फ्रान्स, रशिया या देशांमधील राज्यक्रांती आपल्याला सुपरिचित आहे. २०११ साली मध्य पूर्वेतही उठाव झाला. कधी तरी एकदा भारतातही अशीच एक दिवस अचानक क्रांती होईलच, असे अनेक जण ठासून सांगतात; त्या त्या वेळेस काही समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ नेहमी हा युक्तिवाद खोडून काढताना सांगतात की, भारतात असे कधीही होणार नाही. कारण या देशाचा डीएनए सम्मीलनाचा- एकरूपतेचा आहे. आजवर जगभरात विविध ठिकाणी धार्मिक आक्रमणे झाली, स्थानिकांचे शिरकाणही झाले. भीतीने धर्मातरण झाले आणि आधीच्या धर्माचा मागमूसही राहिला नाही. धार्मिक क्रांती असे नावही त्याला देण्यात आले. धर्मातरण भारतातही झाले पण परिणाम वेगळा आहे. कारण तो इथल्या मातीचा परिणाम आहे. इथली मातीही सम्मीलनाची- एकरूपतेचा गुण ल्यालेली आहे. त्यामुळे इथे माणसाची ‘सांस्कृतिक स्मृती’   पिढय़ान्पिढय़ा कायम राहते. ‘सांस्कृतिक स्मृती’   ही मानववंशशास्त्रीय संकल्पना आहे.

मुंबई विद्यापीठातील बहिशाल शिक्षण विभागांतर्गत काम करणाऱ्या पुरातत्त्व केंद्रातर्फे अलीकडेच साष्टी म्हणजेच प्राचीन मुंबईचे पुरातत्त्वीय गवेषण करण्यात आले. यामध्ये मुंबईतील ख्रिस्ती बांधवांनी पिढय़ान्पिढय़ा जपलेला ‘सांस्कृतिक स्मृती’चा मुद्दा अधोरेखित झाला. येथील ख्रिस्ती बांधव नित्यनैमित्तिक जीवनात अनेक बिगरख्रिस्तीपरंपरांचे पालन करताना दिसतात. ते ठिकाण मग धारावी असो, भांडुप-कांजूर किंवा मग पश्चिम किनारपट्टीवरील मढ-गोराईचा परिसर. तिथे असलेला आगरी-कोळी ख्रिस्ती समाज ही ‘सांस्कृतिक स्मृती’ अभिमानाने जपताना दिसतो. या परंपरा त्यांच्याकडे वंशपरंपरेने आलेल्या असून त्याचा त्यांना रास्त अभिमानही आहे. अनेकदा खासकरून त्यांच्या लग्नविधीमध्ये त्यांचे वेगळेपण दिसते.

मुलगी किंवा मुलगा यांच्यापैकी कुणी तरी एक जण धर्मातरण करतो. अर्थात तेही इथल्या समाजासाठी नेहमीचेच आहे. त्या धर्मातरामुळे त्यांच्या नित्य जीवनात कोणताही विशेष फरक पडत नाही. कारण दोघांच्या प्रथा-परंपरा साधारण सारख्याच आहेत. हिंदूू आणि ख्रिस्ती यांचे इथे सौहार्दाचे संबंध आहेत. दोघांचेही सण तेवढय़ाच उत्साहात इथे साजरे होतात आणि त्यात दोघांचाही सहभाग तेवढाच असतो. हे काही केवळ मुंबईपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्रात मग ते ख्रिस्ती बांधवांची संख्या अधिक असलेले नगर असो, वसई किंवा मग सावंतवाडीही असो; सर्वत्र हाच अनुभव येतो. म्हणूनच तर वसईत माघी गणेशोत्सव मंडळ नाताळगोठय़ाचा देखावाही सादर करताना दिसते. सावंतवाडी आणि नगरमध्येही असाच सहभाग दिसतो. फादर थॉमस स्टिफन्सने लिहिलेले ‘ख्रिस्तपुराण’ही हाच संदेश आपल्याला देते.

आता तर अनेक हिंदूू घरांमध्येही ख्रिसमस ट्रीची सजावट असते. जिवलग मित्र हिंदूू असल्याने त्याच्या दिवाळीत जसा ख्रिश्चन मित्राच्या घरी कंदील लागतो, तशीच नाताळात हिंदूू मित्राच्या घरी चांदणी लागते..

हाच आपल्या भारतीय मातीचा विशेष अधोरेखित करीत यंदाचा नाताळ साजरा व्हावा म्हणून हा ‘लोकप्रभा’चा खटाटोप.

नाताळ व नववर्षांच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
vinayak-signature
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com