हिंदी चित्रपटांसारखा मराठी चित्रपटांमध्ये लव्ह स्टोरी हा जॉनर खूप प्रचलित नाही. तरीसुद्धा हिरो-हिरोइन-व्हिलन हा फॉम्र्युला प्रत्येक चित्रपटात असतोच. मात्र लव्ह स्टोरीचा जॉनर वेगळ्या अर्थाने मराठी चित्रपटात ट्रेण्ड बनू शकेल अशा पद्धतीचा ‘मितवा’ हा आगामी चित्रपट फेब्रुवारीत प्रदर्शित होतोय.
टीआरपी गाजविणाऱ्या अनेक हिंदी मालिका, ‘क’ अक्षराची नावे असलेल्या बालाजी टेलिफिल्म्सच्या मालिका, गुजराती मालिका क्षेत्रात गाजल्यानंतर स्वप्ना वाघमारे-जोशी प्रथमच मराठीच्या रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हे ‘मितवा’ या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
मराठी चित्रपटाच्या निर्मिती दिग्दर्शनात हिंदी चित्रपट, मालिकासृष्टीतील अनेकजण येऊ पाहताहेत. विशेषत: मराठी चित्रपटाच्या निर्मितीत हिंदी कलावंत उत्सुक असतात. परंतु, दिग्दर्शनामध्ये हिंदी मालिकेतील प्रथितयश कलावंत मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाकडे वळत नाहीत. परंतु, स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी हे पाऊल उचलले आहे.
त्या सांगतात, आपण यापूर्वी संजय सूरकर, नीलकांती पाटेकर यांना सिनेमासाठी साहाय्यक दिग्दर्शन केलंय. हिंदी, गुजराती मालिका केल्यामुळे हिंदीच्या बजेटमध्ये मराठी सिनेमा करायला परवडणार नाही, मराठी सिनेसृष्टीतील लोकांना वाटायचं. म्हणून इच्छा असूनही मराठी सिनेमा करण्याची संधी मिळत नव्हती. मी बजेट न सांगताच बजेट खूप असणार, आपल्याला परवडणार नाही असे मराठी सिनेमातल्या कलावंत-निर्माते-दिग्दर्शकांना वाटत आले आहे, असे त्या सांगतात.
खूप हिंदी मालिका आणि या मालिकांचा टीआरपी मिळविण्यासाठी ती ‘लाउड’ करण्याला पर्याय अनेकदा नसतो. हिंदूी मालिका आणि मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग निरनिराळा आहे. गेल्या काही वर्षांत येत असलेले मराठी चित्रपटांचे विषय आणि मराठी प्रेक्षकाची आवड लक्षात घेतली तर मराठी प्रेक्षक नवनवीन विषय स्वीकारणारा आहे, खूप भडक सादरीकरण आणि कथाविषय घिसापिटा असणे मराठी प्रेक्षकाला नको असते. हे ओळखूनच लव्ह स्टोरी हा जॉनर ‘मितवा’ या सिनेमात दाखवला असला तरी मूलत: हा चित्रपट नातेसंबंधांवरचाच आहे, असे स्वप्ना यांनी सांगितले. प्रत्येक नात्याला एक कोन नसतो तर अनेक कोन असतात तसेच या सिनेमातल्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या नात्याला अनेक कोन आहेत. लव्ह स्टोरी हा जॉनर असला तरी यात मोठे नाटय़ आणि म्युझिकल फिल्म असल्यामुळे अतिशय उत्तम गाणी हे या सिनेमाचे वैशिष्टय़ आहे, असे त्या म्हणाल्या.
ट्रेलर पाहून, त्यातली गाणी पाहून, संवाद ऐकून आणि पोस्टरवरून हा चित्रपट म्हणजे एक ‘टिपिकल’ प्रेमत्रिकोण प्रकारातला चित्रपट वाटत असेल. तसा तो आहेही, पण त्यापलीकडे जाऊन नातेसंबंधांचा खोल खोल जाऊन कोन शोधून अर्थ लावण्याचा प्रयत्न या चित्रपटातून आपण केला असल्याचे स्वप्ना यांनी सांगितले.
मासेस आणि क्लासेस अशा दोन्ही वर्गातील प्रेक्षकांना हा आवडू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात असते, प्रत्येकजण केव्हा ना केव्हा तरी प्रेमात पडतो, त्यातला हळुवारपणा, प्रेमात पडल्याचा आनंद, विरह, दु:ख, अहंभाव, स्वार्थ, त्याग असे प्रेमाचे अनेक रंग या रोमॅण्टिक जॉनरच्या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतीलच. परंतु, त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्नही दिग्दर्शक म्हणून आपण केला आहे. मूलत: स्वप्न विकण्याचा प्रयत्न करताना सिनेमाच्या गोष्टी आणि संवादांबरोबरच सिनेमा देखणा कसा होईल यासाठी आपण आणि कॅमेरामन प्रसाद भेंडे यांनी अनेक लोकेशन्सची चार-चार वेळा रेकी केली आहे, अशी माहिती स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी आवर्जून दिली. यातल्या व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाइफ नाहीत. स्वप्निल जोशीची व्यक्तिरेखा मित्र, वाटाडय़ा, तत्त्वज्ञ अशा स्वरूपाची असली तरी ती खोटी वाटणार नाही, असेही घडते एवढे प्रेक्षकाला हा सिनेमा पाहताना नक्कीच जाणवेल. या सिनेमातील व्यक्तिरेखांच्या बाबतीत घडते तसे कुणाच्याही आयुष्यात घडू शकते असे सिनेमा पाहताना नक्कीच वाटेल. शिरीष लाटकर यांनी पटकथा-संवाद लेखन केले असून सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर संग्राम साळवी या कलावंताचीही प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
सुनील नांदगावकर