माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे सध्या सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या कारवाईमुळे गजाआड आहेत. दुसरीकडे किंगफिशरफेम विजय मल्ल्या राज्यसभेत हजेरी लावून थेट सर्व तपास यंत्रणांना गुंगारा देत परागंदा आहेत. यापूर्वी विरोधी पक्षनेते असताना बेकायदा बांधकामांवर तुटून पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बेकायदा बांधकामांमुळे बिल्डर नव्हे तर गोरगरीब जनताच अडचणीत आल्याचा साक्षात्कार अलीकडेच झाला आणि मग त्यांनी राज्यातील बेकायदा बांधकामे अधिकृत करण्याचा परोपकारी निर्णय घेतला, त्यामुळे आता परोपकारी गंपूनंतर परोपकारी देवेंद्र असा धडाच बहुधा पाठय़पुस्तकात समाविष्ट केला जाईल, असे दिसते. हा निर्णय परोपकारी आणि खास करून गरिबांच्या हिताचाच कसा आहे, हे सांगण्यास व त्या निर्णयाची पाठराखण करण्यात मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कसर सोडलेली दिसत नाही. एकीकडे हे सुरू असतानाच पुन्हा एकदा राज्य सरकारने मेट्रोच्या कारशेडसाठी आरेचे जंगल पणाला लावले आहे. त्यासाठी हे जंगल नाहीच, अशी सोईस्कर बतावणीही यापूर्वी अनेकदा करून झाली. पण त्यानंतर थेट केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीच मुंबईत येऊन केवळ ३०० झाडेच कापली जाणार व त्याहीपेक्षा अनेक पटींनी अधिक झाडे लावली जाणार, अशी घोषणा करत मेट्रोचा मार्ग मोकळा केला. अर्थात केवळ झाडे कापणे एवढय़ापुरताच हा मुद्दा मर्यादित नाही.
दुसरीकडे नवी दिल्लीला जाणारा मालवाहतुकीचा रेल्वे मार्ग हादेखील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातूनच नेण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले. या रेल्वे मार्गाला वन खात्याचा असलेला विरोध बाजूला सारून हा निर्णय घेतला. या संपूर्ण निर्णयप्रक्रियेमध्ये आपण परिसंस्थेचे नेमके काय करतो आहोत, याचा विचार करण्याचेही भान सरकारला राहिलेले नाही. सरकारी पातळीवर निर्णय आधी होतात आणि मग त्यांच्या पुष्टय़र्थ अहवाल तयार केले जातात, असाच आजवरचा अनुभव आहे. समोर आलेल्या अहवालानंतर प्रकल्प बासनात गुंडाळण्याचा निर्णय झाल्याची उदाहरणे आपल्याकडे फारशी नाहीत. तशी उदाहरणे आठवण्यासाठी डोक्यावर खूप ताण द्यावा लागेल आणि त्यानंतरही ती आठवतीलच याची कोणतीही शाश्वती नाही, अशीच अवस्था आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा