महिलांचा लैंगिक छळ हा आजच्या काळातला ऐरणीवरचा विषय आहे. दिल्लीतील तसंच मुंबईतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणांमुळे या संदर्भात समाजमन अधिकच संवेदनशील बनले आहे. म्हणूनच या विषयावरील चित्रपटाचे स्वागत करायला हवे.
अल्पवयीन मुली, तरुणी तसेच महिलांवर बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण आपल्या देशात दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना असो की मुंबईतील शक्ती मिलमध्ये झालेली घटना असो या घटना उघडकीस आल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून या घटनांचा तीव्र निषेध नोंदवून दबाव आणला आणि त्याची देशभर चर्चा झाली. त्यामुळेच या दोन्ही घटनांबाबत न्यायालयात त्वरेने निकला लागला. परंतु, दोन घटना म्हणजे केवळ हिमनगाचे टोक ठराव्यात इतक्या मोठय़ा प्रमाणात गावखेडय़ांमध्ये, शहरांमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये, फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये, अगदी प्रचंड गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र लहान मुलींपासून महिलांपर्यंतच्या वेगवेगळ्या स्तरातील महिलांना मोठय़ा प्रमाणावर लैंगिक छळणुकीचा सामना करावा लागतो. याच महत्त्वाच्या मुद्दय़ावर बेतलेला ‘कॅण्डल मार्च’ हा मराठी सिनेमा पाच डिसेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे.
अण्णा हजारे उपोषणाला दिल्लीत बसले होते तेव्हा भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. जनता रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित सहभागी झाली होती. तेव्हा तसेच त्यापूर्वी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणूनही मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे मेणबत्ती मोर्चा लोकांनी काढला होता. याचा संबंध चित्रपटाच्या शीर्षकाशी आहे का याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन देव यांना विचारले असता ते म्हणाले की, एखादी घटना घडली आणि त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली की ‘तारीख पे तारीख’चा अनुभव सर्वाना घ्यावा लागतो. मग लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढला की व्यवस्थेवर दबाव येतो आणि मग त्या संबंधित प्रश्नाचा, अन्याय्य घटनेबाबतच्या प्रक्रियेला वेग मिळून न्याय मिळतो. म्हणून शीर्षकामधून आम्हाला एवढेच सूचित करायचे आहे की लोकांनी उत्स्फूर्तपणे मोर्चा काढला नाही, आणि त्यामुळे व्यवस्थेवर दबाव आला नाही तर अशाच एखाद्या अन्याय घटनेवरचा न्यायालयीन निवाडा अथवा दोषींवर केली जाणारी पोलीस कारवाई यात किती काळ दिरंगाई होत राहणार. शीर्षकामधून हे सूचित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सचिन देव यांनी सांगितले.
जवळपास १५-१६ वर्षे हिंदी मालिकांच्या दुनियेत सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शक व नंतर दिग्दर्शक म्हणून काम करीत असतानाच चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे मनात होते. काही वर्षांपूर्वी ‘अनोळखी हे घर माझे’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शितही केला. परंतु, तो अतिशय नवखा आणि म्हणून तोकडा अनुभव ठरला. खऱ्या अर्थाने नीट विचार करून, शिस्तबद्ध, योजनाबद्ध रीतीने केलेला प्रयत्न म्हणून ‘कॅण्डल मार्च’ हाच माझा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न आहे असे सचिन देव यांनी नमूद केले.
सचिन दरेकर यांनी पटकथा वाचायला दिली तेव्हा महिलांची लैंगिक छळणूक हा गंभीर सामाजिक प्रश्न आजच्या काळात हाताळणे संयुक्तिक नक्कीच ठरेल हे मनाला पटले. कारण निर्भया प्रकरण, मुंबईतील शक्ती मिल प्रकरण असो त्यानंतरही वृत्तपत्रांतून अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या बातम्या दररोज वाचायला मिळतात. म्हणजे बलात्कार, लैंगिक छळणूकीच्या घटना वाढल्याचेच हे निदर्शक म्हणावे लागेल. म्हणूनच या विषयावर सध्याच्या काळात चित्रपट बनविणे हा संयुक्तिक विचार केला.
चित्रपटाच्या गोष्टीविषयी थोडक्यात सांगताना सचिन देव म्हणाले की, वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक स्तरातील चार निरनिराळ्या वयोगटातील महिलांची लैंगिक छळणूक केली जाते, त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी चौघीजणींना बळ मिळते ते एका घटनेनंतर. त्या एका घटनेमुळे प्रेरित होऊन चौघीजणी आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवितात. चारही जणींच्या स्वतंत्र गोष्टी असल्या तरी एका घटनेशी त्यांचा अन्योन्य संबंध जुळतो आणि त्यामुळे त्या चौघीजणींना लढण्याची प्रेरणा, ऊर्जा मिळते अशी साधारण गोष्ट असल्याचे देव सांगतात.
तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे, मनवा नाईक आणि या चित्रपटाद्वारे पदार्पण करीत असलेली सायली सहस्त्रबुद्धे अशा चार प्रमुख कलावंत या चित्रपटात झळकणार असून त्यांना नीलेश दिवेकर, आशीष पठाडे आदिंची चांगली साथ लाभलेली पाहायला मिळेल. राजा सटाणकर यांचे छायालेखन असून दरेकर-देव यांनी एकत्रितरीत्या पटकथा लिहिली असून संवादलेखन सचिन दरेकर यांनी केले आहे. अंजली गावडे व नीलेश गावडे हे निर्मात्याच्या भूमिकेत असून अमितराज यांचे संगीत व पाश्र्वसंगीत आहे. मंदार चोळकर यांची गाणी असून कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांनी केले आहे.
वास्तवातील घटनांवर बेतलेला ‘कॅण्डल मार्च’ हा चित्रपट वास्तववादी चित्रीकरणस्थळीच चित्रीत करण्यात आला असून पाच डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.