सत्यजित खूप हैराण झाला होता, गेल्या अनेक दिवसांमध्ये त्याला काहीच सुचेनासे झाले होते. एक तर त्याने करिअर म्हणून या क्षेत्राची निवड केली तीही घरच्यांच्या खातर. त्याला स्वारस्य होते ते दुसऱ्याच विषयांमध्ये. त्याला निसर्ग, त्यातले प्राणी- पक्षी, झाडे- फुले हे सारे खुणावत होते. पण तरीही त्याने सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी म्हणून खूप मेहनत घेतली. पैसेही मिळाले चांगले, घरचेही खूश होते. त्याच आनंदात चांगली मुलगी सांगून आली, लग्नही झाले. पण काही केले तरी त्याचे त्या सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात मात्र मन काही रमत नव्हते.
गेल्या काही दिवसांमध्ये मात्र बहुधा त्याचे ग्रहच फिरले असावेत, असे त्याच्याच अनेक सहकाऱ्यांचे मत झाले होते. काहींनी तर त्याला परोपरीने सांगण्याचाही प्रयत्न केला की, ग्रहशांतीचे उपाय कर.. कारण बॉस असलेल्या उमंगशी त्याचे सातत्याने खटके उडत होते. उमंगचे खोटे बोलणे त्याला बिलकूल आवडणारे नव्हते. पण काय करणार, तो बॉस असल्याने सारी दुनिया अर्थात अध्र्याहून अधिक ऑफिस त्याच्याच बरोबर होते. अखेरीस न राहवून त्याने नोकरीचा राजीनामा दिला, त्या वेळेस तर त्याला अनेकांनी वेडय़ातही काढले. बऱ्याच जणांचे त्या वेळेस ठाम मत झाले होते की, त्याची साडेसातीच सुरू असावी, अनेकांनी त्याला सांगून पाहिले, ‘‘ज्योतिषाकडे जा आणि त्यांचा सल्ला घे. सल्ला घेण्यात वाईट काय आहे, ते पण अखेरीस विज्ञानच आहे ना..’’
वयाच्या ऐन तिशीमध्ये हातची नोकरी गेलेली आणि त्यात जागतिक मंदीसदृश स्थिती त्यामुळे आता दुसरी नोकरी कोण देणार, असा प्रश्न होता. अनेकांनी त्याला सल्लाही दिला की, जाऊन उमंगची माफी माग. पण खरे बोलणाऱ्याने माफी का मागावी, यावर सत्यजित ठाम होता.
पण नंतर सहा महिन्याचा काळ नोकरीशिवाय गेल्यानंतर त्याच्याही मनावर उदासीच पसरलेली होती. हळूहळू तो नकारात्मक होत चालला आहे, असेच त्याला वाटत होते. स्वभावही काहीसा चिडचिडा झाला होता. आधी कधीही कुणालाही उलटून न बोलणारा तो आता सर्रास उलटून बोलत होता.. स्वतचे काय होते आहे, हेही त्याला कळत होते. अखेरीस त्यालाही ज्योतिषाकडे जावे, कुंडली काढावी असे वाटू लागले. त्याने काही मित्रांना गाठले. एकाने चांगल्या ज्योतिषाचा नंबर दिला आणि मग सत्यजित त्या दिवशी जायलाही निघाला. त्याच वेळेस समोरून प्रा. सावंत येताना दिसले. हे तेच सर होते, ज्यांनी त्याची निसर्गविषयीची उत्कंठा पाहून त्याला वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्राच्या वर्गाला उपस्थित राहण्याची परवानगी तो अकरावीत असतानाही दिली होती. ते म्हणायचे, आता कदाचित काही कळणार नाही पण कानावर जाऊ दे. इच्छा असेल तर मार्ग सापडेलच. पण नंतर सत्यजित सॉफ्टवेअरच्या मार्गावर गेला तेव्हा त्यांना वाईट वाटले होते.
‘‘कसे काय चाललेय?’’ सर समोर केव्हा आले ते त्याला कळलेच नाही. क्षणभर भांबावून गेलेल्या त्याचे काही तरी बिनसले आहे, हे सरांनाही जाणवले. त्यांनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला तेव्हा तर सत्यजितला रडूच कोसळले. आपले मन त्याने सरांकडे मोकळे केले.
सर म्हणाले, तुला या अवस्थेत कुंडली पाहावीशी वाटणे यात वेगळे काहीच नाही. पण अरे हातावरच्या रेषांपेक्षा, हातातली ताकद अधिक महत्त्वाची आहे. तुझी अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. मला आठवतोय तो रायगडावर वनस्पतीची वेगळी जात शोधणारा सत्यजित. तुझ्या तीव्र निरीक्षणशक्तीमुळेच आणि शोधक नजर व अभ्यासामुळेच ते शक्य झाले. तुझ्या कुंडलीतले सारे ग्रह व्यवस्थितच आहेत. फक्त तू जागा चुकलायस, म्हणतात ना, तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी!

विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
Twiter – @vinayakparab

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा