भारताची खगोल वेधशाळा असलेल्या अ‍ॅस्ट्रोसॅटच्या यशस्वी उड्डाणानंतर इस्रोचे अध्यक्ष किरणकुमार यांनी केलेले विधान खूपच महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘‘अमेरिकेने भारतावर घातलेल्या र्निबधांमुळे अनेक वर्षे आपल्याला उपग्रह तंत्रज्ञान नाकारले गेले. आपण ते इथे भारतातच विकसित केले. आणि आज आपण विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे त्याच अमेरिकेच्या चार उपग्रहांचे प्रक्षेपण करून त्यांना कक्षेत स्थिरही केले.’’ अमेरिकेने लादलेले र्निबध म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची मिळालेली संधीच या दृष्टिकोनातून भारतीय वैज्ञानिकांनी त्याकडे पाहिले आणि भारलेल्या राष्ट्रवादातून त्यांनी कंबर कसली. त्याची फळे आज देशाला चाखायला मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगातील फारच कमी देशांनी खगोल वेधशाळा अवकाशात स्थिर केल्या आहेत. नासाची खगोल वेधशाळा हबल ही त्यातील सर्वात मोठी. मात्र हबलसह सर्वच वेधशाळांमध्ये एक मर्यादा आहे. यातील प्रत्येकाची क्षमता ही काही विशिष्ट तरंगलहरींपुरती मर्यादित आहे. म्हणजेच इतर तरंगलहरींचा अभ्यास त्यांच्या मार्फत होऊ  शकत नाही. अगदी हबललादेखील ही मर्यादा चुकलेली नाही. या सर्वाच्या पुढे जाऊन इस्रोने अ‍ॅस्ट्रोसॅट विकसित केला. यात विविध प्रकारच्या सर्व तरंगलहरींचा अभ्यास करता येणार आहे. ही अशा प्रकारची जगातील पहिलीच खगोल वेधशाळा ठरली आहे. या निमित्ताने याही क्षेत्रात आपण नासाच्या एक पाऊल पुढेच टाकले आहे.

इस्रोने आजवर असे अनेक विक्रम केले आहेत. १० उपग्रहांचे प्रक्षेपण एकाच वेळेस करून ते त्यांच्या नियोजित कक्षेत स्थिर करणारा भारत हा एकमेव देश आहे. चांद्रयान आणि मंगळयान या जगातील सर्वात कमी खर्चाच्या मोहिमा होत्या. चांद्रयान मोहिमेच्या वेळेस तर नासाचे संचालक स्वत: इस्रोमध्ये उपस्थित होते. कमीत कमी खर्चात तेही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता मोहिमेची यशस्वी आखणी करून ती तडीस कशी न्यायची हे नासाने इस्रोकडून शिकण्यासारखे आहे, असे विधान त्यांनी केले होते. जगातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या नासानेही हे मान्य करावे, याशिवाय इस्रोच्या यशाला मिळालेली दुसरी पावती ती कोणती असू शकते.

विनायक परब

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrosat isro