मराठी सिनेमाच्या निर्मितीनंतर श्रेयस तळपदे वळला मालिकेच्या निर्मितीकडे. स्टार प्रवाहच्या ‘तुमचं आमचं सेम असतं’ या नव्या मालिकेची निर्मिती करत एक हलकीफुलकी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. अनेक नावाजलेल्या मंडळींचा मालिकेत सहभाग आहे.
डेली सोपच्या कारस्थान, ताणतणावाच्या भाऊगर्दीत एखादी हलकीफुलकी मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी आवश्यक असा ब्रेक ठरते. कारण, रोजच्या मालिकांमधला सास-बहू ड्रामा, कुरघोडी, खलनायिका अशा सगळ्या मसालेदार गोष्टींना प्रेक्षक कुठे तरी कंटाळत असतो. त्याचा कंटाळा दूर करण्यासाठी रिअॅलिटी शो सज्ज असतातच. या रिअॅलिटी शोच्या जोडीला काही प्रमाणात मालिकाही तयार होताहेत. त्यात भर पडतेय स्टार प्रवाहच्या ‘तुमचं आमचं सेम असतं’ या नव्या मालिकेची. मराठी-हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीत नाव कमवलेल्या श्रेयस तळपदे या अभिनेत्याची ही कलाकृती. ‘पोश्टर बॉइज’ या मराठी सिनेमाची निर्मिती केल्यानंतर श्रेयस वळलाय ते मालिका निर्मितीकडे. ‘तुमचं आमचं सेम असतं’ ही त्याची निर्माता म्हणून पहिली मालिका. आतापर्यंत मालिकांमध्ये अभिनेता म्हणून बघितलं आहे. पण, संपूर्ण मालिकेची धुरा आता त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं; तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’.. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांची ही लोकप्रिय कविता. या कवितेला वय, काळ असं काहीच नाही. कारण त्यात मांडलेली भावना ही प्रेमाविषयी. प्रेम हे प्रेम असतं. काळानुरूप, व्यक्तिपरत्वे त्याचं स्वरूप काहीसं बदलत जातं. त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलतात, व्यक्त होण्याची पद्धत बदलते. पण, भावना मात्र तीच आणि तशीच असते. हेच नेमकं सांगण्याचा प्रयत्न ‘तुमचं आमचं सेम असतं’ ही मालिका करणार आहे. निर्माता श्रेयस याबाबत सांगतो, ‘एक वाक्य नेहमी म्हटलं जातं, ‘मला सगळ्या प्रेमकहाण्या आवडतात. पण, माझी प्रेमकथा ही माझी सगळ्यात आवडती आहे’. प्रेमकथा न आवडणारे काही अपवादानेच आढळतील. मालिकेचा विषय प्रेमकथा हाच आहे. पण, प्रामुख्याने आजच्या पिढीचे विचार यात दाखवले जातील. मुलं काही वेगळं करू पाहताहेत. नोकरीव्यतिरिक्त काही तरी करण्याच्या प्रयत्नात असतात. तर मुली त्यांच्या भविष्याचं व्यवस्थित नियोजन करतात. मुलगा बघताना तो सेटल्ड आहे की नाही, त्याची आर्थिक स्थिती या सगळ्याचा त्या विचार करतात. असे भिन्न दृष्टिकोन असलेल्या दोन प्रवृत्ती प्रेमात पडल्यावर काय होतं, याभोवती मालिकेची कथा फिरते. ‘प्रेमात लॉजिक नाही मॅजिक चालतं. छोटय़ा छोटय़ा क्षणांनी आपलं जग सजत असतं, कारण तुमचं आमचं सेम असतं’, अशी आमच्या मालिकेची टॅगलाइनच आहे.’
या मालिकेचं वैशिष्टय़ म्हणजे मालिकेची संपूर्ण टीम. मालिकेसाठी नावाजलेली मंडळी काम करत आहेत. मालिकेचं दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी करत असून त्याची कथा प्रतिमा, श्रेयस तळपदे आणि मनस्विनी लता रवींद्र यांची आहे. प्रतिमा कुलकर्णी यांच्यासोबत सिद्धार्थ साळवी, योगेश गायकवाड, समीर गरुड यांनी मालिकेची पटकथा लिहिली आहे. मालिकेचे संवाद शर्वरी पाटणकर यांनी लिहिले आहेत. मालिका विभागातील संकलन क्षेत्रातल्या नामवंत भक्ती मायाळू या मालिकेचं संकलन करताहेत. तर महेश आणे हे सिनेमाटोग्राफीमधलं एक महत्त्वाचं नाव. ते या मालिकेसाठी छायांकन करत आहेत. कविता लाड, आनंद इंगळे, मंगल केंकरे, स्वाती चिटणीस, प्रमोद पवार, पुष्कर श्रोत्री या अनुभवी कलाकारांसह नवोदित कलाकारांची फळीही यामध्ये दिसणार आहे. स्तवन शिंदे आणि अमृता देशमुख हे दोघे मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत आशीष जोशी, सोनम पवार, अभिषेक कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, तन्वी संगवई , गौरव मोरे हे तरुण कलाकार आहेत. मालिका तजेलदार दिसावी म्हणून नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याचं श्रेयस सांगतो. ‘लोकप्रिय कलाकारांची विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. तसंच त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे त्यांच्याबद्दलचं विशिष्ट मतंही झालेलं असतं. नवोदित कलाकारांच्या बाबतीत मात्र असं होत नाही. त्यांना कसलीच पाश्र्वभूमी नसते. त्यांची कोणत्याही प्रकारची प्रतिमाही तयार झालेली नसते. त्यामुळे या मालिकेतही नव्या चेहऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आलं आहे’, श्रेयस त्याबाबतचं स्पष्टीकरण देतो.
मालिकेचा यूएसपी म्हणजे प्रतिमा कुलकर्णी यांचं दिग्दर्शन. ‘प्रपंच’, ‘पिंपळपान’, ‘झोका’, ‘४०५ आनंदवन’, ‘अंकुर’, ‘कुंकू’, ‘लाइफलाइन टू’ अशा मालिकांचं दर्जेदार दिग्दर्शन केल्यानंतर काही काळ प्रतिमा कुलकर्णी मालिकांपासून लांब होत्या. काही गोष्टी त्यांना पटत नसल्यामुळे मालिकांकडे त्या वळत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण, आता ‘तुमचं आमचं..’च्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा मालिकेकडे वळल्या आहेत. प्रतिमा यांच्या चाहत्यांना या खुशखबरीने दिलासा मिळेल यात शंका नाही. त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल श्रेयस सांगतो, ‘प्रतिमाताईंच्या दिग्दर्शनाचा दर्जा आजही प्रेक्षकांना हवाहवासा वाटणारा आहे. त्यांच्या सगळ्याच मालिका प्रेक्षकांना आजही आठवतात. ताईंची दिग्दर्शनाची पद्धत तेव्हा वेगळी होती. आताच्या मालिका-दिग्दर्शनात थोडा बदल झाला आहे. पण, आम्ही जुन्या-नव्याची सांगड घालत या मालिकेसाठी सुवर्णमध्य गाठला आहे. ताईंनाही तो पटला म्हणूनच त्या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. प्रतिमाताईंचं कौशल्य आणि आजचं तंत्रज्ञान यांचा मेळ घालत मालिका दर्जेदार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
‘आभाळमाया’, ‘दामिनी’, ‘बेधुंद मनाच्या लहरी’, ‘अवंतिका’, ‘अमानत’, ‘वो’ या मालिकांमधून श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीस आला. श्रेयसच्या करिअरची सुरुवातही मालिकांमधूनच झाली. त्यामुळे मालिका हे माध्यम त्यांच्या जवळचं आहे. निर्मितीसह मालिकेत तो अभिनेता म्हणून दिसणार का याबाबत त्याने गुप्तता पाळली आहे. ‘मालिकेत मी अभिनेता म्हणून काम करेन की नाही हे एक गुपित आहे. याबाबत मला आता काही सांगता येणार नाही. पण, होम प्रॉडक्शन असल्यामुळे त्यात काही ना काही तरी करायला मला आवडेलच. पण, गोष्ट जशी पुढे सरकेल तसे एकेक पत्ते उलगडत जातील. आता मात्र याबाबत ठाम असं काही सांगता येणार नाही,’ असं तो सांगतो. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे तो मालिकेत पाहुणा कलाकार म्हणून एखाद्या भूमिकेत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक मालिकेचा टार्गेट ऑडिअन्स असतो. या मालिकेचा बाज बघता तरुण प्रेक्षकांना आकर्षित करणारी ही मालिका आहे असं म्हणता येईल. पण, केवळ तरुण प्रेक्षक नाही तर कुटुंबही आमचा प्रेक्षकवर्ग असल्याचं श्रेयस सांगतो. ‘आधीच्या पिढीचे लोक मूल्यांना, संस्कृतीला किती जपत होते आणि आताची पिढी किती जपतेय याची सांगड या मालिकेत घातली गेली आहे. संपूर्ण कुटुंब आणि तरुणाई या दोघांनी एकत्र बसून बघावी अशी ही मालिका आहे,’ तो सांगतो. ‘तुमचं आमचं..’ या मालिकेची टीम बघता सध्या सुरू असलेल्या मालिकांपेक्षा ही मालिका वेगळी ठरेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
हिंदी ‘पोश्टर बॉइज’मध्ये श्रेयस?
‘पोश्टर बॉइज’ हा श्रेयसची निर्मिती असलेला मराठी सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. समतोल साधत एका नाजूक विषयाची हाताळणी योग्य प्रकारे केल्यामुळे सिनेमा यशस्वी ठरला. या सिनेमाची वाहवा थेट बॉलीवूडपर्यंत झाली. अक्षयकुमार दक्षिण कलाकार राणा डगुबत्ती या लोकप्रिय कलाकाराला घेऊन तेलुगू भाषेत ‘पोश्टर बॉइज’ करणार आहे. त्याबाबत श्रेयस सांगतो, ‘आम्ही ‘पोश्टर बॉइज’ सिनेमाचे तेलुगू सिनेमासाठीचे हक्क अक्षय कुमारला दिले आहेत. या सिनेमाचं काम सप्टेंबरपासून सुरू होईल. एरव्ही दाक्षिणात्य सिनेमांचे आपल्याकडे रिमेक होतात. पण, एखादा मराठी सिनेमा दुसऱ्या प्रादेशिक भाषेत येतो तेव्हा अभिमान वाटतो. मल्याळी भाषेतलेही हक्क आम्ही विकले आहेत. याही भाषेत तो सिनेमा येणार आहे. तमिळ, बंगाली याही भाषांच्या ऑफर्स होत्या पण, हिंदीत आम्ही स्वत:च त्याचा रिमेक करत असल्यामुळे ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. हिंदीत हा सिनेमा पुढच्या वर्षी येईल. महिन्याभरात या सिनेमाची घोषणा होईल.’ हिंदीतल्या ‘पोश्टर बॉइज’मध्ये श्रेयस स्वत: काम करणार की नाही याबाबत त्याने गुप्तता पाळली आहे. दोन-तीन गोष्टींमध्ये तो सक्रिय असल्याचं मात्र त्याने कबूल केलं.
चैताली जोशी