निहार आणि निहारिका या दोन्ही जुळ्या भावंडांनी काही तरी वेगळे करावे, असे त्यांच्या आई-वडिलांना वाटत होते. म्हणूनच दहावीची परीक्षा झाल्यानंतर सुट्टी सुरू होत असतानाच त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना एकत्र बसवून करिअरबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. १९२५ साली जन्मलेले आजोबा आताच्या या मुलांना करिअरबाबत काय सांगणार म्हणून त्यांचा सहभाग चर्चेत नको, असे आई-बाबांनीच ठरवले होते. त्यामुळे आजोबाही लांबूनच वर्तमानपत्र चाळताना चर्चा ऐकत होते. आई-बाबांना जे व्हावेसे वाटत होते, पण शक्य झाले नाही त्या पर्यायांवर आधी विचार झाला. मग बाबा म्हणाले, एकाने तरी सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हा म्हणजे पैसे घरी कमी पडणार नाहीत. मुलींनी शक्यतो, फूड सायन्स वगैरे काही तरी करावे, असे आईचे म्हणणे होते. मुलांना मात्र यातले काहीच पटत नव्हते. तासभरानंतर अखेरीस आजोबांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि ते चर्चेत सहभागी झाले. ते म्हणाले, ‘‘पालकांनी सर्वात पहिली गोष्ट टाळायला हवी ती म्हणजे त्यांना जे जमले नाही किंवा शक्य झाले नाही ते मुलांवर थोपवू नका. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही दहावी- बारावीत होतात त्या वेळची परिस्थिती आणि आताची यात जमीनअस्मानाचे अंतर आहे. तुमच्याच वेळचा तसाच विचार या एकविसाव्या शतकातील मुलांनी का करावा? त्यांच्या हातात मोबाइल आहेत, कॉम्प्युटर हाताळताहेत त्याच्यातील प्रगत विषय त्यांनी करावा. सॉफ्टवेअर प्रकरण आता जुने झालेय. जग खूप पुढे गेलेय. बदला आता. कॉम्प्युटर असो अथवा मोबाइल, दोघांनाही सायबर सुरक्षेची गरज असते. मग तुमच्याच भाषेत सांगायचे तर कॉम्प्युटरवर सतत खटपटी लटपटी करणाऱ्या निहारिकाने एथिकल हॅकर का नाही व्हायचे? नव्या जमान्याप्रमाणे बदला आता. निहारला हस्तकलेची चांगली आवड तर आहेच, पण तो कुणाच्याही वाढदिवसाला किंवा एरवी भेटवस्तूंसाठी उत्तम पॅकिंग करत असेल आणि दर खेपेस त्या पॅकिंगमध्ये नावीन्य असेल तर मग त्याने सॉफ्टवेअर का करायचे? त्याने पॅकेिजगमध्ये पदवी घ्यायला काय हरकत आहे? त्यामध्येही उत्तम पैसे आहेत.’’
आजोबांच्या विचारांतील ही आधुनिकता त्यांच्या तुफान वाचनातून आली होती. हाताला लागेल त्याचे वाचन आजोबा करायचे. पण केवळ करिअरचे पर्याय देऊन आजोबा थांबले नाहीत, तर त्यांनी एक महत्त्वाचा इशाराही दिला, केवळ मुलांनाच नव्हे तर अद्याप १५ वर्षांची नोकरी शिल्लक असलेल्या आई-बाबांनादेखील! ते म्हणाले, ‘‘महत्त्वाचे म्हणजे पुढल्या पाच-दहा वर्षांत होणाऱ्या बदलांमध्ये पहिल्यांदा तुम्हाला मोठय़ा मंडळींना तुमची नोकरी सांभाळावी, तगवून ठेवावी लागणार आहे. आताचा जमाना हा अपडेशनचा आणि त्यानंतर अपग्रेड होण्याचा आहे. मुळात अपडेट म्हणजे काय आणि अपग्रेड म्हणजे काय यातील सूक्ष्म भेदही समजून घ्यावा लागेल. कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर त्याची ऑपरेटिंग सिस्टम सतत अपडेट किंवा अपग्रेड होत असते. तेच आता या जमान्यात तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांना लागू असणार आहे, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात का असेना! अपडेशन आणि अपग्रेड हे परवलीचे शब्द असतील आणि नोकरीत टिकायचे, करिअरमध्ये अग्रेसर राहायचे तर रिडिफाइन आणि रिस्किलिंग हे आत्मसात करावे लागेल. म्हणजे भविष्यात सर्वच क्षेत्रांमध्ये तुम्हाला सतत काही वर्षांनी स्वत:चाच आढावा घेत, आपली कौशल्ये परजावी लागणार आहेत; नाही तर सृष्टीचा आणि नव्या युगाचा नियम सांगतो.. अन्यथा नष्ट व्हा!’’
विनायक परब
@vinayakparab, vinayak.parab@expressindia.com