मराठी चित्रपटांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमकथापटांची चांगलीच रेलचेल असल्याचे दिसून येते. परंतु अलीकडे झळकलेल्या मराठी प्रेमकथापटांतून निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करण्यात आल्याचे दिसते. पौगंडावस्थेतील मुलामुलींचे अल्लड प्रेम दाखविणारे चित्रपटही प्रेक्षकांनी उचलून धरल्याचे ‘टाइमपास’ चित्रपटावरून म्हणता येईल. त्याच धर्तीवर अलीकडेच झळकलेल्या ‘स्लॅमबुक’ चित्रपटातून लहान वयातील मुलामुलींच्या प्रेमाची कथा प्रेक्षकांसमोर आली. एकंदरीतच मराठी चित्रपटांमध्ये प्रेमकथापटांचे भरपूर पीक आले असून आणखीही बरेच चित्रपट या विषयावर येणार आहेत असे दिसतेय.
सुपरहिट ‘दुनियादारी’चे दिग्दर्शक संजय जाधव यांचा आगामी मराठी चित्रपट ‘तू ही रे’ ४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून त्यांचा चित्रपट म्हणजे श्रवणीय संगीत आणि भव्यता यांचे मिश्रण असलेला चित्रपट असतो असे म्हणायला हरकत नाही. चित्रपटाबद्दल बोलताना संजय जाधव म्हणाले की, हा चित्रपट म्हणजे लव्ह स्टोरी असली तरी ही प्रेमकथा लग्न झालेल्या जोडप्याची आहे. लग्नाआधीची प्रेमकथा दाखविलेली नाही. स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित असे प्रमुख कलावंत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहून आणि चित्रपटाच्या शीर्षकावरूनही प्रेमाचा त्रिकोण असेल असे वाटतेय. त्याबद्दल जाधव म्हणाले की, नाही, तसे काही नाही. यात दोन लव्ह स्टोरीज आहेत.
‘दुनियादारी’ हा चित्रपट सुहास शिरवळकरांच्या गाजलेल्या कादंबरीवर बेतलेला होता. त्यातही प्रेमकथा होती, परंतु त्यापेक्षा मैत्रीचे दर्शन अधिक घडविले होते. उत्तम कलावंतांची फळी असण्याबरोबरच संगीतामुळे खूप गाजला होता. म्हणूनच ‘तू ही रे’ चित्रपटाच्या संगीताविषयी विचारल्यानंतर संजय जाधव यांनी सांगितले की, या चित्रपटाचे संगीत ही सर्वात मोठी जमेची बाजू ठरेल. सर्व पाच गाणी अतिशय श्रवणीय आहेत. किंबहुना ‘दुनियादारी’पेक्षाही या चित्रपटाचे संगीत मला अधिक आवडले असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
संजय जाधव मूळचे छायालेखक असले तरी या चित्रपटाचे छायालेखन प्रसाद भेंडे यांनी केले असून पंकज पडघन, अमितराज आणि शशांक पोवार अशा तिघांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. प्रमुख तीन कलावंतांच्या व्यतिरिक्त लहान मुलीच्या भूमिकेत मृणाल जाधवने काम केले आहे. ‘दृश्यम’ या अलीकडेच गाजलेल्या हिंदी चित्रपटात तिने काम केले होते. अरविंद जगताप यांनी संवादलेखन केले असून सुशांत शेलार, गिरीश ओक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. लोकप्रिय कलावंत, संगीत असलेला हा प्रेमकथापट लोकप्रिय ठरणार की नाही हे प्रदर्शित झाल्यावरच समजू शकेल.
एखाद्या हिंदी चित्रपटाच्या गोष्टीसारखा हा चित्रपट असेल असा कयास चित्रपटाची छायाचित्रे पाहून करता येऊ शकतो. ‘गुलाबाची कळी’, ‘सुंदरा’, ‘जीव हा सांग ना’ इत्यादी गाणी यात असून मराठीच्या रुपेरी पडद्यावर भव्यता आणि ‘म्युझिकल लव्ह स्टोरी’ पुन्हा एकदा ‘तू ही रे’ चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळू शकेल एवढाच अंदाज ट्रेलर, पोस्टर पाहून करता येतो.
सुनील नांदगावकर