lp00मराठी, पंजाबी, बंगाली, गुजराती अशा वेगवेगळ्या पद्धतीची लग्नं ही खरंतर आपली सांस्कृतिक श्रीमंती. पण सिनेमा आणि टीव्हीच्या प्रभावामुळे आता लग्नसोहळेही बदलत चालले आहेत. संगीत, मेहंदी, नवऱ्या मुलाचे बूट चोरणं, नवरीला डोलीतून आणणं, डिझायनर लेहेंगा अशा मराठी लग्नपद्धतीत नसणाऱ्या गोष्टींपासून भव्य, ग्लॅमरस लग्नसोहळ्यांपर्यंत अनेक गोष्टी आपण हायजॅक केल्यात. थोडक्यात घरगुती पद्धतीच्या मराठमोळ्या लग्नाचं आता ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’मध्ये रूपांतर झालंय.

‘‘आयुष्यातला महत्त्वाचा दिवस. बॉस.. सेलिब्रेशन तर दणक्यातच झालं पाहिजे.’’
‘‘मला तो टिपिकल शालू नको हां..
डिझायनर लेहेंगा हवा.’’
‘‘मेहंदी, संगीत.. धमाल येणार आहे.’’
‘‘लग्न लागल्यानंतर डीजे तर हवाच..
माझं लग्न आहे यार.. होऊ दे खर्च.
चर्चा तर होणारच.’’
हेसंवाद आहेत लग्नाळू मुला-मुलींचे. अर्थात ज्यांची लग्ने येत्या तीनेक महिन्यांत आहेत, त्यांच्या घरी अशाच संवादांना सध्या जागा आहे. हिवाळ्यासोबत लग्नाचा सीझनही सुरू झाला आहे. ज्यांचे लग्न आहे ते आणि ज्यांच्या जवळच्या व्यक्तींचं लग्न आहे ते असे सगळेच खऱ्या अर्थाने लग्नमय झालेत. आप्तेष्टांना पत्रिका पोहोचली आहे की नाही, त्यांच्या राहण्याची व्यवस्था होतेय की नाही, मुहूर्तापर्यंत सगळ्यांचं आवरून होईल ना, गुरुजींना लागणारं सगळं सामान आणलंय की नाही या विचारांमध्ये आता भर पडली आहे ती लग्नाचा प्रत्येक क्षण आठवणीत कसा राहील या विचाराची. आपलं लग्न खास कसं होईल, सगळ्यांच्या कायम लक्षात कसं राहील, वेगळं कसं होईल याचा सतत विचार केला जातोय. सलग आठवडाभर सुरू असणारी ही लगबग म्हणजे खऱ्या अर्थाने सोहळाच. मराठमोळ्या कुटुंबात लग्न फारतर दोन ते तीन दिवस सुरू असते. पण हा मराठी लग्नसोहळा आता आणखी खेचला जातो. संगीत, मेहंदी, डीजे, गेट-टूगेदर असे सगळे एकामागे एक कार्यक्रम सुरू असतात. शेवटच्या दिवशी दणक्यात लग्न करून हा ‘सोहळा’ पार पडतो. लग्नकार्यामध्ये असे चांगले यंगिस्तानच्या भाषेत हॅपनिंग बदल होऊन मराठी लग्नसोहळ्यांचे ‘इंडियन बिग फॅट वेडिंग’ झाले आहे.
lp02स्वत:चं लग्न ‘खास’ कसं होणार या विचारासाठी मुख्यत्वे मनोरंजन क्षेत्र जबाबदार आहे. हिंदी-मराठी मालिका, सिनेमांमधल्या प्रभाव पाडणाऱ्या गोष्टींमध्ये लग्नसोहळा ही एक महत्त्वाची बाब. अमुक एका सिनेमातल्या नायिकेने तसं केलं तर आपणही तसंच करायला हवं, तमुक सिनेमात लग्नाआधी संगीत, डान्स, धमाल होती, आपल्याही लग्नात ती सगळी धमाल व्हायलाच हवी, अशी स्वप्नं ही लग्नाळू मुलं-मुली बघायला लागतात. मग काय, असं स्पेशल लग्न लावून द्यायला नवऱ्या मुली-मुलाचा मित्रपरिवार सज्ज असतोच. मग ग्रुपमधला संगीतप्रेमी असलेला मित्र संगीत कार्यक्रमांसाठी त्याच्या पोतडीत असलेली गाणी बाहेर काढतो. अर्थातच गाणी बॉलीवूडची आणि अलीकडे मराठी सिनेमा, मालिकांची. इथून सुरुवात होते ती सिने इंडस्ट्री आणि लग्नसोहळे यांच्या नात्यांची. सिनेमा, मालिकांमधल्या अनेक गोष्टी आता मराठमोळ्या लग्नांमध्ये दिसू लागल्या आहेत. हिंदी सिनेमांमधली नवऱ्या मुलीला आणणारी डोली, मेहंदीचा जल्लोषात कार्यक्रम, संगीताची मैफल, नवऱ्या मुलाचे बूट चोरणं असे अनेक प्रकार आता मराठी लग्नांमध्ये बघायला मिळताहेत.

lp08
lp07बॉलीवूडप्रेम लग्नात
खरं तर मला कोर्ट मॅरेजच करायचं होतं, पण नंतर धुमधडाक्यातच लग्न करायचं ठरलं. त्यामुळे थाटामाटात लग्न म्हणजे फिल्मीच झालं पाहिजे, असा मी विचार केला. मी आणि माझी बायको, प्रणाली आमचा प्रेमविवाह. आमची आवडही एक, नृत्य. त्यामुळे सहाजिकच बॉलीवूडप्रेम पूर्वीपासून आमच्या मनात होतं. म्हणून आम्ही आमचं लग्न फिल्मी स्टाइलने करायचं ठरवलं. सुरुवात झाली ती साखरपुडय़ापासून. त्या दिवशी आमच्या मित्रपरिवाराने आमची प्रेमकहाणी वेगवेगळ्या गाण्यांमधून सादर केली. लग्नासाठी प्रणालीला डिझायनर लेहेंगा हवा होता. अनेक सिनेमांमध्ये तिने तो बघितला होता. त्यामुळे तिला तसाच हवा होता. लग्न लागताना प्रणालीची एंट्री डोलीमधून झाली. त्यामुळे आमच्या फिल्मी लग्नातला हा आणखी एक थाट. लग्न लागल्यानंतर दोन मैत्रिणींनी मिळून ‘गोऱ्या गोऱ्या गालावरी’ या गाण्यावर परफॉर्म केलं होतं.
श्रेयस देसाई

हिंदी सिनेमातली लग्ने म्हणजे तर आकर्षण, नवनवीन कल्पना, मनोरंजन. त्यात हिंदी सिनेमांचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. त्यात हा लग्नसोहळा कसा मागे राहील? मराठी लग्नांमध्ये काही गोष्टी पूर्वीपासून होत असल्या तर त्याला ग्लॅमर मिळवून दिलं ते सिने इंडस्ट्रीने. नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यापासून ते मेहंदी, संगीताचे भलेमोठे सोहळे करण्यापर्यंत सगळंच लग्नामध्ये दिसू लागलं. यामध्ये एका सिनेमाला विसरून चालणार नाही. राजश्री प्रॉडक्शनचा ‘हम आपके हैं कौन’ हा सिनेमा. या सिनेमातल्या लग्नातला प्रत्येक क्षण आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. नवऱ्या मुलाचे बूट चोरण्याचं फॅड इथूनच वाढलं असं म्हणता येईल. त्यामुळे आता अनेक लग्नांमध्ये ‘जूते लो पैसे दो’च्या तालावर नाचत नवऱ्यामुलाचे बूट चोरण्याचे प्लान ठरत असतात. मग त्याच्या भोवती जमून पैशांची जोरदार मागणी करायची, त्यात जरा बार्गेनिंग करत दोन पैसे इकडे-तिकडे करून ठरावीक रक्कम खिशात घालायची, लग्नात हमखास दिसणारं हे चित्र. या सिनेमाने लग्नाची संकल्पनाच बदलून टाकली. संगीत कार्यक्रमांचीही फॅशन खऱ्या अर्थाने तिथूनच वाढीस लागली. लग्नसोहळा दाखवण्यात पटाईत असलेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या आणखी एका सिनेमाचा उल्लेख करता येईल. ‘हम साथ साथ हैं’ हा सिनेमा. यात दाखवलेली वरात, नाचगाणी, लग्न लागल्यानंतरचे डान्स परफॉर्मन्सेस असं सगळं काही तरुण मंडळींना आपल्या लग्नात आता हवं असतं. याबाबत टीसीएस कंपनीमध्ये एचआर असलेला श्रेयस देसाई सांगतो, ‘माझं आणि माझ्या बायकोचं- प्रणालीचं- बॉलीवूडवर प्रचंड प्रेम. त्यामुळे लग्न फिल्मी दिसायला हवं यासाठी आम्ही अनेक गोष्टी केल्या. आम्हा दोघांनाही नृत्याची आवड. त्यामुळे लग्नात डान्स परफॉर्मन्स असायलाच हवा अशी आमची इच्छा होती. ती आमच्या मैत्रिणींनी पूर्ण केली. लग्न लागल्यानंतर एक परफॉर्मन्स दिला.’ असंच काहीसं डोंबिवलीच्या मानस सायकॉलिजिकल हेल्थ सेंटरमध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असलेल्या अदिती कुंटे-खंडागळेचं. ती म्हणते, ‘लग्न लागल्यानंतर रिसेप्शन असतं, नातेवाईक भेटतात, ओळख होते. पण आमच्या लग्नात रिसेप्शनच्याच वेळी डीजे ठेवला होता. मित्रपरिवारापैकी काहींनी परफॉर्मन्सेस दिले.’ सर्वसाधारणपणे लग्नाच्या दिवशी वरातीशिवाय इतर कोणताही नाचण्याचा कार्यक्रम नसतो. पण आता ‘परफॉर्मन्स’चा हा नवा घटक लग्नात सामील होतोय.
lp03‘डोली सजाके रखना.. मेहंदी लगाके रखना..’ असं ‘डीडीएलजे’ अर्थात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमात शाहरुखने म्हटलं आणि तरुणाईने ते भलतंच मनावर घेतलंय. हल्ली नवऱ्या मुलीचा वेगळाच थाट बघायला मिळतो. मंगल कार्यालयाच्या दारापासून ते मंगलाष्टकांसाठी स्टेजवर येईपर्यंत नवऱ्या मुलीला डोलीमध्ये आणलं जातं. ही डोली कधी पालखीसारखी वरून उघडी तर कधी पूर्ण झाकलेली असते. राजा-महाराजांच्या काळाप्रमाणे डोलीतून येऊन आपल्या लग्नाला उभं राहण्याचं फिलिंग आजच्या तरुणींना सुखावणारं असतं. त्यामुळे ही डोली आता लग्नांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसू लागली आहे. म्हणूनच लग्नाआधी असलेल्या संगीत कार्यक्रमाला ‘डोली सजाके रखना’ हे गाणंही हमखास हजेरी लावतंच. ‘लग्न लागण्याआधी मला स्टेजपर्यंत डोलीतून नेण्यात आलं होतं. मी डोलीतून यावं अशी माझ्या आईची इच्छा होती. ती पूर्ण झाल्याचा आनंद तर होताच, पण मला स्वत:लाही खूप मस्त वाटत होतं’, असं अदिती सांगते.

आठवणींसाठी
lp10
lp09मराठी लग्नात विधींना खूप महत्त्व असतं. आमचंही विधिवत लग्न झालं, पण त्यात वेगळेपण यावं असं वाटतं होतं. मुळात माझ्या आईची एक इच्छा मला पूर्ण करायची होती. ती म्हणजे मंगलाष्टकाच्या वेळी माझी एंट्री डोलीमधून व्हावी. त्यामुळे डोलीतून लग्नाच्या बोहल्यावर चढायचा अनुभव मला घेता आला. मराठी लग्नांमध्ये डोली हा प्रकार अलीकडे बघायला मिळतोय. लग्न लागल्यानंतर सहसा रिसेप्शनशिवाय कार्यक्रम नसतात. पण आम्ही डिजे ठेवला होता. त्यात आमच्या मित्रपरिवाराने वेगवेगळे परफॉर्मन्सेस दिले. त्यामुळे परंपरा जपत लग्नात थोडं वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या या आठवणी नेहमी लक्षात असतील.
अदिती कुंटे-खंडागळे

lp04अगदी अलीकडचा ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमातल्या संगीताचा कार्यक्रम काहीसा वेगळा होता. सिनेमांतली गाणी म्हणणं इतकाच तो कार्यक्रम नसून त्या कार्यक्रमासाठी विशेष गाण्यांवर डान्स परफॉर्मन्सेस होते. अशा लग्नसोहळ्याच्या वेगळेपणासाठी हिंदी-मराठी मालिकाही पुढे असतात. असा संगीताचा कार्यक्रम स्टार प्रवाहच्या ‘लगोरी’ मालिकेतही झाला होता. ही मालिका पाच जणींच्या मैत्रीवर बेतलेली आहे. सगळ्यात आधी धनश्रीचं लग्न झालं. तिच्यासाठी संगीत कार्यक्रम केला होता. खरंतर संगीत हा कार्यक्रम नवऱ्या मुलाकडे आणि मुलीकडे वेगवेगळा असतो. पण सिनेमा-मालिकांमध्ये दोघंही एकत्र असताना हा संगीत कार्यक्रम होताना दिसतो. हा ट्रेंड खऱ्या आयुष्यातही बघायला मिळतो. पब्लिक हेल्थ विषयात पद्व्युत्तर शिक्षण घेणारी श्रुती दंडवते-सामंत सांगते, ‘माझ्या घरी संगीताचा कार्यक्रम झाला. माझ्या मित्रमंडळींनी जे परफॉर्मन्सेस ठेवले होते. त्यात खूप बारीकसारीक गोष्टींचा समावेश होता. म्हणजे आम्ही कसे भेटलो, प्रेमात पडलो, मेसेजेसवर कसे बोलायचो, रोहन पहिल्यांदा घरी आला होता तेव्हा माझे आई-बाबा त्याच्याशी काय बोलले होते असं सगळं त्यात होतं. या सगळ्या फिल्मी स्टोरीमध्येच एक संगीत कार्यक्रम होता. इतर गाण्यांवर माझे मित्र-मैत्रिणी परफॉर्म करत होते. त्यातल्या संगीत कार्यक्रमात मात्र माझाच परफॉर्मन्स ठेवला होता. नेमकं माझ्याच परफॉर्मन्सच्या वेळी रोहनची एंट्री झाली. खरंतर त्याने येणं अपेक्षितच नव्हतं. कारण त्याच दिवशी सकाळी रोहनला हळद लागली होती. पण त्याच्या ताईने त्यांच्या घरी विचारलं आणि ती त्याला माझ्या घरी घेऊन आली होती. त्यामुळे माझ्यासाठी ते मोठं सरप्राइजच होतं.’ असा संगीत सोहळा ‘बँड बाजा बारात’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘तनू वेड्स मनू’, ‘जब वुई मेट’ अशा सिनेमांमध्येही दिसतो.
lp17‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या लोकप्रिय मालिकेत श्री-जान्हवीच्या लग्नाच्या वेळी त्यांनी तीन ‘अ’ला ठाम विरोध केला होता. ते असे, अक्षता, अन्नाचा आग्रह आणि आहेर. याची कारणंही सांगितली होती. अक्षतांमुळे मोठय़ा प्रमाणावर तांदूळ वाया जातो, अन्नाचा आग्रह केल्याने अन्नही वाया जाते आणि आधी कधी त्यांनी कोणाकडून कधी काही घेतलं नसल्यामुळे आहेराला नकार. ही कल्पना तरुणांना आवडली. म्हणूनच काहींनी त्यांच्या लग्नात अक्षतांऐवजी फुलांच्या पाकळ्या ठेवल्या होत्या. या मालिकेच्या फेसबुक पेजवरही या गोष्टींना तरुणांचा चांगला प्रतिसाद होता. त्याच काळात ज्या तरुणांचं लग्न होतं त्यांनी ‘आम्ही आमच्या लग्नात अक्षतांऐवजी फुलांचाच वापर करू’ अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘मेहंदी की रसम’ हा प्रकार तर हिंदी सिनेमांमध्ये ठरलेला. मेहंदीचा कार्यक्रम म्हणजे नायिकेच्या मैत्रिणी, बहिणी, काकू, मावश्या असा सगळा गोतावळा असतो. पूर्वी नवऱ्या मुलीची मेहंदी कधी काढून संपायची ते कळायचेही नाही. आता त्याचाही सोहळा केला जातो. ही मेहंदीची रसम आधीपासून सिनेमांमध्ये दिसत होती.
lp12lp13महत्त्वाच्या क्षणी मैत्रिणी
कोणताही महत्त्वाचा क्षण मैत्रिणींशिवाय अपूर्णच. त्यामुळे लग्नाची मेहंदी काढण्यासारख्या महत्त्वाच्या क्षणी माझ्या मैत्रिणींनी माझ्यासोबत असावं अशी माझी इच्छा होती. तसंच एकत्र भेटण्याचं ते एक निमित्त असतं, म्हणून मी मेहंदीचा कार्यक्रम करायचा ठरवलं.
– मधुरा सोहनी

पण अलीकडच्या काळात त्याचं प्रमाण मराठी कुटुंबांच्या लग्नांमध्ये वाढलंय. ‘इंग्लिश विंग्लिश’मधल्या ‘नवराई माझी लाडाची’ आणि ‘क्वीन’ या सिनेमातल्या ‘लंडन ठुमकदा’ या गाण्यांवर ठुमकायला आता सगळ्यांनाच आवडतं. हे गाणं सिनेमात नायिकेच्या मेहंदीच्या कार्यक्रमाच्या वेळी आहे. त्यामुळे आता एखाद्या नवऱ्या मुलीच्या मेहंदीच्या कार्यक्रमात हे गाणं लागलं नाही तरच नवल. या ‘ठुमकदा’मुळे मेंहदीच्या कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झालंय हे मात्र खरं. असाच ठुमकदा डान्स झाला मधुरा सोहनी हिच्या घरी. ती सांगते, ‘मला मैत्रिणींसोबत वेळ घालवायचा होता. एंजॉय करायचं होतं. यासाठी मेहंदीच्या कार्यक्रमासारखा चांगला पर्याय नव्हता. काही मैत्रिणींना घरी बोलावलं. हा कार्यक्रम फार मोठय़ा प्रमाणावर मी केला नसला तरी त्या दिवशीची सगळी धमाल आजही तशीच लक्षात आहे. मेहंदी, डान्स, गप्पा अशी मजा-मस्ती आम्ही केली. मनसोक्त नाचलो, गाणी गायलो, जेवलो, आइस्क्रीम पार्टी करून मेहंदीचा कार्यक्रम आठवणीचा बनवला. हे क्षण आम्ही सगळ्यांनीच खूप जपून ठेवले आहेत.’
lp15

lp14आमची फिल्मी प्रेमकहाणी
लग्नाआधी मी संगीताचा कार्यक्रम ठेवला होता, पण तो नेहमीसारखा नव्हता. आम्ही कॉलेजमध्ये असताना ‘कहा ना फिल्मी है’ असा एक कार्यक्रम केला होता. तो संपूर्ण कार्यक्रम बॉलीवूडच्या गाण्यांवर बेतला होता. तसाच कार्यक्रम संगीत कार्यक्रमात केला होता. माझ्या मित्रमंडळींनी माझी आणि माझ्या नवऱ्याची, रोहनची लव्हस्टोरी वेगवेगळ्या गाण्यांमधून सादर केली होती. त्यामुळे नेहमीसारखा संगीत कार्यक्रम न ठेवता त्यात वेगळपण आणल्यामुळे ती आठवण मनात अजून तशीच आहे.
– श्रुती दंडवते-सामंत

मराठी सिनेमांमध्ये लग्नसोहळा मोठय़ा प्रमाणावर दाखवत नसले तरी त्यातल्या काही गोष्टी तरुण मंडळी चटकन हेरतात. ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या सिनेमात सुरुवातीलाच कलाकार आणि टीम सदस्यांची नावं दाखवताना स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांचे फोटोज येतात. तसंच सनईचे सूर कानी पडतात. त्यांच्या या फोटोजच्या प्रेमात अवघी तरुण मंडळी. फोटो काढणं, काढून घेणं हे तरुणाईचं ठरलेलं काम. त्यामुळे ‘जिथे फोटो तिथे आम्ही’ असं म्हणणारे तरुण बरेच. या सिनेमातली ही संकल्पना अनेकांनी त्यांच्या लग्नात आणली. ‘प्री वेडिंग फोटोशूट’ हा ट्रेंड नवीन नाही. पण लग्नाच्या दिवशी कार्यालयात या फोटोंसाठी मोठी स्क्रीन लावणे हा त्यातला एक नवीन ट्रेंड. सिनेमांमधल्या नायिकांच्या लेहेंग्याचीही सध्या क्रेझ आहे. श्रेयस देसाईच्या बायकोला, प्रणालीला डिझायनर लेहेंगा हवा होता. डिझायनर लेहेंग्याच्या विविधतेमुळे तरुणींसाठी अनेक पर्याय आहेत.
lp05बिग फॅट वेडिंगचं प्रमाण ‘क्योंकि सांस भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कसोटी जिंदगी की’ अशा अनेक ‘के’ फॅक्टर मालिकांमुळे वाढलं. आठवडाभर सुरूअसलेल्या लग्नाचा उत्सव करण्याच्या या ट्रेंडला सुरुवात lp06तिथूनच झाली. मराठी मालिका-सिनेमांमधली गाणी लग्नसोहळ्यांमधला अविभाज्य भाग झाली आहेत. ‘मंगलाष्टक वन्स मोअर’मधलं ‘सर सुखाची श्रावणी’, ‘यंदा कर्तव्य आहे’मधलं ‘आभास हा’, ‘’तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’मधलं ‘गोऱ्या गोऱ्या गालावरी’ तर ‘होणार सून मी ह्य़ा घरची’, ‘उंच माझा झोका’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकांची शीर्षकगीतं अशा सगळ्या गाण्यांना लग्नांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. थोडक्यात काय, मनोरंजन क्षेत्र आणि समाज यांच्या पूरक असण्याचा आणखी एक पुरावा लग्नाच्या माध्यमातून मिळाला. सिनेमातलं बिग फॅट वेडिंग मालिकांमध्ये आलं आणि मालिकांचं आता मराठी कुटुंबामध्ये. पारंपरिक पद्धत जपून विधीवत लग्न करताना ते ‘खास’ कसं होईल यासाठी मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक गोष्टींचा आधार घेतला जातोय. मग ते डीजे, संगीत, मेहंदी अशा आधुनिकतेकडे झुकणारं असलं तरी त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणाचा उत्सव करत त्याच्या आठवणी जपण्याचा सगळ्यांचा प्रयत्न..!

Story img Loader