लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशी आपल्याकडची समजूत आहे. कारण कोण, कधी, कुठे आणि कसं भेटेल आणि कायमची जन्मगाठ बांधेल याचा नेम नसतो.

पृथ्वी केव्हा जन्माला आली याबद्दल खूपच मतमतांतरे आहेत. या पृथ्वीवर मानवाचे जन्ममरणाचे अखंड चक्र तेव्हापासून चालू आहे. यातील मानवाचा जन्म होण्याकरिता स्त्री व पुरुषांचे मीलन अत्यावश्यक असते. या मीलनाला विविध राष्ट्रांत, विविध समाजांत विविध शब्दांनी संबोधिले जाते. काही समाजांत व देशांत लग्नव्यवस्थेला ‘कॉन्ट्रॅक्ट’ पद्धती असे मानले जाते. काही समाजांत विवाहाला विवक्षित धर्माचा आधार व कमीजास्त बंधने व जबाबदाऱ्या असतात. आफ्रिका, अमेरिकेतील अ‍ॅमेझॉनचा जंगल विभाग, आपल्या देशातील विविध वन विभागांतील छोटय़ा छोटय़ा टोळ्यांच्या समूहात लग्न ही अगदी साधीसोपी गोष्ट असे समजून व्यवहार होत असतो.

Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
shani surya gochar 2024 saturn Vakri and sun transit in vrishchik
सूर्य आणि शनि बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार, विलासी जीवनासह मिळेल अपार पैसा
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
some shubh muhurat for wedding in November and December this year
दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास

आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्राचा विचार करता एक काळ लग्न जमविणे, होणे यांचे अनेक ठोकळेबाज नियम होते व अजूनही बहुसंख्य सुशिक्षित समाज हे रीतिरिवाज पाळताना दिसतो. साप्ताहिक ‘लोकप्रभा‘च्या रसिक वाचकांकरिता त्याबद्दलचे पुढील चार अनुभव मी सांगत आहे.

माझे वडील वैद्य यशवंत हरी वैद्य खडीवाले यांचा जन्म मालेगाव, जि. नाशिक येथे १८९६ साली झाला. माझे वडील गोरेपान, सहा फूट उंच, सुंदर चेहऱ्याचे व उत्तम शारीरिक आरोग्य असणारे होते. वयाच्या १६-१८व्या वर्षी ते नाटकात स्त्री भूमिकाही करत असत. त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्या आईने आपल्या आसपासच्या व नात्यातल्या मंडळींना असे सांगितले की ‘माझ्या यशवंताकरिता जी पहिली मुलगी सांगून येईल, ती मी लगेच सून म्हणून स्वीकारेन.’ त्या काळात लोकसंख्या कमी होती. मालेगावच्या या बाईंचे बोलणे, माझे आजोबा पाटणकर, यवतमाळ, विदर्भ यांच्या कानावर गेले. आमच्या पाटणकर आजोबांना तीन मुली. मोठी मुलगी कुंटे घराण्यात व मधली मुलगी सावरकर घराण्यात दिली होती. आमच्या आजीचे आपल्या मुलाबद्दलच्या लग्नाबद्दलचे बोलणे ऐकल्याबरोबर पाटणकर आजोबा लगेच मालेगावला आले व त्यांनी आमच्या आजीला मुलीची माहिती दिली. आजीच्या जाहीर केलेल्या सांगाव्याप्रमाणे थोडय़ा दिवसांत माझ्या आई-वडिलांचा विवाह झाला. आमच्या वडिलांच्या तुलनेत आमची आई खूपच बुटकी, कृश व फारशी गोरी नव्हती. तरीपण दोघांचा पाच मुलांचा संसार सुखाचा झाला. लग्नाच्या अगोदर नवरा मुलगा-मुलगी दोघांनी एकमेकांना पाहिले नव्हते, हे सांगावयास नकोच.

मी १९५१ साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी भारतीय विमान दलात वायुसैनिक म्हणून नोकरीवर रुजू झालो. १९५५ साली माझे वय वर्षे २३ असताना, माझ्या वडिलांचे मला पत्र आले. ‘तुझे लग्न ठरवत आहोत, मुलगी बघितली आहे.’ मला धक्काच बसला. इतक्या लवकर लग्न करायची माझी अजिबात तयारी नव्हती. कारण त्या काळी वेतन अत्यंत तोकडे होते. साहजिकच मी पत्राचे उत्तरच दिले नाही. काही दिवसांनी माझ्या कमांडरच्या पत्त्यावर लग्नपत्रिका व कमांडरकरिता एक पत्र आले. ‘माझ्या मुलाचे मी लग्न ठरविले आहे. त्याला रजेवर पाठवा, ही विनंती.’ माझा नाइलाज झाला. लहाणपणापासून मी माझ्या वडिलांचा आज्ञाधारक पुत्र म्हणून वागत आलो होतो. त्यामुळे वडिलांना खात्री होती की आपला मुलगा आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही. असो. मी पुण्याला आलो; तीन दिवसांनी लग्न तिथी होती. २४ जून १९५५. वडिलांनी विचारले, ‘मुलगी बघायची का?’ मी नकारार्थी उत्तर दिले. पण आमचे सासरे म्हणाले, ‘आम्हाला मुलगा बघायचा आहे.’ मग मुलगा ‘बघण्याचा’ कार्यक्रम झाला. असो. रीतसर लग्न झाले व गेली ५७ वर्षे ‘अरे संसार संसार’ व्यवस्थित चालू आहे.

वरील दोन लग्नकथांपेक्षा पुढील कथा काही विलक्षणच आहे. माझ्याबरोबर भारतीय विमान दलात असणारा कैलास सुंदर येळणे हा माझा सहकारी विदर्भातील एका मागास जमातीतील होता. त्याला शास्त्री नावाच्या एका ब्राह्मण बाईंनी लहानपणापासून वाढवले, शिक्षण दिले. आमच्या या कैलासने भारतीय विमान दलातील शिक्षणकालानंतरच्या; नोकरीतील पहिल्या सुट्टीत त्या वृद्ध मातेसमान स्त्रीला विदर्भातील प्रसिद्ध शेगावची यात्रा घडवून आणावयाची ठरविले. १९५६ साली आम्ही दोघे कानपूरला होतो. तेथून कैलासने नेहमीची दोन महिन्यांची रजा घेतली आणि तो शेगावच्या गजानन मंदिरात आजींना घेऊन गेला. त्या काळात मंदिरात अजिबात गर्दी नसायची. आत गेल्याबरोबर एक वयस्कर गृहस्थ भेटले. नमस्कार-चमत्कार झाला. पुढील संवाद व प्रत्यक्ष गाठभेट मी आता कथा सांगत आहे, यापेक्षा कमी वेळात घडली. ‘आपले नाव काय?’ उत्तर ‘कैलास येळणे’. ‘आपण भावसार क्षत्रिय का?’ उत्तर ‘हो.’ ‘लग्न झाले आहे का?’ ‘नाही.’ ‘लग्न करायचे आहे का?’ ‘हो.’ एक मिनिटांत ते गृहस्थ व मित्र कैलास देवळाच्या मागील बाजूस एका घरात गेले. चार-पाच मिनिटांनी ‘आमच्या वहिनी’ दोन कप चहा घेऊन बाहेर आल्या व चहा देऊन आत गेल्या. त्या गृहस्थांनी विचारले, ‘मुलगी पसंत आहे का?’ कैलास ‘हो’ म्हणाला. मग ‘लग्न केव्हा करायचे?’ ‘माझे वडील जंगल खात्यात खूप दूरवर राहतात. तेथे पोचायला दोन दिवस लागतात. त्यांना मी घेऊन येतो.’ आठ दिवसांनी तो वडिलांना घेऊन आला व कैलासचे शुभमंगल झाले. मला कानपूरच्या कँपमध्ये तडक पत्र आले. ‘मी लग्न केले आहे, माझ्याकरिता कँपचे बाहेर घर बघ.’ मी तर हैराणच झालो. कैलास रजेवर जातो काय व लग्न करून येतो काय, सगळेच अघटित. इथे वस्तुस्थिती अशी होती की भारतीय विमान दलातील नोकरीमुळे व कैलासच्या घरात दुसरे वडिलधारे कोणी नसल्यामुळे त्याचा लग्न जमविण्याचा व खासकरून त्याच्याच जातीतील मुलगी मिळण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे त्याने ताबडतोब हो म्हणून लग्न करून टाकले.

भारतीय विमान दलात बंगलोर येथे मी एकूण आठ वर्षे राहिलो. यातील १९५८-५९ या काळातील गोष्ट आहे, आम्ही काही मित्र कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलो होतो. मित्र परिवारात माझ्याबरोबर कानडी, मल्याळी व हिंदी भाषिक पण होते. गप्पा मारता मारता कानडी मित्र म्हणाला ‘नुकताच आपला कॅन्टीन मॅनेजर वारला, त्याची बायको व एक मुलगी इथेच आहेत. बायकोची समस्या अशी की त्या मुलीचे लग्न कसे करावे? केरळमध्ये मूळ गावी केव्हा जावे? मुलीला फक्त मल्याळम भाषा येते.’ आमच्या कोंडाळ्यापैकी हरियाणामधील एक हिंदी भाषिक उठला व म्हणाला, ‘मी करतो तिच्याशी लग्न!!!’ आम्ही सगळे अवाक् झालो. आमच्यातील मल्याळी व कानडी मित्रांनी उचल खाल्ली. आम्ही सगळे तडक त्या कॅन्टीन मॅनेजरच्या बाईला भेटायला गेलो. मोडक्यातोडक्या हिंदी भाषेच्या माध्यमातून बोलणे झाले. चार दिवसांत रजिस्टर्ड मॅरेज झाले. या वायुसैनिकाला मल्याळम भाषा माहीत नव्हती. व तिला हिंदी येत नव्हती हे सांगावयास नकोच! तो वायुसैनिक विमान दलात अ.ा.र.ड एअर फील्ड सेफ्टी ऑपरेटर म्हणून शिक्षण घेत होता. लगेचच त्याला विशेष ट्रेनिंगकरिता तीन महिन्यांकरिता पुण्याला जायला लागले. मग खरी अडचण आली. त्याची बायको त्याला मल्याळम भाषेत पत्र लिहायची. पुण्यातील त्याचा एखादा मल्याळम सहकारी ते वाचून दाखवाचा. तो आपल्या पत्नीला हिंदी भाषेत पत्र लिहायचा. बंगलोरमध्ये त्याच्या पत्राचे भाषांतर करून कोणी शेजारीण हिंदी व मल्याळम भाषिक त्या नववधूला पत्रातील मजकूर सांगायची.

मी नेहमी माझ्या रुग्ण परिवारातील लहान-थोरांना त्यांचे विविध व्याधींबद्दलचे टेन्शन कमी व्हावे म्हणून या सत्यकथा सांगत असतो. आयुष्यात नेहमी खूप खूप गोष्टी केल्या, करत आहे. पण मला लग्न जमविणे, ही एकच गोष्ट जमलेली नाही
‘देव आकाशात लग्ने जमवतात!
आपण नुसते ‘हो’ म्हणायचे!
शुभमंगल सावधान!’