लग्न ठरल्यापासून ते मांडवपरतणी होईपर्यंत सगळी कामे निर्विघ्नपणे पार पाडणारा ‘व्यक्ती आणि वल्ली’मधला पुलंचा ‘नारायण’ मराठी समाजाला नवा नाही; पण आता हा नारायण कॉपरेरेट झालाय. एवढेच नाही, तर त्याचे कंपनीकरण झालेय. त्याच्यामुळे लग्नेही अधिक देखणी आणि संस्मरणीय व्हायला लागली आहेत..
प्रत्येक लग्नात हा असतोच. कधी तो नातेवाईक असतो, तर कधी तो एखादा जवळचा मित्र असतो, तर कधी शेजारचा कोणी तरी असतो, तर कधी घरातलाच एखादा असतो; पण त्याच्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही, कार्य पुढे सरकतच नाही. पत्रिका छापण्यापासून ते मुलगी सासरी रवाना होईपर्यंत प्रत्येक क्षणी त्याची गरज असते. ज्याच्याशिवाय लग्नकार्यात पानदेखील हलत नाही. यत्रतत्र सर्वत्र त्याचा संचार. तुमच्या लक्षात आलेच असेल, की हा कोण.. पुलंनी हे पात्र ‘नारायण’ नावाने अजरामर केले. त्याच्या असण्याची ती पहिली लेखी दखल. कालपरत्वे लग्न सोहळ्यातच अनेक बदल होत गेले. तरीदेखील त्याची गरज होतीच; पण नारायणाची जागा व्यापणारी माणसेच तुलनेने कमी होत गेली; पण आज पुन्हा हाच नारायण एका वेगळ्याच लुकमध्ये चर्चेत आला आहे. पुलंच्या या नारायणाने आता वेडिंग प्लानर किंवा वेडिंग इव्हेंट मॅनेजर या नावाने नवा कॉपरेरेट अवतार धारण केला आहे.
नारायणाच्या या अवताराला कॉपरेरेट वलय आले असले तरी त्याच्या कामात मात्र बदल झालेला नाही. बदलली आहे ती त्याची कार्यशैली आणि वाढली आहे ती त्यातील क्रिएटिव्हिटी. पूर्वी स्वत: पन्नास ठिकाणी धावपळ करणारा हा नारायण आता अनेकांकडून काम करून घेणारा प्रोफेशनल झालाय. त्याची बांधीलकी तीच आहे, पण तो केवळ हरकाम्या न राहता लग्नाच्या काळातील एक सूत्रधार बनून गेला आहे.
खरे तर याची सुरुवात झाली ती मंगल कार्यालयातूनच. मंगल कार्यालयांची संख्या मर्यादित असताना कोणत्या तरी हॉलमध्ये, मंदिरात होणाऱ्या लग्नात सारी जबाबदारी ही कुटुंबावरच असे. मग हा नारायण सारे ओझे वाहत असे. मंगल कार्यालयांमुळे त्यात बदल होत वैविध्य येत गेले. लग्नकार्य हाच व्यवसाय असल्यामुळे तेथील व्यवस्थेत असणाऱ्या अनेक सुविधा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यास फायदेशीर ठरत. भोजन, सजावट, बैठक व्यवस्था, निवास वगैरे गोष्टी येथे मिळू लागल्या. हीच खरे तर आजच्या वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंटची खरी सुरुवात म्हणायला हवी. फक्त फरक इतकाच की, तेथे तुम्हाला कार्यालयांपर्यंत जावे लागत असे आणि तुलनेने पर्यायांना मर्यादा पडत.
वेडिंग इव्हेंट मॅनेजर नेमके काय करतो
* लग्न ठरल्यावर दोन्ही कुटुंबीयांशी त्याची सविस्तर चर्चा होते. सोहळ्याबद्दल त्यांच्या अपेक्षा काय आहेत, गरजेच्या गोष्टी कोणत्या, विधी काय असतील, आमंत्रितांची संख्या वगैरे.
* सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्चाचा अंदाज.
* त्यानुसार पत्रिकावाटप, ठिकाण, सजावट, भोजन व्यवस्था, संगीत कार्यक्रम, भेटवस्तू, छायाचित्रण, बैठक व्यवस्था अशी आखणी करणे. हे करताना त्यात नावीन्य कसे आणता येईल त्यावर भर.
* आमंत्रणासाठी वेबसाइट, त्याचं ब्रँडिंग, डिजिटल आमंत्रण अशा संकल्पनांचा वापर करणे.
’ संपूर्ण कार्यक्रमाची चेकलिस्ट (लग्नाच्या सहा महिने वर्षांपासून ते लग्नानंतर काही दिवसांपर्यंत)
’ इव्हेंटसाठी आवश्यक व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांना कामाचे वाटप- फोटोग्राफर्स, व्हिडीओग्राफर्स, ब्यूटिशिअन, फ्लोरिस्ट, सजावट, वाहन व्यवस्था, निवास व्यवस्था, व्हेन्यू मॅनेजर्स, बेकर्स, केटर्स.
’ डेस्टिनेशन मॅरेज असेल तर त्या ठिकाणच्या कायदेशीर बाबींची पूर्तता आणि वाहन व निवास व्यवस्थेची पूर्तता.
’ योग्य वेळी योग्य वस्तू योग्य ठिकाणी असतील याची काळजी घेणे.
’ आयत्या वेळी काही गोंधळ होऊ नये म्हणून बॅकअप प्लॅन तयार ठेवणे.
लग्नकार्याच्या व्यवसायात अनेक वर्षे काम करणारे पिंपुटकर हे त्यातील आणखीन एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात. ते सांगतात ‘‘केटरिंग सव्र्हिस ही या मॅनेजमेंटची सुरुवात आहे असे म्हणायला हरकत नाही. हा केटरर अनेक गोष्टी करत असे, अर्थात ते मंगल कार्यालयात; पण त्यामुळेच काही वेळा त्यावर मर्यादा पडत.’’ ते सांगतात की, कार्यालयात अनेक वेळा नियमांचा जाच होत असे. नऊ वाजता नाष्टा बंद, शेवटची पंगत दोन वाजता असेल, सीमांत पूजनाचा कार्यक्रम आठच्या आत संपला पाहिजे, अशा अनेक त्रुटींमुळे नाही म्हटले तरी आनंदाच्या प्रसंगी काहीसे बंधन हे येतच. तसेच कार्यालयाशी जोडलेलेच केटर्स आणि डेकोरेटर्स एकच असल्यामुळे अनेक वेळा आपल्याला मर्यादा येत असत. पिंपुटकर सांगतात की, लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सोहळा असतो. तो कायमस्वरूपी आठवणीत राहील असा छान असावा, अशी प्रत्येकाची किमान अपेक्षा असते. मग अशा वेळी केवळ वेळेच्या नियमांच्या बंधनात अडकल्यासारखे वाटणे हे नक्कीच चांगले नाही. आणि त्यासाठी सारी धावपळ आपल्यालाच करावी लागली, तर त्या आनंदाच्या प्रसंगाचा आनंद घेणार तरी कसा? आजच्या वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंटची मुळे यातच दडली आहेत.
वेडिंग मॅनेजमेंट एक कसरत
वेडिंग मॅनेजमेंट ही गरज असली आणि त्याला मागणी असली त्यातून चांगली मिळकतदेखील होत असली तरी ती एक कसरतच असते. निखिल भिडे सांगतात की, एकदा गोव्यातील लग्नात घोडा हवा होता. तो बाहेरून येणार होता. नेमका तो घोडा रात्री गाडीत चढताना लाथा झाडू लागला. काही केल्या तो गाडीत चढेचना, तो गोव्यात येईपर्यंत प्रचंड दडपण होते. इतकेच नाही, तर पाहुण्यांना विमानतळावरून आणायचे असेल, तर आयत्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून एखादी गाडी स्पेअर ठेवावी लागते, कारण लग्न सोहळ्यात एकाने जरी काही तक्रार केली, की सगळेच तक्रारी करू लागतात आणि मग त्यांना सावरणे कठीण असते. मोजलेल्या पैशाचे समाधान हे विनातक्रार हवे असते. अशाच एका लग्नात नवरदेवाला पांढराशुभ्र स्पॉटलेस घोडा हवा होता. अशा वेळी कोणत्या व्हेंडरकडे काय उपलब्ध आहे याची चोख माहिती असावी लागते. नेमका आयत्या वेळी तो स्पॉटलेस घोडा काही उपलब्ध झाला नाही. झाला त्याच्या पायावर एक छोटा स्पॉट होता. अशा वेळी खूप कसरत होते.
कालांतराने मंगल कार्यालयातील बंदिस्त लग्ने एखाद्या क्लबच्या लॉनवर, पार्टी वजनदार असेल, तर एखाद्या छोटय़ाशा मैदानात होऊ लागली. अर्थात यात खर्च वाढत असला तरी आपल्या हाती आपल्या कार्यक्रमाची सूत्रे असणे हादेखील महत्त्वाचा भाग होता. अर्थातच हे सारे सांभाळणाऱ्या माणसांची गरजदेखील भासू लागली. राजकारणी, उद्योगपतींच्या मोठमोठय़ा विवाह सोहळ्यात अशी जबाबदारी सांभाळणारी माणसे त्यांच्याच चाकरीत असणारी लोक पाहात असत. ती लग्न व्यवस्थापनात प्रोफेशनल असतीलच असे नाही. परत डेकोरटेर्स वेगळे, केटर्स वेगळे आणि अन्य जबाबदाऱ्या पेलणारे वेगळे. त्या सर्वाना एका सूत्रात बांधणारा कोणी विश्वासू माणूस असलाच तर ठीक, नाही तर स्वत:लाच लक्ष घातल्याशिवाय पर्याय नसे; पण कायमच शक्य होईल असे नाही. अर्थात प्रोफेशनल्सची गरज अधोरेखित होत गेली आणि वेडिंग इव्हेंट मॅनेजरचा जन्म झाला.
सुरुवातीस केवळ मोठय़ा कुटुंबापुरती असणारी ही गरज आज उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचली असल्याचे दिसून येते. पुण्यातील वेडिंग इव्हेंट मॅनेजर सत्यश्री पानसे सांगतात की, मराठी कुटुंबात जरी याचं प्रमाण फार नसलं तरी आज प्रत्येक लग्नात काही ना काही गोष्टी या वेडिंग इव्हेंट मॅनेजरकडून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या लग्नाला आलेल्यांना ते जास्तीत जास्त कसे लक्षात राहील यावर सर्वाचा भर असतो. त्यातूनच ही संकल्पना वाढत गेली असल्याचे त्या नमूद करतात. त्या सांगतात की, वेळ कमी आणि त्या कमी वेळात अपेक्षा अधिक, ही आताची मानसिकता आहे. दुसरे असे की, लग्नाचे विधी जरी पारंपरिक पद्धतीनेच होत असले तरी त्या सोहळ्याला नवा साज द्यायची गरज अनेकांना वाटते. त्यामुळेच आजकाल अक्षता, फुले वाटण्यापासून ते रिटर्न गिफ्ट देण्यापर्यंत वेगळ्या पॅकेजिंगचा वापर दिसतो. गोष्टी त्याच आहेत, पण साज निराळा. नुसताच मेंदीचा, सीमांत पूजनाचा कार्यक्रम करण्यापेक्षा त्याबरोबर संगीत नृत्याचा कार्यक्रम केला, तर त्यात रंजकता येते. त्यामुळेच आज होणाऱ्या बहुतांश लग्न सोहळ्यांत काही ना काही भाग हा इव्हेंट मॅनेजरकडून करून घेतलेला असतो. पंजाबी, मारवाडी समाजात संपूर्ण सोहळ्याचे व्यवस्थापन इव्हेंट होण्याचे प्रमाण मोठे आहे; पण मराठी कुटुंबांतदेखील आज काही प्रमाणात पद्धत रूढ होत आहे.
क्रिएटिव्ह वेडिंग मॅनेजमेंट
वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे केवळ लग्नाचे व्यवस्थापन इतकेच मर्यादित नसून त्याला मेमोरेबल कसे करता येईल आणि त्यातील कंटाळवाणा भाग बाजूला करून रंजक कसे करता येईल यावर सध्याच्या वेडिंग मॅनेजर्सचा भर आहे. सत्यश्री पानसे सांगतात की, लग्न, बॉलीवूड आणि क्रिकेट हे आपल्या समाजाचे वीक पॉइंट आहेत. आम्हीदेखील आमच्या व्यवस्थापनात याचा वापर करतो. नुसतेच व्याही भोजन न ठेवता त्यानिमित्ताने आम्ही एकदा दोन्ही कुटुंबांची क्रिकेटची मॅच ठेवली होती. त्यातून धम्माल मजा आली आणि एक वेगळेच बॉण्डिंग तयार झाले. तर एकदा बॉलीवूडचा आधार घेत मुलाचे आणि मुलीचे फोटो वापरून पोस्टर तयार केले होते. नंतर फिल्म अॅवॉर्डच्या धर्तीवर नातेवाईकांना वेगवेगळे अॅवॉर्ड दिले होते. तर एका मारवाडी लग्नाचा तीन दिवसांचा सोहळा होता. तेव्हा रोजच्या कार्यक्रमाचे फोटो वापरून चार पानांचे वर्तमानपत्रच तयार केले होते आणि प्रत्येक पाहुण्याच्या खोलीत ते वाटले होते. त्याचबरोबर पाहुण्यांना देण्यात येणार आहेर देखील जपून ठेवता येतील अशा आकर्षक परडीतून आणि आकर्षक पॅकेजिंग करून देण्यात येतात.
गेली दहा वर्षे मुंबईत या व्यवसायात असणारे निखिल भिडे याबद्दल सांगतात की, आम्ही जेव्हा या व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. एखाद्या कुटुंबाचा कोणी तरी नातेवाईक इव्हेंट मॅनेजमेटमध्ये असला, तर तो काही प्रमाणात त्याची आखणी करायचा. उत्तर भारतीय विशेषत: पंजाबी कुटुंबांत लग्न सोहळा मोठय़ा प्रमाणात दोन-तीन दिवस साजरा होत असे. त्यांना गरज होती; पण मराठी कुटुंबांत लग्न सोहळा अशा प्रकारे मॅनेज करून देण्याइतपत गरज फारशी भासत नसे; पण त्याच वेळी एनआरआय कुटुंबांना मात्र याची गरज मोठी होती. लग्नासाठी भारतात येणाऱ्या या कुटुंबाला परदेशात राहून सारे काही व्यवस्थापन करणे त्रासदायक होते. पैसे खर्च करण्याची तयारी आहे, पण त्यासाठी धावपळ करायला वेळ नाही. मग अर्थातच कोणी तरी असा व्यवस्थापक हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आधार ठरला. निखिल सांगतात, आजदेखील आम्ही जी लग्ने करतो त्यात एनआरआय कुटुंबांची संख्या तुलनेने अधिक आहे. विमानतळावर उतरल्यापासून ते विवाह सोहळा आवरून परत विमान पकडेपर्यंतची सारी व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारा असा हा मॅनेजर त्यातून जन्माला आला.
अर्थातच एकदा का सोहळ्याला ‘इव्हेंट’ हा शब्द चिकटल्यावर त्यात मग आपसूकच नवनवे प्रयोग सुरू होतात आणि केवळ विवाह सोहळ्यापुरता मर्यादित न राहता या कामाची व्याप्ती पत्रिका छापण्यापासून ते रिटर्न गिफ्ट देण्यापर्यंत विस्तारत गेली. मुळातच वेगवेगळे इव्हेंट करणाऱ्यांनीदेखील मग मॅरेज इव्हेंटमध्ये उडी घेतली. हा बदल साधारण गेल्या दहा-बारा वर्षांत झाला. सत्यश्री पानसे सांगतात की, आमच्या कंपनीत आम्ही इतर अनेक इव्हेंट्सबरोबर वेडिंग इव्हेंट करायचो. आज मात्र त्यासाठी स्वतंत्र विभागच सुरू केला आहे. निखिल भिडे सांगतात की, ते कॅनडात असताना तेथे त्यांनी ही संकल्पना पाहिली. तेथील अनेक लग्नांत अशा प्रकारचे इव्हेंट मॅनेजमेंट दिसून येते. आज तेच आपल्याकडेदेखील होत आहे. आज गुगलवर वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट असे सर्च दिलेत तरी शेकडय़ांनी इव्हेंट कंपन्यांची नावे दिसतील. म्हणजेच आज केवळ हा एक व्यक्तिगत सोहळा राहिला नसून त्याचे एका उद्योगात रूपांतर झाले आहे. अर्थात उद्योग म्हटल्यावर त्याला व्यावसायिकतेची सारी परिमाणे लागतात आणि आज ही सारी परिमाणे या उद्योगाने स्वीकारली आहेत. त्यामुळेच त्यातील स्पर्धादेखील वाढली आहे. अर्थातच या वाढलेल्या स्पर्धेचा फायदा अंतिमत: सेवा घेणाऱ्यांना मिळत आहे.
वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम
एखादी नवी व्यवस्था तयार होऊ लागली, की तिचा पाया भक्कम होतो तो प्रशिक्षणाने. आज वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट हा उद्योग म्हणून विकसित होत आहे. अर्थातच कोणत्याही उद्योगाला गरज असते ती प्रशिक्षित व्यावसायिकांची. हीच गरज ओळखून अनेकांनी असा अभ्यासक्रमच सुरू केला आहे. देशातील अठरापगड जातींच्या आणि वर्गाच्या गरजेनुसार लग्नाचे आयोजन कसे करावे हे त्यात शिकवले जाते. केवळ सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमाला ५१ हजार रुपये अशी भक्कम फी घेतली जाते. अर्थात या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांच्या मते मात्र केवळ अभ्यासक्रम हा याचा आधार नाही. त्यासाठी महत्त्वाचे आहे ते पॅशन आणि अनुभव.
पण आपल्या खासगी सोहळ्याचे असे व्यवस्थापन दुसऱ्याला करू देण्याची आपली मानसिकता असते का? खरे तर अनेकांची नसते. बहुतांश ठिकाणी चार गोष्टी स्वत: चार ठिकाणी पाहून मगच निवडण्याकडे कल असतो आणि अर्थातच त्यात आपल्या बजेटनुसार चार पैसे वाचविण्याचा उद्देशदेखील असतो; पण आज परिस्थिती अशी आहे की, सर्वानाच नोकरी-व्यवसायात गुरफटायला झाले आहे. पैसे कमवायचे तर धावपळ ही अपरिहार्य झाली आहे. चार पैसे जास्ती पडले तरी चालतील, पण सोहळ्याचा आनंद घेता यावा, ही मानसिकता वाढीस लागली आहे. मग आपले पैसे खर्च करताना योग्य पद्धतीने कसे खर्च होतील हे सांगणारा कोणी तरी व्यावसायिक असेल तर तो हवा असतो. आपल्या नियमित कामाला धक्का न लावता हे होत असेल आणि त्याकरिता चार पैसे मोजायला लागले, तर त्याचीदेखील तयारी असते. त्यामुळे अनेक मराठी कुटुंबांत इव्हेंटचा शोऑफ नसला तरी सारी व्यवस्था इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून करून घेतलेली दिसून येत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
धावपळीच्या आजच्या जगात आनंदाचे सोहळे अनुभवण्यासाठी आणि चार पैसे खर्च करण्याच्या मानसिकतेतून पारंपरिक विवाह सोहळ्यात झालेला हा बदल चांगला की वाईट यावर चर्चेचे काथ्याकूट करणारे, दळण दळणारे अनेक जण असतील; पण आपल्या पैशाने साजरा होणारा हा सोहळा चार घटका सुखाने अनुभवला नाही, तर काय फायदा? पूर्वी आपल्याकडे लग्न सोहळ्यानंतर एक संवाद हमखास ऐकायला यायचा. ‘‘या लग्नाच्या गडबडीत बोलायलाच मिळाले नाही बघा. आता पुन्हा कधी तरी चार दिवस या आरामात गप्पा मारायला.’’ आता मात्र नारायणाच्या या कॉपरेरेट अवताराने हा संवाद जरा तरी कमी होईल आणि आपल्याच सोहळ्यात आपल्याच पाहुण्यांशी आनंदाचे चार क्षण निवांतपणे अनुभवता येतील, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.