यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सरकारला पूर्ण बहुमत नसल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घेता आले नाहीत, याची खंत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अखेरच्या काळात व्यक्त केली होती. त्यांना प्रामुख्याने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घ्यायचे होते. त्यानंतर प्रचंड बहुमताने भाजपाचे मोदी सरकार निवडून आले. एरवीही अर्थशास्त्राचे गोडवे गाणारे मोदी आता अर्थव्यवस्थेतील सुधारणा वेगात रेटतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी अपेक्षित वेग घेतलेला नाही. निश्चलनीकरण आणि जीएसटीसारखे दोन महत्त्वाचे निर्णय मात्र त्यांनी घेतले. मोदी हे अर्थव्यवस्थेचे महत्त्व पक्के जाणणाऱ्या, व्यापारउदीम महत्त्वाचा मानणाऱ्या गुजरातेतून आलेले असल्याने उद्योजक त्यांच्यावर खूश होते. मात्र आता त्यांनी गेल्या काही दिवसांत प्रत्येक गोष्ट ही अर्थव्यवस्थेच्या आणि व्यापारउदीमाच्या नियमांमधूनच पाहण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका अलीकडेच देशभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या शिक्षण व संशोधन संस्थांना बसण्याच्या बेतात आहे. सरकारने या संस्थांच्या निधीपुरवठय़ात ३० टक्के कपात केली असून तो निधी संस्थांनी स्वत: उभारावा, असे सांगितले आहे. एखाद्या उद्योग संस्थेला असा नियम लावणे वेगळे आणि संशोधन संस्थांना असा नियम लावणे वेगळे. मात्र याचे भान सरकारला नाही. अर्थात याचा काहीसा दोष हा वैज्ञानिकांकडेही जातो. महत्त्वाचे म्हणजे ही मागणी काही सरकारकडून अशी पहिल्यांदाच आलेली नाही. तर तुम्ही करता त्याचा समाजाला उपयोग काय, असा प्रश्न आजवर अनेकदा वैज्ञानिकांना आणि त्यांच्या संस्थांना अज्ञानापोटी विचारला गेला आहे. त्यामुळे समाजाचा पाया विज्ञानाच्या बळावर पक्का करणे आणि ज्ञानाच्या प्रवाहाचा स्रोत अखंड वाहत राहील हे पाहणे हे प्रगतीसाठी किती महत्त्वाचे आहे, ते समाजाला, राजकारण्यांना पटवून देण्यात आजवर वैज्ञानिक अनेकदा कमीच पडले आहेत. राजकारणी तर प्रश्न विचारणारच. हा प्रश्न विचारणारे मोदी हे काही पहिलेच पंतप्रधान नाहीत, हा प्रश्न डॉ. मनमोहन सिंगांनीही विचारला होता, विचारण्याची पद्धत मवाळ होती इतकेच. शिवाय हा फक्त भारतातच विचारला जातो असे नाही तर जेएफ केनडी आणि आयसेनहॉवर यांचाही अशाच प्रकारचा प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये समावेश होता. राजकारणी प्रश्न विचारणारच, कारण गरव्यवहारांचा आरोप टाळण्यासाठी त्यांना तरतुदी किती व कशा योग्य होत्या, त्याचे समर्थन तरी करायचे असते किंवा मग हात धुऊन घेण्यासाठीचे मार्ग तरी समजून घ्यायचे असतात. अन्यथा, ते दमडीही देणार नाहीत, हे वास्तव आहे. फक्त पुढचा प्रश्न असा आहे की, मग हाच प्रश्न त्यांनी राजकारणापासून ते इतर सर्वच क्षेत्रांना त्याच पद्धतीने विचारायला हवा. ते मात्र होत नाही. राजकारण आणि राजकारणी यांच्यावर होणाऱ्या खर्चातून समाजाला आणि देशाला काय मिळते, हा प्रश्नही कोणी विचारत नाही. आजारी किंवा कर्जाच्या रकमांचे डोलारे उभे राहिलेल्या बँकांचे काय? त्यांना असे का सांगितले जात नाही की, तुमचे तुम्ही पाहा. त्या तर याच व्यवसायात असून त्यांनी केलेल्या उपद्व्यापांमुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. मग जनतेचे पसे तिथे असे का वापरायचे, असे प्रश्न विचारण्याच्या फंदात तिथे कुणी पडत नाही. कारण तिथे हितसंबंधदेखील गुंतलेले असतात. या सरकारी छत्राखाली असलेल्या बँकांचा वापर राजकारण्यांना त्यांच्या विविध मोहिमा आणि उपक्रमांसाठी करता येतो. त्या तुलनेत वैज्ञानिकांचा वापर तो काय आणि कसा करणार? त्यामुळे इथे हितसंबंध जपण्याचा प्रश्नच येत नाही.
सरकारची बनियागिरी!
महासत्ता होण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा पाया भक्कम असावा लागतो.
Written by विनायक परब
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-08-2017 at 01:07 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic policies of modi government and indian research centers