तृतीयपंथीयांवर आतापर्यंत हिंदीत तसंच मराठीत चित्रपट येऊन गेले आहेत. आगामी काळात येऊ घातलेला ‘ऋण’ हा चित्रपटही तृतीयपंथीयांवर असला तरी नेहमीपेक्षा निराळा दृष्टिकोन यातून मांडला आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल गायकवाड यांनी सांगितले.
चित्रपटाविषयी अगदी थोडक्यात सांगायचे तर ही एक प्रेमकथा आहे. एका तृतीयपंथीयाचे एका व्यक्तीवर प्रेम बसते. आपल्याला समाज स्वीकारत नाही, आई-वडिलांनीही आपल्याला स्वीकारलेले नाही, समाजात हीन वागणूक मिळते हे माहीत असूनही आपल्यात एखाद्या व्यक्तीविषयी प्रेमभावना उत्पन्न होणे याचाच धक्का या तृतीयपंथीयाला बसतो. परंतु, मनातील भावना लपवून ठेवता येत नाहीत. आपल्याला मानाने जगण्याचा अधिकार समाजमानसाने दिलेला नसताना प्रेम करण्याचा अधिकार कसा मिळेल, याचा विचार करीत असतानाही मनात उमटलेले प्रेमभावनेचे तरंग व्यक्त करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे, अशी काहीशी गोष्ट या चित्रपटाची आहे.
विशाल गायकवाड म्हणाले की, आतापर्यंत हिंदी-मराठीच नव्हे तर बहुतांश चित्रपटांमध्ये तृतीयपंथीय व्यक्तिरेखेसाठी पुरुष कलावंतांनाच निवडण्यात आले आहे. परंतु, आपण पहिल्यांदाच या चित्रपटात तृतीयपंथीय प्रमुख व्यक्तिरेखेसाठी एका अभिनेत्रीची निवड केली असून ती भूमिका नारायणी शास्त्रीने केली आहे. मराठीच्या रुपेरी पडद्यावर गाजत असलेल्या काही अभिनेत्रींना या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. परंतु, प्रतिमेला छेद जाईल किंवा अन्य काही कारणांनी त्या चार-पाच अभिनेत्रींनी ही भूमिका करण्यास नकार दिला. परंतु, नारायणी शास्त्री यांनी कथा-पटकथा वाचल्यानंतर ताबडतोब ही ‘चौकटीबाहेरची’ भूमिका करण्यास होकार दिला.
ही मी पाहिलेली सत्यघटना असून त्यातील खरीखुरी माणसे मला दिसली, भावली तशी मी पडद्यावर साकारायचे ठरविले. काही गोष्टींच्या कथा लिहून चालतात. पण काही केवळ कथा लिहून भागणार नाही, तर या पडद्यावर ही कथा प्रेक्षकांसमोर आणली पाहिजे या तीव्र इच्छेमुळेच मी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, असे विशाल गायकवाड यांनी सांगितले.
तृतीयपंथीय जमातीचे गुरू असतात. तेच त्यांचे पोलीस-वकील-न्यायाधीश-प्रमुख असे सर्वकाही असतात. या भूमिकेत मनोज जोशी दिसणार आहेत. सर्वसाधारणपणे या भूमिकांद्वारे लोकांना घाबरविण्याची प्रवृत्ती दिसून आली आहे. परंतु, मनोज जोशी यांनी या भूमिकेत जान ओतली असून एक प्रकारे मनोज जोशी यांची व्यक्तिरेखा ही चित्रपटाची सूत्रधार म्हणता येईल अशा स्वरूपाची असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.
अशा धाडसी, वैशिष्टय़पूर्ण विषयावर चित्रपट करण्यासाठी पटकथा लेखक विनोद रामन नायर यांनी साथ दिली. त्याचबरोबर पत्रकार महिलेच्या भूमिकेसाठी राजेश्वरी सचदेव, तर मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत अभिनेते अनंत जोग प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
गायकवाड म्हणाले की, मानसोपचारतज्ज्ञाची ही भूमिका अनंत जोग यांना खूप आवडली असून त्यांनी मनापासून ती पडद्यावर साकारली आहे. विशेष म्हणजे एक लांबलचक स्वगत अनंत जोग यांच्या तोंडी आहे. ते नेहमी हिंदी-मराठी चित्रपटांतून साकारत असलेल्या भूमिकांपेक्षा पूर्ण वेगळी भूमिका त्यांनी अगदी समरसून केली आहे, असे सांगायलाही गायकवाड विसरले नाहीत.
ओमकार गोवर्धन हा नवोदित कलावंत या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार असून विजय पाटकर, दिवंगत विनय आपटे, जयराज नायर, विवेक लागू यांनीही भूमिका साकारल्या आहेत. हिंदीतील आघाडीचे संगीतकार व पाश्र्वसंगीतकार संगीत-सिद्धार्थ हळदीपूर यांनी प्रथमच मराठी चित्रपटाला संगीत दिले असून त्यातही वेगवेगळे प्रयोग केले आहेत.
इंग्रजी उपशीर्षकांसह हा चित्रपट १७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून त्यानंतर हा धाडसी विषय जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही ‘ऋण’ हा चित्रपट दाखवावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विशाल गायकवाड यांनी सांगितले.
सुनील नांदगावकर