आवडते नायक-नायिका, कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद मालिका बघायला ही कारणं पुरेशी असतात. यामुळे मालिका लोकप्रियही होते. पण, सध्या काही मालिकांमध्ये अनावश्यक ट्रॅक दाखवत असल्यामुळे ‘पुरे झालं ते दळण’ असं प्रेक्षक म्हणू लागलेत.
एखादी मालिका सुरू होण्यापूर्वी त्यातलं ‘वेगळपण’ सतत प्रेक्षकांच्या नजरेस आणून दिलं जातं. ती मालिका बघण्यासाठी तिचं दणक्यात प्रमोशनही केलं जातं. मग प्रमोशनसाठीचं विशेष गाणं, आकर्षक प्रोमोज, चॅनलच्या एखाद्या सोहळ्यात मालिकेच्या नायक-नायिकांचा परफॉर्मन्स असं सारं काही दाखवलं जातं. असा गाजावाजा करत नवी मालिका सुरू होते. नव्याची नवलाई म्हणत प्रेक्षकही त्या मालिकेचा आनंद घेतात. काही महिने झाले की ती नवी मालिकाही वेगवेगळे रंग दाखवायला सुरुवात करते. अर्थात, भरकटते. कारण, टीआरपीचा खेळ. अमुक एका ट्रॅकला टीआरपी नाही, त्या ट्रॅक वास्तवदर्शी वाटत नाही, त्याला प्रतिसाद मिळत नाही अशी एक ना अनेक कारणं देऊन मालिकेची मूळ कथा गुंडाळून ठेवतात. मग नवनव्या व्यक्तिरेखा आणून मालिकेचं नवं दळणं दळलं जातं. सध्या मराठी मालिकांमध्ये हे दळणं सुरू आहे. अशा मालिकांना टीआरपी मिळत असला तरी प्रेक्षकांमध्ये मात्र काहीसा नाराजीचा सूर आहे. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘पुढचं पाऊल’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ अशा काही मालिका सध्या भरकटल्या आहेत, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांमध्ये उमटत आहेत.
मालिकेचं आयुष्य किती असावं, असा प्रश्न विचारला तर त्यावर असं उत्तर मिळेल की, ‘टीआरपी आहे तोवर’ किंवा ‘जितना चलता है उतना चलने दो’. पण, यामुळे मालिकेची लोकप्रियता कमी होऊन प्रेक्षक मालिकेपासून तुटतो हे दुर्लक्षित केलं जातंय. याचं ताजं उदाहरण म्हणजे, ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ ही मालिका. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. पण, मुख्य व्यक्तिरेखा, जान्हवीच्या स्मृतिभ्रंशाचा ट्रॅक पाच महिने खेचला गेला. या दरम्यान मालिकेचा टीआरपीही थोडा घसरला. एखादी गोष्ट मालिकेत अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात खेचली गेली की प्रेक्षक त्यावर परखड मत व्यक्त करतात. ‘मालिकेत एकच ट्रॅक खेचत राहिले तर कालांतराने तो कंटाळवाणा वाटू लागतो. ‘होणार सून..’ंमध्येही अनेक वेगळ्या गोष्टी दाखवता आल्या असत्या. पण, जान्हवीचा स्मृतिभ्रंश खूप महिने रेंगाळला. हा ट्रॅक दाखवायला ना नाही. पण, त्याचा काळ खूप वाटला’, असं अक्षदा केळकर ही प्रेक्षक आपलं मत नोंदवते. यावर मालिकेची लेखिका मधुगंधा कुलकर्णी या सांगतात की, ‘होणार सून..’ची गोष्ट जशी ठरवली होती त्याचप्रमाणे सुरू आहे. स्मृतिभ्रंशचा ट्रॅक आणू या हा माझा विचार होता. तसंच त्यावर निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला होता. या ट्रॅकदरम्यान मालिकेचा टीआरपी कमी झाला हे खरं. पण, तो कमी झाला म्हणून आम्ही ट्रॅक बदलला नाही. मालिकेत कोणत्या वेळी कोणता टप्पा येणार आहे हे आधीच ठरलंय. त्यानुसारच मालिका सुरू आहे.’
सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत
मधुगंधा कुलकर्णी
इतर माध्यमांप्रमाणे टीव्हीच्या त्याच्या आशयाबाबत काही मर्यादा आहेत. ठरावीक गोष्टीनंतर गोष्टींची पुनरावृत्ती होते. सिनेमा, नाटकासारखी त्यात विविधता आणता येत नाही. मालिका ताणली जाते यासाठी कोणी एक दोषी नाही. यासाठी प्रेक्षक, लेखक, चॅनल, निर्माते अशा सगळ्यांचे प्रयत्न त्यामध्ये दिसले पाहिजेत.
व्यवसायाभिमुख माध्यमाची गरज
शिरीष लाटकर
पटकथेत अचानक होणाऱ्या बदलांना चॅनलकडून येणारं दडपण कारणीभूत नाही, तर माध्यमाची अपरिहार्यता कारणीभूत आहे. टीव्ही हे व्यवसायाभिमुख माध्यम असल्यामुळे असे बदल करणं आवश्यक असतं. टीआरपीसाठी केलेले प्रयत्न हे सगळ्यांचे मिळून असतात. मी या साऱ्याकडे सकारात्मकदृष्टय़ा बघतो.
सध्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतल्या चित्रापुराणालाही प्रेक्षक कंटाळले आहेत. दिवाळीच्या आधीपासून आलेली ही व्यक्तिरेखा देसाई वाडीचा महत्त्वाचा प्रश्न बनली आहे. मेघना-आदित्य यांची केमिस्ट्री, प्रेमकहाणी बघण्यासाठी उत्सुक असलेले प्रेक्षक आता एखादा एपिसोड चुकला तर हळहळ व्यक्त करत नाही. गरजेपुरतं नव्या व्यक्तिरेखा आणण्यासाठी हरकत नाही पण, ते गरजेपुरतंच असावं. ती गरज मात्र वाढवू नये असंही प्रेक्षकांचं म्हणणं आहे. टीआरपीच्या आकडेमोडीवर टीव्ही माध्यमात सारा खेळ चालतो. एखाद्या मालिकेतला ट्रॅक लांबवायचा की कमी करायचा हे टीआरपीच्या मोजपट्टीवर आधारित असतं. याबाबत लेखक शिरीष लाटकर सांगतात, ‘गुरुवारी येणारा टीआरपीचा चार्ट म्हणजे आमच्यासाठी ‘प्रगतिपुस्तक.’ टीव्ही हे व्यवसायाभिमुख माध्यम आहे. टीआरपीसाठी केलेले प्रयत्न हे सगळ्यांचे मिळून असतात. मी या साऱ्याकडे सकारात्मकदृष्टय़ा बघतो. चॅनल, निर्माता, लेखक यांच्यात मतभेद असतात. पण, ते मालिकांच्या हितासाठीच असतात. अशा वेगवेगळ्या संकल्पनांकडे प्रयोग म्हणून बघितलं पाहिजे. मी या क्षेत्रात आलो तेव्हा टीआरपीच्या चक्रानुसार काम करायचंय याची मानसिक तयारी केली होती. टीआरपीसाठी मालिकांमध्ये वेगवेगळे बदल होतात. पण, या बदलांमुळे टीआरपीवर चांगलाच परिणाम झाला आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवलाच पाहिजे.’
‘पुढचं पाऊल’ ही मालिका वर्षांनुर्वष सुरू आहे. यातले कलाकार, कथा, संवाद, व्यक्तिरेखा या सगळ्यामुळे मालिका लोकप्रिय आहेच. पण, कथेला शेवट नाही अशी प्रेक्षकांमधून प्रतिक्रिया उमटतेय. ठरावीक एपिसोडनंतर नव्या व्यक्तिरेखेची एंट्री-एक्झिट हा प्रकार मालिकेत सतत बघायला मिळतो. त्यामुळे काही प्रेक्षकांनी स्वत:हून मालिका बघणं थांबवलं. रेवती जोग या प्रेक्षकाचं असं म्हणणं आहे, ‘मालिकेची मूळ कथा सोडून त्यात नवनव्या प्रयोगांसाठी होणारे बदल काहीवेळा अनावश्यक वाटतात. अशावेळी मालिका भरकटते आणि मालिकेची लिंक तुटत जाते. म्हणूनच मी ‘पुढचं पाऊल’, ‘देवयानी’ या मालिका बघायचं थांबवलं.’ मधुगंधा याबाबत सांगतात, ‘प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा असतात. टीव्हीची मर्यादा आहे त्याचा आशय. ठरावीक गोष्टीनंतर त्याच त्या गोष्टी दाखवल्या जातात. सिनेमा, नाटकासारखी त्यात विविधता आणता येत नाही, तसंच प्रत्येक माध्यमाची मागणी वेगवेगळी असते. मालिका खेचली जाते, ताणली जाते यासाठी कोणा एकाला दोष देऊन चालणार नाही. वेगळे विषयांना प्रेक्षकांनी पसंती दिली पाहिजे. ही पसंती टीआरपीमध्ये रूपांतरित झाली पाहिजे. मगच चॅनल असा वेगवेगळ्या मालिका आणण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारे हे चक्र सुरू होईल. परदेशी मालिकांप्रमाणे आपल्याकडच्या मालिकांमध्ये विषय येत नाहीत. आपल्याकडच्या कथा नवरा-बायको, सून, नायिकेचं लग्न झालं की सासरी तिला येणाऱ्या अडचणी यांभोवतीच फिरतात. मालिकांसाठी लेखन करायचंय हे ठरवल्यानंतर या माध्यमात टीआरपीचा खेळ असतो, इथे मर्यादा आहेत अशा अनेक गोष्टी मी आधीच स्वीकारल्या होत्या. यात बदल घडायला हवा. तो नक्कीच घडेल.’
कंटाळा येईपर्यंत ताणू नये
रेवती जोग
मालिका खेचल्यावर प्रेक्षकाला ती कंटाळवाणी वाटू लागते. यामुळे मराठी मालिकाही आता हिंदीकडे वळू लागल्यात असं वाटतं. अशावेळी मालिकांचे एपिसोड्स चुकल्याचं वाईट वाटत नाही. आताच्या मालिकांमध्ये गोष्ट हा प्रकार राहीलाच नाही. ‘आभाळमाया’, ‘अवंतिका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकांच्या यशामागे हीच महत्त्वाची गोष्ट होती. ‘जुळून येती रेशीमगाठी’मध्ये मूळ कथा बाजूलाच राहिली आहे आणि चित्रा या व्यक्तिरेखेच्या ट्रॅकला अवाजवी महत्त्व दिलं जातंय. ‘होणार सून..’मध्येही जान्हवीच्या स्मृतिभ्रंशाचा ट्रॅक खूप ताणला. मालिकेच्या विषयाचा जीव आहे तितकीच ती दाखवायला हवी.
अनावश्यक गोष्टी टाळाव्यात
अक्षदा केळकर
मध्यंतरी ठरावीक भागांची मालिका दाखवल्या जात होत्या. आता मात्र अशा मालिका दिसत नाहीत. ‘पुढचं पाऊल’, ‘देवयानी’ या मालिका मी कालांतराने बघणं सोडून दिलं. आपल्या आयुष्यात इतके ट्विस्ट आणि टर्न्स येत नसतात. मालिकांमध्ये मात्र ते दाखवलं जातं. ‘जुळून.’ची मूळ कथा लहान आहे. दोघांची मनं जुळली. पुढे काय दाखवणार ही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात असतानाच चित्रापुराण सुरू झालं. ‘होणार सून..’ंमध्येही अनेक वेगळ्या गोष्टी दाखवता आल्या असत्या पण, स्मृतिभ्रंश या ट्रॅकने खूप महिने घेतले. अनावश्यक गोष्टींमुळे काहीवेळा लोकप्रिय मालिका आवडेनाशी होते. ‘गंध फुलांचा.’च्या कथेचाही जीव खरंतर संपला. नायक-नायिकांच्या मुली आणि त्यांची कथा दाखवतायत. उगाचच वाढावयाची म्हणून वाढवू नका.
मालिका म्हणजे ‘डेली’ काम. मालिकांच्या एपिसोड्सची पूर्वीसारखी बँक नसते. यात काही अपवादांमध्ये ‘होणार सून..’चा समावेश आहे. या मालिकेचं लेखन करताना ठरावीक एपिसोड्सची बँक केली जाते, असं मधुगंधा सांगतात. ‘माझी १५ ते २० एपिसोड्सची बँक असते. चॅनल, निर्माते आणि मी आमचं त्याबाबत चांगलं टय़ुनिंग जमून आलंय’, असं मधुगंधा सांगतात. कलाकारांची अनुपस्थिती, टीआरपीमुळे कमी वेळात पटकथा बदलणं अशा काही गोष्टींमुळे लेखकाची जबाबदारी वाढते. ‘अचानक पटकथेत बदल करावे लागतात. मी एकदा मध्यरात्री उठून पटकथेत बदल केले आहेत. पण, याला चॅनलकडून येणारं दडपण नाही. तर माध्यमाची अपरिहार्यता कारणीभूत आहे. टीव्ही हे व्यवसायाभिमुख माध्यम असल्यामुळे असे बदल करणं आवश्यक असतं’, असं शिरीष सांगतात.
‘जावई विकत घेणे आहे’ या मालिकेतही मध्यंतरी प्रांजलची बहीण आणि तिचा नवरा या व्यक्तिरेखांवर ट्रॅक आखला होता. तो वाढवल्यामुळे मालिकेचा वेग काहीसा मंदावला होता. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’मध्येही आरव आणि ईश्वरीच्या दुराव्याचा ट्रॅक लांबवला. त्यामध्येच आलेल्या नवनव्या पात्रांना वाव तसा मालिकेसाठी कमी होता. पण, तरी नव्या पात्रांची ओळख झाली. पुढे त्यांचे ट्रॅक येतील यात शंका नाही. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेत मुख्य नायक-नायिका मरण पावले आहेत. त्यांच्या मुली आणि त्यांच्या कथा असा ट्रॅक मालिकेत सध्या सुरू आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल, भरकटेल असं वाटतंय. टीआरपी मिळतोय म्हणून मालिकांची शेपूट वाढता वाढता वाढे अशी करण्यापेक्षा मालिकेच्या कथेचा जेवढा जीव आहे तेवढीच खेचावी. टीआरपीची गणितं असली तरी समतोल साधून मालिका रंगवली तर त्या मालिका प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ घर करून असतील.