विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
ऑस्ट्रियाने चार दिवसांपूर्वीच टाळेबंदी जारी केली. जर्मनीमध्येही काटेकोरपणे नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा टाळेबंदी जाहीर करावी लागेल असा इशारा सरकारने दिला आहे. नेदरलँड्स, स्लोव्होकिया आदी देशांनी लसीकरण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे तर बेल्जिअम आणि युनायडेट किंगडममध्ये करोना रुग्णसंख्येमध्ये चिंताजनक वाढ होते आहे. आता एकूण जगभरातील करोना रुग्णांपैकी दोनतृतीयांश संख्या ही युरोपातीलच असेल इतपत वाढ सातत्याने होते आहे. ही वाढ अशीच होत राहिली तर येत्या मार्चअखेपर्यंत कोविडमुळे मृत्यू झालेल्या युरोपिअन नागरिकांची संख्या २० लाखांच्या घरात पोहोचेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुन्हा टाळेबंदी लागू होण्याच्या भीतीने व्हिएन्ना, ब्रुसेल्स, रोमच्या रस्त्यावर उतरून नागरिकांनी निदर्शनेही केली. एकुणात पुन्हा एकदा करोनाच्या या डेल्टा प्रतिरूपाने युरोपावर चिंतेचे मळभ दाटले आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये युरोपात अनेक देशांमध्ये र्निबध हटविण्यात आले आणि करोना हद्दपारच झाला आहे जणू अशाच थाटात सर्व व्यवहार सुरू झाले. सध्याचा करोनाफटका हा प्रामुख्याने त्यामुळेच आहे, असे संशोधकांना वाटते. अंतरनियमन आणि मुखपट्टीला रजाच देण्यात आली. शिवाय युरोपात आजही लसीकरणाला मोठय़ा प्रमाणावर विरोध होतो आहे. त्यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. करोनाच्या नव्या उद्रेकानंतर या आंदोलनांना बळच मिळाले असून ‘लसीकरणानंतरही करोना झालेल्यांची मोठी संख्या’ ही या मुद्दय़ाच्या प्रसारार्थ वापरली जात आहे. ‘लसीकरणानंतरही करोना होतोय तर मग लस घ्याच कशासाठी?’ असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मुळात लसीकरण हाच एकमेव करोनाला सामोरा जाण्याचा शास्त्रीय मार्ग असून लसीकरणानंतर करोना होणारच नाही, असे कोणत्याही संशोधकाने कधीही सांगितलेले नाही. पुन्हा करोना होण्याची शक्यता कमी असेल, झालाच तर त्याची तीव्रताही कमी असेल आणि तो जीवघेणा ठरणार नाही यासाठी हे लसीकरण होते. शिवाय लसीकरणानंतरचा मृत्युदर जगभरात सर्वत्र कमी आहे, त्यावरून ते सिद्धही झाले आहे. भारतात अशिक्षितांची संख्या किंवा अल्पशिक्षितांची संख्या युरोपच्या तुलनेत अधिक असतानाही एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विरोध झाला नाही, हे महत्त्वाचे.
करोनाउद्रेक युरोपात झालाय त्यामुळे आपण घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे म्हणून चालणार नाही. तर या उद्रेकातून धडा घेऊन आपण वाटचाल करायला हवी. लसीकरणाच्या दोन मात्रांचा परिणाम हा वर्षभरासाठीच चांगला असेल असे संशोधकांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने करोनायोद्धय़ांना वर्धक लसमात्रा तातडीने देण्यासंदर्भात पावले उचलायला हवीत. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाचा निर्णयही तेवढय़ाच तातडीने घेणे आवश्यक आहे. कारण करोनाच्या या नव्या उद्रेकामध्ये लागण झालेल्यांत लहान मुलांची संख्या अधिक आहे. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर लहान मुलांना लागण होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. सध्याचे जग हे एकमेकांशी घट्ट जोडलेले असे जग आहे. इथे माणसांचे चलनवलन खूप मोठय़ा प्रमाणावर होते. अनेक देशांनी आपापल्या सीमा खुल्या केल्यानंतर आवकजावक वाढली आहे. आपल्याकडेही महाराष्ट्र आता र्निबधमुक्त होण्याच्या दिशेने पावले टाकतो आहे. नेमकी हीच वेळ आहे की, र्निबध कमी करताना किंवा हटवितानाही करोना नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पाहायला हवे. कारण करोनाने अनेकांचे ‘होत्याचे नव्हते’ केले आहे. पुन्हा त्या टाळेबंदीच्या मार्गाने जाणे परवडणारे नसेल त्यामुळे युरोपामधील या उद्रेकातून धडा घेत पुढची वाटचाल करायला हवी!