वेगवेगळे चित्रपट प्रकार हाताळल्यानंतर आता सतीश राजवाडे यांनी विनोदी पण नाटय़पूर्णता असलेला चित्रपट प्रकार ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात हाताळला असून हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
मराठीतील यशस्वी दिग्दर्शकांमध्ये सतीश राजवाडे यांचे नाव घेतले जाते. ‘मृगजळ’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘गैर’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आता ‘सांगतो ऐका’ हा नाटय़पूर्ण विनोदी चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपल्या या नव्या चित्रपटाबद्दल त्यांच्याशी गप्पा करताना त्यांनी ‘सांगतो ऐका’ची वैशिष्टय़े सांगितली.
‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपट चांगलाच गाजला. मुक्ता बर्वे-स्वप्निल जोशी या जोडीची केमिस्ट्री चांगलीच जमून आली होती. हीच जोडी घेऊन एका लग्नाची गोष्ट ही मालिकाही राजवाडे यांनी केली. अतुल कुलकर्णी यांना घेऊन ‘प्रेमाची गोष्ट’ लोकांना सांगितली तर पुन्हा अतुल कुलकर्णी यांच्यासोबत ‘पोपट’ चित्रपट केला. परंतु, ‘सांगतो ऐका’ या आगामी चित्रपटात सतीश राजवाडे यांनी निर्मात्यांपासून ते कथा-पटकथा, कलावंत अशा चित्रपटाच्या सर्वच विभागांमध्ये नवीन टीम जुळवली आहे.
सतीश राजवाडे म्हणाले की, माझ्या आधीच्या सर्व चित्रपटांप्रमाणेच ‘सांगतो ऐका’ या चित्रपटातही ‘कॉण्टेण्ट इज किंग’ ही गोष्ट नक्कीच आहे. डोकं बाजूला ठेवून निव्वळ करमणूक देण्याचा प्रयत्न आजवर केलेला नाही. या चित्रपटातूनही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे.
वेगवेगळे चित्रपट प्रकार हाताळले असून या चित्रपटातही विनोदी आणि नाटय़पूर्ण घडामोडी असा प्रकार हाताळला आहे. सर्वसामान्य माणूस असामान्य परिस्थितीत काय करू शकेल ते दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच आयुष्यात कधीतरी वाटतं की एकदा तरी मी सांगतोय ते लोकांनी ऐकलं पाहिजे. ‘सांगतो ऐका’ची हीच संकल्पना आहे. पराग कुलकर्णी यांनी कथा-पटकथेतून चित्रपटाची ही संकल्पना मांडली आहे, असे त्यांनी सांगितले.
विजू माने दिग्दर्शित ‘शर्यत’ या चित्रपटानंतर सचिन पिळगांवकर प्रथमच सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनाखाली पडद्यावर दिसणार आहेत. सचिन यांच्या भूमिकेबद्दल सांगताना राजवाडे म्हणाले की, एक फड आहे, त्या फडातला आंबट असे वैचित्र्यपूर्ण नाव असलेल्या स्टॅण्डअप कॉमेडीयनची प्रमुख व्यक्तिरेखा सचिन यांनी साकारली आहे. ‘आंबट’ हे व्यक्तिरेखेचे नाव का ठेवले असे विचारले असता त्यांनी सांगितले की, स्टॅण्डअप कॉमेडीयन असलेला हा आंबट एकदा फडाच्या मंचावर येऊन लोकांशी संवाद साधू लागला की तो जे बोलतो त्यातून कायमच प्रेक्षकांना शालजोडीतले देण्याचा प्रकार घडत असतो. फडातील नृत्यांगनांचे नृत्य आणि गाण्यांचे सादरीकरण पाहण्यापेक्षा आंबटची कॉमेडी पाहायला लोक गर्दी करत असतात. परंतु, तो प्रेक्षकांच्या काळजाला हात घालत दांभिकपणावर बोट ठेवतो तेव्हा लोकांची तोंडं आंबट होतात. एक तर हा आंबट म्हणजे सदान्कदा दारू ढोसूनच असतो, दुसरे म्हणजे तो अतिशय बेभरवशाचा माणूस आहे. आंबट चव प्रत्येकालाच खूप आवडते असे नव्हे परंतु कधीतरी चाखावीशी वाटतेच. म्हणून असे वैचित्र्यपूर्ण वाटणारे परंतु या व्यक्तिरेखेला चपखल बसेल असे नाव ठेवले आहे, असे राजवाडे नमूद करतात.
अशोक सराफ यांच्यासोबत ‘एक डाव धोबीपछाड’ केला आता सचिन यांच्यासोबत हा चित्रपट हे ठरवून केले का असे विचारल्यावर राजवाडे यांनी एक क्षण पॉज घेऊन सांगितले की मराठीतले हे दोन्ही गाजलेले कलावंत आहेत. सचिन पिळगांवकर हे तर अभिनय, नृत्य, पाश्र्वगायन, निर्माता-दिग्दर्शक, पटकथा लेखक अशा चित्रपटाच्या विविध विभागांमध्ये माहीर असलेले कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होतीच. चित्रपटाची संकल्पना आणि पटकथा आवडली म्हणूनच अर्थातच या भूमिकेसाठी ते तयार झाले, असेही राजवाडे यांनी नमूद केले.
आंबट या व्यक्तिरेखेचा वेगळा ‘लूक’ या चित्रपटातून दिसणार आहे. त्यासाठी सचिन यांनी खोटी दाढी न लावण्याचे ठरविले आणि भूमिकेला शोभेल अशी दाढी वाढवली आणि त्यानुसार हेअरस्टाईलही केली आहे. विनोदी त्रिकुटामध्ये प्रेक्षकांनी रुपेरी पडद्यावर सचिन-लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ हे त्रिकूट पाहिले आहे. आपल्या या चित्रपटातून सचिन-वैभव मांगले-भाऊ कदम असे कलावंतांचे नवीन विनोदी त्रिकूट प्रेक्षकांसमोर येणार आहे. विधी कासलीवाल यांच्या लॅण्डमार्क फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटात विनोदी त्रिकुटाबरोबरच विनोदी अभिनेते विजय चव्हाणही या चित्रपटात आहेत. माधव अभ्यंकर, जगन्नाथ निवनगुणे, मिलिंद सिंदे, पूजा सावंत, संस्कृती बालगुडे या कलावंतांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
चित्रपटाचे संवादलेखन संजय पवार यांनी केले असून संगीत अविनाश-विश्वजीत यांचे आहे. छायालेखन सुहास गुजराती यांनी केले असून कला दिग्दर्शन निखिल कोवळे यांनी केले आहे. २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.