शाळेत असताना गणिताचा कितीही कंटाळा आला आणि गणिताचा पिच्छा सुटल्यानंतर कितीही हायसे वाटले तरी आयुष्यातील करिअरचे गणित मात्र प्रत्येकाला स्वतचे स्वतलाच सोडवावे लागते. कधी त्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध असतातही. पण प्रत्येक वेळेस ते आपल्यासाठी असतीलच असे नाही. आपण ज्या शाखेची किंवा व्यवसायाची अथवा क्षेत्राची निवड करू तिथे आयुष्यभर आपल्यालाच काम करायचे आहे, हे विद्यार्थ्यांनी पक्के ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण अनेकदा घरच्यांच्या आणि समाजाच्या अपेक्षा यांना बळी पडल्यामुळे विनाकारण मनस्ताप आणि अनेकदा अपयश हाती आल्याने नैराश्याच्या खाईत लोटल्यासारखी अवस्था होते. तिथे या मार्गाने जाण्याची अपेक्षा धरणारे कुणीच मदतीला येत नाहीत. या मार्गावरून स्वतलाच मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळेच त्या क्षेत्राची निवड करतानाच पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.
आई-वडील आपल्याला सांगतात त्या वेळेस त्यांच्या अनुभवानुसार ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान काळ बदललेला असतो, हेही विद्यार्थी आणि पालक दोघांनीही लक्षात घ्यायला हवे. पालकांनी त्यांच्या करिअरची निवड केली तो वीसेक वर्षांपूर्वीचा काळ आणि आता उपलब्ध असलेल्या संधी यात कमालीचे अंतर आहे. आताची पिढी ही पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक हुशार आहे. शिवाय त्यांना नव्या संधी खुणावत आहेत, अशा वेळेस धोपटमार्गाचा आग्रह पालकांनी सोडण्यास हरकत नाही. फक्त नव्या क्षेत्रासंदर्भात निर्णय घेताना तो चुकणार नाही, यासाठी मुलांना योग्य ते तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल, याची काळजी घ्यावी.
पैसे तर अनेक प्रकारांनी कमावता येतात, पण ते कमावता आपल्याला समाधान मिळत असेल तर आयुष्याचे गणित जुळून यायला वेळ लागणार नाही. पण त्यासाठी काही गुण आपल्या अंगी बाणवणे महत्त्वाचे आहे. त्यातील सर्वात पहिला गुण म्हणजे आपल्याकडे दूरदर्शीपणा असला पाहिजे. आपली नजर आणि वाचन चौफेर असेल तर कोणत्या क्षेत्राला उज्ज्वल भविष्य आहे, हे आपल्याला लक्षात येऊ शकते. त्यासाठीही तज्ज्ञांची मदतही घेता येईल.
कोणत्याही क्षेत्रामध्ये यशाचा शॉर्टकट उपलब्ध नाही, मेहनतीलाच यशाचे कोंदण लाभते. शॉर्टकटमधून येणाऱ्या गोष्टी दीर्घकाळ टिकत नाहीत. तुमचा दृष्टीकोन हा शैक्षणिक स्वरूपाचा (अॅकेडमिक) असेल तर मग क्षेत्र कोणतेही असले तरी येणाऱ्या अडचणींवर तुम्ही पद्धतशीरपणे मात करण्याची क्षमता राखता. कष्टाला घाबरू नका किंवा कंटाळा करू नका आणि आळसाला जवळ फिरकू देऊ नका!
अपयशाला घाबरू नका, त्याला निधडय़ा छातीने सामोरे जा. गणितामध्ये ज्याप्रमाणे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असतात त्याचप्रमाणे आयुष्यात चढ-उतार असतात हे लक्षात ठेवा. त्यांना घाबरण्याचे कारण नाही. फक्त त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. म्हणजे प्रत्यक्षात तशी वेळ येईल, तेव्हा तुम्ही आधीच सज्ज असाल! आपले शरीर हे करिअरसाठीचे पहिले माध्यम आहे, हे लक्षात ठेवा, आरोग्य राखा. बाकी सारे त्यानंतरच येते. अन्यथा पैसे, समाधान आणि प्रतिष्ठेच्या मागे धावताना आपण आयुष्यच हातून घालवून बसतो आणि मग विलंब झालेला असतो. आयुष्याचे गणित चुकवू नका, त्याची सुरुवात निरोगी शरीर आणि खंबीर मनापासून होते, हे कायम लक्षात ठेवा!
शुभास्ते पन्थान: सन्तु!
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com, twitter – @vinayakparab