‘आजचा दिवस माझा’ या राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटानंतर लगेचच येत्या महाराष्ट्रदिनी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘दुसरी गोष्ट’ हा आणखी एक राजकीय वातावरण असलेला चित्रपट प्रदर्शित होतोय.

‘बिनधास्त’, ‘भेट’, ‘कायद्याचं बोला’ या चित्रपटांपासून ते ‘तुकाराम’, ‘कदाचित’ अशा चित्रपटांपर्यंत रचनेतले वेगवेगळे प्रयोग करीत अतिशय गोळीबंद पटकथा घेऊन चंद्रकांत कुलकर्णी- अजित दळवी- प्रशांत दळवी या त्रिकुटाचे लिखित-दिग्दर्शित चित्रपट रसिकांसमोर आले आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘आजचा दिवस माझा’ या सचिन खेडेकरच्या अभिनयाने गाजलेल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. संवेदनशील मुख्यमंत्री एका सर्वसामान्य माणसाचे काम तातडीने करण्याचे ठरवितो, अशी एका रात्रीची गोष्ट असलेल्या चित्रपटाला रसिकांची दाद मिळालीच. आता राष्ट्रीय पारितोषिकाचीही मोहोर उमटली आहे. त्यामुळे रसिकांच्या अपेक्षा आता आणखी वाढल्या असतानाच जिगिषा क्रिएशन प्रस्तुत ‘दुसरी गोष्ट’ हा नवीन चित्रपट महाराष्ट्र दिनी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
आपल्याकडे राजकीय पाश्र्वभूमीवरचे अथवा प्रत्यक्ष राजकारणावरचे चित्रपट असे म्हटले की, दोन पक्षांचे निवडणुकीचे राजकारण दाखविले जाते किंवा एकाच पक्षातील कार्यकर्ता व त्याचा गुरू असलेला नेता किंवा मग सरळसरळ एकाच पक्षातील सर्वोच्च पदासाठी इच्छुक असलेल्या दोन नेत्यांची एकमेकांतील जीवघेणी स्पर्धा, राजकीय डावपेच खरेतर कुटिल नीतीचा वापर करून कुरघोडी करण्याचा प्रयत्न, गुंडांची साथ वगैरे तद्दन हिंदी चित्रपटातील सरधोपट कथानकासारखे नायक-खलनायक पद्धतीने चित्रपट केले जातात.
त्यापेक्षा ‘दुसरी गोष्ट’ अतिशय निराळ्या पद्धतीचा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. या संदर्भात गप्पा करताना दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की, आमच्या या नव्या चित्रपटात राजकीय वातावरण आहे. म्हणूनच सार्वत्रिक निवडणुकीची निदान महाराष्ट्रातील रणधुमाळी थांबली की प्रदर्शित करण्याचे आम्ही ठरविले. प्रसन्नकुमार या समाजाच्या निम्न स्तरातील मुलगा अनाथ होतो. पोटाची खळगी भरण्यासाठी चोरीसुद्धा करतो. परंतु शिक्षणाचे महत्त्व पटल्यावर शिक्षण घेतो, मोठा होतो आणि राजकारणातही वरच्या पदावर पोहोचतो. त्याचा हा सबंध प्रवास, त्यातला संघर्ष हे तर आम्ही दाखविण्याचा प्रयत्न केला आहेच; परंतु कोणत्याही प्रकारचा राजकीय प्रचार न करता सर्वसामान्य, समाजातील अतिशय गरीब, पददलित मुलगा हाही आपल्या देशाच्या घटनेने बहाल केलेल्या अधिकारानुसार राजकीय अधिकारपदावर पोहोचू शकतो हे अधोरेखित केले आहे. तरुण प्रसन्नकुमार ही व्यक्तिरेखा सिद्धार्थ चांदेकरने साकारली असून राजकारणात नेता बनलेली प्रौढ व्यक्तिरेखा विक्रम गोखले यांनी साकारली आहे. वैचारिक पातळीवर मतभेद असले, पक्षीय स्पर्धा असली तरी अनेकदा मैत्रीच्या पातळीवर दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते व एकमेकांचे विरोधक एकत्र जेवण करतात हे आपण पाहतो. ‘दुसरी गोष्ट’मधील नायक प्रसन्नकुमार हा रसरशीत जीवन जगणारा माणूस आहे. शून्यातून विश्व उभे करण्याची धमक तो दाखवितो, त्याचा मानवी चेहरा शोधण्याचा प्रयत्न ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटांप्रमाणेच ‘दुसरी गोष्ट’ या चित्रपटातून केला आहे, असे लेखकद्वयीपैकी प्रशांत दळवी यांनी सांगितले. जवळपास ४० वर्षांचा पट दाखविताना मुख्य व्यक्तिरेखांबरोबरच अन्य छोटय़ा छोटय़ा व्यक्तिरेखाही सिनेमॅटिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न पटकथेद्वारे केला आहे. सिनेमा माध्यमाच्या वेगवेगळ्या शक्यता, रचनेचा वेगळा प्रयोग हा चित्रपट पाहताना तुम्हाला जाणवेल हे वैशिष्टय़ही प्रशांत दळवी यांनी नमूद केले. आमच्या अख्ख्या टीमने ‘दुसरी गोष्ट’ चित्रपट बनवतानाची प्रक्रिया ‘एन्जॉय’ केली आहे. ही ‘प्रोसेस’ उत्कटतेने अनुभवणे, त्यातला आनंद मिळविणे हाही एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत वाटावी, गोष्ट ‘स्पेसिफिक’ न करता ‘जनरलाइज’ होणं खूप आवश्यक असतं. तो प्रयत्न ‘दुसरी गोष्ट’मधून आम्ही केला आहे, असे प्रशांत दळवी म्हणाले.
आजचा दिवस माझा हा चित्रपट पाहून तो आवडला असे जीवनगाणी फिल्म्स या प्रसाद महाडकर, डॉ. शैलजा गायकवाड, मंजिरी हेटे यांनी भेटून सांगितले. चित्रपट क्षेत्रात आम्ही पदार्पण करीत असून पहिला चित्रपट तुम्ही दिग्दर्शित करावा असा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे पहिलाच चित्रपट असूनही कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप निर्मितीप्रक्रियेत, कथानकात केला नाही, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी आवर्जून नमूद केले.
आजच्या काळात डिजिटलवर जबरदस्त पकड असलेले छायालेखक सुरेश देशमाने ‘दुसरी गोष्ट’चे छायालेखक असून कलावंतांमध्ये सिद्धार्थ चांदेकर-नेहा पेंडसे ही जोडी पडद्यावर येतेय. विक्रम गोखले यांच्याबरोबरीनेच भारती पाटील, सुनील तावडे, संदीप मेहता, मुग्धा गोडबोले, स्मिता सरवदे, गिरीश जोशी, प्रतीक्षा लोणकर, रेणुका शहाणे, आनंद इंगळे, बालकलाकार आदित्य गानू अशी स्टारकास्ट यात झळकणार आहे. मंगेश धाकडे आणि अशोक पत्की यांनी संगीत दिले असून आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मंगेश धाकडे प्रथमच चित्रपटात गाणार आहेत.

Story img Loader