मराठी रंगभूमीवर आलेल्या नाटकांच्या विषयांवर नजर टाकल्यास नातेसंबंधांमधील संघर्ष या विषयाला प्राधान्य असल्याचं जाणवतं. मराठी नाटककारांना नातेसंबंध, त्यामधील गुंतागुंत, त्यातील भावभावनांचा गोफ जास्त आवडतो, असं चित्र आहे.
‘एक राजा होता. त्याला एक राजकुमारी दिसली. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनीही लग्न केलं. लग्नानंतर वर्षभरातच दोघांना राजबिंडा मुलगा झाला. मुलगा कतृत्ववान निघाला. राजा-राणी दोघेही सुखाने नांदले. राजकुमाराचं लग्नही यथावकाश एका मोठय़ा राज्याच्या राजकुमारीसह झालं. राजकुमाराचा राज्याभिषेक झाला. थकलेले आणि तृप्त झालेले राजा-राणी वानप्रस्थाश्रमात जाऊन राहिले..’ अशी गोष्ट कोणी सांगितली, तर ना ती सांगणाऱ्याला मजा येईल ना ऐकणाऱ्याला! कारण विचारा. कारण एवढी सरळ सोपी गोष्ट ही आपल्या लेखी गोष्टच नसते. गोष्टीत काहीतरी ‘ट्विस्ट’ हवा ना!
आता वरची गोष्टच घ्या. वरच्या गोष्टीत तिसऱ्या वाक्यानंतर एक ‘पण’ टाका. सांगणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची उत्सुकता वाढली म्हणूनच समजा. तिसऱ्याच नाही, तर चवथ्या वाक्यानंतरचा ‘पण’ही हा परिणाम साधून जाईल.
असं का? या प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं आहे. उत्तर आहे, हा ‘पण’ पुढे अटळ असलेल्या संघर्षांची नांदी म्हणून येतो. मग तो संघर्ष कधी, ‘ती राजकुमारी शत्रुराज्याच्या राजाची’ म्हणून, तर कधी ‘लग्नानंतर त्यांना मूल होत नव्हतं’ म्हणून सुरू होतो. गोष्टीत खरी मजा सुरू होते, ती हा ‘पण’ आल्यावरच! त्यामुळे गोष्ट सांगण्याचं प्रभावी माध्यम असलेल्या नाटकात संघर्षांला अतिमहत्त्वाचं स्थान आहे. मग हा संघर्ष कधी सत्य-असत्य, पाप-पुण्य अशा मूल्यांमध्ये असतो; तर कधी नातेसंबंधांमध्ये आणि भावभावनांमध्ये तो जाणवतो.
मराठी रंगभूमीवर आलेल्या अनेक नाटकांमध्ये हा संघर्षांचा गाभा नेमका उभा करून त्याला नातेसंबंधांचं अस्तर दिल्याची उदाहरणं अनेक आहेत. वि. वा. शिरवाडकरांचं गाजलेलं ‘नटसम्राट’ घ्या! त्यातही आप्पासाहेब बेलवलकर आणि त्यांची मुलं यांच्यात एक संघर्ष आहेच की! तो संघर्ष जसा बाप आणि मुलांचा आहे, तसाच तो जुन्या-नव्याचाही आहे. किंवा वसंत कानेटकर यांचं ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ घ्या! शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमधील बाप-लेक यांच्यातील संघर्षांमुळे या नाटकाला वेगळीच दिशा आणि डूब मिळते. नेमकी हीच धारा पकडून गेल्या एक-दोन वर्षांमध्ये मराठी रंगभूमीवर नेमकी या नातेसंबंधांवर भाष्य करणारी काही नाटकं आली. यातील काही नाटकांनी व्यावसायिकदृष्टय़ा उत्तम कामगिरी केली, तर काहींचे विषय वेगळे असूनही त्यांना व्यावसायिक यश म्हणता येईल अशी कामगिरी करता आली नाही.
सध्या जोरदार चाललेलं मराठीतील एक नाटक म्हणजे, ‘गोष्ट तशी गमतीची’! मिहीर राजदा यांनी लिहिलेल्या ‘रिश्ता वही, सोच नई’ या एकांकिकेत काही योग्य प्रसंग जोडून दोन अंकी केलेलं हे नाटक वडील आणि मुलगा या दोघांच्या नातेसंबंधांवर भाष्य करतं. पण ते तेवढय़ावरच थांबत नाही. तर ‘काल’मध्ये गुंतून राहणारे वडील आणि ‘उद्या’कडे डोळे लावून असलेला मुलगा यांच्या या संघर्षांत नकळत भरडली जाणारी आई, हा गुंताही या नाटकात अत्यंत गमतीने मांडला आहे. खुसखुशीत संवाद, अद्वैत दादरकर यांचं दिग्दर्शन आणि मंगेश कदम, लीना भागवत व शशांक केतकर या तिघांच्या अभिनय या गोष्टींमुळे नाटक खूप छानच लक्षात राहतं. कोणताही संदेश वगैरे देण्याचा भानगडीत न पडता, हे नाटक लोकांना हसवत हसवत प्रेक्षकांत बसलेल्या बाप-लेकांना अंतर्मुख करतं, हे नक्की!
नव्यानेच रंगभूमीवर आलेलं, नातेसंबंधांवरच बेतलेलं नाटक म्हणजे ‘समुद्र’! मिलिंद बोकील यांच्या ‘समुद्र’ या कादंबरीचं नाटय़ रूपांतर चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. या नाटकात दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका, ही दुहेरी जबाबदारीही त्यांनीच पेलली आहे. या नाटकातही पती-पत्नी यांच्या नातेसंबंधात आलेला तणाव, पत्नीचा मित्र असणं, या गोष्टींमुळे निर्माण झालेला संघर्ष अधोरेखित केला आहे. पती-पत्नी या नातेसंबंधांमधील संघर्ष याआधीही अनेक नाटकांमध्ये आला असला, तरी ‘समुद्र’ त्यावर वेगळेपणाने आणि प्रभावीपणे भाष्य करतं.
पती-पत्नी यांच्यातील नातेसंबंधांवर आधारलेलं आणखी एक सध्याचं आलेलं नाटक म्हणजे ‘त्या तिघांची गोष्ट’! ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेल्या या नाटकात केवळ पती-पत्नीच नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन घटस्फोटित दाम्पत्याचे अपत्य, त्या अपत्याचं आपल्याला सांभाळणाऱ्या पालकाशी आणि लांब असलेल्या पालकाशी असलेलं नातं, आदी अनेक नातेसंबंधांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. डॉ. नाडकर्णी स्वत: मानसोपचारतज्ज्ञ असल्याने मानवी मनाचे विविध कंगोरे, पात्रांची नेमकी मानसिक अवस्था यांचं अचूक चित्रण ते करतात. त्यामुळे हे नाटक प्रभावीपणे नातेसंबंधांवर भाष्य करतं.
घरातली कर्ती स्त्री म्हणजेच अर्थात आई! भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीसमान मानत असले, तरी या पुरुषप्रधान संस्कृतीत कुटुंबातील तिची भूमिका नेहमीच दुय्यम राहिली आहे. मात्र काळानुरूप समाजात आणि समाजाचा आरसा असलेल्या नाटकांतही ही प्रतिमा बदलत चालल्याचं चित्र दिसतं. त्यामुळे नाटकांमध्येही आता आई आणि मुले यांच्या नातेसंबंधांवर भाष्य होत असलेलं आढळतं. या नात्यावर बेतलेलं ‘आई रिटायर्ड होतेय’ हे नाटक चांगलंच गाजलं होतं. आता ‘आई तुला मी कुठे ठेवू’, ‘मदर्स डे’, ‘छापा-काटा’ या नाटकांमध्येही आई आणि मुलं यांच्यातील नातेसंबंध, वयोमानानुसार त्या नातसंबंधांत आलेले ताणतणाव, त्यांच्याशी झुंजत नातेसंबंध छान ठेवण्याचा प्रयत्न करणारी माणसं यांचं चित्रण आढळतं.
नातेसंबंधांवर आधारित नाटकांमध्ये वाढ होण्यात हल्लीच्या तंत्रक्रांतीचाही मोठा वाटा आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी संपर्क साधनं जवळ असूनही नात्यानात्यांमधील ओलावा कमी होऊन त्याची जागा काही प्रमाणात दुरावा घेत आहे, असं म्हटलं जातं. दोन पिढय़ांमधील विचारांची आणि काही प्रमाणात आचारांची दरी, हा तर नाटकातील खूपच आवडता विषय! गेल्या काही महिन्यांत आलेल्या नाटकांत ही दरी विनोदी, गंभीर अशा दोन्ही पद्धतींनी अधोरेखित करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नाटककार अशोक पाटोळे यांच्या मते कित्येक वर्षांत रंगभूमीवर नातेसंबंधांवर आधारित नाटके नव्हती. काही वर्ष मराठी रंगभूमी विनोदी नाटकांनी काबीज केली होती. कौटुंबिक समस्यांकडे किंवा संबंधांकडे लक्ष वेधणारं नाटक लिहावं, अशी कल्पना पुरुषोत्तम बेर्डे यांनी मांडल्यावर आपण कामाला लागलो, असे पाटोळे सांगतात. सध्या उत्तम विनोदी नाटक लिहावं, असा विषय नाही. त्याचबरोबर आजकाल सगळं कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल, अशी नाटकं लिहिण्याकडे आमचा कल आहे. त्यातूनच मग कौटुंबिक नाटकांची लाट येत आहे. अशा नाटकांमध्ये नातेसंबंध अनिवार्यच नाही, तर आवश्यक असतात, असे पाटोळे म्हणतात. ‘आई तुला मी कुठे ठेवू’ या नाटकातही आपण नेमकी हीच गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले.
तर ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा दिग्दर्शक अद्वैत दादरकर याच्या मते नातेसंबंधांमध्ये येणारी पिढय़ांची दरी हा सार्वकालीन विषय आहे. ही समस्या घराघरांत भेडसावत असते. वडील-मुलगा यांच्यात होणारे वाद गंभीरच असतात. मात्र त्रयस्थ नजरेनं या वादांकडे पाहिल्यास त्यातील ह्युमर कोणालाही लक्षात येऊ शकतो. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकात आपण नेमक्या याच पद्धतीने या जनरेशन गॅपकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाची मांडणी करताना हे नाटक न वाटता एखाद्या घरात घडणारा प्रसंग वाटायला हवा, याकडे आपला कल होता, असेही अद्वैतने सांगितले. कदाचित या जनरेशन गॅपकडे इतर नाटककार आणि दिग्दर्शक वेगळ्या नजरेनं पाहतील, असंही अद्वैत म्हणाला.
नातेसंबंध आणि त्यातील तणाव, हा जीवनातील एक अपरिहार्य भाग आहे. त्यामुळे या नातेसंबंधांचं चित्रण नाटकांमध्ये नेहमीच होत आलं आहे आणि यापुढेही ते होणारच आहे.
रोहन टिल्लू