सिनेमा हे प्रामुख्याने मनोरंजनाचे माध्यम असल्याने त्यात सोहळे, उत्सव या प्रकारांवर भर असणार हे साहजिकच. त्यातही लग्नसोहळे पाहणे प्रेक्षकांना अधिकच आवडते. लग्न म्हटले की, गीत-संगीत आलेच. सिनेमातली लग्ने गाण्यांशिवाय पूर्ण होणे अशक्यच. लग्न ठरणे, ठरत नसेल तर त्यासाठीचे त्या नायक-नायिकेचे प्रयत्न, साखरपुडा, प्रत्यक्ष लग्न, मुलीची पाठवणी (हिंदी सिनेमांच्या भाषेत बिदाई) आदी प्रसंगांवर आजवर किती गाणी रचली गेली आहेत. त्यातल्या निवडक गाण्यांचा धांडोळा..
एक तरुण आणि एक तरुणी एकमेकांना भेटतात.. कुठे काय विचारता, ते कुठेही भेटू शकतात. रस्त्यात त्यांची टक्कर होते, तिच्या हातातली पुस्तके पडतात, तो (संधी साधून) ती उचलून देतो, ती हळूच त्याच्याकडे पाहते, हलकेच हसते. दोघांना एकमेकांचे नावही ठाऊक नसते, तरी योगायोग असा की, ते भेटतच राहतात. समजा ही टक्कर झालीच नाही, तर ते कॉलेजमध्ये भेटतात, ती कॉलेजमध्ये नवीन असते आणि हा तिच्यापेक्षा दोन-चार वर्षे मोठा. मग, गॅदिरग किंवा पिकनिक कुठे तरी त्यांची भेट होतेच, व्हायलाच पाहिजे. हेही होणार नसेल, तर गुंडांनी घेरलेल्या तिला तो सहज सोडवतो आणि ते जवळ येतात. गेलाबाजार, अनोळखी असताना त्या दोघांमध्ये काही कारणांमुळे गरसमज होतो, ती त्याचा तिरस्कार करते आणि नंतर खरे काय ते समजल्यानंतर त्याच्याकडे ओढली जाते, तर आपल्या सिनेमांत हिरो-हिरॉईनला परस्परांच्या जवळ येण्यासाठी यापकी किंवा या पलीकडचे कोणतेही निमित्त पुरते. त्याशिवाय स्टोरी पुढे कशी सरकणार? या सगळ्याची परिणती अर्थातच त्यांच्या लग्नात होते. आता हे लाडू खाऊन त्यांना पश्चात्ताप करून घ्यायचा असेल, तर तुम्ही-आम्ही काय करणार? आपल्या हातात केवळ मनोरंजन करून घेणे आहे. प्रेमापासून लग्नापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार आपणच असतो की!
सून सायबा सून..
राज कपूरला शोमन हा किताब मिळाला तो त्याच्या सिनेमांतल्या नाटय़पूर्ण कथानकांमुळे व अर्थातच दिलखेचक गाण्यांमुळे. ‘आरके’नेही त्याच्या काही सिनेमांत लग्नगीतांचा चांगला वापर केला आहे. राजा नवाथे यांनी दिग्दíशत केलेल्या ‘आह’ या आरकेच्या सिनेमात ‘राजा की आएगी बारात, रंगीली होगी रात, मगन मैं नाचूंगी..’ हे अतिशय तरल आणि भावस्पर्शी गीत आहे. शैलेंद्र व शंकर-जयकिशन जोडीचं हे ‘टची’ गाणं लता मंगेशकर यांच्याशिवाय कोण गाऊ शकेल? कथेला अनुसरून सिनेमात ज्या प्रकारे हे गीत येतं, ते पाहून प्रेक्षक हेलावतात. (असं काहीतरी लिहायला हवं, या अस्वस्थतेतून कवी मंगेश पाडगावकर यांनी ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी..’ हे तितकंच उत्कट गीत रचलं) ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशानंतर ज्या ‘बॉबी’ने ‘आरके’ला सावरलं त्यात त्याने एक वेगळ्या प्रकारचं गीत घेतलं आहे. बॉबीला लग्नाची मागणी घालताना राज म्हणतो, ना चाहूं सोना-चांदी, ना चाहूं हिरा-मोती.. त्याचं शांतपणे ऐकून बॉबी थट्टेत त्याला सुनावते, झूठ बोले कौआ काँटे.. पाठोपाठ येणाऱ्या या गाण्यांनी त्या काळी धुमाकूळ घातला होता. शंकर-जयकिशनऐवजी ताज्या दमाच्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीकडे संगीत सोपवण्याचा आरकेचा निर्णय योग्य ठरला. असंच एक जोडगीत ‘आरके’ने पुन्हा योजलं ते ‘प्रेमरोग’मध्ये. अबोध आणि अल्लड मनोरमा स्वत:च्याच लगीनघाईदरम्यान नायकाला सांगते, ‘ये गलीयाँ ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा, अब हम तो भए परदेसी के तेरा यहाँ कोई नहीं..’ लक्ष्मी-प्यारेंनी रचलेली ही भैरवी अप्रतिमच. यालाच जोडून आहे ते नायकाचं मनोगत.. ‘ये प्यार था या कुछ और था, ना तुझे पता न मुझे पता, ये निगाहों का ही कसूर था, न तेरी खता न मेरी खता..’ हा पूर्ण सिक्वेन्स दाद देण्यासारखा झालाय. ऋषी कपूरचा मुद्राभिनय तर लाजबाब! ‘प्रेमरोग’नंतर आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’मध्येही आरकेने हा प्रयोग केला. या वेळी पाश्र्वभूमी होती ती पहाडी परंपरेची. गंगोत्रीच्या सहलीला गेलेला नरेन गंगाच्या प्रेमात पडतो आणि तिथल्या रिवाजानुसार त्यांचं लग्नही होतं. हा प्रसंग काहीसा अतार्किक असला तरी हे गाणं मात्र हटके ठरलं. ‘सून सायबा सून, प्यार की धून, मैंने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन..’ ‘बॉबी, सत्यम् शिवम् सुंदरम् आणि प्रेमरोग’दरम्यान ‘आरके’कडे गीतलेखनाची संधी न मिळालेल्या हसरत जयपुरी यांनी हे गीत लिहिलं आहे. हसरत यांनी उत्साहाच्या भरात या गीतासाठी अनेक अंतरे लिहिले होते. ‘आरके’च्या निधनानंतर आलेल्या ‘हीना’मध्येही ‘देर ना हो जाए कहीं, नार दाना अनारदाना (साखरपुडा) आणि ओए वशमल्ले’ (लग्नगीत) ही उत्तम गाणी होती. ‘आरके’ कॅम्पच्याच ‘बिबी ओ बिबी’ या सिनेमातलं किशोरकुमारने गायलेलं ‘गोरी हो काली हो या नखरेवाली हो कैसी भी दुल्हन दिला दे’ हेही एक धमालगीत होतं.
यश चोप्रा यांच्या सिनेमातही लग्नगीतांचा प्रच्छन्न वापर दिसतो. चोप्रा हे पंजाबी असल्याने त्यांच्या सिनेमात ढोलक वाजवत लग्नगीतं गाणाऱ्या स्त्रिया हे नेहमीचंच दृश्य. कभी कभी मेरे दिल में (कभी कभी) हे सुहाग रातीचं गीत, मेरे दुरों से आए बारात (काला पत्थर), सरसे सरके सरके चुनरियाँ आणि पहली पहली बार देखा ऐसा जलवा (सिलसिला) मेरे हाथों में नौ-नौ चुडियां हैं, मैं ससुराल नहीं जाऊंगी (चाँदनी), बन्नो की आएगी बारात (आइना) ही गाणी जमून आली होती. चोप्रांच्या मुलाने म्हणजे आदित्यने दिग्दर्शित केलेल्या एकमेव सिनेमातलं (दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे) ‘मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना’ हे गीत कमालीचं गाजलं. संगीतकार जतिन-ललित यांनी लता मंगेशकरांना दूरध्वनीवरून या गीताची चाल ऐकवली. लतादीदींना ती आवडली आणि नंतर हे गीत ध्वनिमुद्रित झालं. आनंद बक्षींची सहजसोपी परंतु दर्जेदार शब्दकळा हेही या गीताचं वैशिष्टय़. ‘यशराज फिल्म्स’च्या गेल्या काही सिनेमांमधून ही लग्नगीतं हद्दपार झालीत.. हा काळाचा महिमा. चोप्रा कॅम्पची काही प्रमाणात नक्कल केली ती करण जोहरने. त्याचे सिनेमे मेलोड्रामाने भरलेले असले तरी ‘साजन जी घर आए’ (कुछ कुछ होता है) आणि ‘बोले चूडियाँ, बोले कंगना’ (कभी खुशी कभी गम) ही लग्नगीतं उत्तम होती. एके काळी कमी बजेटचे सात्त्विक सिनेमे काढणाऱ्या राजश्री प्रॉडक्शनने ‘मैंने प्यार किया’पासून कात टाकली. त्यापुढच्या ‘हम आपके हैं कौन’च्या निमित्ताने तर प्रेक्षकांना भपकेबाज लग्नाची मोठी व्हिडीओ कॅसेटच पाहायला मिळाली. सिनेमाभर केवळ लग्नाचंच वातावरण. त्यात भर म्हणून ‘वाह वाह रामजी, दीदी तेरा देवर दीवाना, जूते दो पैसे लो’ आदी लग्नगीतं. या सिनेमामुळे उत्तरेतल्या लग्नातल्या अनेक प्रथांचं आपल्याकडे शहरापासून गावपातळीपर्यंत हास्यास्पद अनुकरण होऊ लागलं.
तर, हा लग्नाळू तरुण काय म्हणतोय पाहा, ‘जरुरत है जरुरत है जरुरत है, एक श्रीमती की, एक कलावती की, सेवा करे जो पती की..’ त्याची अपेक्षा काय तर, ‘हसी हजारों भी हो खडे, मगर उसी पर नजर पडे, हो झुल्फ गालोंसे खेलती के जैसे दिनरात से लडे, अदाओंमें बहार हो निगाहोंमें खुमार हो, कबूल मेरा प्यार हो तो क्या बात है..’ ‘मनमौजी’ सिनेमातल्या या गाण्याचे गीतकार आहेत राजेंद्रकृष्ण आणि संगीतकार मदनमोहन. हे गाणे मदनमोहनच्या नेहमीच्या शैलीतले नाही, पडद्यावर आणि गाणाराही किशोर असल्याने त्यांनी तशी खास चाल दिल्याचे दिसते. याच भावनेचे एक गाणे आहे ते खूप नंतरच्या ‘वक्त की दीवार’ या सिनेमातले. संजीवकुमार आणि सुलक्षणा पंडितवर ते चित्रित झाले होते. ‘मनचाही लडकी कही कोई मिल जाए, अपना भी इस साल शादी का इरादा है..’ ते गायले होते किशोरकुमार आणि आशा भोसले यांनी.
अशी मुलगी मिळाल्यानंतरचे एक गाणे आहे ते ‘देवी’ या सिनेमात. ‘शादी के लिये रजामंद करली मने एक लडकी पसंद करली, उडती चिडिया पिंजरेमें बंद करली, मने एक लडकी पसंद करली’.. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत असलेले हे गाणे मोहम्मद रफी यांनी ढंगात गायलेय. पडद्यावर दिसतात संजीवकुमार आणि नूतन. संजीवकुमारचे हे स्वप्न प्रत्यक्षात मात्र उतरले नाही. त्याला नाकारणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नूतनचा पहिला क्रमांक लागतो.
किसे पेश करू..?
आपल्या प्रेयसीचं लग्न भलत्याशीच होतंय, हे सहन न झालेला नायक थेट लग्नमंडपातच तारस्वरात गाऊ लागतो! दोन्ही बाजूचे वऱ्हाडीही त्याचं गाणं शांतपणे ऐकतात! यात लॉजिक नसलं तरी संगीतकारांचं मॅजिक मात्र आहे. ‘गझल’मधलं ‘रंग और नूर की बारात किसे पेश करू..’ हे या प्रसंगाचं प्रातिनिधिक गाणं. साहिर लुधियानवी यांनी कदाचित स्वानुभवावरून ही गझल लिहिली असावी, त्यामुळेच ते ही गझल मदनमोहन यांना देण्यास प्रथम तयार नव्हते. पण, मदनमोहन यांनी लावलेली चाल ऐकली आणि ते राजी झाले. मोहम्मद रफी यांनी अक्षरश: या गाण्यात काळीज ओतलंय. याच प्रसंगावर ‘खूश रहे तू सदा’ (खिलौना), ‘मुबारक हो सबको समां ये सुहाना.’ (मीलन), ‘खुशी की वो रात आ गयी’ (धरती कहे पुकार के) ही गाणीही सदाबहार आहेत.
लक्ष्मी-प्यारे जोडीच्या ‘इज्जत’मधली ‘ये दिल तुम बिन’, ‘जागी बदनमें ज्वाला’, ‘रुक जा जरा’, ‘क्या मिलीये ऐसे लोगों’से ही गाणी खूप गाजली. मात्र त्यात एक धमाल गीतही होते. ते म्हणजे ‘सरपर लंबा टोप लेके आएगा तेरा दुल्हा, चोच जैसी नाकसे खुजाएगा तेरा दुल्हा..’ नायकाच्या या छेडछाडीला नायिका ‘भैस जैसी तोंड लेके आएगी, तकतक भेंगी आँखसे शरमाएगी, तेरी दुल्हन..’ असे उत्तर देते, हे खटय़ाळ गीत साहिर यांनी लिहिले होते. अशीच एक खटय़ाळ नायिका म्हणते, ‘म तुमसे मोहब्बत करती हू, पर शादी के नामसे डरती हू, रहूंगी म कुवारी उम्र सारी, आय अॅम सॉरी..’ देव आनंदच्या ‘वॉरंट’मधले हे गीत आनंद बक्षींनी लिहिलेय, संगीतकार अर्थातच राहुल देव बर्मन. (मराठीतली सोज्वळ नायिका मात्र ‘लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची’ असे म्हणते!) यथावकाश तीच नायिका नायकाच्या मागे लागते व त्याला चहापानाचे आमंत्रण देते. बरोबर ओळखलेत, ‘शायद मेरी शादी का खयाल दिलमें आया है, इसीलिये मम्मीने मेरी तुम्हे चायपे बुलाया है..’ ‘सौतन’मधलं हे गाणे त्या काळी खूपच हिट झाले. हा सिनेमाही चांगला चालला. सुपरस्टारपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या राजेश खन्नाने यशाची चव चाखली. त्याचा स्वप्नाळूपणा मात्र कमी झाला नव्हता, अमिताभला टोमणा मारताना तो म्हणाला, मारधाडीच्या सिनेमांना प्रेक्षक आता कंटाळल्येत, रोमँटिक सिनेमांचा जमाना पुन्हा येतोय.. त्याचा हा आशावाद प्रेक्षकांनी मनावर घेतला नाही, हे सुदैव!
चल री सजनी अब क्या सोचे..
मुलीची पाठवणी म्हणजे बिदाईच्या गाण्यांनाही हिंदी सिनेमांत अनन्यसाधारण महत्त्व आहे (म्हणजे होतं). यात चटकन आठवतं ते ‘नीलकमल’मधलं ‘बाबुल की दुवाएं लेती जा’ हे गाणं. मात्र या गाण्याच्या अखेरीस रफी यांचे गदगदलेले स्वर नाटकी वाटतात. चल री सजनी अब क्या सोचे (बम्बई का बाबू), डोली में बिठाई के कहार (अमर प्रेम), चलो रे डोली उठाओ कहार (जानी दुश्मन), डोली चढके दुल्हन ससुराल चली (डोली), लिखनेवाले ने लिख डाले (अर्पण), बाबुल का ये घर गोरी (दाता) ही बिदाईगीतं डोळ्यांच्या कडा ओल्या करतात. मराठी सिनेमे कमी बजेटचे असल्याने त्यात भपकेबाज लग्नसोहळ्यातल्या गाण्यांऐवजी पाठवणीची गाणी अधिक दिसून येतात. सासुऱ्यास चालली लाडकी शकुंतला (सुवासिनी), दाटून कंठ येतो (अष्टविनायक), लेक चालली सासरला (शीर्षक गीत), का गं साजणी, भिजे पापणी (पुढचं पाऊल), ताई माझी जलवंती (मायबाप) या सिनेमागीतांनी व गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का, जा बाळे जा, ओटीत घातली मुलगी विहीणबाई या भावगीतांनी लक्षावधी प्रेक्षक-श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. तरीही पाठवणीच्या एका गाण्याने प्रेक्षकांना हसवलं आहे! अशोक सराफ ऐन भरात असताना आलेल्या ‘सासू वरचढ जावई’ या सिनेमात घरजावई होऊन सासरी राहण्यास निघालेल्या मुलाच्या आईचं मनोगत सुधीर मोघे यांनी शब्दबद्ध केलं आहे! ‘पोटचा दिला मी पोर सांभाळ विहीणबाई..’ हे ते धमाल गाणं. एकमेव असावं अशा या गाण्याचे संगीतकार आहेत राम कदम व ते गायलंय उत्तरा केळकर यांनी.
चहापानाचा हा कार्यक्रम काही वेळा ‘खानदान की इज्जत, गंदी नालेमें पलनेवाले कीडे, अमिरी गरीबी’ आदी कारणांमुळे यशस्वी होत नाही, तर त्या प्रसंगाचेही गाणे तयार आहेच.. ‘ले जाएंगे ले जाएंगे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, रह जाएंगे रह जाएंगे पसेवाले देखते रह जाएंगे’.. ‘चोर मचाए शोर’मधले हे गाणे किशोर-आशाने ठसक्यात म्हटलेय. गीत-संगीत सबकुछ रवींद्र जैन! याच स्थितीत काही नेमस्त नायक-नायिका एकमेकांना धीर देत ‘तेरी मेरी शादी होगी देंगे लोग मुबारक बात’ असे म्हणतात. ‘अर्पण’ सिनेमातल्या ‘परदेस जाके परदेसीयाँ’ आणि ‘मोहब्बत अब तिजारत बन गई है’ या गाण्यांच्या तुलनेत हे गाणे काहीसे झाकोळले गेलेय, मात्र लता-किशोरचे हे युगुलगीत ऐकण्यासारखे आहे.
या प्रवासात त्या लग्नाळू तरुण-तरुणींचे बहीण-भाऊही चेष्टा करण्याची संधी सोडत नाहीत. या प्रकारातले सगळ्यात भन्नाट गाणे आहे ते ‘खूबसूरत’ सिनेमातले. ‘सुन सुन सुन दीदी तेरे लिये एक रिश्ता आया है..’ गुलजार यांनी या गाण्यात शेवटपर्यंत केलेली मिश्किली ऐकण्यासारखीच, त्याला तितकीच छान चाल पंचमदांनी दिली आहे. आशा भोसले यांनी खोडकरपणे ते गायले आहे आणि मिडीमध्ये सहज वावरणारी रेखा तर अप्रतिम! ‘शहेनशाह’मधले ‘ओ बहना, ओ बहना, मेरे जिजा की का क्या कहेना’ हे गाणेही धमाल आहे. (मराठीत ‘गोरी गोरी पान’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ आणि ‘गोडगोजिरी लाजलाजरी ताई तू होणार नवरी’ ही गाणीही सदाबहार)अडथळ्यांची शर्यत पार झाल्यानंतर या लग्नगीतांना खरा वाव मिळतो आणि ‘मेरा यार बना है दुल्हा’ (चौदहवी का चाँद), ‘आज मेरे यार की शादी है’ (आदमी सडक का), ‘लडकी तुम्हारी कुवारी रह जाती’ (क्रोधी), ‘मेरी प्यारी बहनीया बनेगी दुल्हनिया’ (सच्चा झुटा), ‘बनी रहे जोडी राजा-रानी की जोडी रे’ (खून पसीना), ‘लडी नजरिया लडी’ (वॉरंट), ‘बहेना ओ बहेना तेरी डोली मै सजाऊंगा’ (अदालत) ही गाणी सदाबहार आहेत. गेल्या काही वर्षांत प्रेमकहाण्यांचे स्वरूप बदलल्याने सिनेमातले लग्नसोहळेही कमी झाल्याचे दिसतेय. साहजिकच, लग्नगीतांचे प्रमाणही घटलेय. एकापेक्षा एक श्रवणीय लग्नगीते पूर्वी जिच्यामुळे निर्माण झाली त्या लग्नसंस्थेचे किमान या कारणासाठी तरी आभार मानायलाच हवेत!