्हणावं हे आपण समजू शकतो, नव्हे आजच्या जमान्यात ते उत्तमच व्हावं लागतं.. पण प्रयोगाची गरज म्हणून गायकांनी नटांप्रमाणे थोडा पेहराव बदलावा.. दोन मिनिटांत बाहेर येऊन गायला सुरु वात करावी.. त्यात अभिनयही आणावा.. क्वचित गाण्याला झेपेल इतपत नृत्यही असावं.. (चित्रपटातील कलाकार गाताना नाचतील तितकं नाचणं प्रत्यक्ष गायकाला कधी शक्य होत नाही.. याची जाणीव आपण प्रेक्षकांनी ठेवायलाच हवी नाही का?) या अपेक्षा थोडय़ा जास्तच होतात नाही का? पण ही मंडळी त्या पुऱ्या करतात, हे आणखीनच विशेष !
चित्रपटाच्या कृष्णधवल काळामुळे सगळ्यांचे कपडे काळे-पांढरे.. क्वचित एखादी धूसर छटा त्यामध्ये येते. तरीही त्यामध्ये विविधता आणण्याचा छान प्रयत्न झाला आहे. गंमत म्हणजे चंदेरी दुनियेशी सगळं जोडलेलं आहे म्हणून की काय, पण काळ्या साडय़ांना चंदेरी किनार आहे. लावणी नर्तिकेच्या पदरावर भरपूर चंदेरी चमचम आहे.
‘वातावरणाचे भान, अत्यंत शिस्तबद्ध, माध्यमावर हुकमत आणि नावीन्याची ओढ या गुणांमुळे शांताराम चित्रपती झाले.’
‘चित्रपटात रमलेले पुलं आणखी थोडा काळ इथे रेंगाळले असते तर?’
अशा प्रकारची वाक्ये मागे पडद्यावर अधूनमधून झळकत होती. सुधीर फडके, भीमसेन जोशी आणि इतरही अनेक मंडळी व्यासपीठावर असताना पुलं पेटी वाजवण्यासाठी.. अशा प्रकारचे अत्यंत दुर्मीळ फोटोही दिसत होते.
‘कविता पानोपानी’ कार्यक्रमासाठी सुधीर मोघे यांनी कॉर्डलेस माइक हातात घेऊन संपूर्ण कार्यक्रम वर्षांनुवर्षे सादर केला.. हळूहळू इतरही वन मॅन टॉक शोसाठी त्याचा वापर करू लागले, त्या वेळी ते तंत्र नव्याने वापरात आलेलं होतं. आता बऱ्याच वर्षांनी प्रथमच जाणवलं की, डोक्याला अडकवून टाकलेल्या माइकच्या तंत्राचा आणि संगणकातील नवीन तंत्रज्ञानाचा मंडळींनी किती लीलया वापर केला आहे.. आता तर हात मोकळे ठेवून रंगमंचावर वावरता येण्याने किती सोय झाली आहे सगळ्यांची!
काळाबरोबर प्राध्यापकाचं आयुष्यही पुढे चाललेलं.. या सगळ्या वातावरणाशी ते छान जोडलेलंही होतं.. गोष्ट खरी की काल्पनिक, असा संभ्रम वारंवार पडत होता.. साने गुरु जींचं ‘श्यामची आई’ हे पुस्तक बक्षीस म्हणून भेट मिळत राहाणं आणि वाचण्यापेक्षा आईच्या तोंडून अश्रूंत भिजवून ऐकणं.. वडिलांचं हाकेपलीकडच्या अंतरावर जाणं, आयुष्यात केमाकाकांचं येणं.. शिक्षणासाठी/ कामासाठी परदेशी जाणं, पैसा कमावणं.. गोष्ट पडद्याशीही बरीच एकरूप झालेली.
निवेदक असूनही निवेदकापेक्षा बरेच वेगळे राहुल सोलापूरकर इथे बघायला मिळाले. त्यांना स्वानंदी टिकेकरची उत्तम साथ लाभली. हे एक नवीनच कॉम्बिनेशन इथे बघायला मिळालं.. मजा आली, गंमत वाटली..
‘हृदयी प्रीत जागते’, ‘नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम’, ‘का हो धरिला मजवर राग’ ही बैठकीची लावणी आणि मग ‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला.. तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ची धमाल मस्ती..
लावणीला स्वरदाने जाणीवपूर्वक लावलेला रस्टिक आवाज..
काही गाण्यांची नुसती झलक दाखवत पुढे जाणं अपरिहार्य होतं.. वेळेच्या दृष्टीनं आणि गाणं टाळून चालणार नाही, म्हणून!
काही गाण्यांना रेकॉर्डेड ट्रॅक.. ट्रॅकवर गाणं अवघड असतं, असं म्हणतात, पण अलीकडे कलाकार इतके सर्रास ट्रॅकवर गातात, की तेच सोपं असं आपल्याला वाटावं. काही गाण्यांना तबला-पेटीची साथ.. शास्त्रीय संगीतावर आधारित चाली आणि मुक्त गाऊ शकणारे गायक असल्यावर हा प्रबंधही करावाच लागत असणार, नाही का?
‘निजरूप दाखवा हो, हरि दर्शनसि द्या हो..’, ‘माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी..’, ‘काय गं सखू..’ याचा ग्यानबा तुकाराम ठेका.. ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ हे रमा कुलकर्णीने गायलेलं आणि ‘जग हे बंदिशाला’ जितेंद्र अभ्यंकरने म्हटलेलं अप्रतिम गाणं ऐकून समाधान वाटलं. तुलनेने ‘सख्या रे..’ हे गाणं रंगमंचीय कार्यक्रमांमधून कमीच सादर होतं.
प्राध्यापक त्याच्या आयुष्याची खडतर वळणं आठवत असतो.. एका टप्प्यावर त्याचा नातूच परदेशातून व्हायोलिनवर त्याला ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गाणं ऐकवतो.. आणि गाण्यांचा, चित्रपटांचा.. चित्रपटाच्या इतिहासाचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचवायलाच हवा, अशी निकड आता त्या प्राध्यापकालाही वाटू लागली..
‘हा माझा मार्ग एकला’ आणि ‘एक धागा सुखाचा..’ अशी गाणी शेवटी होत असताना गोष्टीचाही शेवट अगदी कळस गाठतो, पण या बाबतीत मात्र थोडे मतभेद होऊ शकतात.
माझ्यासारख्या एखादीला ही आठवणीतली रडारड नको वाटते. छान गाण्याचा आस्वाद घेत असताना, चित्रपटाचा इतिहास रंगला असताना हे कशाला मध्येच! पण त्याच वेळी बाकी सगळे त्या गोष्टीतच रंगलेले असतात. ‘एक धागा सुखाचा’ गाणं पूर्ण होऊन गेलं, तरी त्यांचे दु:खाचे कढ ओसरत नाहीत.. दु:खाचे म्हणू नये खरे तर; अनुभूूतीचे असतात ते!
कार्यक्रमाचं नेपथ्य सगळ्या वातावरणाला साजेसं.. प्राध्यापकाची खुर्ची.. त्याला दिलेली लेव्हल, मागची खिडकी, उजव्या बाजूला मागेच अशीच एक लेव्हल दोन पायऱ्या.. मागे एखाद्या वाचनालयाचं वगैरे असावं तसं बंद दार.. सुयोग्य प्रकाश.. कधी तरी तो थोडा कमी वाटतो.. पण त्याने फार अडथळा येत नाही..
मििलद ओक, आशय वाळिंबे, त्यांची सहकारी मंडळी.. बिनचूकपणे सगळ्या गोष्टी वापरत कार्यक्रम पुढे नेण्याची कसरत यांना उत्तम साधलेली असते.. आणि आता ते निवांत झालेले असतात, आपल्या डोक्यात भुंगा सोडून. फक्त गाण्याचे कार्यक्रम ऐकायची सवय असलेले आपण.. हे आता काय बघितलं? गोष्ट कुणाची होती? व्यक्तिरेखा खरी असती तर त्यांनी नाव सांगितलं असतं नाही का? पण मग त्या वास्तवाशी तर ते सगळं जोडलेलं होतं.. या मुलांचा हा उपक्रम खराच आहे ना? आपण काय मदत करू शकतो त्यांना?
एक ना अनेक.. किती तरी प्रश्नांमध्ये आपण बुडून जातो.. घरी पोचतो आणि थोडय़ा वेळाने कामात सगळं विसरतो. पुन्हा तुकडय़ातुकडय़ाने काही आठवत राहाते.. प्रश्न मनात डोकावतातच..
ही गोष्ट नेमकी काय आहे? मुलांचा उपक्रम काय? यांचा एकमेकांशी संदर्भ काय?.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा कार्यक्रमच देईल. इतर कार्यक्रमांत सहज पाहायला न मिळणाऱ्या गोष्टी इथे घडतात, त्याचा आश्चर्याचा धक्काही इथे बसेल कदाचित.. कुणी गोष्टीत रमेल, कुणी गाण्यांचा आस्वाद घेईल. जो तो आपल्याला हवे तेवढेच पाहील.. कुणी समग्रतेने आस्वाद घेऊ शकेल त्याला ब्रह्मानंद होईल. त्यासाठी थोडा प्रयत्न करायला हवा.. नवे प्रयोग तरुण पिढी आपल्यासमोर करत असताना त्याला दाद देण्यासाठी सज्ज व्हायचं तर खुल्या दिलाने नव्या प्रयोगांना सामोरं जायला हवं.. ते निखळ आनंदच देतील.
या प्रवासात आपल्याला कृष्णधवल मराठी चित्रपटसृष्टीच्या काळातील विविध कलाकार भेटतात. कधी गायकांच्या संवादातून, कधी मागच्या पटावरील चित्रातून, तर कधी चक्क चित्रपटाच्या त्या गाण्यातील काही अंशांमधून!
‘कविता पानोपानी’ कार्यक्रमासाठी सुधीर मोघे यांनी कॉर्डलेस माइक हातात घेऊन संपूर्ण कार्यक्रम वर्षांनुवर्षे सादर केला.. त्या वेळी ते तंत्र नव्याने वापरात आलेलं होतं. आता बऱ्याच वर्षांनी प्रथमच जाणवलं की, नवीन तंत्रज्ञानाचा मंडळींनी किती लीलया वापर केला आहे..
काही गाण्यांना रेकॉर्डेड ट्रॅक.. ट्रॅकवर गाणं अवघड असतं, असं म्हणतात, पण अलीकडे कलाकार इतके सर्रास ट्रॅकवर गातात, की तेच सोपं असं आपल्याला वाटावं.