तीन राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले आहेत. पुन्हा एकदा काँग्रेसी नेते प्रसिद्धी क्षितिजावर झळकू लागले आहेत. अर्थात अजून घोडेमैदान तसे दूरच आहे. पण असे असले तरी सर्वच पक्षांचा प्रवास मात्र आता २०१९च्या घोडेमैदानाच्या दिशेने सुरू झाल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे.
२०१८-१९च्या सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे वर्णनही अनेक विश्लेषकांनी निवडणूक जाहीरनामा असेच केले आहे. कारण पुढचा अर्थसंकल्प हा लोकसभा निवडणुकांमुळे तसा हंगामीच असणार आहे. त्यामुळे मतदारराजाच्या पारडय़ात जे काही टाकायचे त्यासाठी हा अर्थसंकल्प हीच सत्ताधारी भाजपासाठी खरी संधी होती. त्यामुळेच निवडणूक वचननाम्यात भरपूर आश्वासनांची खैरात केली जाते त्याप्रमाणे अनेक योजनांची आकर्षक मांडणी या अर्थसंकल्पात करण्यात आली. त्यांची अंमलबजावणी हा तर फारच लांबचा मुद्दा झाला, त्यांच्या नियोजनाचे काय याचेही उत्तर अर्थसंकल्पातून मिळत नाही. शिवाय यामध्ये सांगितलेल्या काही योजनांची फळे चाखण्यासाठी थेट नातवाच्या जन्मासाठीच वाट पाहायला लागावी एवढे अंतर आहे. (वाचा कव्हरस्टोरी) एकुणात काय तर हाती आला भ्रमाचा भोपळा अशीच अवस्था सामान्य मध्यमवर्गीय माणसाची झाली आहे. अर्थसंकल्पानंतर सुरू झालेल्या वाद-चर्चामध्ये एका महत्त्वाच्या बातमीकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले आहे. ही बातमीदेखील अर्थसंकल्पाइतकीच महत्त्वाची आहे. इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून के. सिवन यांनी पदभार स्वीकारला असून आता चांद्रयान- दोन या मोहिमेच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. चांद्रयान- दोन या मोहिमेकडून भारताच्या आणि भारताच्या या मोहिमेकडून जगाच्या खूप मोठय़ा अपेक्षा आहेत. जगभरातील वैज्ञानिक या मोहिमेकडे नजर ठेवून आहेत. म्हणूनच इस्रोच्या बंगळुरू येथील मुख्यालयातून बाहेर येणाऱ्या माहितीकडे वैज्ञानिकांचे कान आहेत. आपली प्रगती, विकास या साऱ्या गोष्टी इस्रो आणि पर्यायाने वैज्ञानिकांनी साध्य केलेल्या प्रयोगांवर अवलंबून असणार आहेत. प्रगतीच्या मुळाशी या प्रयोगांची आणि मोहिमांची व्याप्ती आणि परिणाम असणार आहेत.
दळणवळण हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व कळीचा मुद्दा आहे. त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान सर्वाधिक महत्त्वाचे असणार आहे. देशातील मोबाइलची संख्या ज्या वेगात वाढते आहे, त्याच वेगात त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये वाढ होणे हेही तेवढेच महत्त्वाचे असणार आहे. सध्या आपण वापरत असलेल्यांपैकी ८० टक्क्यांहून अधिक तंत्रज्ञान हे उपग्रह तंत्रज्ञानामधूनच विकसित करण्यात आले आहे. वॉिशग मशीनपासून ते मोबाइलपर्यंत सर्वत्र आपण त्याचाच वापर करतो आहोत. सध्या आपल्याला स्वप्नं पडताहेत ती, महासत्ता होण्याची. त्यासाठीही याच तंत्रज्ञानाची कास धरावी लागणार आहे. मात्र आपल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्या गरजा आणि अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी केली जाणारी तरतूद यामधली दरी वर्षांगणिक वाढतेच आहे. दिसायला केवळ तरतुदीचे आकडे हे गेल्या वर्षीपेक्षा वाढलेले दिसतात. पण त्यासोबत गरजेची आकडेवारी प्रसिद्ध होत नाही, त्यामुळे त्यातील तफावत सामान्यांपर्यंत पोहोचत नाही. सध्या सुरू असलेले आपले नित्यव्यवहार असेच अखंड सुरू ठेवायचे असतील तर सध्या देशाकडे ४३ उपग्रह अवकाशात उपलब्ध आहेत. पण प्रगती अखंड सुरू ठेवायची असेल तर इस्रोनेच केलेल्या गणतीनुसार आणखी ४३ उपग्रह असणे आजमितीस गरजेचे आहे. सरकारकडून पसे वेळेवर मिळाले आणि सारे काही सुरळीत झाले तरच अजून चार वर्षांमध्ये आपण ही संख्या पार करू शकतो. पण तोपर्यंत या चार वर्षांमध्ये आज अस्तित्वात असलेल्या उपग्रहांपकी काही निकामी झालेले असतील, तर काही त्या वाटेवर असतील. म्हणजे त्यांची जागा नवीन उपग्रहांनी घेणे ही नवीन गरज असणार आहे. आता आपल्याला प्रगतीच्या वाटेवर हे सारे सातत्याने करत राहावे लागणार आहे. कारण प्रगतीसाठी देशाला आवश्यक असणाऱ्या त्या प्राथमिक सुविधा ठरणार आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे.
एका बाबतीत मात्र आपण खूपच सुदैवी आहोत, ती म्हणजे आपल्याकडे बौद्धिक संपत्ती मुबलक आहे. मात्र वैज्ञानिकांच्याच क्षेत्रात असे लक्षात आले आहे की, बौद्धिक आव्हान फारसे नसेल तर अशी मंडळी मग विदेशामध्ये जाऊन नव्या बौद्धिक आव्हानांचा स्वीकार करतात. त्याला अनेकदा आपण ‘ब्रेन ड्रेन’ असे म्हणतो. अशा वेळेस या विद्वान संशोधकांनी देश सोडून जाऊ नये म्हणून त्यांना देशांतर्गत आव्हानात्मक काम द्यावे लागते. पहिल्या चांद्रयान मोहिमेच्या अनेक उद्दिष्टांपकी हेही एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते.
आता नवीन म्हणजे चांद्रयान- दोन ही मोहीमदेखील तेवढीच आव्हानात्मक असणार आहे. त्यासाठीही सर्व संशोधकांनी आता कंबर कसली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेमध्ये यान केवळ चंद्राला प्रदक्षिणा घालणार नाही तर याच यानातून एक लँडर चांद्रभूमीवर उतरणार आहे. त्यामध्ये असलेला रोव्हर, प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरून तेथे विविध प्रयोग करत माहिती गोळा करण्याचे काम करणार आहे. हे काम प्रचंड आव्हानात्मक असून अशा प्रकारचे काम भारतीय वैज्ञानिक प्रथमच करणार आहेत. गेल्या खेपेस भारताच्या चांद्रयानाने पहिल्याच प्रयत्नात चंद्राची कक्षा यशस्वीरीत्या गाठली होती. अशा प्रकारे पहिल्याच प्रयत्नात यश मिळविणारे भारतीय संशोधक हे जगातील पहिलेच होते. याही खेपेस त्यांनी आव्हानांची उंची अधिक ठेवली आहे. आजवर चांद्रभूमीवर उतरलेले लँडर्स आणि रोव्हर्स हे विषुववृत्ताजवळ उतरले होते. मात्र भारतीय मोहिमेतील लँडर-रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहेत. तिथे या रोव्हरला काम करण्यासाठी पृथ्वीवरील १४ दिवसांचा म्हणजेच चंद्रावरील एका दिवसाचा कालावधी लाभेल. कारण त्यानंतर तिथे १४ दिवसांची चांद्ररात्र सुरू होईल. या रोव्हरवरील यंत्रणा पुन्हा एकदा सूर्यप्रकाश आल्यानंतर सुरू होईल आणि तो काम करू लागेल, अशी अपेक्षा आहे.
अनेकदा असाही प्रश्न केला जातो की, जव्हार-मोखाडय़ात आजही भूकबळी होत असताना चंद्रावरची मोहीम कशासाठी? पण त्या वेळेस आपल्याला याचा पूर्ण विसर पडलेला असतो की, याच उपग्रह तंत्रज्ञानामध्ये त्यांच्या यातनाही कमी करण्याची ताकद आहे. शिवाय भूकबळी ही देशापुढील अनेक समस्यांपकी एक आहे. देशाला प्रगती करायची तर अर्थव्यवस्था गतिमान असायला हवी. त्या गतिमानतेसाठी इंधनाचा अखंड पुरवठा महत्त्वाचा असतो. एक दिवस या भूतलावरील तलजन्य पदार्थाचा साठा संपणार आहे. त्या वेळेस काय करणार? चंद्रावर असलेला हेलियम थ्री हे त्यावरचे उत्तर असणार आहे. तो तिथून पृथ्वीवर पाठवायचा तर तिथे वस्ती करावी लागेल. पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही. मग पाणी आणणार कुठून? भारताची चांद्रयान- एक ही मोहीम महत्त्वाची ठरली, कारण बर्फाच्या रूपातील पाण्याच्या अंशाचा त्या मोहिमेने शोध घेतला. या दुसऱ्या मोहिमेत पाण्याच्या संभाव्य साठय़ांचा, त्याचप्रमाणे हेलियम थ्रीच्या साठय़ांचाही शोध घेतला जाणार आहे. मानवी वस्ती करायची तर चंद्रावरचे वातावरण पक्के माहीत हवे, त्यासाठी चांद्रयान- दोनमध्ये प्रयोग केले जाणार आहेत.
आज हे सारे स्वप्नवत वाटत असले तरी भविष्यकाळ फार लांब नाही. १९२६ साली मोबाइल फोन हा स्वप्नवतच वाटत होता. विज्ञान कथा-कादंबऱ्यांमध्येच त्याची वर्णी होती, पण १९९५ साली याच भारतात तो वापरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हे स्वप्न आहे, असे म्हणून वैज्ञानिकांना भागत नाही. तर त्या स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टींचा वैज्ञानिक पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी अखंड अर्थपुरवठा हाही तेवढाच महत्त्वाचा असतो. म्हणून प्रगत देशांसारखीच आपल्याकडे वैज्ञानिक प्रयोगांना मिळणारी गंगाजळी अधिक असणे आवश्यक आहे. यंदाच्या वर्षी महत्त्वाकांक्षी चांद्रयान- दोन मोहीम असल्याने या आíथक तरतुदीमध्ये मोठी वाढ अपेक्षित होती. पण या अर्थसंकल्पामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानासाठीच्या तरतुदीमध्ये केवळ ३८८ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इस्रोच्या चांद्रयान- दोन मोहिमेचा खर्चही त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे वैज्ञानिकांच्या व देशाच्या महत्त्वाकांक्षेला आíथक इंधनाचा अखंड पुरवठा तेवढय़ाच सातत्याने लागणार याचे भान सरकारला ठेवावे लागेल. ..अन्यथा हाती चंद्र यावा ही केवळ स्वप्नवतच अवस्था असेल!
विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com