पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्याबद्दल आणखी काही महिने तरी चर्चा सुरूच राहील. दरखेपेस दहशतवाद्यांनी हल्ला केला की, मग आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेत आपण ती कडेकोट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक हल्ल्यानंतर हे असे होणे ही आता नागरिकांसाठीही नित्याची बाब झाली आहे. पठाणकोट हल्ल्याच्या या घटनेनंतर दहशतवाद्यांची पाकिस्तानातून होणारी घुसखोरी रोखण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खरे तर घुसखोरी प्रकरणाची सर्वाधिक चर्चा झाली ती, कारगिल युद्धाच्या वेळेस. त्यानंतर संपूर्ण सीमारेखा सील करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि पूर्ण सीमेवर काश्मीरमध्ये कुंपण घालण्यात आले. या कुंपणावर मानवी हालचाल टिपणारे सेन्सर्सही बसविण्यात आले. कुंपणामधून आपण विद्युतप्रवाह खेळता ठेवला. त्याचा फायदा म्हणजे कारगिलनंतर घुसखोरीचे प्रमाण खूपच कमी झाले. पण आपण एखादे नवे तंत्र काढले आणि वापरले की, दहशतवादीही त्यावर मात करण्याचा मार्ग शोधतात. कुंपणावर मात करून ते आत भारतीय हद्दीत प्रवेश करतात. अनेकदा निसर्गही यात त्यांना साथ देतो. काश्मीरमधील बर्फ वितळताना घुसखोरी करणे त्यांच्यासाठी खूप सोपे जाते. अशा वेळेस आपल्याला ती रोखणे हे अनेक कारणांनी कठीण जाते.
पठाणकोटसारखे हल्ले झाले की, समस्त भारतीय फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियावर संतप्तपणे व्यक्त होतात. कुंपण आहे मग दहशतवादी घुसतातच कसे भारतात, हा प्रश्न विचारणे म्हणजे आपणच आपले अज्ञान प्रकट करण्याचा प्रकार असतो. कारण आपण गृहीत धरलेले असते ते मुंबई- पुण्याकडे जमिनीवर घालतात तसे कुंपण. काश्मीरमधील कुंपण, तेथील भौगोलिक परिस्थिती याची आपल्याला बिलकुल जाण नसते.
काश्मीरमध्ये भूगोलाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. किंबहुना म्हणूनच काश्मीरचा प्रश्न हा भूराजकीय आहे, असे म्हटले जाते. या प्रश्नाचे मूळ हे काश्मीर आणि पाकिस्तान या दोन्हींच्या समस्यांचे मूळ असलेल्या वीज आणि पाणी या दोन घटकांशी जोडलेले आहे. यातील पाण्याचा भाग खूप महत्त्वाचा आहे. पाकिस्तानबरोबरच्या आपल्या सीमारेखेचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे ही सीमारेखा जम्मू- काश्मीर आणि पंजाब परिसरामध्ये अनेक ठिकाणी चक्क नदीमधून जाते. एखाद्या देशाची सीमा ज्या वेळेस अशा प्रकारे नदीमधून जाते तेव्हा तिच्या रुंदीपैकी अर्धा भाग एका तर उर्वरित दुसरा भाग दुसऱ्या राष्ट्राच्या सीमेत येतो, असे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानण्याचा दंडक आहे. याचाच अर्थ चिनाब, मनावर तवी, सिंधू किंवा किशनगंगा या सर्व नद्यांचे पात्र पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये अनेक ठिकाणी विभागले गेले आहे. प्रत्यक्ष नदीमध्ये तर सीमेवरचे कुंपण घालणे कुणालाच शक्य नाही. पण मग सातत्याने होणारी ही घुसखोरी रोखण्यासाठी आपण नेमके काय करतो, हे आपण कधी तरी एकदा समजून घ्यायला हवे. तत्पूर्वी आपल्याला काश्मीरचा भूगोलही समजून घ्यावा लागेल.
काश्मीरमध्ये सर्वत्र आपल्याला भुसभुशीत माती पाहायला मिळते. लडाखसारख्या भागात तर अनेक ठिकाणी चक्क वाळूच दिसते. जी वाळू एरवी समुद्रकाठी असायला हवी ती समुद्राचा मागमूसही नसलेल्या काश्मीरमध्ये कशी आली, याचा शोध घेतला असता लक्षात येते की, सध्या दिसणारे पाच खंड हे एकमेकांच्या जवळ किंवा जोडलेले होते, त्या वेळेस गोंडवन आणि लॉरेशिया या दोन मोठय़ा भूभागांमध्ये तेथिस महासागर वसलेला होता. गोंडवनाचे तुकडे होत असताना त्याचे आकारमान हळूहळू कमी होत गेले आणि मग तो दीर्घकाळ भारताच्या उत्तरेकडील बाजूस चीनच्या पूर्वेपासून ते अगदी पार युरोपपर्यंत कमी आकारमान होत पसरलेला होता. दोन भूखंडांचे एकमेकांवर घर्षण होऊन ज्या वेळेस हिमालयाची निर्मिती झाली त्या वेळेस तो पृथ्वीच्या पोटात गडप झाला आणि त्याच्या वाळूतून हिमालयाची निर्मिती झाली. त्यामुळेच काश्मीरमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर वालुकामय प्रदेश पाहायला मिळतो. ही वालुकामय परिस्थिती आपल्या संरक्षणासाठी खूप मोठा अडसर ठरते.
नदीपात्रात कुंपण घालणे अशक्य असल्याने मग आपण आपल्याच सीमावर्ती भागात काही किलोमीटर्स आत संरक्षक कुंपण अनेक ठिकाणी घातले आहे. नदीच्या किनारी तर कुंपण घालणे शक्यच नसते, कारण सकाळी खोलवर घातलेला खांब संध्याकाळपर्यंत वाळूच्या अंतर्गत हालचालीने वाकलेला किंवा कललेला असतो. त्यामुळे मग आपल्याच भागात आतमध्ये जिथे भूरचना व्यवस्थित आहे, अशा ठिकाणी आपल्याला कुंपण घालावे लागते. कारगिलच्या युद्धानंतर आपण अशा प्रकारे घालण्यात आलेले कुंपण पूर्ण केले, त्यावर मानवी घुसखोरी लक्षात येण्यासाठी सेन्सर्सही बसविले, त्यानंतर घुसखोरीमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे.
मात्र अनेकदा हे कुंपणही अत्युच्च तंत्रज्ञानाच्या वापरानंतर दीर्घकाळ टिकणे मुश्कील असते असे लक्षात आल्यावर, सीमेवरची ही अडचण लक्षात घेऊनच भारताने आता त्यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी एकत्र येऊन लेझर कुंपण तयार केले आहे. हे लेझर किरणांचे असल्याने ते उखडून निघण्याची भीती नाही. शिवाय घुसखोरी झालीच तर घुसखोरी होत असतानाच मोठी इशाऱ्याची घंटा वाजण्याची सोयही त्यामध्ये आहे. त्यामुळे घुसखोरी लगेचच लक्षात येईल. पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्यानंतर तातडीने पुन्हा एकदा या लेझर कुंपणाकडे सर्वाचेच लक्ष गेले. कारण पंजाबातील उज्ज नदीमधून आपली सीमारेखा जाते. हीच नदी पार करून दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केला असे नंतरच्या तपासात लक्षात आले. त्यामुळे आता पंजाब सीमेवर हे लेझर कुपण सर्वत्र बसविण्यात येणार आहे. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी भेट दिली, त्या वेळेस त्यांच्या भेटीच्या आधी या परिसरात लेझर कुंपण तातडीने बसविण्यात आले. आता पंजाबातील सीमेवर असलेली तब्बल ४० ठिकाणे अशी निवडण्यात आली आहेत, ज्या ठिकाणाहून घुसखोरी होण्याची शक्यता आहे. त्यातील केवळ पाच ठिकाणी सध्या लेझर कुंपण अस्तित्वात आहे. मात्र येणाऱ्या काळात ही सर्वच्या सर्व ४० ठिकाणे लेझर सीमाबंद करण्यात येणार आहेत. अर्थात त्याने दहशतवाद संपणार नाही. तो कमी करण्यासाठी किंवा संपविण्यासाठी त्याच्या मुळाशी जावे लागेल.
पाकिस्तानशी सततचा असलेला संवाद आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य हे यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे असेल. आर्थिक ओढग्रस्तीमध्ये अडकलेल्या पाकिस्तानला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. शत्रूला मदत का करायची, असा प्रश्नही त्यावर कुणी करू शकेल. शत्रूच्या ठिकाणी रिकामे हात व रिकामी डोकी राहणार नाहीत याची काळजी घेणे सामरिकशास्त्रामध्ये आवश्यक असते. कारण रिकामे डोके म्हणजे भुताचे घर. अशी डोकी दहशतवादाच्या दिशेने जातात. शिवाय प्रगतीचा आर्थिक मार्ग सापडला की, लोक वाईट मार्गाने फारसे जात नाहीत, असा जगभरातील सार्वत्रिक अनुभव आहे. काश्मीर प्रश्नावर सध्या दहशतवाद्यांनी आक्रमक होण्याचे महत्त्वाचे कारणही याच्याशीच संबंधित आहे. काश्मीरमधील पायाभूत सुविधा आणि आर्थिक प्रगतीकडे लक्ष दिल्यानंतर काश्मीरमधील नवीन पिढीला आता विकासाची स्वप्ने पडत आहेत. तब्बल २५-२६ वर्षे दहशतवादाच्या छायेखाली राहिल्यानंतर पडणारी ही स्वप्ने खूप मोलाची आहेत. त्यामुळेच पूर्वी दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात मिळणारी सरसकट मदत आता कमी झाली आहे. कारण भारतासोबत राहण्यात हित आहे, याची जाणीव खोऱ्यामध्ये हळूहळू का होईना रुजते आहे, हे भारतीय म्हणून आपल्या सर्वासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
म्हणूनच भारतातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या नासकॉमने पाकिस्तानला या क्षेत्रात उभे राहण्यासाठी दिलेला मदतीचा हात महत्त्वाचा ठरतो. फक्त त्याचबरोबर हा मदतीचा हात देताना आपला हात सतत वरच्याच बाजूला असेल याची काळजीही घ्यावी लागेल. कारण गेल्या काही वर्षांत कमीतकमी मजुरीत काम करणारे म्हणून काहींनी बांगलादेश आणि पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना पसंती दिली आहे. अर्थात त्याने आपण घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण कौशल्याच्या मुद्दय़ावर सध्या आपणच सरस आहोत. पण पुढे जायचे आणि दहशतवादाची भीती कमी करायची तर असे डिजिटलच नव्हे तर विविध प्रकारची दरी कमी करण्याचे प्रयत्नही आपल्याला कुंपण पक्के करताना घ्यावे लागणार आहेत, याचेही भान ठेवावेच लागेल!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab